Monday, 22 June 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 22.06.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 22 June 2026

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २२ जून २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात

·      खासदार ओमराजे निंबाळकर यांचा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश

·      बारावा आंतरराष्ट्रीय योग दिन ठिकठिकाणी योगाभ्यासानं उत्साहात साजरा

आणि

·      नैर्ऋत्य मोसमी पाऊस आजपासून दक्षिण कोकण आणि राज्याच्या काही भागात सक्रिय होण्याची शक्यता

****

राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून प्रारंभ होत आहे. तीन आठवड्याचं हे अधिवेशन १० जुलैपर्यंत चालणार आहे. या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध विषयांवर सरकारची भूमिका मांडली. शेतकरी कर्जमाफी आपल्यासाठी राजकीय बाब नसून, कर्जमाफी हे शेतकऱ्यांना कर्जप्रक्रियेत नव्याने सहभागी करून घेण्याचं माध्यम असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी केलं. ते म्हणाले…

बाईट- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यावेळी उपस्थित होते. सरकार गतीमानतेने काम करत असतांना, विरोधी पक्षांनी खोटे आरोप करू नये, असं आवाहन एकनाथ शिंदे यांनी केलं. तर सुनेत्रा पवार यांनी यावेळी बोलतांना, विरोधकांच्या सर्व विधायक सूचनांचं सरकार नेहमीचं स्वागत करतं, असं सांगत, या अधिवेशन काळात सहकार्याचं आणि जनतेशी निगडित प्रश्नांवर चर्चेचं आवाहन केलं.

****

दरम्यान, सरकारच्या चहापानावर विरोधकांनी काल बहिष्कार टाकला. जनतेच्या प्रश्नांबाबत असंवेदनशील असलेलं हे सरकार सर्व बाजूंनी अपयशी ठरल्याची टिका विरोधी पक्षांनी केली. आजपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात राज्यातल्या तेरा कोटी जनतेचे प्रश्न आक्रमकपणे मांडणार असल्याचं विरोधी पक्षाच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. राष्ट्रावादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील, काँग्रेस नेते सतेज पाटील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव यावेळी उपस्थित होते. विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरं देण्याऐवजी सरकार टिंगलटवाळी करत असून, पेरण्या लांबल्याने सरकारने दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी यावेळी विरोधकांनी केली.

****

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी आपण शिवसेनेत जाणार असल्याचा निर्णय जाहीर केला आहे. काल धाराशिव तालुक्यात गोवर्धनवाडी इथं समर्थकांच्या बैठकीनंतर त्यांनी आपली ही भूमिका स्पष्ट केली. आता आपण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याचं सांगत, आपल्या मतदारसंघातील समस्या सोडवण्यासाठी हा निर्णय आवश्यक असल्याचं राजे निंबाळकर म्हणाले.

****

नांदेड इथल्या सचखंड गुरुद्वारासाठीचा ७० वर्षांपूर्वीचा कायदा रद्द करून, त्याऐवजी संपूर्ण नवीन कायदा लागू करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. विधी आणि न्याय विभागाच्या सल्ल्याने या नव्या कायद्याचे प्रारूप अंतिम करून, विधिमंडळ अधिवेशनात मंजुरीसाठी सादर केलं जाईल. विधीमंडळाच्या मान्यतेनंतर या कायद्याला अंतिम स्वरूप दिलं जाईल. त्यानंतर गुरुद्वाराचे नवीन नियम, निवडणूक नियम आणि उपविधी तयार केले जातील, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

राज्यातल्या १४ जिल्ह्यातल्या ८ नगरपरिषदा आणि १४ नगरपंचायतीमधल्या एकूण ४७ जागांसाठीच्या पोटनिवडणुकीसाठीची मतमोजणी काल झाली. एकूण ४७ जागांपैकी ८ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत, तर एका जागेवर एकाही उमेदवाराने अर्ज न दाखल केल्याने ती जागा रिक्त राहिली आहे.

गडचिरोली जिल्ह्यात नगरपरिषदेच्या एक आणि नगरपंचायतीच्या दोन जागांपैकी भाजपा, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने प्रत्येकी एका जागेवर विजय मिळवला आहे.

****

विधान परिषदेच्या निवडणुकीतल्या मतदानाची मोजणी आज होत आहे. उस्मानाबाद- लातूर-बीड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी धाराशिव इथं भाई उद्धवराव पाटील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत होणार आहे. नांदेड इथंही मतमोजणीची तयारी पूर्ण झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. औरंगाबाद जालना विधानपरिषदेची मतमोजणी छत्रपती संभाजीनगर इथं उस्मानपूरा भागातल्या शासकीय औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात होणार आहे. त्यासाठी ८८ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना काल प्रशिक्षण देण्यात आलं.

****

बारावा आंतरराष्ट्रीय योग दिवस काल सर्वत्र योगाभ्यासाच्या सादरीकरणातून साजरा झाला. कोलकाता इथं ऐतिहासिक लाल रस्त्यावर झालेल्या मुख्य कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहभाग घेतला, तर मध्य प्रदेशात जबलपूर इथं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या प्रमुख उपस्थितीत योग दिनाचा कार्यक्रम झाला. राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी मुंबईत लोकभवनात भारतीय तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांसोबत योगाभ्यास सत्रात सहभाग घेतला. मुंबईत जुहू चौपाटीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत योग दिवस साजरा झाला.

मराठवाड्यात साजरा झालेल्या योगदिनाचा संक्षिप्त आढावा आमच्या प्रतिनिधीकडून

बाईट - योग मराठवाडा

“छत्रपती संभाजीनगर इथं बिबी का मकबरा तसंच विभागीय क्रीडा संकुल इथं सामुहिकरित्या योगासनांचा सराव करण्यात आला. सिडको एन आठ इथल्या वनस्पतीशास्त्र उद्यानात विशेष जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आला. धाराशिव इथं श्री तुळजाभवानी क्रीडा संकुलात योगाभ्यास करण्यात आला तर परभणी इथं प्रियदर्शनी इंदिरा गांधी क्रीडा संकुलात योग प्रात्यक्षिकं सादर करण्यात आले. हिंगोली इथं योग दिनानिमित्त झालेल्या योग प्रात्यक्षिक शिबिरांमध्ये नागरिक उत्साहात सहभागी झाले. लातूर इथं भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात विशेष योगाभ्यास कार्यक्रम पार पडला. शहरातील प्रमुख चौका-चौकांत रांगोळीच्या माध्यमातून योगाचे महत्त्व विशद करण्यात आलं. जालना इथं जिल्हा क्रीडा संकुलात योग प्रात्यक्षिकांसह वृक्षारोपण करण्यात आलं. बीड इथं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणात झालेल्या योगाभ्यास सादरीकरणात मंत्री पंकजा मुंडे सहभागी झाल्या. नांदेड इथं स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या क्रीडा आणि शारीरिक शिक्षण विभागाच्या वतीनं योग दिनानिमित्त योगासनांची प्रात्यक्षिकं सादर करून योग दिवस साजरा झाला.’’

****

वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेशासाठी नीट युजी फेरपरीक्षा २०२६ काल देशातल्या ५५१ आणि परदेशातल्या १४ केंद्रांवर कडक बंदोबस्तात पार पडली. २२ लाख ७९ हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पन्नास केंद्रांवर तर लातूर जिल्ह्यात २६ केंद्रांवर ही परीक्षा पार पडली.

****

नांदेड जिल्ह्यात उन्हाच्या तीव्रतेमुळे इयत्ता पहिली ते बारावीच्या सर्व शाळा आणि महाविद्यालय सकाळच्या सत्रात भरवण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले आहेत. पुढील आदेशापर्यंत हे वर्ग सकाळी आठ ते साडेबारा यावेळेत भरवण्यात यावेत अशा सूचना शिक्षण विभागाकडून दिल्या आहेत.

****

रत्नागिरी जिल्ह्यातल्या गणपतीपुळे समुद्रात बुडालेल्या पाचही तरुणांचे मृतदेह काल सापडले. छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातल्या बिडकीन इथले हे तरुण परवा सकाळी बुडाले होते. पोलीस, तटरक्षक दल, मच्छिमार, जीवरक्षक आणि स्थानिक नागरिक यांच्या पथकाकडून कसून शोधकार्य सुरू होतं. रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी काल मृत तरुणांच्या नातेवाईकांची प्राथमिक आरोग्य केंद्रात भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं.

****

छत्रपती संभाजीनगर इथं झाल्टा फाटा परिसरात १२ लाख २७ हजार ९६४ किंमतीचा प्रतिबंधित गुटखा काल जप्त करण्यात आला. अन्न आणि औषध प्रशासनाच्या पथकानं ही कारवार्इ केली.

****

हिंगोली तालुक्यात काल बिबट्याच्या हल्ल्यात एक गुराखी किरकोळ जखमी झाला. बासंबा शिवारात काल सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. महेश दगडू कुरवाडे असं जखमी गुराख्याचं नाव असून, त्यांचा आवाज ऐकून आजूबाजूच्या शेतातील शेतकऱ्यांनी तातडीने धाव घेत, बिबट्याला हुसकावून लावलं. महेश यांच्यावर हिंगोली इथं सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

****

आषाढी एकादशीनिमित्त श्री क्षेत्र पंढरपूरला जाण्यासाठी बुलडाणा जिल्ह्यातील संतनगरी शेगाव इथून श्री संत गजानन महाराज संस्थानच्या पालखीनं काल प्रस्थान केलं. यावेळी संपूर्ण परिसर 'गण गणात बोते' आणि 'जय हरी विठ्ठल'च्या जयघोषात - भगव्या पताका, टाळ-मृदंगाच्या गजरात न्हाऊन गेला होता.

****

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ, सीबीएसईनं इयत्ता १२वी च्या गुणतपासणी आणि पुनर्मूल्यांकनाचे निकाल जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत ८७ टक्क्यांहून अधिक अर्जांचे निकाल जाहीर झाले असून, उर्वरित निकाल लवकरच जाहीर केले जातील, असं मंडळानं म्हटलं आहे.

****

हवामान

नैर्ऋत्य मोसमी पाऊस आजपासून दक्षिण कोकण आणि राज्याच्या काही भागात सक्रिय होण्याची शक्यता आहे. २४ ते २६ जून पर्यंत मुंबईसह राज्याच्या अंतर्गत भागांपर्यंत पावसाचा जोर वाढेल, असं हवामान विभागाचे निवृत्त अधिकारी कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यांत आज काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह, हलका ते मध्यम पाऊस आणि ताशी ४०-५० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विभागात इतर जिल्ह्यातही हलक्या पावसाची शक्यता आहे.

****

No comments:

آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 22 جون 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 22 June-2026 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبریں ...