Monday, 8 June 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक ८ जून २०२६ सकाळी ११.०० वाजता

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 08 June 2026

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक जून २०२ सकाळी.०० वाजता

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गरिबांच्या कल्याणासाठी सरकारच्या १२ वर्षांच्या विकास प्रवासावर प्रकाश टाकला. यासंदर्भात समाज माध्यमावरच्या संदेशात पंतप्रधानांनी, गेल्या १२ वर्षांत भारताने अनेक परिवर्तनांचा अनुभव घेतला आहे आणि या बदलांच्या केंद्रस्थानी गरीब आणि वंचितांचं कल्याण हेच राहिलं असल्याचं सांगितलं. सरकारला नेहमीच 'अंत्योदय' या संकल्पनेतून प्रेरणा मिळाली आहे; तसंच, अनेक दशकांपासून विकासाच्या प्रक्रियेत मागे राहिलेल्या घटकांपर्यंत विकासाचे लाभ पोहोचवणं, निरंतर उद्दिष्ट राहिलं असल्याचं त्यांनी नमूद केलं. 'थेट लाभ हस्तांतरण' आणि डिजिटल प्लॅटफॉर्म्सच्या माध्यमातून लोकांना थेट आणि पारदर्शकपणे मदत पोहोचत आहे. यामुळे गळती कमी झाली असून, कार्यक्षमतेत वाढ झाली असून, शासनावरील विश्वास अधिक दृढ झाला असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. गरिब कल्याणाचा हा प्रवास आता मानवी सक्षमीकरणाच्या सामूहिक चळवळीत रूपांतरित होत असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं.

****

प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेच्या अंमलबजावणीत पश्चिम बंगाल सहभागी होणार आहे. यामुळे पश्चिम बंगाल हे देशातलं ३६ वं राज्य ठरणार आहे. नवी दिल्ली इथं राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण आणि पश्चिम बंगाल सरकार यांच्यात आज यासंदर्भातला करार होणार आहे. या निर्णयामुळे देशभरातल्या नागरिकांना समान, सुलभ आणि दर्जेदार आरोग्य सेवा मिळण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललं जात आहे. तसंच पश्चिम बंगालमधल्या नागरिकांच्या आरोग्य खर्चात मोठी कपात होण्याची अपेक्षा आहे.

****

राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल, पोलिस महासंचालक सदानंद दाते आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी, गडचिरोलीमध्ये आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांशी काल संवाद साधला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निर्धारानंतर गडचिरोली जिल्ह्यातला नक्षलवाद जवळपास संपुष्टात आला आहे. त्याअनुषंगाने विविध विकासकामांचं नियोजन आणि आढावा घेण्यासाठी अग्रवाल आणि दाते यांनी नवेगाव इथल्या नवजीवन वसाहतीला भेट दिली. आत्मसमर्पित नक्षलवाद्यांच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध असून शासनाच्या विविध योजनांचा त्यांनी लाभ घ्यावा असं आवाहन मुख्य सचिव अग्रवाल यांनी केलं.

****

राज्यातल्या रस्ते सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या अतिभार आणि इतर अवैध मालवाहतुकीच्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी परिवहन आयुक्त कार्यालयानं राज्यभर विशेष तपासणी मोहीम राबवण्याचे आदेश दिले आहेत. या मोहिमे अंतर्गत राज्यातल्या विविध आरटीओ कार्यालयांच्या पथकांना इतर जिल्ह्यांमध्ये पाठवून संयुक्त तपासणी करण्यात येणार आहे. दोषी आढळणाऱ्या वाहनांवर मोटार वाहन कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

****

स्फोटकांच्या कंपन्यांमधील सुरक्षेबाबत स्फोटके नियम २००८ मध्ये सुधारणा सुचवणारा प्रस्ताव केंद्र शासनाकडे सादर करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नागपूरचे जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या नेतृत्वाखालील अभ्यासगटाने या मसुद्याचं सादरीकरण केलं. प्रस्तावात स्फोटक निर्मिती प्रक्रिया अधिकाधिक स्वयंचलित करण्यावर भर देण्यात आला असून, रोबोटिक्सचा वापर वाढवून मानवी हस्तक्षेप कमी करण्याची शिफारस करण्यात आली आहे. तसंच जागतिक दर्जाचे सुरक्षा मानके लागू करण्यावरही भर देण्यात आला आहे. या सुधारणा अमलात आल्यास स्फोटक उद्योगातील अपघात कमी होऊन कर्मचाऱ्यांची सुरक्षितता अधिक मजबूत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

****

राज्यात अमराठी चालकांसाठीच्या व्यावहारिक मराठी शिकवणी वर्गांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याची माहिती परिवहन विभागानं दिली आहे. परिवहन विभागाच्या पुढाकारातून आणि कोकण मराठी साहित्य परिषद तसंच मुंबई साहित्य संघ यांच्यावतीनं एक जूनपासून मुंबई महानगर क्षेत्रात अमराठी चालकांसाठी व्यावहारिक मराठीचे विशेष वर्ग सुरू करण्यात आले आहेत. अनेक रिक्षा आणि टॅक्सी संघटनांनीही सामाजिक बांधिलकी जपत या अभियानात सक्रिय सहभाग नोंदवला आहे.

****

मंगोलियात उलानबातर खुल्या कुस्ती स्पर्धेत भारतीय कुस्तीपटूंनी काल पुरुषांच्या फ्रीस्टाईल प्रकारात दोन सुवर्ण आणि दोन कांस्य पदकं जिंकली. अंतिम लढतीत दीपकनं ६१ किलो वजनी गटात कझाकस्तानच्या खेळाडुचा ६-० असा पराभव केला. तर दिनेशनं १२५ किलो वजनी गटात कझाकस्तानच्याच खेळाडुवर २-० ने मात करुन सुवर्णपदक जिंकलं. तर ९७ किलो वजनी गटात विकीनं मंगोलियाच्या खेळाडुचा ४-० नं पराभव करत कांस्य पदक पटकावलं.

****

न्यू तैपेई सिटी ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत पदकांची कमाई केली. महिलांच्या लांब उडी प्रकारात शैली सिंगने ६.२४ मीटरची सर्वोत्तम उडी मारत सुवर्णपदक पटकावलं, तर पुरुषांच्या २०० मीटर धावण्याच्या शर्यतीत अनिमेश कुजूरने २०.४७ सेकंदांची वेळ नोंदवत रौप्य पदक जिंकलं.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 13.06.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 13 June 2026 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत...