Saturday, 6 June 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 06.06.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 06 June 2026

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ६ जून २०२ दुपारी १.०० वा.

****

अनेक देश आर्थिक अनिश्चिततेचा सामना करत असताना भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून आपली ओळख टिकवून असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे.२०२५-२६ या आर्थिक वर्षात नोंदवलेल्या सात पूर्णांक सात टक्के जीडीपी -विकासदराचा उल्लेख करत ही कामगिरी गेल्या १२ वर्षांत भारतीय अर्थव्यवस्थेने निर्माण केलेली लवचिकता आणि शक्ती अधोरेखित करते असं त्यांनी नमूद केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताची ही उल्लेखनीय प्रगती नवनवीन संधी निर्माण करत असून, १४० कोटी भारतीयांच्या आकांक्षांना बळ देत असल्याचेही त्यांनी सांगितलं.

****

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सर्व बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरात होणाऱ्या अवैध प्रवासी वाहतुकीस आळा घालण्यासाठी राज्यभर विशेष अंमलबजावणी मोहीम राबविण्याचे निर्देश परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत.

या मोहिमेअंतर्गत काल पाच जूनपासून १५ जूनपर्यंत सर्व विभागांमध्ये संयुक्त तपासणी आणि अंमलबजावणी मोहीम राबवण्यात येत आहे, याबाबतचं परिपत्रक एसटी महामंडळाच्या सुरक्षा आणि दक्षता विभागाने जारी केलं आहे.

उच्च न्यायालय, औरंगाबाद खंडपीठाने अवैध प्रवासी वाहतुकीसंदर्भात दिलेल्या आदेशांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ही मोहीम हाती घेण्यात आली असून, राज्यातील सर्व एसटी बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरात खासगी वाहनं उभी करून प्रवासी घेणं अथवा उतरवणं यावर बंदी राहणार आहे. या नियमाचं उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचं सरनाईक यांनी स्पष्ट केलं आहे.

****

वन विभाग, ईला फाउंडेशन आणि सामर्थ्य फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने अकोला जिल्ह्यातील पातूरच्या जंगलात श्रमदानातून वन्यप्राणी आणि पक्ष्यांसाठी मोठ्या पाणवठ्याची निर्मिती करण्यात आली आहे. पर्यावरण दिनानिमित्त राबवण्यात आलेल्या या उपक्रमांतर्गत अवघ्या काही तासांत पाच हजार लिटर पाण्याची व्यवस्था करून वन्यजिवांसाठी महत्त्वाचा जलस्रोत उपलब्ध करून देण्यात आला आहे.

विस्तीर्ण पातूरच्या जंगलातील काही भागांमध्ये पाणवठ्यांची कमतरता जाणवत होती. त्यामुळे अनेकदा वन्यप्राणी पाण्याच्या शोधात मानवी वस्तीकडे वळत होते, या पार्श्वभूमीवर हा उपक्रम हाती घेण्यात आला. श्रमदानातून एक मीटर खोलीचा आणि सुमारे पाच मीटर व्यासाचा पाणवठा अवघ्या तीन तासांत तयार करण्यात आला.

****

छत्रपती संभाजीनगर इथं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात आज सकाळी विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्यासह जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या मोहिमेत सहभाग घेतला. दोन तासांच्या सामूहिक श्रमदानातून संपूर्ण कार्यालय परिसर स्वच्छ करण्यात आला.

****

अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील बावी गाव आणि परिसरात काल दुपारी आलेल्या वादळी वारा आणि अवकाळी पावसाने मोठं नुकसान केलं आहे. वीज पत्र्यामध्ये उतरल्यामुळे गोठ्यातील तीन गायी मृत्यूमुखी पडल्या, तर गोठामालक गंभीर जखमी झाला. वादळात शेकडो झाडं उन्मळून पडल्याने लिंबोणीच्या फळबागा उद्ध्वस्त झाल्या आहेत.

****

भारतीय बुद्धिबळपटू आणि ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानानंदने अंतिम फेरीत जर्मनीच्या व्हिन्सेंट केमरला पराभूत करुन प्रतिष्ठित नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धा जिंकली आहे. ही स्पर्धा जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला. प्रज्ञानानंदनं क्लासिकल प्रकारात विजय मिळवला, यामुळे त्याला पूर्ण तीन गुण मिळाले. या विजयामुळे त्यानं एकूण १८ गुणांसह अव्वल स्थान पटकावलं आणि विजेतेपद मिळवलं. प्रज्ञानानंदने स्पर्धेदरम्यान क्लासिकल सामन्यांमध्ये जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या मॅग्नस कार्लसनला दोनदा पराभूत केलं. कोणत्याही युवा बुद्धिबळपटूसाठी ही कामगिरी अत्यंत विशेष मानली जाते. भारतीय विश्वविजेता डी. गुकेश देखील या स्पर्धेत सहभागी झाला होता, मात्र तो विजेतेपदाच्या शर्यतीतून बाहेर पडला.

****

आर. प्रज्ञानंदच्या कामगिरीबद्दल उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी त्याचं अभिनंदन केलं आहे. जागतिक स्तरावरील ही असाधारण कामगिरी त्याच्यातील विलक्षण प्रतिभा, अढळ निष्ठेचं फळ आहे. त्याची कामगिरी भारतातील असंख्य युवा बुद्धिबळपटूंना सतत प्रेरणा देत आहे असं उपराष्ट्रपतींनी सामाजिक माध्यमावरील आपल्या संदेशात म्हटलं आहे.

****

हॉकीमध्ये, आज जपानमधील काकामिगाहारा इथं होणाऱ्या पुरुषांच्या १८ वर्षांखालील आशिया कपच्या अंतिम सामन्यात भारताचा सामना यजमान जपानशी होईल. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी साडेतीन वाजता सुरू होईल. यापूर्वी काल, दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताने आपला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला ५-३ ने पराभूत केलं. जपानने पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात मलेशियावर ८-१ असा दणदणीत विजय मिळवून अंतिम फेरीत आपलं स्थान निश्चित केलं.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 13.06.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 13 June 2026 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत...