Friday, 19 June 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 19.06.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 19 June 2026

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १९ जून २०२ दुपारी १.०० वा.

****

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज मध्यप्रदेशातील ओंकारेश्वर इथं आंतरराष्ट्रीय सिकल सेल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभाग घेतला. त्यानंतर ओडिशामधील रायरांगपूर इथं अनेक विकास प्रकल्पांचं राष्ट्रपतींच्या हस्ते आज उद्घाटन होणार आहे. यामध्ये एम्स भुवनेश्वरने आयोजित केलेले वैद्यकीय शिबिर, एकात्मिक ग्रामीण पाइपलाइन पाणीपुरवठा प्रकल्प, ब्रह्मकुमारींचे मातृशक्ती भवन आणि एका विशेष सर्किट हाऊसचा समावेश आहे.

दरम्यान, 'जागतिक सिकलसेल जागरूकता दिना'निमित्त, केंद्रीय आरोग्य मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी निरोगी राष्ट्र उभारण्याच्या सरकारच्या कटिबद्धतेचा पुनरुच्चार केला. राष्ट्रीय सिकलसेल ॲनिमिया निर्मूलन मोहिमे अंतर्गत सात पूर्णांक १९ कोटींहून अधिक नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत दोन पूर्णांक ४६ लाखाहून अधिक व्यक्तींना सिकलसेल आजार असल्याचे निदान झाले आहे आणि ४ कोटींहून अधिक सिकलसेल कार्ड्सचं वाटप करण्यात आलं आहे, असं नड्डा यांनी समाजमाध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पश्चिम बंगालमधील हुगळी जिल्ह्यातील तारकेश्वर इथून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या २३ व्या हप्त्याचं वितरण करणार आहेत. देशभरातल्या ९४ कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये १८ हजार ८८० कोटींहून अधिक रक्कम थेट हस्तांतरित केली जाईल. दोन कोटी १८ लाखांहून अधिक महिला शेतकऱ्यांनाही या हप्त्याचा लाभ होणार आहे, अशी माहिती कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं दिली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात २० जून हा दिवस ‘पीएम किसान उत्सव दिवस’ म्हणून साजरा करण्यात येणार असून कृषी विभागामार्फत विविध जनजागृती उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

****

दरम्यान, पंतप्रधानांच्या हस्ते आज पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजनेंतर्गत दोन हजार ४०० कोटी रुपयांच्या प्रोत्साहन निधीचं वितरण करण्यात येणार आहे. देशभरात २०० ठिकाणी, प्रामुख्यानं औद्योगिक आणि रोजगार केंद्र असलेल्या भागात हा कार्यक्रम होणार आहे.

****

येत्या रविवारी होणाऱ्या नीट-युजी च्या पुनर्परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांसाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सी, एनटीएनं एक अधिकृत व्हॉट्सॲप चॅनल सुरु केलं आहे. विद्यार्थ्यांना व्हॉट्सॲप संदेश ७८ २७ ९८ ०२ ८७ या अधिकृत मोबाईल क्रमांकावरुनच पाठवले जातील. एनटीएकडून संदेश आल्याचा दावा करणाऱ्या कोणत्याही संदेशावर विश्वास ठेवण्यापूर्वी, त्यावर 'ब्लू व्हेरिफिकेशन टिक' आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सी हे नाव असल्याची खात्री करावी, असं आवाहन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना करण्यात आलं आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप आपली नवीन प्रवेशपत्रं डाउनलोड केलेली नाहीत, अशा विद्यार्थ्यांनाच प्रामुख्याने एसएमएस, ईमेल किंवा व्हॉट्सॲप संदेश पाठवले जात असल्याचं एजन्सीनं सांगितलं.

****

राज्यात विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी काल मतदान पार पडलं. या निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया सोमवारी २२ तारखेला होणार आहे. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर इथं शहरातल्या उस्मानपूरा भागातील शासकीय औषध विज्ञान महाविद्यालयात ही मतमोजणी प्रक्रिया होणार आहे. त्या अनुषंगाने विट्स हॉटेल चौक ते गाडे चौक हा मार्ग मतमोजणी होईपर्यंत सर्व वाहनांसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याचं वाहतूक विभागानं कळवलं आहे.

****

मराठवाडा साहित्य परिषदेच्या २०२६ या वर्षासाठीच्या पाच ग्रंथपुरस्कारांचं वितरण उद्या छत्रपती संभाजीनगर इथं होणार आहे. परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांच्या हस्ते साहित्य परिषदेच्या डॉ. ना.गो नांदापूरकर सभागृहात हा सोहळा होणार आहे. नरेंद्र मोहरीर वाङ्गमय पुरस्कारासाठी परभणीचे डॉ. साहेब खंदारे, यांच्या 'मराठवाडा अमूर्त संस्कृती संचित' या ग्रंथाला, तर नरहर कुरुंदकर वाङ्गमय पुरस्कार नांदेडचे डॉ. अनुराग श्रीकांत लव्हेकर, यांच्या 'पुस्तके : साद आणि दाद' या पुस्तकासाठी प्रदान करण्यात येणार आहे. तर प्राचार्य म. भि. चिटणीस वाङ्गमय पुरस्कार छत्रपती संभाजीनगर इथले डॉ. शिव कदम, यांच्या 'चित्रपटाचे शास्त्र - संहिता ते समीक्षा' या ग्रंथाला देण्यात येणार आहे. बी. रघुनाथ कथा-कादंबरी पुरस्कारासाठी ठाण्याचे क्षितिज देसाई, यांच्या 'शीतपेटीतून जेव्हा जाग येते' या कथासंग्रहाची तर मराठी पुस्तक व्यवहारात लक्षणीय कार्यासाठीचा रा. ज. देशमुख स्मृतिपुरस्कार मुंबईच्या उमा नाबर यांना जाहीर झाला आहे. रोख रकमेच्या स्वरुपातले हे पाच पुरस्कार उद्या प्रदान केले जाणार आहेत.

****

ऑलिम्पिक पदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा आज प्रतिष्ठित दोहा डायमंड लीग स्पर्धेत सहभागी होणार आहे. नीरज चोप्रा काही काळापासून पाठीच्या दुखापतीमुळे स्पर्धेत सहभागी होऊ शकला नव्हता.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 19.06.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 19 June 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्...