Saturday, 6 June 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 06.06.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 06 June 2026

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक जून २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानासाठी १६ कोटी ७१ लाख रुपये निधी मंजूर; छत्रपती संभाजीनगर तसंच बीडसाठी १२ कोटी २७ लाख रुपये वर्ग

·      नीट परीक्षेबाबत सर्व यंत्रणांना सतर्कतेची मुख्यमंत्र्यांकडून सूचना

·      प्लास्टिकच्या चलनी नोटांचा प्रस्ताव रिझर्व बँकेच्या विचाराधीन

·      अन्नपदार्थ बांधण्यासाठी वर्तमानपत्रांचा वापर बंद करण्याचे निर्देश

·      जागतिक पर्यावरण दिन विविध कार्यक्रमांनी साजरा

आणि

·      १८ वर्षांखालील आशिया चषक हॉकी स्पर्धेत पाकिस्तानचा पराभव करत भारत अंतिम फेरीत दाखल

****

मार्च महिन्यात राज्यात विविध जिल्ह्यांत अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी १६ कोटी ७१ लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. याबाबतचा शासननिर्णय आज जारी करण्यात आला. यामध्ये छत्रपती संभाजीनगर विभागात छत्रपती संभाजीनगर तसंच बीड जिल्ह्यासाठी १२ कोटी २७ लाख ६० हजार रुपये तर नागपूर विभागात गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यासाठी सुमारे चार कोटी ४१ लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. पात्र लाभार्थ्यांना थेट लाभहस्तांतरणाद्वारे त्यांच्या बँक खात्यात निधी जमा करण्याची सूचना संबंधित यंत्रणेला देण्यात आली आहे.

दरम्यान, आगामी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्यातील साधू ग्राम प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या सुमारे १९१ एकर जमिनीच्या संपादनासाठी राज्य सरकारने दोन हजार २६७ कोटी रुपये खर्चाला मंजुरी दिली आहे.

मराठा समाजातील विद्यार्थ्यांना इतर मागास प्रवर्गाच्या धर्तीवर सर्व शैक्षणिक सवलती आणि योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. २०२६-२७ या चालू शैक्षणिक  वर्षापासूनच या सवलती आणि योजना लागू असतील. याबाबतचा शासननिर्णय काल जारी करण्यात आला.

****

वैद्यकीय अभ्यासक्रमासाठीची राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षा पारदर्शक आणि तणावरहित वातावरणात व्हावी, यासाठी सर्व यंत्रणांनी सतर्क राहून दक्षता घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. नीट परीक्षेच्या पूर्व तयारीसंदर्भात काल मुंबईत झालेल्या बैठकीत ते बोलत होते.  पुणे आणि लातूर इथल्या परीक्षा केंद्रांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात यावं, परीक्षा केंद्रांवर कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार होऊ नये, याची दक्षता घेण्याची सूचना त्यांनी केली.

****

राज्यात अनुसुचित जातींच्या उपवर्गीकरणामुळे कोणत्याही जातीवर अन्याय होवू नये, हीच रिपब्लिकन पक्षाची भूमिका असल्याचं, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. अनुसुचित जातींचे उपवर्गीकरण करावं, आणि सर्व जातींना लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण देवून समान न्याय द्यावा, त्यामुळे जोपर्यंत जातनिहाय जनगणना पूर्ण होत नाही, तोपर्यंत अनुसुचित जातींचे उपवर्गीकरण करु नये अशी भूमिका आठवले यांनी मांडली.

****

जागतिक पातळीवर प्रतिकूल परिस्थिती असताना भारत समर्थपणे आर्थिक अडचणींना तोंड देत असल्याचं रिझर्व बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितलं आहे. ते काल मुंबईत, पत्रकार परिषदेत बोलत होते. बँकेचा रेपो दर सव्वा ५ टक्क्यांवर कायम राहणार आहे. दरम्यान, देशात चलनी नोटांकरता प्लॅस्टिकचा वापर करण्याचा प्रस्ताव बँकेच्या विचाराधीन असल्याचं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं.

****

राज्याचे माजी मंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते अनंतराव थोपटे यांच्या पार्थिव देहावर काल पुण्यात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. थोपटे यांचं परवा पुण्यात निधन झालं, ते ९३ वर्षांचे होते.

****

अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण-एफ एस एस ए आय ने अन्नपदार्थ बांधण्यासाठी किंवा अन्न वाढण्यासाठी, वर्तमानपत्रांचा वापर बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. छपाईच्या शाईमध्ये असलेले हानिकारक पदार्थ, अन्नपदार्थांमध्ये उतरण्याच्या शक्यतेमुळे हे निर्देश देण्यात आले. सर्व विक्रेत्यांनी अन्नपदार्थांची विक्री आणि वितरण सुरक्षित आणि मान्यताप्राप्त साहित्यातून करावी, ग्राहकांनीही या संदर्भात सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

****

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ- सीबीएसईने गुण पडताळणी आणि पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज सादर करण्याची मुदत उद्या ७ जूनपर्यंत वाढवली आहे. विद्यार्थी आता उद्या मध्यरात्रीपर्यंत यासाठी अर्ज करू शकतील.

****

खरीप हंगामासाठीची प्रमाणित बियाणे महाडीबीटी पोर्टलवर प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, इच्छुकांनी महाडीबीटी पोर्टलवर जाऊन तात्काळ अर्ज करावेत, असं आवाहन कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलं आहे. ते काल मुंबई इथं बोलत होते. या योजनेअंतर्गत राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी ३ लाख क्विंटल बियाण्यांचा साठा उपलब्ध करून देण्यात आला आहे.

****

जागतिक पर्यावरण दिन काल साजरा झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त संदेश देत, निसर्गाशी नाळ जोडून स्वच्छ हवा आणि सुरक्षित भविष्य घडवण्याचा संकल्प अधोरेखित केला. राज्य मार्ग परिवहन - एस टी महामंडळ राज्यातल्या सर्व बस स्थानकांमध्ये स्वच्छता मोहिमेला कालपासून प्रारंभ झाला. बसस्थानक आणि परिसर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अत्याधुनिक स्वच्छता उपकरणांनी नियमितपणे स्वच्छ करण्यात येणार आहे. तसंच एसटी बसेस, चालक-वाहक विश्रांतीगृह आणि प्रसाधनगृहांची दर चार तासांनी स्वच्छता केली जाणार आहे.

****

छत्रपती संभाजीनगर इथं सुखना नदीच्या काठावर भारतीय वंशाची सुमारे अडीच हजार झाडं लावण्यात आली. आमदार अनुराधा चव्हाण, महापौर समीर राजूरकर यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

****

जालना जिल्ह्यातल्या बदनापूर तालुक्यातल्या पाडळी इथं जलदिंडी अभियानाचा काल समारोप झाला. जिल्हाधिकारी अशिमा मत्तिल यांनी यावेळी बोलतांना, जलसंवर्धन, जलसाक्षरता आणि पर्यावरण संरक्षणासाठी युवकांनी पुढाकार घेण्याचं आवाहन केलं.

****

परभणी जिल्ह्यातल्या रहाटी इथं युवा जल दिंडी २०२६ अभियानाचा काल समारोप झाला. अभियानात सहभागी युवकांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं. ‘एक पेड माँ के नाम’ या उपक्रमांतर्गत परभणी इथं माजी केंद्रीय मंत्री खासदार भागवत कऱ्हाड यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं.

****

हिंगोली इथं जिल्हा आणि सत्र न्यायालय परिसरात काल वृक्षारोपण करण्यात आलं. न्यायिक अधिकारी, वकील संघाचे पदाधिकारी, सदस्य तसंच न्यायालयीन कर्मचारी यांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वृक्षारोपण केलं.

****

धाराशिव इथंही जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने काल न्यायिक अधिकारी निवासस्थान परिसरात वृक्षारोपण करण्यात आलं. मानवी जीवनात झाडांचं महत्त्व आणि निसर्ग संवर्धन, याबाबत जनजागृतीही करण्यात आली.

****

नांदेड महापालिकेच्या, हरित नांदेड अभियानाला काल प्रारंभ झाला. या अभियानांतर्गत नांदेड शहरात १८ हजार झाडं लावली जाणार असल्याची माहिती आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी दिली.

****

ऊसतोड कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थांनी समन्वयाने काम करण्याची गरज, बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी वर्तवली आहे. मराठवाडा ग्रामीण विकास संस्था संचलित ऊसतोड कामगार प्रकल्पांतर्गत जिल्हास्तरीय स्थलांतर पूर्व नियोजन समन्वय बैठकीत ते काल बोलत होते.

****

औद्योगिक विकासासोबत पर्यावरणाचा समतोल राखणंही महत्त्वाचं असल्याचं, विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी म्हटलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं सीआयआयच्या १६ व्या परिषदेत ते प्रमुख पाहुणे म्हणून काल बोलत होते.  छत्रपती संभाजीनगरला आज इलेक्ट्रिक व्हेईकल कॅपिटल म्हणून नवी ओळख मिळत असून भविष्यात हे शहर देशाच्या औद्योगिक नकाशावर अधिक ठळकपणे झळकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

****

लातूर शहरातल्या विविध भागात मोकाट कुत्र्यांच्या वाढलेल्या त्रासाच्या विरोधात भारतीय जनता पक्षाच्या वतीने काल आंदोलन करण्यात आलं. भाजप नगरसेवकांनी महानगरपालिकेसमोर हे अनोखं आंदोलन केलं

****

शासकीय सेवेत कार्यरत आणि सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित सेवा विषयक अडचणी आता तातडीने मार्गी लागणार आहेत. विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांच्या संकल्पनेतून संपूर्ण विभागात दर महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी कर्मचारी समाधान शिबीर घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार कालबीड इथं पहिलं कर्मचारी समाधान शिबीर पार पडलं

****

जनगणनेच्या कामात हलगर्जीपणा आणि आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी परभणी जिल्ह्यात ७ कर्मचाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात आली. कर्तव्यावर हजर न राहिल्याबद्दल या सातही जणांविरुद्ध नवा मोंढा ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

****

१८ वर्षांखालील मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघानं पाकिस्तानचा पराभव करत, अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. जपानमध्ये सुरु असलेल्या या स्पर्धेत काल उपांत्य फेरीत भारतीय संघाने पाकिस्तानचा ५-३ असा पराभव केला. आज होणाऱ्या अंतिम फेरीत भारताचा सामना यजमान जपानच्या संघाशी होणार आहे. दरम्यान, मुलींच्या १८ वर्षांखालच्या आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाचा उपांत्य फेरीत चीनने पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभव केला.

****

हवामान

नैर्ऋत्य मोसमी पाऊस गोवा आणि कर्नाटकच्या काही भागात पोहोचला आहे. मोसमी पाऊस महाराष्ट्रात पोहोचण्यासाठी स्थिती अनुकूल असल्याचं हवामान विभागाने म्हटलं आहे.

****

No comments:

آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 13 جون 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 13 June-2026 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبریں ...