Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 20
June 2026
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २० जून २०२६ दुपारी १.०० वा.
****
पॉश कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याकरता राष्ट्रीय
महिला आयोगानं कृती आराखडा निश्चित केला आहे. देशातील प्रत्येक कामाच्या ठिकाणी महिलांसाठी
सुरक्षित वातावरण तयार करण्यासाठी, १० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांच्या संस्थांना POSH ऑडिट बंधनकारक करण्यात आलं आहे. जनजागृती कार्यक्रम तसंच
सर्व कार्यालयांत अंतर्गत तक्रार समित्या अनिवार्य करण्यात आल्या आहेत.
यासारख्या १८ महत्त्वाच्या उपाययोजनांसंदर्भात आयोगानं
सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांसह विविध यंत्रणांना निर्देश दिले आहेत. प्रत्येक कार्यस्थळ
सुरक्षितता, समानता आणि सन्मानाचं केंद्र बनलं
पाहिजे, असं आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर
यांनी म्हटलं आहे.
****
कोल्हापूरच्या श्री अंबाबाई देवी तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचं
उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आज करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ
शिंदे, खासदार धनंजय महाडिक, आमदार राजेश क्षीरसागर आदी मान्यवर उपस्थित होते. केंद्रीय
गृहमंत्री अमित शहा आज आणि उद्या कोल्हापूर तसंच इचलकरंजीच्या दौऱ्यावर असून या २ दिवसांत
त्यांच्या हस्ते काही विकासप्रकल्पांचं उद्घाटन केलं जाणार आहे.
****
अकोला जिल्ह्यातील पातूर नगरपरिषदेची निवडणूक आज होत आहे.
पातूर नगराध्यक्षपद हे खुल्या प्रवर्गासाठी असून या ठिकाणी १० प्रभागांतून २० नगरसेवकांची
निवड होणार आहे. सकाळी साडे सात ते सायंकाळी साडे पाच या वेळेत हे मतदान होईल. नगराध्यक्ष
पदासाठी पाच उमेदवार, तर नगरसेवक पदासाठी
७५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून, १७ हजार ९३३ नागरिक या ठिकाणी आपला मतदानाचा अधिकार बजावतील.
****
आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या औचित्याने छत्रपती संभाजीनगर
महानगरपालिकेच्या वतीनं उद्या सकाळी ७ वाजता महानगर पालिकेच्या गरवारे क्रीडा संकुल
इथे योग दिन कार्यक्रम घेण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित
राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
****
अकोल्यात जागतिक सिकल सेल दिनानिमित्त जिल्हा स्त्री रुग्णालय, अकोला आणि शासकीय रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने
आज प्रभात फेरी काढण्यात आली. यावेळी “सिकल सेल रोग ओळखा, तपासणी करा, निरोगी भविष्य घडवा” या संदेशासह नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात
आली. यावेळी रक्तदानाबद्दल जनजागृतीसाठी “रक्तदान करा, जीवन वाचवा” तसेच “रक्तदान हेच महादान” अशा घोषणाही देण्यात
आल्या. सिकल सेल तपासणी, वेळेवर उपचार आणि रोगमुक्त समाज निर्मितीसाठी नागरिकांनी पुढाकार
घ्यावा, असं आवाहनही करण्यात आलं. प्रभात
फेरीत आरोग्य कर्मचारी, विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
****
गुजरातमधील सुरत इथून राज्यात नशेच्या गोळ्या आणि औषधांचा
पुरवठा करणाऱ्या एका व्यक्तीला काल छत्रपती संभाजीनगर इथे अटक करण्यात आली. तपासादरम्यान
आरोपीकडून एकूण १९ लाख ५३ हजार २९८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी
छत्रपती संभाजीनगर शहरातल्या छावणी तसंच बेगमपुरा पोलीस ठाण्यात यासंदर्भात गुन्हा
दाखल करण्यात आला.
****
मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने दरवर्षी दिल्या जाणाऱ्या
ग्रंथ पुरस्कारांचे वितरण आज सायंकाळी करण्यात येणार आहे. सायंकाळी साडेपाच वाजता मसापच्या
डॉ. ना. गो. नांदापूरकर सभागृहात मसापचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील, संजीव कुळकर्णी, आणि डॉ. विश्वाधार देशमुख या मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण
होणार आहे. डॉ. साहेबराव खंदारे यांना नरेंद्र मोहरीर वाङमय पुरस्कार, डॉ. अनुराग लव्हेकर यांना नरहर कुरुंदकर वाङमय पुरस्कार, डॉ. शिव कदम यांना म. भि. चिटणीस वाङमय पुरस्कार, क्षितिज देसाई यांना बी. रघुनाथ वाङमय पुरस्काराने गौरविले
जाणार आहे.
****
नांदेड इथल्या प्रसाद वैद्यकीय प्रतिष्ठानचे वाङ्गमय पुरस्कार
नुकतेच जाहीर करण्यात आले. ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक गिरीश कुबेर, कवी अजीम नवाज राही, संगीता अरबुने आणि नांदेड इथले डॉ. प्र. दि. जोशी पाटोदेकर यांचा
ह्या पुरस्कारांच्या मानकऱ्यांमध्ये समावेश आहे. रोख रक्कम, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह असं ह्या सर्व पुरस्कारांचं
स्वरूप आहे. येत्या १२ जुलैला नांदेड इथं हे पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान करण्यात
येतील.
****
लातूर शहरातील बार्शी रोडवरील वसवाडी परिसरात काही तरुणांनी
भरदिवसा एक महिला आणि लहान मुलावर कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यात महिला आणि मुलगा
जखमी झाला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून एमआयडीसी पोलिसांकडून
आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.
****
No comments:
Post a Comment