Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 30 June
2026
Time 7.10
AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३० जून २०२६ सकाळी ७.१० मि.
****
·
पुढील वर्षापासून ऑनलाईन टीईटी घेणार-शालेय शिक्षण मंत्र्यांचं सूतोवाच
· अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ७१७ कोटी रुपये मंजूर, तर कर्जमाफी ही शेतकऱ्यांची फसवणूक असल्याची काँग्रेसची टीका
·
नसरापूर बाल लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा
आणि
·
मराठवाड्यातल्या जलसाठ्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे नऊ टक्क्यांनी घट
****
शिक्षक पात्रता
परीक्षा – टीईटी पुढील वर्षापासून ऑनलाईन पद्धतीने घेण्याचे सुतोवाच शालेय शिक्षण मंत्री
दादा भुसे यांनी केलं आहे. काल विधानसभेत त्यांनी टीईटीसंदर्भात निवेदन सादर केलं.
सदर परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यासंदर्भात आवश्यक पायाभूत सुविधांसाठी मुख्य सचिवांच्या
अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येईल, असं त्यांनी सांगितलं. फेरीपरीक्षा पारदर्शक पद्धतीने होणार असल्याची ग्वाही
भुसे यांनी दिली. ते म्हणाले…
बाईट- शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
दरम्यान, टीईटी पेपर फुटीप्रकरणी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात काल
गदारोळ झाला. यासंदर्भात विरोधकांचा स्थगन प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांनी फेटाळून लावला.
त्यामुळे विरोधकांनी सभात्याग केला.
विधानपरिषदेत विरोधकांनी
या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्यावा, शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा द्यावा तसंच शिक्षण आयुक्तांना निलंबित करावं,
आदी मागण्या करत, हौद्यात उतरून घोषणाबाजी केली.
त्यामुळे सभापतींना सभागृहाचं कामकाज अर्ध्या तासासाठी तहकूब करावं लागलं.
****
राज्यातल्या सर्व
शिक्षण मंडळाच्या सर्व शाळांमध्ये मराठी शिकवली जाते की नाही हे पाहण्यासाठी विशेष
मोहीम राबवली जाईल, अशी माहिती शिक्षण मंत्री भुसे
यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. थोरामोठ्यांच्या कर्तृत्वाची माहिती
देणारं नवं पुस्तक शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट केलं जाईल, असंही
त्यांनी सांगितलं. कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद किंवा विलीन करण्याचा कुठलाही निर्णय
सरकारने घेतला नसल्याचेही शिक्षण मंत्र्यांनी लेखी उत्तरात स्पष्ट केलं.
****
यंदा मार्च आणि
एप्रिल महिन्यात राज्याच्या विविध भागांत वादळी वारा, गारपीट आणि अवकाळी पावसाचा फटका एक लाख २२ हजार हेक्टर क्षेत्रावरच्या
पिकाला बसला होता. या नुकसान भरपाईपोटी सात लाख नऊ हजार शेतकऱ्यांना ७१७ कोटी रुपये
मंजूर करण्यात आल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी काल सदनात
दिली.
****
राज्य सरकारने जाहीर
केलेली शेतकरी कर्जमाफी ही प्रत्यक्षात शेतकऱ्यांची फसवणूक असल्याची टीका काँग्रेसचे
विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. ते काल विधानसभेत पुरवणी मागण्यांवरील
चर्चेत बोलत होते. या कर्जमाफीचा लाभ ५६ लाख शेतकऱ्यांना होणार असल्याचा दावा केला
जात असला, तरी चार वेळा नियमित कर्जफेड केल्याशिवाय
हा लाभ मिळणार नाही, अशा कठोर अटी घालून सरकारने शेतकऱ्यांना
जाळ्यात अडकवल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला.
****
राज्यात अवैध सावकारी
प्रतिबंधक कायदा लागू झाल्यापासून साडे ११ हजार तक्रारी दाखल झाल्या आहेत. ८३० हेक्टर
पेक्षा अधिक जमीन शेतकऱ्यांना परत दिली असून, ५४९ गुन्हे दाखल केल्याची माहिती सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी काल
विधानसभेत दिली.
****
विधानपरिषदेच्या
उपसभापती पदाची निवडणूक उद्या एक जुलै रोजी घेण्याची घोषणा सभापती राम शिंदे यांनी
केली. इच्छुक सदस्यांना आज दुपारी १२ वाजेपर्यंत अर्ज दाखल करता येणार असून, दाखल झालेल्या अर्जांची छाननी लगेचच दुपारी एक वाजता होईल,
असं सभापतींनी सांगितलं.
****
पुणे जिल्ह्यातल्या
नसरापूर इथल्या बाल लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणी पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने
आरोपी भीमराव कांबळे याला काल फाशीची शिक्षा सुनावली. विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे
यांच्या न्यायालयाने गेल्या २५ तारखेला सदर आरोपीला दोषी ठरवलं होतं. आरोपीने केलेला
गुन्हा अत्यंत क्रूर, अमानुष आणि 'दुर्मीळातील दुर्मीळ' स्वरूपाचा असल्याचं सांगत न्यायालयाने
आरोपीला फाशीची शिक्षा ठोठावली. साडे तीन वर्षाच्या बालिकेवर अत्याचार करुन तिची हत्या
केल्या प्रकरणी आरोपी भीमराव कांबळे याच्याविरोधात सादर परिस्थितीजन्य आणि वैज्ञानिक
पुरावे भक्कम असल्याचं निरीक्षण नोंदवत, केवळ वय हा शिक्षेत सवलत
देण्याचा आधार ठरू शकत नसल्याचंही न्यायालयाने नमूद केलं.
प्रकरणाचा जलद तपास
आणि निकाल लावल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्यायालय, पोलीस आणि वकीलांचे आभार मानले आहेत. विधानसभेत काल यासंदर्भात
केलेल्या निवेदनात मुख्यमंत्री म्हणाले...
बाईट- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
****
नाशिकच्या त्र्यंबकेश्वर
इथून श्री संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीने काल पंढरपूरकडे प्रस्थान केलं. या
पालखी सोहळ्यात विणेकरी, टाळकरी यासह ५० हून अधिक दिंड्या
आणि १५ हजार वारकरी सहभागी झाले आहेत.
**
दरम्यान, आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपूरकडे पायी मार्गस्थ होणाऱ्या
वारकऱ्यांच्या सेवेसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षातर्फे
चरण सेवा उपक्रम यंदाही राबवण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत आरोग्य तपासणी,
प्राथमिक उपचार आणि इतर वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. यात
११ प्रमुख जिल्ह्यांतून जाणाऱ्या पालखी मार्गावरील सुमारे ४०० विश्रांती आणि मुक्काम
स्थळांचा समावेश आहे.
****
राज्यात एक एप्रिल
२०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट बसवण्यासाठीची
मुदत आज संपत आहे. नियमांचं पालन न करणाऱ्या वाहनधारकांवर मोटार वाहन कायद्यानुसार
उद्या एक जुलैपासून कडक कारवाई करण्यात येणार आहे.
दरम्यान, आज ३० जूनपर्यंत एचएसआरपी बसवण्यासाठी अधिकृतपणे वेळ घेतलेल्या
वाहनधारकांना उद्यापासून सुरू होणाऱ्या दंडात्मक कारवाईतून तात्पुरता दिलासा देण्यात
आला आहे.
****
ऊसतोड कामगार आणि
त्यांच्या कुटुंबीयांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थांनी
समन्वयाने काम करावं, असे निर्देश जालन्याच्या जिल्हाधिकारी
आशिमा मित्तल यांनी दिले आहेत. काल जिल्हास्तरीय स्थलांतरपूर्व नियोजन समन्वय बैठकीत
त्या बोलत होत्या. लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळामार्फत कामगारांना
स्वतंत्र ओळखपत्रं देण्यासाठी नवीन कार्यपद्धती तयार करण्याची सूचनाही त्यांनी केली.
****
परभणी जिल्ह्यात
जिंतूर तालुक्यातल्या कसर इथं कृषी विभागाच्यावतीने बीबीएफ म्हणजेच रुंद वरंबा सरी
तंत्रज्ञानाद्वारे सोयाबीन लागवड प्रात्यक्षिक काल घेण्यात आलं. पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर
यांनी यावेळी प्रत्यक्ष शेतात जाऊन पेरणीची पाहणी केली, तसंच शेतकऱ्यांशी संवाद साधत आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा अवलंब
करण्याचं आवाहन केलं.
****
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
मराठवाडा विद्यापीठात एकत्रित निधीतून वेतनावर विविध ३८ विभागात शिक्षकांची ११६ पदे
भरण्यात येणार आहेत. आजपासून १५ जुलै पर्यंत ऑनलाईन आवेदन मागवण्यात आले असून, उमेदवारांची लेखी परीक्षा, मुलाखतीद्वारे
पदे भरण्यात येणार आहेत, अशी माहिती कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर
यांनी दिली. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या समर्थ पोर्टलवरुन ऑनलाईन पध्दतीने आवेदन मागवण्यात
आले असून यांची लिंक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.
****
लातूर जिल्ह्यात
शहरी तसंच ग्रामीण भागात विनापरवाना लावण्यात येणाऱ्या अनधिकृत होर्डिंग्ज, पोस्टर्स आणि बॅनर्सविरोधात जिल्हा प्रशासन, महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे तीव्र मोहीम सुरू केली आहे.
आतापर्यंत अशा प्रकरणांमध्ये १६ एफआयआर दाखल करण्यात आले असून संबंधितांकडून मोठ्या
प्रमाणात दंडही वसूल करण्यात आला आहे.
****
नांदेड जिल्हा मध्यवर्ती
सहकारी बँकेच्या २३ संचालक पदासाठी निवडणूक प्रक्रियेत अर्ज भरण्यासाठी आज शेवटचा दिवस
आहे. या निवडणुकीत आतापर्यंत तीन विद्यमान आमदारांसह ८४ उमेदवारांनी अर्ज दाखल केले
आहेत.
****
यंदा पावसाने ओढ
दिल्याने मराठवाड्यातल्या जलसाठ्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे नऊ टक्क्यांनी
घट झाली आहे. विभागात ११ प्रमुख प्रकल्पांमध्ये सरासरी ३३ टक्के उपयुक्त जलसाठा शिल्लक
आहे. जायकवाडी धरणातला जलसाठा हा २१ टक्क्यांच्या खाली आला आहे. गेल्या वर्षी याच दिवशी
जायकवाडीत सुमारे ४१ टक्के जलसाठा होता. मांजरा तसंच माजलगाव १९ टक्के, निम्न दुधना धरणात २५ टक्के, तर येलदरी
धरणात सर्वाधिक ५१ पूर्णांक ४६ टक्के जलसाठा असून, सिद्धेश्वर
धरणात उपयुक्त जलसाठा शून्य टक्के आहे.
****
छत्रपती संभाजीनगर
तसंच जालना शहरासह जिल्ह्यात काल पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. लातूर जिल्ह्यात काल
सलग दुसऱ्या दिवशी अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस झाला. जिल्ह्यातल्या जळकोट, उदगीर आणि रेणापूर तालुक्यांमध्ये शंभर मिलिमीटरहून अधिक पावसाची
नोंद झाल्याने पेरणीच्या कामांना सुरुवात झाली आहे.
****
No comments:
Post a Comment