Monday, 8 June 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 08.06.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 08 June 2026

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ८ जून २०२ दुपारी १.०० वा.

****

आकाशवाणीच्या स्थापनेला आज ९० वर्ष पूर्ण झाली. यानिमित्त केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी संस्थेचं अभिनंदन केलं आहे. संपूर्ण देश आकाशवाणीशी जोडलेला असल्याचं रिजिजू यांनी यासंदर्भात जारी केलेल्या व्हिडिओ संदेशात म्हटलं आहे. आकाशवाणीच्या माध्यमातून एक भारत श्रेष्ठ भारत ही भावना अधिक दृढ असल्याचं रिजिजू यांनी नमूद केलं. ते म्हणाले -

बाईट – केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला १२ वर्ष पूर्ण झाली असून, या कालावधीत गरीबांच्या कल्याणासाठी सरकारने केलेल्या उपाययोजनांवर पंतप्रधानांनी प्रकाश टाकला. यासंदर्भात समाज माध्यमावरच्या संदेशात त्यांनी, गेल्या १२ वर्षांत भारताने अनेक परिवर्तनांचा अनुभव घेतला आहे आणि या बदलांच्या केंद्रस्थानी गरीब आणि वंचितांचं कल्याण हेच राहिलं असल्याचं सांगितलं. सरकारला नेहमीच ‘अंत्योदय’ या संकल्पनेतून प्रेरणा मिळाली आहे; तसंच, अनेक दशकांपासून विकासाच्या प्रक्रियेत मागे राहिलेल्या घटकांपर्यंत विकासाचे लाभ पोहोचवणं, हे निरंतर उद्दिष्ट राहिलं असल्याचं त्यांनी नमूद केलं. ‘थेट लाभ हस्तांतरण’ आणि डिजिटल प्लॅटफॉर्म्सच्या माध्यमातून लोकांना थेट आणि पारदर्शकपणे मदत पोहोचत आहे. यामुळे गळती कमी झाली, कार्यक्षमतेत वाढ झाली असून, आणि शासनावरील विश्वास अधिक दृढ झाला असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. गरीब कल्याणाचा हा प्रवास आता मानवी सक्षमीकरणाच्या सामूहिक चळवळीत रूपांतरित होत असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं.

****

केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी यासंदर्भात बोलताना, मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशातल्या गरिब जनतेला सुरक्षा, आत्मविश्वास आणि आत्मसन्मान दिल्याचं नमूद केलं. या काळात पंतप्रधान जन धन योजना, उज्वला योजना, आवास योजना, जल जीवन मिशन, आयुष्मान भारत, गरीब कल्याण योजना अशा योजनांनी देशातल्या गरीब जनतेला बळ दिल्याचं त्यांनी याबाबतच्या संदेशात म्हटलं आहे.

****

पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आतापर्यंत देशात चार कोटींहून अधिक घरं बांधल्याचं केंद्रीय गृहनिर्माण आणि शहर विकास मंत्री मनोहर लाल यांनी म्हटलं आहे. या घरांमध्ये नळाचं पाणी, गॅस आणि शौचालय या मुलभूत सुविधा उपलब्ध असल्याचं त्यांनी सांगितलं. या सुविधांमुळे या घरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांचं जीवन सुरक्षित आणि सुसह्य झालं असल्याचं मनोहर लाल यांनी नमूद केलं.

****

प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेच्या अंमलबजावणीत पश्चिम बंगाल सहभागी होणार आहे. नवी दिल्ली इथं राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण आणि पश्चिम बंगाल सरकार यांच्यात आज यासंदर्भातला करार होणार आहे. या निर्णयामुळे देशभरातल्या नागरिकांना समान, सुलभ आणि दर्जेदार आरोग्य सेवा मिळण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललं जात आहे. तसंच पश्चिम बंगालमधल्या नागरिकांच्या आरोग्य खर्चात मोठी कपात होण्याची अपेक्षा आहे.

****

प्रभावी नियोजन आणि योजनांच्या परिणामकारक अंमलबजावणीमुळे ग्राहकांना अखंडित आणि स्वस्त वीज देण्यात महावितरणला यश आल्याचं महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी सांगितलं. मुंबईत काल महावितरण कंपनीच्या २१व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते काल बोलत होते. महाराष्ट्रात यावर्षी विजेची उच्चांकी मागणी नोंदवण्यात आली, महावितरणने ही मागणी विनाअडथळा पूर्ण केल्याचं त्यांनी सांगितलं. प्रभावी नियोजन, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेची परिणामकारक अंमलबजावणी, कृषिपंपांचं विक्रमी सौर उर्जीकरण तसंच नवीकरणीय ऊर्जेची मोठ्या प्रमाणात निर्मिती आणि वापर यामुळे महावितरणला विजेची वाढती मागणी पूर्ण करणं शक्य झाल्याचं लोकेश चंद्र यांनी सांगितलं.

****

आषाढी यात्रेसाठी लंडन ते पंढरपूर ही पहिली ग्लोबल दिंडी काल लंडन इथून मार्गस्थ झाली. ही दिंडी ११ देश आणि ५० दिवसांचा प्रवास करून शेकडो भक्तांसह आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपुरात पोहोचणार आहे.

दरम्यान, आषाढी वारीसाठी देहू इथून संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा सात जुलै तर आळंदी इथून संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा आठ जुलै रोजी मार्गस्थ होणार आहे.

****

बुलढाणा जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर मेहकर तालुक्यातल्या पिंपरी माळी गावाजवळ आज पहाटे खाजगी प्रवासी बसच्या भीषण अपघातात २५ प्रवासी जखमी झाले असून, त्यापैकी ११ जणांची प्रकृती गंभीर आहे. पुण्याहून नागपूरकडे जाणारी बाबा ट्रॅव्हल्सची लक्झरी बस समोर जाणाऱ्या ट्रकला पाठीमागून धडकल्याने हा अपघात झाला.

****

नेऋत्य मोसमी पाऊस आज पश्चिम-मध्य बंगाल उपसागराचा ईशान्य आणि वायव्य भाग व्यापण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे या भागांमध्ये पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता असून नागरिकांनी हवामान बदलानुसार सतर्क राहावं, असं आवाहन करण्यात येत आहे.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 13.06.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 13 June 2026 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत...