Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 01
June 2026
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १ जून २०२६ दुपारी १.०० वा.
****
पथविक्रेत्यांना परवडणारं
कर्ज आणि सामाजिक सुरक्षा उपलब्ध करून देणाऱ्या पीएम स्वनिधी योजनेला आज सहा वर्ष पूर्ण
झाली. या योजनेमुळे लाखो पथविक्रेत्यांना आर्थिक बळ मिळालं असून, लाभार्थ्यांच्या
सरासरी उत्पन्नात दरवर्षी २० टक्क्यांनी वाढ नोंदवली गेली आहे. मार्च २०३० पर्यंत मुदतवाढ
देण्यात आलेल्या या योजनेने लाखो पथविक्रेत्यांच्या आयुष्यात सकारात्मक परिवर्तन घडवून
आणलं आहे. आतापर्यंत ७५ लाख विक्रेत्यांना १७,८०० कोटी रुपयांहून अधिक कर्जवाटप
करण्यात आलं असून, डिजिटल व्यवहारांना चालना मिळाली आहे आणि लाभार्थ्यांच्या
उत्पन्नात जवळपास २० टक्क्यांनी वाढ झाली आहे.
तारणमुक्त कर्ज, आर्थिक समावेशन
आणि प्रगतीच्या नव्या संधी उपलब्ध करून देत या योजनेने देशातल्या असंख्य पथविक्रेत्यांच्या
जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणला असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
आपली मेहनत, जिद्द आणि उद्यमशीलतेच्या बळावर देशाच्या अर्थव्यवस्थेला अधिक मजबूत करणाऱ्या सर्व
लाभार्थ्यांना, त्यांनी सामाजिक माध्यमावरच्या संदेशातून शुभेच्छा दिल्या.
****
१९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी
सिलिंडरच्या किमतीत चार प्रमुख शहरांमध्ये ४२ रुपयांपासून ते साडे ५३ रुपयांपर्यंत
वाढ करण्यात आली आहे. दिल्लीमध्ये व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत ४२ रुपयांची
वाढ करण्यात आली असून, आता त्याची किंमत तीन हजार ११३ रुपये ५० पैसे इतकी असेल.
मुंबईमध्ये ही वाढ साडे ४३ रुपये करण्यात आली असून, त्याची किंमत आता तीन हजार
६७ रुपये ५० पैसे होईल. कोलकाता इथं साडे ५३ रुपये, तर चेन्नईत ४२ रुपयांची वाढ
करण्यात आली आहे. घरगुती वापरासाठीच्या स्वयंपाकाच्या गॅसच्या दरांमध्ये कोणताही बदल
करण्यात आलेला नाही.
****
सर्वोच्च न्यायालयात पाच नवीन
न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे सरन्यायाधीशांसह सर्वोच्च न्यायालयाच्या
न्यायाधीशांची संख्या ३७ वर पोहोचली आहे. कायदा आणि न्याय मंत्री अर्जुन राम मेघवाल
यांनी समाज माध्यमावर ही माहिती दिली. कायदा मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, पंजाब आणि
हरियाणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती शील नागू, मुंबई उच्च
न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती चंद्रशेखर, मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे
मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती संजीव सचदेवा आणि जम्मू –काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचे
मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती अरुण पल्ली, तसंच, वरिष्ठ वकील
वेंकिटा सुब्रमणी मोहना यांची सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात
आली आहे.
****
राज्यसभेच्या २४ जागांसाठी
होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीची अधिसूचना जारी करण्यात आली. या निवडणुकीसाठी उमेदवारी
अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झाली, आठ जूनपर्यंत अर्ज दाखल करता
येणार आहेत. मतदान आणि मतमोजणी १८ जून रोजी होणार आहे. महाराष्ट्रात विद्यमान उपमुख्यमंत्री
सुनेत्रा पवार यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर निर्माण झालेल्या रिक्त
जागेसाठी देखील पोटनिवडणूक होत आहे.
****
विधान परिषदेच्या १७ जागांसाठी
होणाऱ्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. मतदान आणि
मतमोजणी २२ जून ला होणार आहे.
****
गोव्यात मडगाव इथं सुरू असलेल्या
सॅफ महिला फुटबॉल स्पर्धेत भारतीय महिला फुटबॉल संघाने शानदार कामगिरी करत गतविजेत्या
बांगलादेशचा ३-० असा पराभव केला. या विजयासह भारताने ब गटात अव्वल स्थान निश्चित करत
उपांत्य फेरी गाठली आहे. जागतिक क्रमवारीत ६९ व्या स्थानावर असलेल्या भारतीय संघाकडून
प्यारी खाखा, लिंडा कोम आणि मालविका पी यांनी प्रत्येकी एक गोल करत संघाच्या विजयात महत्त्वाची
भूमिका बजावली. उपान्त्य फेरीत भारताचा सामना भूतानसोबत होईल.
****
हाँगकाँग इथं सुरू असलेल्या
२२ व्या आशियाई २० वर्षांखालील अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी शानदार
कामगिरी केली. भारताच्या मोगली व्यंकटराम याने पुरुषांच्या ८०० मीटर शर्यतीत सुवर्णपदक
पटकावलं. याशिवाय महिलांच्या ४ बाय ४०० मीटर रिले संघाने सुवर्णपदक जिंकले, तर ४ बाय १००
मीटर रिले संघाने रौप्यपदकाची कमाई केली. तसेच पुरुषांच्या ४ बाय ४०० मीटर रिले संघाने
कांस्यपदक पटकावत नवा कनिष्ठ राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला. ही स्पर्धा अमेरिकेतील
ओरेगॉन येथे ५ ते ९ ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या जागतिक २० वर्षांखालील अॅणथलेटिक्स अजिंक्यपद
स्पर्धेसाठी पात्रता फेरी म्हणून आयोजित करण्यात आली आहे.
****
मराठा आरक्षण आंदोलनकर्ते
मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांवर तातडीने आणि सकारात्मक तोडगा काढावा, अशी मागणी
बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस आणि मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष तथा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील
यांना पत्र पाठवलं आहे.
****
No comments:
Post a Comment