Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 15 April 2021
Time 7.10AM to 7.25AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १५ एप्रिल
२०२१ सकाळी ७.१० मि.
****
कोरोना विषाणू रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होत आहे, त्यामुळे
संपूर्ण काळजी घेण्याचं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. प्रत्येक नागरिकाने
सर्व सुरक्षा उपायांचं पालन करावं. ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांनी,
न घाबरता, लसीकरण करुन घ्यावं. नाक आणि तोंडाला मास्क लावावा, एकमेकांपासून
सुरक्षित अंतर राखावं, हात वेळोवेळी साबणाने धुवावेत. हात आणि तोंड स्वच्छ ठेवावं.
या सहज सुलभ उपायांचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा.
****
· राज्यात कोरोना विषाणू संसर्गाची साखळी
तोडण्यासाठी संचारबंदी लागू; रस्त्यांवरची वर्दळ घटली.
· संचारबंदीच्या निर्बंधांची अतिशय काटेकोरपणे
अंमलबजावणी करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रशासनाला निर्देश.
· केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाची बारावीची
परीक्षा पुढे ढकलली तर दहावीची परीक्षा रद्द.
· औरंगाबादच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा
विद्यापीठाच्या सर्व परीक्षा दोन मे पर्यंत स्थगित.
· राज्यात ५८ हजार ९५२ नवीन कोविड रुग्णांची नोंद,
मराठवाड्यात ११४ जणांचा मृत्यू तर आठ हजार ४६८ बाधित.
· माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची जवळपास दहा
तास सी बी आय चौकशी.
· भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना
त्यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त देशभर आदरांजली.
· राज्याच्या काही भागात अवकाळी पाऊस.
आणि
· औरंगाबाद जिल्हा केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट
असोसिएशनचे अध्यक्ष रावसाहेब खेडकर यांचं निधन.
****
राज्यात कोरोना विषाणू संसर्गाची साखळी तोडण्यासाठी काल रात्री आठ
वाजेपासून संचारबंदी लागू करण्यात आली. संचारबंदी लागू झाल्यानंतर शहरांमधील
रस्त्यांवरची वर्दळ घटल्याचं दिसून आलं. एक मे पर्यंत ही संचारबंदी लागू राहणार
असून, या काळात केवळ आवश्यक सेवा सुविधा सुरु राहणार आहेत. ज्यात कोविड-19 ची
दुसरी लाट आली असून, या लाटेमध्ये बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रुग्ण
वाढीची ही साखळी तोडण्यासाठी ही संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या काळात आर्थिक
दुर्बल घटकांना दिलासा देण्यासाठी, राज्य सरकारनं मदतीची घोषणा केली आहे. यामध्ये
अन्न सुरक्षा योजनेच्या लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्य योजनेतून, प्रति व्यक्ती तीन
किलो गहू, आणि दोन किलो तांदूळ एक महिनाभर मोफत देण्यात येईल. त्याचबरोबर महिनाभर
शिवभोजन थाळीही मोफत देण्यात येणार आहेत. निवृत्तीवेतन योजनेतल्या लाभार्थ्यांनाही
दोन महिन्यांकरिता प्रत्येकी एक हजार रुपयांचं आर्थिक सहाय्य आगाऊ देण्यात येणार
आहे.
दरम्यान, संचारबंदी काळात निर्बंधांची अतिशय काटेकोरपणे अंमलबजावणी
होईल याकडे सर्व जिल्हाधिकारी तसंच पोलीस यंत्रणेनं लक्ष द्यावं, असे निर्देश
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. यासंदर्भातल्या बैठकीत ते काल बोलत
होते. जीवनावश्यक आणि आवश्यक सेवा सुविधांचा वापर करताना नियम मोडले जात आहेत
किंवा गर्दी होत आहे असे दिसून आल्यास त्या सुविधा स्थानिक प्रशासनानं तात्काळ बंद
कराव्यात, अशा स्पष्ट सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.
****
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ - सी बी एस ईच्या बारावीच्या
परीक्षा पुढे ढकलण्याचा तर दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय, केंद्र
सरकारनं घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत केंद्रीय शिक्षण
मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची काल नवी दिल्लीत बैठक झाली, या बैठकीत आगामी
महिन्यात होणाऱ्या, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या परीक्षेशी संबंधित
बाबींचा, आढावा घेण्यात आला. सध्याच्या वाढत्या कोरोना विषाणू संसर्गाचा विचार
करुन हा निर्णय घेण्यात आला असल्याचं, केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं स्पष्ट केलं
आहे. पुढे ढकलण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेच्या तारखा एक जून रोजी साथीच्या
स्थितीचा आढावा घेतल्यानंतर निश्चित करण्यात येतील. परीक्षेच्या तारखांबाबत १५
दिवस अगोदर विद्यार्थ्यांना सूचना देण्यात येईल, असं मंत्रालयानं म्हटलं आहे.
दहावीच्या परीक्षा मात्र रद्द करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. दहावीच्या
विद्यार्थ्यांच्या निकालासाठी मंडळ निकष निश्चित करणार आहे. या निकषानुसार
लावण्यात आलेल्या निकालाबाबत समाधानी नसलेल्या विद्यार्थ्यांना, कोविड परिस्थितीत
सुधारणा झाल्यानंतर परीक्षा देण्याची संधी उपलब्ध करुन दिली जाईल, असं मंत्रालयानं
स्पष्ट केलं आहे. कोविड-19 च्या वाढत्या प्रकोपाच्या पार्श्वभूमीवर अनेक राज्यांनी
परीक्षा रद्द करण्याची मागणी केली होती, त्यानुसार हा निर्णय घेण्यात आल्याचं
मंडळानं म्हटलं आहे.
****
औरंगाबादमधल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या,
सर्व कला, वाणिज्य, विज्ञान तसंच अभियांत्रिकी शाखेच्या पदवी परीक्षा, दोन मे
पर्यंत स्थगित करण्यात आल्या आहेत. तसंच इतर अभ्यासक्रमांच्या परीक्षाही २७ एप्रिल
ऐवजी, पाच मे पासून सुरू होणार आहे. कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कुलगुरू
डॉक्टर प्रमोद येवले यांनी, परीक्षा पुढे ढकलण्याचे आदेश परीक्षा विभागाला दिले
आहेत. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी उर्वरित परीक्षा ऑफलाईन ऐवजी ऑनलाईन पद्धतीनं
द्यावी, असं आवाहन परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉक्टर योगेश पाटील यांनी
केलं आहे.
****
कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटावर मात करण्यासाठी प्रत्येक पात्र
लाभार्थ्यांनं लसीकरण करुन घ्यावं, असं आवाहन ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी
केलं आहे. ही लस पूर्णपणे सुरक्षित असल्याचं त्यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं –
आपण
सगळेच बघतोय की कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आल्याच्या वाटत असतानाच पुन्हा वाढायला लागला.
त्याच्यापासून बचाव करण्यासाठी आपण सगळेच प्रयत्नही करतो आहोत. आता आपल्याला एकच गोष्ट
करायचीय अन ती म्हणजे कोविड वरची लस घ्यायचीये. घाबरू नका, ती पूर्णपणे सुरक्षित आहे.
लस घ्यायला पात्र असलेल्या नागरिकांना माझं आवाहन आहे, पुढे या लस घ्या आणि स्वतःसह
आपल्या कुटुंबियांना आणि देशातल्या सगळ्या नागरिकांना कोरोनापासून सुरक्षित करण्यात
आपलं योगदान द्या.
****
देशात कोविड-19च्या उपचारासाठी आवश्यक रेमडेसीवीर इंजेक्शनच
उत्पादन आणि पुरवठा वाढवण्याचा, तसंच या इंजेक्शनच्या किंमती कमी करण्याचा निर्णय,
केंद्र सरकारनं घेतला आहे. देशातल्या सहा उत्पादकांना दर महिन्याला सात वेगवेगळ्या
केंद्रांवर, दहा लाख इन्जेक्शनचं उत्पादन करण्यास सरकारनं परवानगी दिली असल्याचं,
केंद्रीय रसायन आणि खते मंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितलं. सध्या सात
उत्पादकांची प्रतिमाह ३८ लाख ८० हजार मात्रा निर्मितीची क्षमता आहे. आता या
कंपन्यांनी आणखी ३० लाख मात्रा उत्पादित करण्याची तयारी दाखवली आहे. यामुळे या
इंजेक्शनचं दरमहा उत्पादन ७८ लाख मात्रांवर पोहोचेल. उत्पादकांनी इंजेक्शनच्या
किंमती कमी करण्याची तयारी दर्शवली असून, येत्या आठवडाभरात इंजेक्शनच्या किंमती
कमी होतील, असा विश्वास मंत्रालयानं व्यक्त केला आहे.
****
रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार होऊ नये म्हणून सरकारनं उपाययोजना
केली असल्याची माहिती, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. जालन्यात खासगी कोविड
रुग्णालयांना दहा हजार रेमडेसिवीर इंजेक्शनचं, काल टोपे यांच्या हस्ते वाटप
करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. हाफकीन कंपनीमार्फत राज्य सरकार इंजेक्शनची
खरेदी करुन, शासकीय रुग्णालयांना पुरवठा करणार आहे, तसंच खाजगी रुग्णालयांना
पुरवण्यात येणाऱ्या इंजेक्शनवर अन्न आणि औषध प्रशासनाचं नियंत्रण राहील, असं
स्पष्ट करतांना ते म्हणाले –
जे
रेमडेसिवीर काही दिवसांपूर्वी खूप जास्त ब्लॅक मार्केटींगच्या पध्दतीने होत असायचं
त्याच्यावर आता एफडीए आणि कलेक्टरचा कंट्रोल राहील. रेट्स वर कंट्रोल राहील. त्यामुळे
चौदाशे-पंधराशेच्या आतमध्येच रेमडेसिवीर विकल्या जाणार आहे. कंपनी तर देणार नाहीच,
परंतू चुकीच्या पध्दतीने स्टॉकींग करुन ब्लॅक मार्केटींग करण्याचं काम आज कुठल्याही
ट्रेडर्सनी करु नये. कंपनी आणि गव्हर्नमेंट, कंपनी आणि कलेक्टर एवढाच विषय राहिलेला
आहे. स्टॉकिस्ट हा फक्त कलेक्टरच्या नियंत्रणाखाली काम करणारी एक व्यवस्था राहिलेली
आहे. त्यामुळे मला विश्वास आहे, जी एक कमतरता निर्माण झाली होती, ती कमतरता निश्चितप्रकारे
या सिस्टीममुळे निघून जाईल.
राज्यात सध्या प्राण वायुच्या सिलेंडर्सचा तुटवडा असून जालना
जिल्ह्यात घनसावंगी इथं येत्या १५ दिवसांत हवेतील प्राण वायू शोषून घेणारा प्रकल्प
प्रायोगिक तत्त्वावर उभारण्यात येत आहे. हा प्रकल्प यशस्वी झाला तर संपूर्ण
राज्यात असे प्रकल्प उभारले जातील, यामुळे जल प्राण वायुला नवा पर्याय मिळेल,
असंही टोपे यांनी यावेळी सांगितलं.
****
राज्यात काल ५८ हजार ९५२ कोविड रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे
राज्यभरातल्या कोविडबाधितांची एकूण संख्या ३५ लाख ७८ हजार १६० झाली आहे. काल २७८
रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची
एकूण संख्या, ५८ हजार ८०४ झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ६४ शतांश टक्के झाला
आहे. काल ३९ हजार ६२४ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत २९ लाख
०५ हजार ७२१ रुग्ण, कोरोना विषाणू मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ८१ पूर्णांक
२१ शतांश टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात सहा लाख १२ हजार ७० रुग्णांवर उपचार
सुरू आहेत.
****
मराठवाड्यात काल नव्या आठ हजार ४६८ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची
नोंद झाली, तर ११४ रुग्णांचा या संसर्गानं मृत्यू झाला. मृतांमध्ये औरंगाबाद
जिल्ह्यातल्या २७, नांदेड जिल्ह्यातल्या २८, परभणी २०, उस्मानाबाद १४, जालना आणि
लातूर जिल्ह्यातल्या प्रत्येकी आठ, बीड सात, तर हिंगोली जिल्ह्यातल्या दोन
रुग्णांचा समावेश आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात काल एक हजार ७१८ रुग्ण आढळले. नांदेड जिल्ह्यात
एक हजार ४३९, लातूर एक हजार ७६१, परभणी एक हजार १७२, बीड ९२८, जालना ७०१,
उस्मानाबाद ६१३, तर हिंगोली जिल्ह्यात १३६ नवे रुग्ण आढळून आले.
****
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची काल केंद्रीय गुन्हे अन्वेषण
विभाग - सी बी आयनं जवळपास दहा तास चौकशी केली. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर
सिंग यांनी त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराचे आरोप केले असून, उच्च न्यायालयानं
त्यांची केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागामार्फत प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश दिले
आहेत. १५ दिवसांत प्राथमिक चौकशी पूर्ण करण्याचे आदेश न्यायालयानं सीबीआयला दिले
आहेत.
****
रमजान महिन्यातली सामुदायिक नमाज पठण करण्याची मागणी करणारी याचिक
मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली आहे. एक सामाजिक संस्थेनं ही याचिका दाखल केली
होती. सध्याची परिस्थिती आणि गंभीर आणि चिंताजनक असून, नागरिकांची सुरक्षा
सर्वाधिक महत्त्वाची असल्याचं, उच्च न्यायालयानं म्हटलं आहे.
****
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या १३० व्या
जयंतीनिमित्त काल त्यांना आदरांजली वाहण्यात आली.
मुंबईत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी चैत्यभूमीवर जाऊन डॉ.
बाबासाहेब आंबेडकरांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करुन अभिवादन केलं.
यावेळी सामुदायिक त्रिशरण बुद्ध वंदना करण्यात आली.
नागपूरमध्ये दीक्षाभूमी इथं असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांच्या पुतळ्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य
नागार्जुन सुरई ससई आणि सचिव सुधीर फुलझेले यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन
केलं.
****
औरंगाबादमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात
मुख्य प्रशासकीय इमारतीत लावण्यात आलेलं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं
तैलचित्र, तसंच 'गीत भीमायन' ध्वनिफितीचं विमोचन, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या
हस्ते काल दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आलं. यावेळी बोलतांना ते म्हणाले –
डॉ.बाबासाहेब
आंबेडकर यांना समजून घेण अत्यंत महत्वाचं आहे. हे खरं असलं तरी बाबासाहेब समजणे तितके
सोपे सुध्दा नाही. आणि म्हणूनच त्यांचा काही इंग्रजी ग्रंथाचा अनुवाद अद्यापही आपल्याला
करता आलेला नाही. म्हणून सर्वसामान्य जनतेला बाबासाहेब समजून सांगण्यासाठी कवी, लेखक
व साहित्यिकांनी पुढे आले पाहिजे.
जालना जिल्ह्यात पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांनी मस्तगड इथल्या
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.
परभणी, लातूरमध्येही बाबासाहेबांना आदरांजली वाहण्यात आली.
नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू
डॉ. उद्धव भोसले यांनी, विद्यापीठातल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस
पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. नांदेडच्या महापौर मोहिनी येवनकर, आमदार अमरनाथ
राजूरकर, जिल्हाधिकारी डॉ विपिन ईटनकर, यांच्यासह इतर मान्यावरांनी, डॉ. बाबासाहेब
आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.
उस्मानाबाद इथं भारतीय जनता पक्षाच्या वतीनं डॉ. बाबासाहेब आंबेडकर
जयंतीनिमीत्त त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आलं.
****
राज्याच्या काही भागात कालही अवकाळी पाऊस झाला.
औरंगाबाद शहरासह जिल्ह्यातल्या शेंद्रा, कुंभेफळ, करमाड तसंच
लाडगाव परिसरात काल हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला. जालना जिल्ह्यात राजूरसह परिसरात
मेघगर्जनेसह पाऊस झाला. बीड जिल्ह्यात वीजेच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे अनेक
फळबागा आणि काढणी आलेल्या पिकांचं नुकसान झालं. गेवराई तालुक्यातल्या कोळगाव इथं
मोठ्या प्रमाणात काल गारपीट झाली. अंबाजोगाई, परळी, माजलगाव या तालुक्यातही गारपीट
झाली, बीड शहरात सोसाट्याच्या वाऱ्यासह रिमझिम पाऊस झाला.
हिंगोली जिल्ह्यातही वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसामुळे वीजपुरवठा
खंडीत झाला होता.
नांदेड शहरात काल रात्री अर्धा तास मुसळधार पाऊस झाला. नांदेड
तालुक्यातल्या सोमेश्वर, राठी, जैतापूर या भागात गारांचा पाऊस झाला.
नाशिक तसंच धुळे जिल्ह्यात धुळे, साक्री, शिरपूर, शिंदखेडा
तालुक्यात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण असून, काही ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह
तुरळक स्वरूपात पाऊस झाला.
सातारा जिल्ह्यातल्या माण, खटाव, कोरेगाव, सातारा तालुक्यात सलग
चौथ्या दिवशी गारपीटीसह मुसळधार पाऊस झाला. सोलापूर, अहमदनगर, वाशिम, अकोला जिल्ह्यातही
काल पाऊस झाल्याचं आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे.
****
औरंगाबाद जिल्हा केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष
रावसाहेब खेडकर यांचं औरंगाबाद इथं निधन झालं, ते ८० वर्षांचे होते. खेडकर हे
महाराष्ट्र राज्य केमिस्ट असोसिएशनचे उपाध्यक्ष, अखिल भारतीय केमिस्ट असोसिएशनचे
कार्यकारी सदस्य होते. औषधी भवनची संकल्पना ही खेडकर यांनीच मांडली होती,
त्यांच्या पुढाकाराने १९९१ मध्ये औरंगाबादमध्ये देशातल्या पहिल्या औषधी भवनाचं
उद्घाटन झालं होतं.
****
No comments:
Post a Comment