Friday, 26 June 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 26.06.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 26 June 2026

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २६ जून २०२६ सायंकाळी ६.१०

****

·      अंमली पदार्थांच्या समस्येविरुद्ध एकत्रित लढा देण्याचं गृहमंत्री अमित शहा यांचं आवाहन

·      श्रीरामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यास अपहार प्रकरणी ट्रस्टचे सरचिटणीस आणि विश्वस्तांचा राजीनामा

·      राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरी; सामाजिक न्याय दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन

आणि

·      मोहरमनिमित्त ठिकठिकाणी ताजिया मिरवणूक

****

अंमली पदार्थांच्या समस्येविरुद्ध एकत्रित लढा देण्याचं आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं आहे. ते आज नवी दिल्लीत नार्को कोऑर्डिनेशन सेंटरच्या दहाव्या बैठकीला संबोधित करत होते. अंमली पदार्थांचा विळखा हा राष्ट्रीय सुरक्षा, सामाजिक स्थैर्य, आर्थिक हितसंबंध आणि तरुण पिढी तसंच देशाच्या भविष्यासाठी धोकादायक असल्याचंही त्यांनी नमूद केलं. अध्यात्मिक गुरु, युवक आणि महिलांनी या अभियानात सहभागी होण्याचं आवाहनही शहा यांनी केलं. अंमली पदार्थांविरोधातला लढा पुढील तीन वर्षांत निर्णायक टप्प्यावर पोहोचेल, असं ते म्हणाले -

बाईट – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

 

या बैठकीत २००४ ते २०१४ आणि २०१४ ते २०२६ या कालावधीत जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थांची आकडेवारीही शहा यांनी मांडली. तसंच तस्करी रोखण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या ऑनलाइन पोर्टल्सची माहिती देत सर्व राज्यांनी माहितीची त्वरित देवाणघेवाण करण्याचे निर्देश दिले.

****

दरम्यान, आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ आणि अवैध तस्करी विरोधी दिन आज पाळण्यात येत आहे. या अनुषंगाने युवा कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाने ‘नशा मुक्त युवाया संकल्पनेवर आधारित राष्ट्रीय नशा मुक्ती प्रश्नमंजुषाआजपासून माय भारतपोर्टलवर सुरू केली आहे. युवकांमध्ये जागृती निर्माण करणं, नशामुक्त जीवन आणि सुदृढ आरोग्याची निवड करतानाच, अंमली पदार्थांच्या सेवनाने होणाऱ्या घातक दुष्परिणामांबद्दल तरुणांमध्ये जनजागृती करणं हा या उपक्रमाचा उद्देश आहे. हे डिजिटल पोर्टल संपूर्ण देशभरातल्या युवकांसाठी १५ जुलै पर्यंत खुलं राहणार आहे.

****

यानिमित्त केंद्र सरकारच्या वतीने नशा मुक्त भारत अभियान राबवण्यात आलं. नशा बंदी मंडळाचे मराठवाडा विभाग संघटक भाऊ पठाडे यांनी, युवकांना आणि पालकांना विशेष आवाहन केलं. ते म्हणाले -

बाईट – भाऊ पठाडे

****

आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थविरोधी दिनानिमित्त आज धुळे इथं २३ गुन्ह्यात जप्त केलेले २ कोटी रुपयांचे अंमली पदार्थ नष्ट करण्यात आले. ९०१ किंलो गांजा, १७३ किलो अफूची बोंडे यासह एमडी ड्रग्स, कोडीन सिरप आदींचा यात समावेश आहे.

****

कृत्रिम बुद्धिमत्ता, अणु, अंतराळ आणि क्वांटम तंत्रज्ञान ही भविष्यातल्या विकासाची आणि जागतिक स्पर्धेची दिशा ठरवणारी महत्त्वाची क्षेत्रे आहेत, असं विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी सांगितलं आहे. आज नवी दिल्ली इथं पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भारत अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात वेगाने एक प्रमुख शक्ती म्हणून उदयास येत असल्याचं त्यांनी सांगितलं. राष्ट्रीय क्वांटम अभियानाचा उल्लेख करताना, या अभियानाने सुरू झाल्यानंतर केवळ तीन वर्षांतच आपल्या निम्म्याहून अधिक उद्दिष्टांची पूर्तता केल्याचं त्यांनी सांगितलं. या अभियानाच्या वेगवान प्रगतीतून भारताची वाढती वैज्ञानिक क्षमता आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जागतिक नेतृत्व मिळवण्याची त्याची बांधिलकी दिसून येते, असं डॉ. सिंह म्हणाले.

****

अयोध्येच्या श्रीरामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासाला मिळालेल्या देणग्यांच्या अपहार प्रकरणी एफ आय आर दाखल झाल्यानंतर राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय आणि विश्वस्त अनिल मिश्रा यांनी आपापल्या पदांचा राजीनामा दिला आहे. उत्तर प्रदेश सरकारच्या प्रसिद्धी विभाग संचालकांनी ही माहिती दिली.

दरम्यान, याप्रकरणी विशेष तपास पथकानं दाखल केलेल्या एफआयआरमधल्या आठ आरोपींना काल अटक केली. ट्रस्टचे सदस्य कृष्णमोहन यांच्या लेखी तक्रारीवरून श्री राम जन्मभूमी पोलीस ठाण्यात अपहाराचा गुन्हा नोंदवला होता.

****

छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त आज सर्वत्र त्यांना आदरांजली वाहण्यात आली. तसंच त्यानिमित्त साजऱ्या होणाऱ्या सामाजिक न्याय दिनानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

****

राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी मुंबईतल्या लोकभवन इथं शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातल्या सारथी म्हणजेच छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण आणि मानव विकास संस्थेच्या मुख्यालयाला भेट देऊन तिथल्या उपक्रमांची माहिती घेतली. सारथीने शासनाकडे सादर केलेल्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात येईल, असं फडणवीस यांनी सांगितलं. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केलं.

कोल्हापूरमध्ये दसरा चौक इथल्या राजर्षी शाहू छत्रपती स्मारक भवनाचं लोकार्पण जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि खासदार श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या हस्ते करण्यात आले. तसंच जिल्हा प्रशासनाच्या वतीनं समता दिंडीही काढण्यात आली.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद तसंच महानगरपालिकेच्या वतीने आज मिल कॉर्नर इथल्या छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं.

हिंगोली शहरात रॅलीच्या माध्यमातून सामाजिक न्याय आणि समाज प्रबोधनात्मक फलकांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली.

नांदेड इथं सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाअंतर्गत, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाच्या वतीने समता दिंडीसह विविध कार्यक्रम घेण्यात आले. आमदार अमर राजूरकर यांच्या हस्ते समता दिंडीचं उद्घाटन झालं. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात प्र-कुलगरू डॉ. अशोक महाजन यांच्या हस्ते शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं.

सामाजिक न्याय दिनानिमित्त लातूर इथं आज समाज कल्याण विभागामार्फत समता दिंडी आणि संविधान जनजागृती प्रभातफेरी काढण्यात आली. या उपक्रमाला लातूर शहरातले नागरिक, विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी शाहू महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.

****

देशभरात आज मुहर्रम पाळला जात आहे. प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचे नातू हजरत इमाम हुसेन आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या हौतात्म्याचं स्मरण करून देणारा हा दिवस आहे. मोहरमनिमित्त ठिकठिकाणी ताजिया मिरवणुका काढल्या जात आहेत.

छत्रपती संभाजीनगर शहरात मोहरमनिमित्त विविध भागांतून सवाऱ्या निघाल्या असून, मोठ्या संख्येनं मुस्लिम बांधन त्यात सहभागी झाले होते. मुस्लिम बांधवांनी अत्यंत शांततेत धार्मिक परंपरांचं पालन करत एकात्मता आणि शांततेचा संदेश दिला.

****

पुण्यातलं केतन अग्रवाल हत्या प्रकरण जलदगती न्यायालयात चालवायला आणि या प्रकरणी उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करायला राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे. या तरुणाच्या वडिलांनी आज पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. दोषींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी तसंच मृताच्या कुटुंबियांना न्याय देण्यासाठी वचनबद्ध असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.

****

परभणी शहर महानगरपालिकेत कार्यरत तीन मुकादम आणि तीन सफाई कामगारांची स्वच्छता निरीक्षक या पदावर पदोन्नती करण्यात आली असून, लाड पागे शिफारशी नुसार १० सफाई कामगार या पदावर नियुक्तीचे आदेश देण्यात आले. महापौर सय्यद इक्बाल सय्यद खाजा, आयुक्त नितिन नार्वेकर, उपायुक्त प्रज्ञावंत कांबळे यांच्या हस्ते पदोन्नती आदेश देण्यात आले.

****

प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेने जालन्याहून कर्नाटकात येलहंका इथं विशेष रेल्वे चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ही गाडी दर रविवारी जालना इथून सायंकाळी सात वाजून २० मिनिटांनी निघेल, तर येलहंका इथं दुसऱ्या दिवशी रात्री साडे नऊ वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही रेल्वे येलहंका इथून प्रत्येक सोमवारी रात्री साडे अकरा वाजता निघेल. ही गाडी परतूर, सेलू, परभणी, पूर्णा, नांदेड, सिकंदराबाद, धर्मावरम या मार्गाने धावेल.

****

पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारत-आयर्लंड यांच्यात दोन टी– ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आयर्लंडमधल्या बेलफास्ट इथं नुकताच सुरु झाला. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.   

****

वाशिम स्थानिक गुन्हे शाखेने आज आंतरजिल्हा दुचाकी चोरांच्या टोळीला बेड्या ठोकल्या. वैभव प्रल्हाद घुले आणि लखन ऊर्फ पुष्पा देविदास राठोड या दोघांना अटक करून त्यांच्याकडून ७ लाख रुपये किमतीच्या १० दुचाकी हस्तगत केल्या.

****

धुळे जिल्ह्यात मागील दोन दिवसात पाऊस न पडल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे. जिल्ह्यात अद्यापही जोरदार पावसाची प्रतीक्षा असून, पावसा अभावी पेरण्या खोळंबल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 26.06.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 26 June 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपत...