Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 30 June 2026
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती
संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ३० जून २०२६ सायंकाळी
६.१०
****
· विधान परिषदेच्या उपसभापतिपदासाठी सचिन अहीर यांचा
महायुतीकडून अर्ज; महाविकास आघाडीकडून शिक्षणतज्ज्ञ
जे.एम.अभ्यंकर यांना उमेदवारी
· बाल गुन्हेगारांसाठीची
वयोमर्यादा १८ वर्षांवरून १६ वर्षे करण्याबाबत सरकार अनुकूल
· वस्तू आणि सेवा
कर अपील न्यायाधिकरणासमोर अपील करण्यास ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ
· इंधनाच्या विक्री तसंच वितरणावर घातलेले निर्बंध केंद्र सरकारकडून रद्दबातल
आणि
· राज्यात मतदार
याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला सुरूवात
****
विधान परिषदेच्या उपसभापतिपदासाठी आज अर्ज दाखल झाले. महाविकास आघाडीकडून शिक्षणतज्ज्ञ
जे.एम.अभ्यंकर यांनी, तर महायुतीकडून सचिन अहीर यांनी अर्ज दाखल केला. अहिर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून एकनाथ शिंदे यांच्या
नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करुन हा अर्ज भरला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री
एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यावेळी उपस्थित होते. आता आवश्यकता भासल्यास उद्या उपसभापतीपदासाठी निवडणूक
होईल.
दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार
परिषद घेत, सचिन अहीर यांचं स्वागत केलं. त्यांच्या येण्याने शिवसेनेची ताकद वाढल्याचं,
एकनाथ शिंदे यांनी नमूद केलं. ते म्हणाले -
बाईट - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
गिरणी कामगारांचे प्रश्न आणि गृहनिर्माण
क्षेत्रातलं त्यांचं योगदान आणि जनतेशी असलेली बांधिलकी लक्षात घेता सचिन अहिर यांची
उपसभापतिपदासाठीची
उमेदवारी अत्यंत योग्य आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेत्या डॉक्टर नीलम गो-हे यांनी दिली आहे.
दरम्यान,
सदनात आपली संख्या कमी असली तरी लोकशाही प्रक्रियेत भाग घेणं,
ही विरोधी पक्ष म्हणून जबाबदारी असल्यामुळे या निवडणुकीत उतरत असल्याचं
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अंबादास दानवे यांनी सांगितलं.
****
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी पक्ष
सोडून जाणाऱ्या नेत्यांवर कठोर टीका केली आहे. जे लोक पक्षाचे सर्वात जवळचे होते आणि ज्यांना पक्षानं
सर्व काही दिलं, ते लोक पक्ष
सोडून जात असल्याचं सांगत त्यांनी खेद व्यक्त केला.
****
गुन्हेगारीसाठी
अल्पवयीन बालकांचा वापर करणाऱ्यांच्या शिक्षेत वाढ करून कठोर शिक्षेची तरतूद
करण्यासाठी कायद्यात सुधारणा केली जाईल, तसंच बाल
गुन्हेगारांसाठीची वयोमर्यादा १८ वर्षांवरून १६ वर्षे करण्याबाबत केंद्र शासनाकडे
प्रस्ताव पाठवण्यात येईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितलं. जालना जिल्ह्यात अल्पवयीन मुलांना लक्ष्य
करून त्यांच्याकडून गुन्हेगारी कृत्यं करवून घेतल्यासंदर्भातला मुद्दा आमदार अर्जुन
खोतकर यांनी उपस्थित केला होता. त्यासंदर्भात बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले -
बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
****
अनुसूचित
जातींच्या उपवर्गीकरणाबाबत कोणताही कायदा सरकारनं या अधिवेशनात आणलेला नाही मात्र यासंदर्भात
नेमलेल्या बदर समितीच्या अहवालावर सूचना, हरकती विचारात घेऊनच
व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेऊ, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी आज विधानसभेत दिली. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या प्रश्नाला
ते
उत्तर देत होते.
या
विषयावर अधिक चर्चा करण्याची मागणी विरोधकांनी केली, मात्र अध्यक्ष
राहुल नार्वेकर यांनी ती फेटाळल्यानंतर विरोधकांनी सभात्याग केला.
****
राज्य लोकसेवा आयोगामार्फत होणारी भरती
प्रक्रिया अधिक जलद, पारदर्शक आणि कार्यक्षम व्हावी, यासाठी या परीक्षांसाठी
संगणकाधारित परीक्षा अर्थात CBT पद्धतीचा अवलंब करण्याचा निर्णय घेण्यात
आल्याची माहिती सामान्य प्रशासन विभाग मंत्री आशिष शेलार यांनी आज विधान परिषदेत
दिली. या परीक्षांचं खाजगीकरण
होणार नाही,
असंही
त्यांनी स्पष्ट केलं.
****
बनावट औषध विक्री करणाऱ्यांवर मकोका
लावला जाईल, अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी आज विधानपरिषदेत
प्रश्नोत्तराच्या तासात दिली. अशा आरोपींवर सध्या लावलेली कलमं सुधारित करून सध्या
जामिनावर सुटलेल्या आरोपींना पुन्हा अटक करण्यासाठी कारवाई करू, असंही ते
म्हणाले.
****
कृत्रिम
बुद्धिमत्तेच्या वापराबाबत एक प्रमाणित कार्यपद्धती अर्थात SoP तयार
करण्याचा सरकारचा विचार असून त्यासाठी AI तज्ज्ञांची समिती स्थापन
केली जाईल,
अशी
माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी आज विधानसभेत दिली. या समितीचा अहवाल चार ते
सहा महिन्यांत घेऊन केंद्र सरकारकडे पाठवला जाईल आणि केंद्राच्या धोरणात त्याचा
समावेश व्हावा,
अशी
विनंती केली जाईल, असं त्यांनी सांगितलं.
****
केंद्र सरकारनं वस्तू आणि सेवा कर अपील न्यायाधिकरणासमोर
अपील करण्याची मुदत ३१ जुलैपर्यंत वाढवली आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये जारी केलेल्या अधिसूचनेनुसार
अपील करण्याची मुदत ३० जून, म्हणजे आजपर्यंत होती. मात्र, अपील दाखल
करताना येणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे अनेक घटकांनी केलेल्या मागणीवरून ही मुदतवाढ करण्यात
आली आहे.
****
पश्चिम आशियातल्या युद्धस्थितीमुळे पेट्रोल आणि डिझेलच्या
विक्री आणि वितरणावर घातलेले निर्बंध मागे घेण्याचा निर्णय केंद्रसरकारनं घेतला आहे. उद्या म्हणजे एक जुलैपासून सार्वजनिक तेल कंपन्यांच्या
विक्री केंद्रांवर आधीचे निर्बंध लागू होणार नाहीत, असं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाकडून सांगण्यात आलं.
****
महाराष्ट्र-छत्तीसगड
सीमेवरच्या बालबेडा जंगल परिसरात गडचिरोली पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दलानं केलेल्या
कारवाईत नक्षलवाद्यांनी लपवून ठेवलेलं शस्त्रनिर्मितीचं साहित्य शोधून जागीच नष्ट करण्यात
आलं. मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी या कारवाईबद्दल गडचिरोली पोलीस आणि सीआरपीएफचं अभिनंदन केलं.
****
येत्या आषाढी एकादशी
सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात येत्या १०
जुलैपासून श्री विठ्ठल-रुक्मिणीचं व्हीआयपी दर्शन बंद
करण्यात येणार आहे. मंदिर परिसर ‘नो व्हेईकल झोन’ घोषित करण्यात येणार असल्याची
माहिती राज्याचे ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे
पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली आहे. यासंदर्भात आज झालेल्या बैठकीत ते बोलत होते.
****
राज्यात मतदार
याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला आजपासून सुरूवात झाली. याअंतर्गत
येत्या २९
जुलै पर्यंत मतदान-केंद्रस्तरीय अधिकारी म्हणजेच बीएलओ मतदारांच्या घरी प्रत्यक्ष
भेट देऊन गणना अर्ज वाटप करतील आणि भरलेले अर्ज परत घेतील. त्यानंतर येत्या पाच
ऑगस्ट रोजी प्रारुप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. या प्रक्रियेसाठी राज्यात
एक लाखाहून अधिक बीएलओ नियुक्त करण्यात आले आहेत.
****
विशेष सखोल
पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत घरभेटीद्वारे गणना प्रपत्र भरण्याच्या महत्त्वपूर्ण
मोहिमेला बीड जिल्ह्यात आज प्रत्यक्ष प्रारंभ झाला. या अभियानाचा शुभारंभ
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी विवेक जॉन्सन यांनी बीड शहरातल्या
मतदारांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन केला. घराघरात जाऊन नागरिकांना गणना
प्रपत्राचं महत्त्व समजावून सांगत त्यांनी स्वतः अर्ज वितरण आणि पडताळणी
प्रक्रियेचा आढावा घेतल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
नियोजित अतिरिक्त वाळूज औद्योगिक वसाहत क्षेत्रात
जमीन जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या मागण्या शासनाकडे पाठवण्यात येतील, असं आश्वासन छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी
विनय गौडा जी.सी. यांनी दिलं आहे. आज जिल्हाधिकारी कार्यालयात यासंदर्भात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. या नियोजित औद्योगिक क्षेत्रासाठी गंगापूर तालुक्यातल्या
आरापूर, सुलतानाबाद
आणि गवळी शिवरा या गावातल्या शेतकऱ्यांच्या सुमारे ७६२ हेक्टर जमिनी संपादित कराव्या लागणार आहेत.
****
येत्या सप्टेंबरमधे जपानमधे होणाऱ्या आशियाई क्रीडास्पर्धांसाठी
भारताचा महिला क्रिकेट संघ जाहीर झाला आहे. कर्णधारपदाची धुरा हरमनप्रीतकौरवर सोपवण्यात आली असून
स्मृती मानधना उपकर्णधार असेल.
****
हवामान
मराठवाड्यात लातूर आणि धाराशिव
जिल्हा वगळता उर्वरित सर्व जिल्ह्यांना आज पावसाचा यलो अलर्ट तर
कोकणातल्या सर्व जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
या सर्व भागात सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता
वर्तवण्यात आली आहे. मराठवाड्यात बीड, धाराशिव, लातूर, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यासाठी
उद्या पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
****
No comments:
Post a Comment