Saturday, 20 June 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 20.06.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 20 June 2026

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २० जून २०२ सकाळी.०० वाजता

****

NEET-UG २०२६ च्या पुनर्परीक्षेपूर्वी 'नॅशनल टेस्टिंग एजन्सी' आज देशभरात एक सराव चाचणी आयोजित करणार आहे. परीक्षा सुरळीत, सुरक्षित आणि पारदर्शकपणे पार पाडण्याच्या तयारीचा हा एक भाग आहे.

ही परीक्षा भारतातील ५५१ आणि परदेशातील १४ शहरांमध्ये २२ लाख ७९ हजारांहून अधिक उमेदवारांसाठी घेतली जाईल. या परीक्षेसाठी निरीक्षकांपासून ते समन्वयक, पोलीस दल आणि प्रशासकीय अधिकारी अशा दोन लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे एजन्सीने सांगितलं आहे. परीक्षा निष्पक्ष आणि पारदर्शक व्हावी यासाठी बहुस्तरीय सुरक्षा व्यवस्था करण्यात आली असल्याचेही NTA ने सांगितलं. यामध्ये सीसीटीव्ही पाळत, आधार-आधारित बायोमेट्रिक पडताळणी आणि परीक्षा साहित्य ने-आण करण्यासाठी पोलीस संरक्षणासह जीपीएस यंत्रणा असलेली वाहनं यांचा समावेश आहे. ही पुनर्परीक्षा दुपारी २ ते सायंकाळी सव्वा पाच या वेळेत लेखी पद्धतीने घेतली जाईल.

***

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पश्चिम बंगालमध्ये 'प्रधानमंत्री किसान सन्मान निधी' चा २३ वा हप्ता जारी करतील. याअंतर्गत, देशभरातील ९ कोटी ४४ लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये १८ हजार ८८० कोटी रुपयांहून अधिक रक्कम थेट हस्तांतरित केली जाईल. पंतप्रधान आजपासून पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या २ दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदी आज पश्चिम बंगालमधील हुगळी जिल्ह्यातील तारकेश्वर इथे 'पश्चिम बंगाल दिवस' सोहळ्यात सहभागी होतील. तसंच, पश्चिम बंगालमध्ये अनेक विकासकामांचं लोकार्पण आणि पायाभरणी कार्यक्रम पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहेत. उद्या सकाळी साडेसहाच्या सुमारास कोलकाता इथे होणाऱ्या १२ व्या आंतरराष्ट्रीय योग दिन सोहळ्यात पंतप्रधान मोदी सहभागी होतील. तसंच, कोलकाता इथल्या श्यामा प्रसाद मुखर्जी बंदरावर स्वदेशी बनावटीच्या आणि विकसित केलेल्या तीन नौदल जहाजांचं - ते जलावतरण करतील.

***

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या ६८ व्या वाढदिवसानिमित्त ओडिशामध्ये मयूरभंज जिल्ह्यातील पहाडपूर गावात आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान सहभागी होतील. दोघेही पहाडपूर गावाला भेट देतील आणि 'संथाली जाहेरा' आणि 'हो जाहेरा' या पवित्र उपवनांना भेट देतील. त्यानंतर, मयूरभंज जिल्ह्यातील रायरंगपूर इथे मोहन चरण माझी यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारच्या दोन वर्षांच्या कार्यकाळाच्या पूर्ततेनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते सहभागी होतील. या कार्यक्रमादरम्यान, ते ४७ हजार कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विविध विकासकामांचं उद्घाटन आणि पायाभरणी पंतप्रधान करणार आहेत. 

***

कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नावीन्यता विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य नावीन्यता सोसायटी आणि उदैती फाउंडेशन यांच्यात याबाबत काल मुंबईत सामंजस्य करार करण्यात आला. यातून महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्रात ‘महिला उद्योजकता स्टार्ट अप’ हब स्थापन होण्यास मदत होणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. या कराराअंतर्गत महाराष्ट्र राज्य नावीन्यता सोसायटी आणि उदैती फाउंडेशन तांत्रिक आणि ज्ञान भागीदार म्हणून कार्य करणार असून महिला उद्योजकांना वित्तपुरवठा, बाजारपेठ आणि व्यवसाय सहाय्यदेखील मिळवून देण्यात येणार आहे. 

***

विदर्भातील शिक्षण क्षेत्रातलं अभ्यासू नेतृत्व, शिक्षक चळवळीतील प्रभावी संघटक, माजी आमदार आणि ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ प्राध्यापक बी. टी. देशमुख यांचं काल अमरावती इथे निधन झालं. ते ८७ वर्षांचे होते. शिक्षकांच्या सेवा अटी, वेतन, पदोन्नती, निवृत्तीवेतन, विद्यापीठ प्रशासनातील सुधारणा आणि उच्च शिक्षणातील गुणवत्तावाढ यांसारख्या विषयांवर त्यांनी सातत्याने आवाज उठवला. त्यांच्या अभ्यासपूर्ण भूमिकेमुळे शिक्षक समाजात त्यांना विशेष मानाचं स्थान होतं. बी. टी. देशमुख यांच्या निधनाबद्दल विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी, शिक्षणप्रेमी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे.

***

शेतकऱ्यांना दर्जेदार आणि रास्त दरात खतांचा पुरवठा व्हावा यासाठी कृषी विभागामार्फत पुणे विभागातील पुणे, अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये एप्रिल २०२६ पर्यंत विभागात नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध मोठी कारवाई करण्यात आली आहे. आतापर्यंत १०७ खत विक्री परवाने निलंबित आणि ६ खत विक्री परवाने रद्द करण्यात आले आहेत, तर ७ केंद्रांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कृषी विभागातर्फे खतांचा काळाबाजार, कृत्रिम टंचाई, साठेबाजी आणि चढ्या दराने विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर यापुढेही कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा  कृषी विभागाने दिला आहे.

***

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतला तिसरा आणि अंतिम एकदिवसीय सामना आज दुपारी चेन्नईतील एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. हा सामना दुपारी दीड वाजता सुरू होईल. यजमान भारताने या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतलेली आहे.

***

  

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 20.06.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 20 June 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती...