Sunday, 21 June 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 21.06.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 21 June 2026

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २१ जून २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      वाढत्या वयासोबत अधिक उर्जावान आणि उत्तम प्रतिकारशक्तीसाठी योगाभ्यास सहायक-१२ व्या आंतरराष्ट्रीय योग दिनी पंतप्रधानांचं प्रतिपादन

·      देशभरात ५५१ तर परदेशातल्या १४ शहरांमध्ये आज नीट यूजी फेरपरीक्षा

·      काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणी माजी मंत्री पद्मसिंह पाटील निर्दोष

·      छत्रपती संभाजीनगरचे पाच तरुण गणपती पुळेच्या समुद्रात बेपत्ता

·      परभणी जिल्ह्यात मंदिराचा सभामंडप कोसळून पाच भाविकांचा मृत्यू

आणि

·      एकदिवसीय क्रिकेट मालिकेत भारताचा अफगाणिस्तानवर निर्भेळ विजय

****

वाढत्या वयासोबत अधिक उर्जावान आणि उत्तम प्रतिकारशक्तीसाठी योग सर्वांसाठी सहायक असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. आज १२ व्या ‘आंतरराष्ट्रीय योग दिनी,’ कोलकाता इथल्या ऐतिहासिक लाल रस्त्यावर योगाभ्यास मंचावरून पंतप्रधान बोलत होते. ‘निरोगी वयोवृद्धीसाठी योग’ अशी यंदाच्या योगदिनाची संकल्पना आहे. जगभरातल्या सर्व नागरिकांना योग दिनाच्या शुभेच्छा देतांना, पंतप्रधान म्हणाले..

बाईट- पंतप्रधान नरेंद्र मोदी

पश्चिम बंगालचे राज्यपाल आर एन रवी, मुख्यमंत्री सुवेंधू अधिकारी, केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव, यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. पंतप्रधानांसह उपस्थित सर्वांनी यावेळी योगाभ्यास केला.

 

 

 

 

जगभरात सुमारे अडीच हजार ठिकाणी विविध संस्था संघटनांतर्फे योगविषयक कार्यक्रम होत आहेत.

मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत योग दिवस साजरा झाला. आज संपूर्ण जगाने योग विद्येचं महत्त्व जाणून घेतल्याचं, मुख्यमंत्री म्हणाले.

 

आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या औचित्याने छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीनं गरवारे क्रीडा संकुल इथे योगाभ्यास करण्यात येत आहे. हिंगोली शहरात काल जनजागृती रॅली काढण्यात आली. यामध्ये  शिक्षक  आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले. परभणी इथं प्रियदर्शनी इंदिरा गांधी क्रीडा संकुलात योग प्रात्यक्षिकं साजरा करून उत्साहात योग दिवस करण्यात आला.

 

 

जागतिक योग दिनाच्या अनुषंगाने सध्या योग पंधरवडा पाळला जात आहे. या निमित्ताने दररोज एका आसनाची माहिती आपण घेत आहोत. योग अभ्यासक डॉ कैलास शिवणकर यांनी दिलेली शलभासनाची माहिती आज आपण जाणून घेऊ.

बाईट – योग अभ्यासक कैलास शिवणकर

****

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा २३ वा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल वितरित करण्यात आला. पश्चिम बंगालमधील हुगळी जिल्ह्यातील तारकेश्वर इथं झालेल्या या कार्यक्रमात महाराष्ट्रातील ९० लाख ८५ हजार शेतकरी कुटुंबांच्या खात्यात सुमारे १ हजार ८१७ कोटी रुपये जमा करण्यात आल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

****

नीट यूजी २०२६ फेरपरीक्षा आज होत आहे. या परीक्षेची पूर्वतयारी म्हणून काल राष्ट्रीय चाचणी संस्था- एनटीएनं देशभरात मॉक ड्रील घेतली. देशातल्या ५५१ आणि परदेशातल्या १४ शहरांमध्ये ही परीक्षा होणार आहे. २२ लाख ७९ हजार पेक्षा जास्त विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. दुपारी दोन ते सव्वा पाच दरम्यान ही परीक्षा होईल. यासाठी विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर सकाळी अकरा ते साडे अकराच्या सुमारास हजर व्हावं, असं एनटीएने सांगितलं आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आज पन्नास केंद्रांवर सतरा हजार चारशे विद्यार्थी ही परीक्षा देत आहेत. संबंधित सर्व केंद्रांवर नियुक्त कर्मचारी पहाटेपासूनच उपस्थित असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

कोल्हापूरच्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराचा परिसर, शासनाच्या तब्बल दीड हजार कोटी रुपयांच्या निधीतून विकास कॉरीडॉर म्हणून विकसित करण्यात येणार आहे. ही बाब सर्व भाविकांसाठी अत्यंत अभिमानास्पद असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितलं. ते काल कोल्हापूर इथं कृतज्ञता सोहळा सभेत बोलत होते. सातव्या शतकातील या प्राचीन मंदिराच्या परिसरातील सुमारे ४१ छोट्या-मोठ्या मंदिराचे संवर्धन करून हा परिसर पुढील सहा महिन्याच्या आत विकसित करण्यात येणार असल्याचं शहा यांनी सांगितलं.

****

येत्या आषाढी एकादशी यात्रेनिमित्त राज्यभरातून श्रीक्षेत्र पंढरपूरकडे जाणाऱ्या भाविकांच्या सुरक्षित, सुलभ आणि सुखकर प्रवासासाठी एसटी महामंडळाने साडे पाच हजार विशेष बस सोडण्याचं नियोजन केलं आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काल मुंबईत ही माहिती दिली. राज्यातल्या कोणत्याही गावातून ४० किंवा त्यापेक्षा अधिक भाविकांनी एकत्रित मागणी केल्यास त्या गावातून थेट पंढरपूरसाठी विशेष एसटी बस उपलब्ध करून दिली जाईल असंही त्यांनी सांगितलं.

****

ग्रामीण भागातल्या महिलांचे आर्थिक सक्षमीकरण, पशुपालनाला चालना आणि शासकीय जमिनींवरील अतिक्रमणांना आळा या त्रिसूत्रीवर आधारित ‘राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजना' महसूल विभागाने जाहीर केली आहे. या योजनेत नोंदणीकृत महिला बचत गट, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा महिलांचे बचत गट आणि 'उमेद किंवा माविम' अंतर्गत येणाऱ्या ग्रामसंघांना, राज्यातल्या शासकीय पडीक जमिनी नाममात्र एक रुपया दराने भाडेपट्ट्याने दिल्या जाणार आहेत. यासाठी राज्यातील प्रत्येक तालुक्याच्या तहसीलदारांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील गावनिहाय शासकीय जमिनींचा आढावा घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

****

विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. आज अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दोन्ही सभागृहांचे गटनेते, तसंच ज्येष्ठ सदस्यांना सह्याद्री अतिथीगृहात चहापान तसंच चर्चेसाठी निमंत्रित केलं आहे.

****

काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर आणि त्यांच्या चालकाच्या हत्या प्रकरणात राज्याचे माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील आणि ७ इतर आरोपींची विशेष सीबीआय न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली. माफीचा साक्षीदार झालेला पारसमल जैन याच्या साक्षीवर सरकारी पक्षाची पूर्ण भिस्त होती, पण त्याची साक्ष विश्वासार्ह नसल्याचं सांगून न्यायालयानं ही साक्ष फेटाळून लावली. या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचं सीबीआयनं सांगितलं. २००६ मध्ये पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समद काझी यांची नवी मुंबईतल्या कळंबोली इथं गोळ्या झाडून हत्या झाली होती.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातले पाच युवक रत्नागिरीतील गणपतीपुळे इथल्या समुद्रात बुडाल्याची घटना काल घडली. पैठण तालुक्यातील बिडकीन इथले १९ पर्यटक गणपतीपुळे इथं आले होते. यापैकी ८ जण काल सकाळी समुद्रात पोहण्यासाठी उतरले, मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने, हे आठही जण बुडाले, यापैकी तिघांना वाचवण्यात यश आलं, मात्र पाच जण बेपत्ता आहेत. या सर्वांचा शोध सुरू असल्याचं रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी सांगितले.

****

परभणी जिल्ह्यात मानवत तालुक्यातील यशवाडी इथल्या त्रिमूर्ती हनुमान मंदिरातील सभामंडप कोसळून पाच भाविकांचा मृत्यू झाला, तर १६ भाविक जखमी झाले. या दुर्घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दु:ख व्यक्त केलं असून, मृतांच्या कुटुंबाला पाच लाख रुपये मदत जाहीर केली आहे.

दरम्यान, पालकमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली, तसंच घटनास्थळाची पाहणी केली. या मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या संथगतीने चाललेल्या कामासाठी, उपविभागीय अधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांची कमिटी नेमून दोषींवर कारवाई करण्यात येईल असंही पालकमंत्री बोर्डीकर यांनी सांगितलं.

****

मराठवाडा साहित्य परिषदेच्या ग्रंथ पुरस्कारांचं काल छत्रपती संभाजीनगर इथं वितरण करण्यात आलं. डॉ. साहेबराव खंदारे यांना नरेंद्र मोहरीर वाङ्ममय पुरस्कार, डॉ. अनुराग लव्हेकर यांना नरहर कुरुंदकर वाङ्ममय पुरस्कार, डॉ. शिव कदम यांना म. भि. चिटणीस वाङ्ममय पुरस्कार तर क्षितिज देसाई यांना बी. रघुनाथ वाङ्ममय पुरस्कारानं गौरवण्यात आलं.

****

परभणी शहरात काल, दहशतवाद विरोधी पथकानं १५ ठिकाणी धाडी टाकल्या या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नाही. परजिल्ह्यातील तपास अधिकारी मोठ्या संखेनं दाखल झाल्यानं या परिसराला छावणीचं स्वरुप आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

क्रिकेट

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातल्या एकदिवसीय सामन्यांची मालिका भारताने तीन शून्य अशी जिंकली आहे. काल चेन्नई इथं झालेल्या मालिकेतल्या तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यात अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत भारतासमोर विजयासाठी २१९ धावांचं लक्ष्य ठेवलं, यशस्वी जैस्वालच्या नाबाद ११० तसंच रोहित शर्माच्या ७० धावांच्या बळावर भारतानं हे लक्ष्य २९ व्या षटकांत एका गड्याच्या मोबदल्यात साध्य केलं. पाच बळी घेणारा प्रसिद्ध कृष्णा सामनावीर तर मालिकेत पहिल्या दोन सामन्यात २३८ धावा करणारा कर्णधार शुभमन गिल मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

****

हवामान

येत्या ४८ तासांत मराठवाड्यातील लातूर,नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यांत काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ,हलका ते मध्यम पाऊस आणि ताशी ४०-५० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

****

No comments:

آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 21 جون 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 21 June-2026 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبریں ...