Friday, 12 June 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 12.06.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 12 June 2026

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १२ जून २०२ सकाळी.०० वाजता

****

आर्थिक साक्षरता आणि उद्योजकतेपासून ते शिक्षण, आरोग्यसेवा, स्वच्छता, गृहनिर्माण, क्रीडा, विज्ञान आणि प्रशासनापर्यंत महिला विविध क्षेत्रांत अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ड्रोन तंत्रज्ञानासारख्या उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये महिलांचा वाढता सहभाग संधींचे नवे मार्ग खुले करत आहे आणि त्यामुळे संपूर्ण देशात विकासाचं चित्र बदलत असल्याचं त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. गेल्या १२ वर्षांत सरकारने महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाला चालना देण्यासाठी सातत्याने काम केलं असून, याचे सकारात्मक परिणाम आज वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये स्पष्टपणे दिसून येत असल्याचं त्यांनी नमूद केलं. एनडीए सरकारचे प्रयत्न सन्मान, संधी आणि सक्षमीकरण यावर आधारित आहेत. सरकार स्वयं-सहायता गटांना सक्रियपणे पाठिंबा देत आहे, जे महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं.

****

आसाम-नागालँड सीमेवरील विवादित भागात कच्च्या तेलाचा आणि नैसर्गिक वायूचा संयुक्त शोध आणि उत्पादन करण्यासाठी केंद्र सरकार, नागालँड सरकार आणि आसाम सरकार यांच्यात एका त्रिपक्षीय सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांच्या उपस्थितीत हा करार पार पडला. या करारामुळे तेल उत्खनन क्षमता दिवसाला १० पटीने वाढून १५ हजार कोटी रुपयांहून अधिक मूल्य मिळण्याची क्षमता निर्माण होईल. यामुळे भारताचे परदेशी तेलावरील अवलंबित्व कमी होणार असल्याचं शहा यांनी सांगितलं.

****

भारताचे प्रख्यात नेमबाजी प्रशिक्षक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतले माजी सुवर्णपदक विजेते जसपाल राणा यांचं दिल्लीत निधन झालं, ते ४९ वर्षांचे होते. जर्मनीत म्युनिक इथं झालेल्या 'आयएसएसएफ' विश्वचषकानंतर भारतीय पथक परतत असताना त्यांची प्रकृती बिघडली, नवी दिल्लीत उतरल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. राणा हे भारतीय पिस्तूल नेमबाजांचे 'हाय-परफॉर्मन्स कोच' म्हणून कार्यरत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जसपाल राणा यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. राणा यांच्या जाण्याने भारतीय क्रीडा विश्वाची मोठी हानी झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. नेमबाजी क्षेत्रातील आपल्या असामान्य कामगिरीद्वारे राणा यांनी देशाला अनेक गौरवशाली क्षण दिले. उत्कृष्टता, शिस्त आणि क्रीडा क्षेत्रातील सेवाभाव यांप्रती त्यांची अखंड निष्ठा सर्वांसाठी प्रेरणादायी राहील, असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. 

****

गर्भधारणापूर्व आणि प्रसूतिपूर्व लिंग निदान प्रतिबंधक कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या आवश्यकतेवर सर्वोच्च न्यायालयाने भर दिला आहे. न्यायमूर्ती संजय करोल आणि न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा यांच्या पीठाने काल यासंदर्भात एका सुनावणीदरम्यान, अनेक राज्यांमध्ये जन्माचं लिंग गुणोत्तर राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी असल्याकडे लक्ष वेधलं. पितृसत्ताक मानसिकतेतून उद्भवणाऱ्या लिंग-निवडीच्या प्रथा अजूनही अस्तित्वात असल्याबद्दल न्यायालयाने चिंता व्यक्त केली.

****

राज्यातली सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी नवी दिल्लीत राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या केंद्रीय अतिरिक्त सचिव आणि व्यवस्थापकीय संचालक आराधना पटनाईक यांची कर्तव्य भवनमध्ये काल भेट घेतली. २०२६२७ च्या कार्यक्रम अंमलबजावणी आराखड्यांतर्गत निधी मंजुरी तसंच अतिरिक्त निधीच्या मागणीसाठी ही बैठक महत्त्वाची मानली जात होती. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत कॉक्लियर इम्प्लांट शस्त्रक्रियेसाठी लाभार्थी बालकांची वयोमर्यादा दोन वर्षांवरून पाच वर्षांपर्यंत वाढविण्यास या बैठकीत तत्त्वतः मान्यता देण्यात आली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाकडून लोकाभिमुख योजना राबवण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनामध्ये समन्वय वाढवण्यावर भर दिला जात आहे.

****

नाशिक इथं पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ध्वजस्तंभ शिलान्यास पूजन सोहळा काल मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत झाला. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे ३१ ऑक्टोबर रोजी धर्मध्वजारोहण होऊन कुंभमेळा पर्वाला प्रारंभ होणार आहे. या कुंभमेळयासाठी १२ कोटींपेक्षा जास्त भाविक येण्याची अपेक्षा आहे.

****

सामाजिक कार्यकर्ते पद्मभूषण अण्णा हजारे यांच्या ९० व्या वाढदिवसानिमित्त, संरक्षण मंत्रालयानं त्यांना एक अनोखी भेट दिली. १९६५ आणि १९७१ च्या युद्धांमध्ये प्रत्यक्ष लढलेला T-55 रणगाडा त्यांना भेट म्हणून देण्यात आला असून, हा रणगाडा काल राळेगणसिद्धी इथं दाखल झाला. त्याचं अधिकृत अनावरण १५ जून रोजी होणार आहे. हा रणगाडा पाहून अण्णा हजारे यांनी युद्धाच्या आठवणींना उजाळा दिल्याचं आमच्या वार्ताहराने कळवलं आहे.

****

नाशिक जवळच्या गंगापूर धरणाच्या बॅकवॉटरमध्ये अंघोळीसाठी उतरलेल्या एकाच कुटुंबातल्या चौघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये एक २१ वर्षीय विवाहित तरुणी आणि तीन किशोरवयीन मुलांचा समावेश आहे.

अकोला जिल्ह्यात मुर्तीजापुर तालुक्यातल्या समशेरपूर इथं अधिक मास आणि एकादशीच्या पार्श्वभूमीवर धार्मिक स्नानासाठी गेलेल्या माय-लेकाचा काटेपूर्णा नदीत बुडून मृत्यू झाला. शोधमोहिमेदरम्यान त्या दोघांचे मृतदेह नदीत आढळून आले.

****

 

 

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 13.06.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 13 June 2026 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत...