Friday, 16 April 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 16.04.2021 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 16 April 2021

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १६ एप्रिल २०२१ सायंकाळी ०६.१०

****

कोरोना विषाणू रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होत आहे, त्यामुळे संपूर्ण काळजी घेण्याचं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. प्रत्येक नागरिकानं सर्व सुरक्षा उपायांचं पालन करावं आणि ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांनी, न घाबरता, लसीकरण करुन घ्यावं. नाक आणि तोंडाला मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, वेळोवेळी साबणाने हात धुवावेत. हात आणि तोंड स्वच्छ ठेवावं. या सहज सुलभ उपायांचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा.

****

·      औरंगाबाद इथं रेमडेसिवीर औषधाचा काळा बाजार करणारी टोळी गजाआड.

·      रेमडीसिवीर औषधाचा गैरवापर केल्याप्रकरणी जळगाव शहरातल्या चार रुग्णालयांना नोटीस.

·      बीड जिल्ह्यात एक हजार पाच नवे कोविडग्रस्त; तर औरंगाबाद इथं २५ जणांचा मृत्यू.

आणि

·      देशात यंदा सरासरीच्या ९८ टक्के पाऊस पडणार असल्याचा प्राथमिक अंदाज.

****

औरंगाबाद इथं रेमडेसिवीर औषध काळ्या बाजारात चढ्या भावाने विकणारा शासकीय रुग्णालयातला कर्मचारी आणि त्याच्या दोन साथीदारांना आज सापळा रचून अटक करण्यात आली. शहरातल्या पुंडलिक नगर पोलिस ठाणे आणि औषध निरीक्षक कार्यालयानं ही कारवाई केली. शासकीय रुग्णालयाचा कर्मचारी अनिल बहोते हा, मंदार भालेराव आणि खाजगी औषधी विक्री दुकानाचा मालक अभिजीत तौर यांच्या साथीने रेमडेसिवीर औषध काळ्या बाजारात विकत होता. ही माहिती खबऱ्या द्वारे पोलिसांना मिळाली असता ही कारवाई करण्यात आली. ही टोळी रेमडेसिवीर हे औषध १५ हजार रुपयांना विक्री करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

****

रेमडीसिवीर औषधाचा गैरवापर केल्याप्रकरणी जळगाव शहरातल्या चार रुग्णालयांना जिल्हा शल्य चिकित्सकांनी नोटीस बजावली आहे. रेमडीसीवीर औषधाचा गैरवापर, कृत्रिम प्राणवायूचा आवश्यकतेपेक्षा जास्त उपयोग आणि क्षमतेपेक्षा जास्त रुग्णांची दवाखान्यात भरती करून घेणं, यामुळे ही नोटीस बजावण्यात आली असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. याबाबत दोन दिवसांत खुलासा सादर करण्याचे आदेश रुग्णालयांना दिले आहेत.

****

मराठवाड्याचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी आज जालना औद्योगिक वसाहतीमधल्या ऑक्सिजन प्लांट प्राणवायू प्रकल्प केंद्राला भेट दिली. जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे यांच्याकडून सध्याची प्राणवायूची गरज आणि उपलब्ध साठा याबाबतही केंद्रेकर यांनी माहिती घेतली. 

****

बीड जिल्ह्यात आज एक हजार पाच कोविड बाधित रुग्ण दाखल झाले. यामध्ये सर्वाधिक ३४८ रुग्ण बीड इथले, आष्टी १६८, अंबाजोगाई १४२, केज ९८, गेवराई ६७, माजलगाव ६०, वडवणी २२ आणि पाटोदा तसंच शिरुर इथल्या प्रत्येकी २१ रुग्णांचा समावेश आहे.

****

औरंगाबाद इथं आज २५ कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामध्ये २० रुग्ण औरंगाबाद जिल्ह्यातील असून तीन मृत रुग्ण जालना जिल्ह्यातले तर हिंगोली, परभणी आणि जळगाव जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यात या विषाणू संसर्गानं दगावलेल्या मृतांची संख्या आता दोन हजार ९५ झाली आहे. जिल्ह्यातल्या एकूण रुग्णांची संख्या एक लाख चार हजार ५८३ झाली आहे.

****

डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीचे नवनियुक्त सदस्य सचिव डॉ. कृष्णा कांबळे यांचं आज दुपारी नागपूर इथं शासकीय इस्‍पितळात निधन झालं गेल्या १५ दिवसांपासून त्यांच्यावर कोरोना विषाणू संसर्गावर उपचार सुरू होते. डॉ कांबळे नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कर्करोग विभागात गेल्या ३५ वर्षांपासून कार्यरत होते.  

****

कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या टाळेबंदीच्या काळात खरीप हंगामात शेतकऱ्यांना खते, बियाणे, निविष्ठांचा पुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला आहे. सध्या लागू असलेल्या निर्बंधामध्ये बियाणे खते आणि कीटकनाशकांची गुणवत्ता याबद्दल शेतकरी, वाहतूकदार, विक्रेते यांना क्षेत्रीयस्तरावर येणाऱ्या अडचणींचं निराकरण करण्यासाठी हे नियंत्रण कक्ष सुरू करण्याचे निर्देश कृषीमंत्री दादा भुसे यांनी बैठकीत दिले हेाते. या नियंत्रण कक्षाशी दररोज सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत ८४ ४६ ११ ७५ ०० या मोबाईल क्रमांकावर तसंच कृषी विभागचा टोल फ्री क्रमांक १८०० २३ ३४ ००० या क्रमांकावर सुद्धा संपर्क करता येणार आहे. 

****

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उद्या सकाळी ७ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. कोविड संसर्गाचे सर्व नियम पाळून ५२४ मतदान केंद्रांवर मतदार मतदानाचा हक्क बजावतील.

****

अयोध्येमध्ये राम मंदिर उभारणीसाठी देणगीच्या स्वरूपात गोळा करण्यात आलेले सुमारे १५ हजार धनादेश बाउन्स झाले आहेत. बँकेत वटवले न गेलेल्या या सर्व धनादेशांचं एकूण मूल्य २२ कोटी रुपये आहे. काही धनादेश, देणगीदारांच्या बँक खात्यांमध्ये कमी रक्कम असल्यामुळे तर काही धनादेश तांत्रिक चुकांमुळे वटले गेले नसल्याचं, श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाच्या अंकेक्षण अहवालात म्हटलं आहे.  संबंधित देणगीदारांना पुन्हा दान करण्याची विनंती न्यासाकडून करण्यात येत आहे.

****

देशात कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पुरेसा कृत्रिम प्राणवायूचा पुरवठा व्हावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आढावा बैठक घेतली. प्राणवायूची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी मंत्रालयं आणि राज्य सरकार यांच्यात समन्वय साधणं आवश्यक असल्याचं पंतप्रधान यावेळी म्हणाले. केंद्र आणि राज्य याबाबत वेळोवेळी एकमेकांच्या संपर्कात असल्याचं यावेळी नमूद करण्यात आलं.

****

देशात यंदा सरासरीच्या ९८ टक्के पाऊस पडणार असल्याचा प्राथमिक अंदाज केंद्रीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. या संदर्भातील परिपत्रक हवामान विभागानं जाहीर केले आहे. प्रशांत महासागर आणि हिंद महासागर यामध्ये होणाऱ्या अनुकूल बदलांमुळे देशात मोसमी पाऊस समाधानकारक राहणार असल्याचं हवामान विभागातर्फे सांगण्यात आलं आहे.

****

राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे यांची यवतमाळ जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचा शासननिर्णय आज जारी करण्यात आला.

****

नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार वसंत चव्हाण तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हरिहर भोसीकर यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली. नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत २१ पैकी १७ जागा महाविकास आघाडीनं जिंकल्या होत्या. तर भारतीय जनता पक्षाचे चार उमेदवार विजयी झाले होते.

****

औरंगाबाद शहरात संचारबंदी काळात सर्व बाजारपेठा बंद असूनही रस्त्यांवर वर्दळ दिसून येत आहे. त्यामुळे पोलिस प्रशासन आणि महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीनं, विनाकारण बाहेर फिरणाऱ्या नागरिकांची कोविड अँटीजन चाचणी करण्यात येत आहे. यासाठी आरोग्य विभागाची १२ फिरती पथकं तैनात करण्यात आल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ.नीता पाडळकर यांनी दिली आहे. पोलिसांनी लावलेल्या नाकाबंदीच्या ठिकाणी ही अँटीजन चाचणी केली जात आहे. या चाचणीत कोविड बाधित आढळलेल्या रुग्णांना तत्काळ कोविड केंद्रात दाखल करण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं. 

औरंगाबाद इथं कांचनवाडी परिसरात काही उपाहारगृहं सुरू होती, या उपहारगृहांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिले.

****

हिंगोली शहरात संचारबंदी दरम्यान विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची कोविड चाचणी केली जात आहे. यामध्ये आज दोघे जण कोरोना विषाणू बाधित आढळून आले. त्यांना कोविड रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी दिली.

****

उस्मानाबाद जिल्ह्यात कोविड निर्बंध अधिक कडक करण्यात आले आहेत. जिल्ह्यात अत्यावश्यक सेवा आता दुपारी २ वाजेपर्यंतच सुरु राहतील. जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी याबाबतचे आदेश जारी केले.

****

टाळेबंदीच्या काळात सर्व मंदिरं बंद ठेवण्यात आल्यामुळे मंदिराचे पुजारी आणि पौरोहित्य करणारे पुजारी यांना आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी उस्मानाबाद जिल्ह्यातले नगरसेवक मकरंद जोशी यांनी केली आहे. याबाबतचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावे असलेलं निवेदन त्यांनी प्रशासनाकडे सादर केलं. राज्यातल्या पुरोहित आणि पुजारी यांना टाळेबंदीच्या काळात अन्नधान्य आणि आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी या निवेदनात केली आहे.

****

हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत शहर पोलिसांनी दोन ठिकाणी छापा टाकून ४३ लाख ४ हजार रुपयांचा गुटखा जप्त केला. याप्रकरणी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

परभणी जिल्ह्यात कोविड साथीच्या काळात काम करत असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांची कामगिरी उल्लेखनीय असल्याची भावना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी व्यक्त केली. असोला या गावी आयोजित लसीकरण कार्यक्रमाच्यावेळी ते आज बोलत होते. ग्रामीण भागातल्या आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी कार्यकर्त्या, आरोग्य कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचं ते यावेळी म्हणाले. 

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 26.06.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 26 June 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपत...