Wednesday, 14 April 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 14.04.2021 रोजीचे दुपारी 13.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 14 April 2021

Time 1.00pm to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – १४ एप्रिल २०२१ दुपारी १.०० वा.

****

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आज उत्साहात आणि कोविड प्रतिबंधाचे नियम पाळून साजरी होत आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात बाबासाहेबांच्या तैलचित्राचं अनावरण ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते झालं. भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना समजून घेणं सोपं नाही, त्यांच्या काही इंग्रजी ग्रंथांचा अनुवाद अद्यापही झाला नाही, म्हणून सर्व सामान्य जनतेला बाबासाहेब समजून सांगण्यासाठी कवी, लेखक, साहित्यिकांनी पुढे येण्याचं आवाहन, राऊत यांनी यावेळी केलं. औरंगाबाद हे आंबेडकरी चळवळीचं प्रमुख केंद्र आहे, या भूमीनं आजही आंबेडकर चळवळ जिवंत ठेवली असल्याचं, त्यांनी नमूद केलं. विद्यापीठाचे माजी अधिष्ठाता तथा ज्येष्ठ चित्रकार प्राध्यापक दिलीप बडे यांनी हे तैलचित्र रेखाटलं आहे. त्याचबरोबर शाहीर वामन दादा कर्डक यांनी रचलेल्या गीतांच्या ‘गीत भीमायन’ या ध्वनिफितीचं विमोचनही राऊत यांच्या हस्ते झालं. 

****

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, यांनी आज सकाळी मुंबईत चैत्यभूमी स्मारक इथं बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं.

नागपूर मध्ये दीक्षाभूमी इथं असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई आणि सचिव सुधीर फूलझेले यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी समता सैनिक दलाच्या वतीनं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सलामी देण्यात आली, तसंच स्तुपतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाला देखील अभिवादन करण्यात आलं आणि बुद्धवंदना घेण्यात आली.

****

आकाशवाणी औरंगाबाद केंद्रातही अधिकारी कर्मचाऱ्यांनी कोविड प्रतिबंधाचे नियम पाळून बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं.

****

राज्यातल्या युवक-युवतींना कौशल्याधारित उच्च शिक्षणाद्वारे रोजगार, स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात या हेतूने राज्यात महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ स्थापन करण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ अधिनियम आजपासून म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी अंमलात येत असल्याची माहिती, कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली. महाराष्ट्रात उद्योगांच्या मागणीनुसार तांत्रिक क्षमता आणि कुशल मनुष्यबळ निर्माण व्हावं, हा या विद्यापीठाच्या स्थापनेचा उद्देश आहे. कौशल्य विकास विभागामार्फत राज्यात सहा विभागीय ठिकाणी उत्कृष्टता केंद्र उभारण्याचंही प्रस्तावित आहे, ही सहा केंद्रं राज्य कौशल्य विद्यापीठाची विभागीय केंद्रे म्हणून काम पाहतील, अशी माहितीही मलिक यांनी दिली.

****

देशातल्या वाढत्या कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राज्यापाल आणि उपराज्यपालांशी चर्चा करणार आहेत. गेल्या आठवड्यात या मुद्यावर पंतप्रधानांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली होती.

****

देशात लसीची कमतरता नाही, मात्र राज्यांनी लसीकरणाचं योग्य नियोजन केलं नसल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. राज्यांनी लसीच्या उपलब्धतेबाबत योग्य नियोजन करावं आणि मागणीनुसार वितरणाची योग्य व्यवस्था करावी, असे निर्देश केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दिले आहेत.

****

वाढत्या कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर देशात संपूर्ण टाळेबंदी लावण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही, असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. जागतिक बँक समुहाचे प्रमुख डेविड मालपास यांच्यासोबत झालेल्या चर्चेदरम्यात त्या बोलत होत्या. सरकार अर्थव्यवस्थेला कोणतीही बाधा पोहोचू देणार नाही आणि कोविडचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी स्थानिक पातळीवर अनेक उपाययोजना केल्या जात असल्याचं, सीतारामन म्हणाल्या.

****

देशात काल नव्या एक लाख ८४ हजार ३७२ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर एक हजार २७ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. देशातली एकूण कोविड बाधितांची संख्या एक कोटी ३८ लाख ७३ हजार ८२५ झाली असून, या संसर्गानं आतापर्यंत एक लाख ७२ हजार ८५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर काल ८२ हजार ३३९ रुग्ण बरे झाले, देशात आतापर्यंत एक कोटी २३ लाख ३६ हजार रुग्ण, कोरोना विषाणू मुक्त झाले असून, सध्या १३ लाख ६५ हजार रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

जालना-मुंबई जनशताब्दी विशेष रेल्वे उद्या १५ एप्रिल रोजी रद्द करण्यात आली आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या जनसंपर्क कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे.

****

विदर्भ, मराठवाड्यात अवकाळी पावसाचा हा फेरा उद्यापर्यंत राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. या पावसामुळे उन्हाची काहिली काहीशी कमी झाली असून, मध्य महाराष्ट्राच्या बहुतांश भागात तापमानात लक्षणीय घट झाली. मराठवाड्याच्या काही भागात तर विदर्भात तुरळक ठिकाणी तापमानात अल्पशी घट झाली आहे.

****

No comments:

آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 29 جون 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 29 June-2026 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبریں ...