Tuesday, 16 June 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 16.06.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 16 June 2026

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १६ जून २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      राज्यात विदर्भ वगळता इतरत्र नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात; शाळा प्रवेशोत्सवाद्वारे विद्यार्थ्यांचं उत्साहात स्वागत

·      राज्य शिक्षण मंडळाच्या दहावी तसंच बारावीच्या पुरवणी परीक्षेला आजपासून सुरुवात

·      येत्या २२ जून ते १० जुलै दरम्यान विधिमंडळाचं मुंबईत पावसाळी अधिवेशन

·      उन्हाळी हंगामात केलेली १० टक्के भाडेवाढ आणखी महिनाभर कायम ठेवण्याचा एसटी महामंडळाचा निर्णय

आणि

·      एकोणिसाव्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सुरुवात

****

राज्यात विदर्भ वगळता इतर सर्व भागांतल्या शाळा कालपासून सुरू झाल्या. नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात होताच विद्यार्थ्यांचं शाळांमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आलं. रायगड जिल्ह्यात वहाळ इथल्या पीएमश्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शाळा प्रवेशोत्सव पार पडला.

जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षण विभागाने केलेल्या परिवर्तनामुळे या शाळांचा दर्जा उंचावला असून, गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळे विद्यार्थ्यांची पटसंख्याही वाढत असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. जिल्हा परिषद शाळांमध्ये आता मूल्याधारित शिक्षण सुरु करणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. या शाळेतल्या चौथीच्या विद्यार्थिनीने मुख्यमंत्र्यांची छोटेखानी मुलाखत घेतली. या मुलाखतीत एका प्रश्नाला उत्तर देतांना, डिजिटल शिक्षणाचं महत्त्व मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं, ते म्हणाले…

बाईट- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

****

राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या उपस्थितीत बृहन्मुंबईतल्या भायखळा इथंल्या महानगरपालिकेच्या मुंबई पब्लिक स्कूलमध्ये ‘शाळा प्रवेशोत्सव’ साजरा करण्यात आला. यावेळी महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे, यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. राज्यपालांनी नवीन विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत पहिल्यांदाच शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांचे यावेळी स्वागत केलं.

****

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मावळ इथं शाळा प्रवेशोत्सवात सहभाग घेत ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं सांगितलं. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे इथल्या महापालिका शाळेत विद्यार्थ्यांचं फुलं देऊन स्वागत केलं.

****

छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या शाळांमध्ये चिवडा आणि मिठाई देऊन विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं. इस्कॉन अन्नामृतच्या वतीनं हा खाऊ तयार करण्याच्या कामात महापौर समीर राजूरकर, मनपा आयुक्त अमोल येडगे, उपायुक्त अंकुश पांढरे सहभागी झाले होते. या मान्यवरांनी शाळांमध्ये बालकांना हा खाऊ भरवून त्यांचं स्वागत केलं. दरम्यान, शहरातल्या अनेक शाळांच्या प्रवेशद्वारांवर रंगीबेरंगी रांगोळ्या काढून प्रवेश कमाली सजवण्यात आल्या होत्या. काही शाळांमध्ये घोड्यावरून तर काही शाळांमध्ये रथातून विद्यार्थ्यांनी प्रवेश केला.

****

जालना इथं जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा झाला. सांस्कृतिक कार्यक्रम आणि आकर्षक सजावटीसह रांगोळी, फुगे आणि स्वागत कमानी उभारून विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं. विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकं आणि गणवेशांचं वितरणही यावेळी करण्यात आलं.

****

धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजापूरमधल्या नगरपरिषद प्राथमिक शाळेत नवागत विद्यार्थ्यांचं तुतारी संबळाच्या निनादात स्वागत करून प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकाचं वाटप, पालक मेळावा, सेल्फी पॉईंट, या उपक्रमांसोबतच नवीन विद्यार्थ्यांच्या पायाचे ठसे घेऊन, त्यांना ओवाळून, पेढे आणि फुलं देऊन स्वागत करण्यात आलं.

****

नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी नांदेड तालुक्यातल्या मरळक इथं, तर मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी विष्णुपुरी इथल्या जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांचं फुलं देऊन स्वागत केलं. शिक्षण उपसंचालक दिपक चवणे यांनी अर्धापूर तालुक्यातल्या पार्डी इथल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला भेट देत विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचं वाटप केलं.

****

लातूर जिल्ह्यात काटगाव इथल्या जिल्हा परिषद शाळेत जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांच्या उपस्थितीत प्रवेशोत्सव साजरा झाला. विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात मोफत गणवेश आणि पाठ्यपुस्तकांचं वाटप करण्यात आलं. या अंतर्गत इयत्ता पहिलीत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांच्या पायाचा ठसा घेऊन त्याची प्रत पालकांना देण्याची 'पहिले पाऊल' ही अभिनव संकल्पनाही राबवली जात आहे.

उदगीर तालुक्यातल्या चोंडी इथल्या जिल्हा परिषद शाळेत सजवलेल्या बैलगाडीतून मिरवणूक काढून, तसंच विद्यार्थ्यांना मिष्टान्न देऊन स्वागत करण्यात आलं.

****

राज्यभरात इयत्ता ११ वीच्या केंद्रीय ऑनलाइन प्रक्रियेत आतापर्यंत एकूण २३ लाख ७६ हजार ४४९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, यापैकी पाच लाख ९७ हजार ८५२ विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेतल्या दुसऱ्या नियमित फेरीकरता सहभाग नोंदवला आहे. आतापर्यंत एक लाख ३२ हजार ५४७ विद्यार्थ्यांनी त्यांचे प्रवेश निश्चित केले आहेत. यापैकी छत्रपती संभाजीनगर विभागात १७ हजार ५३३ तर लातूर विभागात आठ हजार ९७२ प्रवेश निश्चित झाले आहेत.

****

राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेला आजपासून सुरूवात होत आहे. छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या उपस्थितीत जिल्हास्तरीय दक्षता समितीची बैठक काल पार पडली. जिल्ह्यात दहावीचे दोन हजार ९२८ विद्यार्थी १४ केंद्रांवर तर बारावीचे दोन हजार ८९१ विद्यार्थी दहा परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा देणार आहेत. दहावीची परीक्षा ३० जूनपर्यंत तर बारावीची परीक्षा ८ जुलैपर्यंत चालणार आहे.

****

राज्य विधिमंडळाचं आगामी पावसाळी अधिवेशन येत्या २२ जून ते १० जुलै दरम्यान मुंबईत होणार आहे. काल कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या तीन आठवड्यांच्या अधिवेशन काळात अनेक महत्त्वाच्या विधेयकांसह, महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र ओळख देणारे महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक मांडलं जाणार आहे. तसंच राज्यातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न, कर्जमाफी या विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

****

एस टी च्या सामान्य बस सेवांवरची १० टक्के हंगामी भाडेवाढ आणखी एक महिना कायम राहणार आहे. इंधनाचे वाढते दर आणि कर्मचाऱ्यांवरील वाढत्या खर्चामुळे या भाडेवाढीची मुदत वाढवण्यात आली आहे. सध्याचा वाढीव भाडेदर १५ जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहील, असं महामंडळाच्या परिपत्रकात म्हटलं आहे. उन्हाळी प्रवासाच्या हंगामात महसूल वाढवण्यासाठी एसटीनं १५ एप्रिलपासून हंगामी भाडेवाढ लागू केली होती.

****

एकोणिसावा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव - मिफ कालपासून सुरू झाला. केंद्रीय माहिती प्रसारण राज्यमंत्री एल. मुरुगन, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत या महोत्सवाचं उद्घाटन झालं. या महोत्सवात या वर्षीच्या स्पर्धा विभागात १४४ चित्रपटांचा समावेश आहे; यात १३ देशांतल्या चित्रपट निर्मात्यांच्या ५२ आंतरराष्ट्रीय आणि ९२ राष्ट्रीय प्रवेशिकांचा समावेश आहे. स्पर्धा-बाह्य विभागात ४६ सहभागी देशांतले २०२ चित्रपट दाखवले जात आहेत.

****

२१ जून रोजी साजरा होणाऱ्या बाराव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली कोलकाता इथं होणार असल्याची माहिती केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी दिली. योग दिनाच्या पूर्वतयारीनिमित्त दिल्ली इथं काल पत्रकार परिषदेत ते बोलत होते. संस्कृती मंत्रालयातर्फे देशभरातल्या १०० प्रसिद्ध ऐतिहासिक वारसा स्थळांवर तसंच परराष्ट्र मंत्रालयातर्फे जगभरात अडीच हजार ठिकाणी योग दिनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती जाधव यांनी दिली. ते म्हणाले..

बाईट- केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव

****

जागतिक योगदिनाच्या अनुषंगाने सध्या योग पंधरवडा पाळला जात आहे. या निमित्ताने दररोज एका आसनाची माहिती आपण घेत आहोत. योग अभ्यासक विद्या ताकसांडे यांनी दिलेली अर्ध हलासनाची माहिती आज आपण जाणून घेऊ.

बाईट- योग अभ्यासक विद्या ताकसांडे

****

नांदेड शहरातल्या डॉक्टर लेन भागात तोष्णीवाल औषधी दुकानावर काल अन्न आणि औषध प्रशासन विभागानं कारवाई केली. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधं देणं, विक्री केलेल्या औषधांचं बिल न देणं, तसंच मुदतबाह्य औषधाची विक्री केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली.

****

हवामान

येत्या दोन दिवसांत विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे. कोकणात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. राज्याच्या चारही विभागांमध्ये तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

****

No comments:

آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 16 جون 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 16 June-2026 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبریں ...