Thursday, 25 June 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 25.06.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 25 June 2026

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २५ जून २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      राज्यात २०२९-३० पर्यंत वीज दर देशात सर्वात कमी असतील, मुख्यमंत्र्यांची माहिती

·      राज्याच्या काही भागात पावसाला सुरुवात झाली असली तरी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, कृषीमंत्र्यांचा सल्ला

·      एसआयआर मोहिमेत पात्र मतदार वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचे छत्रपती संभाजीनगर इथल्या आढावा बैठकीत निर्देश

·      आषाढी वारीत वारकऱ्यांसाठी जर्मन हॅंगरची व्यवस्था, मुख्यमंत्र्यांनी घेतला वारीच्या तयारीचा आढावा

आणि

·      राज्यात मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस, मराठवाड्यात पुढील तीन दिवस बहुतांश जिल्ह्यांना यलो अलर्ट

****

राज्यात २०२९-३० पर्यंत वीज दर देशात सर्वात कमी म्हणजेच प्रति युनिट ७ रुपये ४० पैसे इतके असतील, अशी माहिती मुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ते काल विधानपरिषदेत काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देत होते. राज्यातली वाढती वीज मागणी, उद्योगधंद्यांची वाढ आणि सरकारच्या विविध सवलतींमुळे वाढलेल्या वीज वापराबाबत मुख्यमंत्र्यांनी यावेळी माहिती दिली.

गेल्या दोन वर्षांत राज्यातल्या वीज मागणीत २० टक्क्यांनी वाढ झाली असून, मागील २० वर्षांतले वीजदर वाढीच्या कलानुसार हे दर १४ रुपये असायला हवे होते. मात्र महाराष्ट्र वीज नियामक आयोगाच्या निर्णयांमुळे वीजदर नियंत्रित राहिले असून, २०३० पर्यंत ते इतर राज्यांच्या तुलनेतही कमी असतील, असं फडणवीस यांनी सांगितलं. ते म्हणाले..

बाईट – मुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस

 

देशातल्या एकूण सौर कृषी पंपांपैकी ६० टक्के पंप महाराष्ट्रात बसवण्यात आले असून, केंद्र सरकारनं सर्व राज्यांना ‘महाराष्ट्र मॉडेल’चं अनुकरण करण्याबाबत पत्र पाठवल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

**

अनेक कंपन्यांमध्ये महिला कर्मचाऱ्यांचा विनयभंग, लैंगिक अत्याचार, धर्मांतराचा प्रयत्न घडत असल्याचं समोर आलं असून, अशा घटनांचा अभ्यास करण्यासाठी, तसंच सध्या लागू असलेले कायदे आणि नियमांचा अभ्यास करून बदल सुचवण्यासाठी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या महिला सदस्यांची समिती स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानपरिषदेत केली. चित्रा वाघ यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. सोलापूर इथल्या शासकीय आयटीआय आणि तळेगाव दाभाडे इथल्या एका स्पॅनिश कंपनीतही असे प्रकार घडल्याचा मुद्दा मनीषा कायंदे यांनी उपस्थित केला होता. यावर १५ दिवसांच्या आत चौकशी करुन कारवाई करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं.

**

राज्याच्या काही भागांमध्ये मान्सूनला सुरुवात झाली असली तरी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असा सल्ला कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिला आहे. विधानसभेत एका चर्चेला उत्तर देताना ते काल बोलत होते. शेतकऱ्यांनी प्रथम आपल्या शेतातली ओलाव्याची पातळी तपासून, पुरेसा ओलावा असल्याची खात्री झाल्यावरच पेरणी करावी, एल निनोसह हवामानातल्या इतर अनिश्चिततेचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांना कृषी विभाग मदत करेल, असं आश्वासनही भरणे यांनी दिलं.

कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत २०२५-२६ या वर्षात एक हजार ५६ कोटी रुपयांचं अनुदान वितरित करण्यात आलं आहे. तर, चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत २२७ कोटी रुपयांचे अनुदान देण्यात आलं आहे, अशी माहितीही भरणे यांनी दिली. ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजने’ अंतर्गत सुमारे ५६ लाख शेतकऱ्यांना ३६ हजार ५८५ कोटी रुपयांचा लाभ मिळणार आहे. राज्यातल्या आतापर्यंतच्या सर्व कर्जमाफी योजनांमध्ये ही सर्वात मोठी कर्जमुक्ती योजना ठरणार असल्याचंही भरणे यांनी यावेळी सांगितलं.

**

राज्यात बालविवाहाचं प्रमाण कमी करण्यासाठी लग्न पत्रिकेत वर आणि वधूची जन्मतारीख नमूद करण्यासाठी विधी आणि न्याय तसंच ग्रामविकास विभागांच्या मदतीनं कार्यवाही करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधानसभेत दिली. गेल्या वर्षी राज्यात सुमारे पंधराशे आणि चालू वर्षात आतापर्यंत चौदाशेहून अधिक बालविवाह रोखण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.

****

अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या कारभाराला अधिक बळकटी देण्यासाठी मनुष्यबळ वाढ, अत्याधुनिक प्रयोगशाळांची उभारणी आणि भेसळयुक्त अन्नपदार्थांविरोधातली कारवाई अधिक प्रभावी करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याची माहिती मंत्री नरहरी झिरवाळ यांनी विधानसभेत दिली. दूध, दुग्धजन्य पदार्थ, पिण्याचं पाणी, गूळ, शेंगदाणे, चहा पावडर, खाद्यतेल, गुटखा, तंबाखू, सुगंधित सुपारी, मावा आदी भेसळयुक्त अन्नपदार्थांवर व्यापक कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत सुमारे ११ कोटी ९३ लाख रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आल्याच माहिती झिरवाळ यांनी दिली.

**

मराठी भाषेचा प्रसार, संवर्धन आणि शासकीय कामकाजात मराठीचा अधिकाधिक वापर वाढविण्यासाठी राज्य शासन विविध महत्त्वाकांक्षी उपक्रम राबवत आहे. पुढील वर्षभरात राज्यातल्या आठ शहरांमध्ये अत्याधुनिक मराठी विकास केंद्रे उभारली जाणार आहेत, अशी घोषणा मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी काल विधानसभेत केली.

****

राज्यात राबवण्यात येत असलेल्या विशेष सखोल मतदार पुनरीक्षण – एस आय आर मोहिमेत पात्र मतदार वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी दिले. ते काल छत्रपती संभाजीनगर इथं आयोजित आढावा बैठकीत बोलत होते. नागरिकांच्या शंकांचं निरसन करण्यासाठी मदत कक्ष स्थापन करून त्यांना वस्तुनिष्ठ माहिती उपलब्ध करून द्यावी, स्थानिक लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, स्वयंसेवी संघटना, मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी, बीएलए आणि स्वयंसेवक यांना विश्वासात घेऊन ही मोहीम राबवण्यात यावी, असं त्यांनी सांगितलं. या मोहिमेअंतर्गत ३० जून ते २९ जुलै या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी मतदारांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन गणना अर्जांचे वितरण आणि संकलन करणार आहेत.

****

आगामी आषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही यासाठी सर्व विभागांच्या समन्वयातून व्यापक नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत. आषाढी वारी पूर्वतयारीबाबत आढावा बैठकीत ते काल बोलत होते. आषाढी वारी डिस्कव्हरी आणि जिओग्राफी दूरचित्रवाहिनीद्वारे जगभरात पोहोचणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. वारकऱ्यांसाठी जर्मन हॅंगरची व्यवस्था करण्यात आली आहे, त्यामुळे लाखो वारकऱ्यांना सुरक्षित आणि प्रशस्त निवासाची सुविधा उपलब्ध होणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.

दरम्यान, जळगाव जिल्ह्याच्या मुक्ताईनगर तालुक्यातल्या कोथळी इथून संत मुक्ताबाईंच्या पालखीने काल पंढरपूरकडे प्रस्थान केलं. संत मुक्ताई पालखी सोहळ्याचं हे ३१८ वं वर्ष आहे. ७०० किलोमीटरचं सर्वात जास्त अंतर पार करणारा हा एकमेव पालखी सोहळा आहे.

पैठण इथून श्री संत एकनाथ महाराजांची पालखी सात जुलै रोजी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे.

****

हज २०२७ साठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया २० जुलैपर्यंत सुरू राहणार आहे. याबाबतचे अर्ज हज समितीच्या संकेतस्थळावर तसंच हज सुविधा मोबाईल अॅपद्वारे सादर करता येणार आहेत. इच्छुक यात्रेकरूंनी या सुविधेचा लाभ घेऊन विहित मुदतीत अर्ज सादर करण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य हज समितीनं केलं आहे.

****

नांदेड जिल्ह्यात जलजन्य आजारांचा प्रसार रोखण्यासाठी ग्रामपंचायतींनी विशेष खबरदारी घेऊन गावपातळीवर शुद्ध पाणीपुरवठा, पाणी गुणवत्तेची नियमित तपासणी आणि स्वच्छता राखावी, असं आवाहन जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक मयूरकुमार आंदेलवाड यांनी केलं आहे. स्टॉप डायरिया या विशेष मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ काल दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. १६ जून ते ३१ जुलै या कालावधीत जिल्हाभर ही मोहीम राबवण्यात ये आहे.

****

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचा आयुक्त अमोल येडगे यांनी काल आढावा घेतला. यात पावसाळी नियंत्रण कक्षातली उपस्थिती, तक्रार निवारण व्यवस्था आणि नागरिकांना तात्काळ मदत पोहोचवण्याच्या कार्यपद्धतीसंदर्भात त्यांनी सूचना दिल्या.  सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून सखल भागांवर सातत्यानं लक्ष ठेवून संबंधित विभागांना वेळेवर सूचना देण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले.

****

माहिती अधिकार कायद्यातल्या प्रस्तावित बदलाच्या विरोधात ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांनी पाच जुलैपासून उपोषण करण्याचा इशारा दिला आहे, त्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी काल हजारे यांची भेट घेतली. मात्र ही बैठक निष्फळ ठरली असून, आण्णा हजारे यांनी आपण उपोषणावर ठाम असल्याचं म्हटलं आहे.

****

हवामान

राज्यात बहुतांश जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना आणि धाराशिव जिल्ह्यात काल पाऊस झाला.

लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर, पुढील तीन दिवस छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि नांदेड जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 25.06.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 25 June 2026 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत...