Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 14 April 2021
Time 7.10AM to 7.25AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १४ एप्रिल
२०२१ सकाळी ७.१० मि.
****
कोरोना विषाणू रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होत आहे, त्यामुळे संपूर्ण
काळजी घेण्याचं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. प्रत्येक नागरिकाने सर्व सुरक्षा
उपायांचं पालन करावं. ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांनी, न घाबरता, लसीकरण
करुन घ्यावं. नाक आणि तोंडाला मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात
वेळोवेळी साबणाने धुवावेत. हात आणि तोंड स्वच्छ ठेवावं. या सहज सुलभ उपायांचा अवलंब
करा आणि सुरक्षित रहा.
****
· राज्यात आज रात्री आठ वाजेपासून १ मे पर्यंत संचारबंदी;
गरीबांची आबाळ होऊ नये म्हणून पाच हजार चारशे कोटी रुपयांचं अर्थसहाय्य.
· अन्न सुरक्षा योजनेच्या सात कोटी लाभार्थींना महिनाभरासाठी
प्रत्येकी तीन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ मोफत, शिवभोजन थाळीही मिळणार फुकट.
· संचारबंदीच्या काळात सर्व अत्यावश्यक सेवा सुरू राहणार,
उपाहारगृहांसोबतच रस्त्यावर खाद्य पदार्थ विकणारेही पार्सल सुविधा देऊ शकणार.
· राज्यात ६० हजार २१२ कोविड रुग्णांची नोंद; मराठवाड्यात
९३ जणांचा मृत्यू तर आठ हजार १९८ बाधित.
· रमजानच्या पवित्र महिन्याला आजपासून सुरुवात; गुढीपाडव्याचा
सण शांततेत आणि उत्साहात साजरा.
· भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या १३०
व्या जयंतीनिमित्त आज सर्वत्र आदरांजली.
आणि
· मराठवाड्याच्या काही भागात अवकाळी पाऊस.
****
राज्यात आज रात्री आठ वाजेपासून पंधरा दिवसांच्या संचारबंदीची घोषणा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. येत्या एक मे पर्यंत राज्यात कलम १४४ अन्वये
ही संचारबंदी लागू असेल. काल सामाजिक संपर्क माध्यमावरून जनतेशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी
याबाबत सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले –
आज संध्याकाळपासून ब्रेक दी चेन म्हणजे ही श्रृंखला तोडायची
आपल्याला. तोडावीच लागेल आणि ती तोडण्यासाठी आपण राज्यात १४४ कलम लागू करतो आहोत. म्हणजेच
आजपर्यंत ही दिवसा जमावबंदी आणि रात्री संचारबंदी असं होतं, कधी रात्री जमावबंदी करत
होतो. आता मात्र आपल्याला पुढचे किमान १५ दिवस राज्यामधे संचारबंदी लागू करावी लागत
आहे. सकाळी सात ते रात्री आठ या काळामधे आपण अत्यावश्यक सेवा ज्या आहेत त्या आपण चालू
ठेवणार आहोत.
संचारबंदीच्या काळात कोणाचीही आबाळ होऊ देणार नाही, असं सांगत, गरजूंसाठी
मुख्यमंत्र्यांनी पाच हजार चारशे कोटी रुपयांचं अर्थसहाय्य जाहीर केलं. या अंतर्गत
अन्न सुरक्षा योजनेच्या सात कोटी लाभार्थींना, पुढच्या महिन्यासाठी प्रत्येकी तीन किलो
गहू आणि दोन किलो तांदूळ मोफत दिला जाणार आहे. शिवभोजन थाळी पुढचा महिनाभर गरजूंसाठी
मोफत दिली जाणार आहे. दारिद्र्य रेषेखालील, गोरगरीब तसंच निराधार नागरिकांसाठीच्या
विविध पाच योजनांमधल्या लाभार्थींना, दोन महिन्याचं मानधन आगाऊ दिलं जाणार आहे. नोंदणीकृत
बांधकाम कामगार, नोंदणीकृत घरेलु कामगार, अधिकृत फेरीवाले, तसंच परवानाधारक रिक्षाचालकांना,
दीड हजार रुपये अर्थसहाय्य दिलं जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
जिल्हा प्रशासनाला कोविड उपचारासाठी तीन हजार तीनशे कोटी रुपये राखीव
ठेवले जात असल्याची माहितीही, मुख्यमंत्र्यांनी दिली.
संचारबंदीच्या या काळात रुग्णालयं, औषधी दुकानं, यासह सर्व अत्यावश्यक
सेवा सुरू राहणार आहेत. उपाहारगृहांसोबतच रस्त्यावर खाद्यपदार्थ विकणारे विक्रेतेही,
पार्सल सुविधा देऊ शकणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. या काळात सुरू राहणाऱ्या
इतर आस्थापनांबाबत माहिती देताना मुख्यमंत्री म्हणाले –
या काळामधे आपण अत्यावश्यक सेवा ज्या आहेत त्या आपण चालू
ठेवणार आहोत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद करत नाही आहोत. बस सेवा बंद करत नाही आहोत.
मात्र, त्या केवळ आणि केवळ आवश्यक अतीआवश्यक कामासाठीच वापरल्या जातील. रुग्णालये आहेत,
दवाखाने आहेत, वैद्यकीय, विमा, औषधी कंपन्या, औषधी दुकाने, वैद्यकीय सेवा देणारे, काही
डिलर्स आहेत, वाहतूक सप्लाय चेन आहे, लस उत्पादक व वाहतूक करणारे, दूरसंचार सेवा व
त्यांच्याशी संबंधित, देखभाल व दुरूस्ती करणारे, पेट्रोलपंप चालू राहतील. पेट्रोलियम
उत्पादनं आहेत. कार्गो सेवा, डेटा सेंटर, आयटी सेवा, शासकीय व खाजगी सुरक्षा मंडळं
या सगळ्या गोष्टी या आपण चालू ठेवतो आहोत.
दरम्यान, राज्यात कोविड रुग्णांसाठी लागणाऱ्या वाढीव प्राणवायूचा पुरवठा
हवाई मार्गाने करण्याची विनंती केंद्र सरकारकडे करणार असल्याचं, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
नागरिकांनी या सर्व नियमांचं पालन करून सरकारला सहकार्य करावं, असं आवाहन त्यांनी केलं.
****
कोविड लसीकरणाची व्याप्ती वाढवण्यासाठी केंद्र सरकारनं, परदेशात विकसित
लसींच्या आपात्कालीन वापराला परवानगी देण्याच्या प्रक्रियेला, गती दिली आहे. कोविड
लसीकरणासंदर्भात स्थापन विशेषज्ञांच्या राष्ट्रीय समूहानं, या लसींचा वापर करण्याची
शिफारस केली आहे. जागतिक आरोग्य संघटना - डब्ल्यू एच ओ नं या लसींचा, त्यांच्या आपत्कालीन
वापराच्या लसींच्या यादीत समावेश केलेला आहे. भारतात सर्वप्रथम या लसी शंभर जणांच्या
समूहाला देण्यात याव्यात, त्या सर्वांवर आठवडाभर निगराणी ठेवावी, त्यानंतरच देशात सर्वत्र
या लसी देण्यात याव्यात, असं या समूहानं म्हटलं आहे.
****
राज्यात काल ६० हजार २१२ कोविड रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे राज्यभरातल्या
कोविडबाधितांची एकूण संख्या ३५ लाख १९ हजार २०८ झाली आहे. काल २८१ रुग्णांचा उपचारादरम्यान
मृत्यू झाला, राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, ५८ हजार ५२६
झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ६६ शतांश टक्के झाला आहे. काल ३१ हजार ६२४ रुग्ण या
संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत २८ लाख ६६ हजार ९७ रुग्ण, कोरोना विषाणू
मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ८१ पूर्णांक ४४ शतांश टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात
पाच लाख ९३ हजार ४२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
मराठवाड्यात काल नव्या आठ हजार १९८ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद
झाली, तर ९३ रुग्णांचा या संसर्गानं मृत्यू झाला. मृतांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या
२१, नांदेड जिल्ह्यातल्या २७, परभणी १५, हिंगोली आणि बीड जिल्ह्यातल्या प्रत्येकी आठ,
तर जालना आणि उस्मानाबाद जिल्ह्यातल्या प्रत्येकी सात रुग्णांचा समावेश आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात काल एक हजार ३५२ रुग्ण आढळले. नांदेड जिल्ह्यात
एक हजार ६६४, लातूर एक हजार ९१६, बीड एक हजार २८, जालना ८६४, उस्मानाबाद ५९०, परभणी
५३२, तर हिंगोली जिल्ह्यात २५२ नवे रुग्ण आढळून आले.
****
औरंगाबाद शहरातल्या सर्व ११५ प्रभागात काल कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण
मोहीम सुरु होती. आजही यासर्व ठिकाणी लसीकरण मोहीम सुरू राहणार असल्याची माहिती, आरोग्य
वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी दिली. ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांना केाविड
लस देण्यात यावी, यासाठी महापालिकेच्या वतीनं जम्बो कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरु
केलेली आहे.
****
राज्यातल्या प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड उपचार केंद्र
सुरू केल्यास, प्रत्येक जिल्ह्यात कोविड रूग्णांना तीन हजार खाटा उपलब्ध होतील, अशी
सूचना नांदेड इथले सामाजिक कार्यकर्ते दिपक मोरताळे यांनी केली. मोरताळे यांनी पंतप्रधान
नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यालयाला, ही सूचना ई-मेलव्दारे
पाठवली आहे. शिवाय प्रत्येक जिल्ह्यात आरोग्य विभागाचे सरासरी एक हजार आरोग्य कर्मचारी
उपलब्ध असल्याचंही, त्यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान कार्यालयाने त्यांच्या या सूचनेची
दखल घेतली आहे. चांगली सूचना केल्याचं पंतप्रधान कार्यालयानं मोरताळे यांना पाठवलेल्या
ई मेलमध्ये म्हटलं आहे.
****
कोविड उपचारासाठी वापरात येणारे रेमडीसिवीर औषध काळ्या बाजारात विकणाऱ्या
तीन जणांना, काल धुळे इथं अटक करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं सापळा रचून
ही कारवाई केली. ही टोळी ग्राहकांना सोळा हजार रुपयांना एक, याप्रमाणे या औषधाची विक्री
करत होती. रेमडीसीवीर औषध, रोख रक्कम, एक मोबाईल, असा एकूण ३८ हजार ८९९ रूपयांचा मुद्देमाल
यावेळी जप्त करण्यात आला.
****
मुंबईत नोकरीसाठी येणाऱ्या महिलांकरता म्हाडाच्या वतीने वसतीगृह उभारलं
जाणार आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी एका ट्विट संदेशातून ही माहिती
दिली. ताडदेव इथं एम पी मिल कंपाउंड परिसरात म्हाडाच्या संक्रमण शिबिराच्या जागेवर,
हे वसतीगृह उभारलं जाणार आहे. ४५० खोल्याचं हे वसतीगृह येत्या दीड ते दोन वर्षांत उभारलं
जाईल, यासाठीची निविदा प्रक्रिया लवकरच पूर्ण केली जाणार असल्याचं, आव्हाड यांनी सांगितलं.
****
रमजानच्या पवित्र महिन्याला आजपासून सुरुवात होत आहे. दिल्लीच्या जामा
मशिदचे शाही इमाम सैय्यद अहमद बुखारी आणि चाँद दिदार समितीनं ही घोषणा केली. पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी रमजानच्या पवित्र महिन्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
****
राज्यात गुढीपाडव्याचा सण काल शांततेत आणि उत्साहात साजरा झाला. नागरिकांनी
आपापल्या घरी गुढी उभारून नवीन वर्षाचं स्वागत केलं. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर,
सर्वांनी नियमांच पालन करत सण पारंपरिक पद्धतीनं, मात्र साधेपणानं साजरा केला. औरंगाबाद
जिल्ह्यात श्री क्षेत्र पैठण इथं मोजक्याच नागरिकांच्या उपस्थितीत, तीर्थस्तंभ परिसरात
नगराध्यक्ष शेखर पाटील यांच्या हस्ते गुढी उभारण्यात आली.
****
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त
आज सर्वत्र आदरांजली वाहिली जात आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आंबेडकर जयंतीनिमित्त
देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. नागरीकांनी आंबेडकर यांचे विचार आत्मसात करुन सुदृढ
आणि समृद्ध भारताच्या निर्माणात योगदान द्यावं, असं राष्ट्रपतींनी म्हटलं आहे. पंतप्रधान
नरेंद्र मोदी, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित
पवार यांनीही जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. बाबासाहेब आंबेडकरांच्या उदारमतवादी विचारांचं,
मानवतावादी शिकवणींचं पालन करुन, देश हितासाठी, समाजाच्या भल्यासाठी आपण सर्वजण, त्यांची
जयंती आपापल्या घरीच साजरी करु या, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे.
इतर मागास बहुजन विकास मंत्री विजय वडेट्टीवार यांनी, डॉ. आंबेडकर यांची
जयंती गर्दी न करता, शांतता आणि संयम ठेवून आपापल्या घरातच साजरी करावी, असं आवाहन
केलं आहे.
****
नागपूरच्या दीक्षाभूमी इथं बाबासाहेबांची जयंती साधेपणानं साजरी केली
जाणार असल्याची माहिती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे सचिव डॉ सुधीर फुलझेले
यांनी दिली. आज सकाळी नऊ वाजता समितीचे अध्यक्ष भदंत नागार्जुन सुरई ससाई यांच्या हस्ते,
डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत भगवान बुद्धांना माल्यार्पण करून, बुद्ध वंदना होईल.
या कार्यक्रमाला मोजक्या संख्येत भिक्खुसंघ आणि समितीचे पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याचं,
फुलझेले यांनी सांगितलं.
****
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या मुख्य प्रशासकीय इमारतीत,
आज भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचं पूर्णाकृती तैलचित्र लावण्यात येणार आहे. विद्यापीठाचे
माजी अधिष्ठाता तथा ज्येष्ठ चित्रकार प्राध्यापक दिलीप बडे यांनी हे तैलचित्र रेखाटलं
आहे. शाहीर वामन दादा कर्डक यांनी रचलेल्या गीतांच्या ‘गीत भीमायन’ या ध्वनिफितीचं
विमोचनही ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या हस्ते आज ऑनलाईन पद्धतीनं होणार आहे.
****
जालना जिल्ह्यातल्या माळशेंद्रा इथं जिल्हा प्रशासनातर्फे डॉ.बाबासाहेब
आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त काल रक्तदान शिबीर घेण्यात आलं, या शिबिरात ६० जणांनी
रक्तदान केलं
परभणी जिल्ह्यात आंबेडकर जयंतीनिमित्त दरवर्षी काढण्यात येणारी मिरवणूक
रद्द करून, प्रशासनाला सहकार्य करणार असल्याचं आश्वासन, जयंती समिती अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांनी
दिलं आहे.
****
नांदेड शहरातल्या नंदीग्राम गृहनिर्माण सोसायटीतून जिल्हा पोलिस गुन्हे
शाखेच्या पथकानं, काल एक गावठी पिस्तूल आणि चार काडतूसं जप्त केली. या सोसायटीत राहणाऱ्या
गोविंदसिंघ हरिसिंघ पुजारी याच्याकडे गावठी पिस्तूल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली
होती, त्यावरून गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई करत, त्याला अटक केली.
****
परभणी येथील शेकहँड फाऊंडेशन ही समाजातील आर्थिक दुर्बल विधवा महिलांना
उदरनिर्वाहाची साधनं उपलब्ध करून देतात. तसेच त्यांच्या मुलांना मोफत शैक्षणिक साहित्य
पुरवतात. वर्षभरात येणारे सण आणि महापुरूषांच्या जयंतीचे औचित्याने हा उपक्रम राबवला
जातो. याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे परभणीचे वार्ताहर –
रविवारी महात्मा फुले यांच्या
जयंतीनिमित्त परभणी तालुक्यातील आशाताई माने यांना दाळ बनवण्याची गिरणी देण्यात आली.
यासंदर्भात फाऊंडेशनचे कार्यवाहक शरद बोहत म्हणाले “शेकहँड फाऊंडेशन हे विधवा ताईंसाठी
काम करणारे फाऊंडेशन असून या फाऊंडेशन मार्फत प्रत्येक सण तसेच महापुरूंषांच्या जयंतीनिमित्त
विधवा ताईंना उदरनिर्वाहाचे साधन दिले जाते. आजपर्यंत १०० च्या वर महिलांना ही साधनं
देण्यात आलेली आहेत. विविध जिल्ह्यांमधे याचं काम चालतं.” शेकहँड फाऊंडेशनचे कार्य
समाजासाठी निश्चितच समाधानकारक होय.
आकाशवाणी बातम्यांसाठी परभणीहून विनोद कापसीकर
****
जालना-मुंबई जनशताब्दी विशेष रेल्वे आज रद्द करण्यात आली आहे. दक्षिण
मध्य रेल्वेच्या जनसंपर्क कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे.
****
मराठवाड्याच्या काही भागात कालही अवकाळी पाऊस झाला. औरंगाबाद शहर आणि
परिसरात काल अवकाळी पावसानं हजेरी लावली. नांदेड जिल्ह्यात नायगाव तसंच मांजरम भागात,
लातूर जिल्ह्याच्या कासार शिरशीसह परिसरात, हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी तसंच औंढा तालुक्यात
तर परभणी जिल्ह्यात पूर्णा तालुक्यात काही भागात पाऊस झाल्याचं वृत्त आहे. नांदेड जिल्ह्याच्या
लोहा तालुक्यातल्या सायाळ इथले शेतकरी तुकाराम मोरताटे यांच्या अंगावर वीज पडल्यामुळे
त्यांचा जागीच मृत्यू झाला. या पावसामुळे आंबा तसंच ज्वारीवर परिणाम होण्याची भीती
वर्तवली जात आहे. हळद उत्पादक शेतकऱ्यांचीही काल पावसामुळे तारांबळ उडाली.
****
देशाचे २४ वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून सुनील चंद्रा यांनी काल पदभार
स्वीकारला. गेल्या वर्षी चंद्रा यांची निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती झाली होती.
****
परभणी जिल्ह्यात वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील ट्रायकोडर्मा
जैविक बुरशीनाशक उत्पादन विभागाचे कुलगुरू डॉ.अशोक ढवण यांच्या हस्ते काल उद्घाटन करण्यात
आलं. विद्यापीठ निर्मित ट्रायकोडर्मा जैविक बुरशीनाशकाचा खरीप हंगामात जास्तीत जास्त
शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचा विश्वास कुलगुरू ढवण यांनी व्यक्त केला.
****
No comments:
Post a Comment