Thursday, 25 June 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 25.06.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 25 June 2026

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २५ जून २०२६ सायंकाळी ६.१०

****

·      राज्यात गौणखनिज माफिया आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याची महसूल मंत्र्यांची घोषणा

·      नागपूर इथल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचं जीएमआर या खाजगी कंपनीकडे हस्तांतरण

·      पुढील पाच वर्षांत भारतात ४८ अब्ज डॉलर्सची विक्रमी गुंतवणूक करण्याची ॲमेझॉनची घोषणा

·      शिर्डी इथं श्री साईबाबा मंदिर परिसरात ६०० किलोहून अधिक निकृष्ट दर्जाचा पेढा जप्त

आणि

·      महिला टी-ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारत बांगलादेश लढत

****

राज्यात गौणखनिज माफिया आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याची घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात, गडचिरोली जिल्ह्यात नायब तहसीलदारावर झालेल्या हल्ल्यासंदर्भातल्या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले -

बाईट – बावनकुळे

 

राज्यात गेल्या पाच वर्षांत दस्त नोंदवण्यासाठी मुद्रांकशुल्क निश्चिती करण्यात आलेल्या सर्व प्रकरणांची तपासणी महालेखापरीक्षकांमार्फत करण्याची घोषणाही महसूल मंत्र्यांनी केली. दस्त नोंदणी करण्यासाठी मुद्रांक शुल्क निश्चित करण्याचे अधिकार असणाऱ्यांनी मुद्रांक शुल्क निश्चित करताना संबंधित कायद्याचं उल्लंघन करून ते मनमानी पद्धतीने कमी जास्त केल्याच्या तक्रारी आहेत यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.

****

मालवाहतूक करणाऱ्या वाहनांमधून प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांचे परवाने रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून अधिकाऱ्यांना तशा सूचना दिल्या आहेत. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज विधानपरिषदेत ही घोषणा केली. १८ मे रोजी डहाणू इथं मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघातात १३ जणांचा झालेला मृत्यू आणि त्याआधी कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर झालेल्या अपघातात ११ जण मृत्यूमुखी पडणं याबाबतची लक्षवेधी सूचना सुनील शिंदे यांनी उपस्थित केली होती. या मार्गावर दर तासाला बस सोडायचे निर्देश दिले असून, लवकरच ही वारंवारिता दर अर्ध्या तासात एक बस अशी होईल, असं सरनाईक यांनी सांगितलं.

****

नागपूर इथल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचं जीएमआर या खाजगी कंपनीकडे आज औपचारिक हस्तांतरण करण्यात आलं. नागरी हवाई वाहतूक मंत्री राम मोहन नायडू, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित होते. गेल्या दशकात विमानतळाची प्रवासी क्षमता सुमारे १० लाखांनी वाढली असून, जीएमआरच्या माध्यमातून ती दरवर्षी ६० लाखांहून अधिक होण्याची अपेक्षा असल्याचं, केंद्रीय मंत्री नायडू यावेळी म्हणाले. एम आर ओ, कार्गो हब आणि इतर आधुनिक सुविधांमुळे नागपूर एअरोट्रोपोलिसअर्थात विमानतळ आधारित महानगर म्हणून विकसित होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

नितीन गडकरी यांनी विदर्भातील पर्यटन, खाणकाम आणि उद्योग क्षेत्राला चालना देण्यासाठी या विमानतळाचं महत्त्व अधोरेखित केलं.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर विमानतळ हे केवळ शहरासाठी नव्हे तर संपूर्ण विदर्भ आणि मध्य भारतासाठी ग्रोथ इंजिनठरेल, सं सांगितलं. कार्गो प्रकल्प, संरक्षण क्षेत्रातली गुंतवणूक आणि आधुनिक सुविधा यामुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल, संही त्यांनी नमूद केलं. यावेळी नागपूर विमानतळाच्या संकेतस्थळाचं लोकार्पण तसंच विमानतळाच्या नव्या बोधचिन्हाचं अनावरण करण्यात आलं.

****

ॲमेझॉनचे प्रमुख अँडी जॅसी यांनी आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत भारतातल्या आगामी गुंतवणूक योजनांची माहिती दिली. पुढील पाच वर्षांत भारतात ४८ अब्ज डॉलर्सची विक्रमी गुंतवणूक करण्याची घोषणा ॲमेझॉनने केली आहे. या गुंतवणुकीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आणि क्लाउड पायाभूत सुविधांसाठी २१ अब्ज डॉलर्सहून अधिक निधीचा समावेश आहे. २०३० पर्यंत ३८ लाख रोजगारांना चालना देणं, ८० अब्ज डॉलर्सच्या ई-वाणिज्य निर्यातीला प्रोत्साहन देणंसंच दीड कोटी लघुउद्योजक आणि ४० लाख सरकारी शाळांमधल्या विद्यार्थ्यांपर्यंत एआयचे लाभ पोहोचवण्याचं उद्दिष्ट कंपनीने ठेवलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विक्रमी गुंतवणुकीचे स्वागत करत, यामुळे भारतातल्या तरुणांसाठी नव्या संधी निर्माण होतील आणि जागतिक गुंतवणूकदारांचा भारतावरील वाढता विश्वास अधोरेखित होतो, सं म्हटलं आहे.

****

आज संविधान हत्या दिवस पाळला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणीबाणीचा विरोध करणाऱ्या मान्यवरांना वंदन केलं. १९७५ मध्ये आजच्या दिवशी देशात आणीबाणी लागू करण्यात आली होती. त्या घटनेचं स्मरण म्हणून आजचा दिवस पाळला जातो. आणीबाणीच्या काळात देशासाठी प्राण गमावलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी तसंच संविधानाचं आणि लोकशाहीचं मूल्य नागारिकांना समजावं यासाठी आज देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

****

डिजिटल अटक या सायबर गुन्हे प्रकाराच्या २०० हून अधिक प्रकरणात तपास करताना सीबीआय अर्थात केंद्रीय गुप्तचर संस्थेनं महाराष्ट्र, गुजरात, पंजाब आणि दिल्लीसह १६ राज्यांमधल्या ८० पेक्षा जास्त ठिकाणांवर छापे टाकले. तसंच, चेन्नई आणि कोलकाता इथून दोन जणांना अटक केली आहे. देशभरात २०० पेक्षा जास्त डिजिटल अटक प्रकरणांमध्ये सहभाग असलेल्या गुन्हेगारी जाळ्याविरुद्ध ऑपरेशन चक्र ६ अंतर्गत सीबीआय तपास करत आहे. अटक करण्यात आलेले आरोपी शेल कंपन्या स्थापन करून बनावट बँक खाती तयार करत होते. सायबर अटकेतून मिळालेली रक्कम या खात्यांमध्ये वळवण्यात येत होती.

****

नसरापूर लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातला आरोपी भीमराव कांबळे याला पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने दोषी ठरवलं आहे. विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांच्या न्यायालयात अंतिम युक्तिवादानंतर हा महत्त्वाचा निर्णय देण्यात आला. कांबळे याला शिक्षा येत्या २९ तारखेला सुनावली जाणार आहे. सुनावणीदरम्यान न्यायालयाने आरोपीला स्वतःची बाजू मांडण्याची संधी दिली. मात्र, दोष कबूल करण्याऐवजी आरोपीने गुन्ह्याबाबत सबबी सांगण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर न्यायालयाने उपलब्ध पुराव्यांच्या आधारे आरोपी दोषी असल्याचं स्पष्ट केलं. या प्रकरणातील शिक्षेचा निर्णय येत्या २९ जून रोजी सुनावली जाणार आहे.

****

अहमदनगर जिल्ह्यात शिर्डी इथं श्री साईबाबा मंदिर परिसरात खासगी पेढा विक्री केंद्रे आणि पेढा उत्पादन करणाऱ्या आस्थापनांवर धाड टाकून अन्न आणि औषध  प्रशासन  विभागानं ६०० किलोहून अधिक निकृष्ट दर्जाचा तसंच संशयित पेढा जप्त केला. या पेढ्याची किंमत जवळपास दोन लाख रुपये असून, १५ दिवसांतली ही दुसरी मोठी कारवाई असल्याचं आमच्या वार्ताहराने कळवलं आहे.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अंबादास दानवे यांनी महायुतीच्या पॅनलमधून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय पक्षीय राजकारणाशी संबंधित नसून सहकार क्षेत्रातल्या विकासासाठी नितीन पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी घेतल्याचं दानवे यांनी सांगितलं. जिल्हा बँकेच्या १२ जागांसाठी महायुती आणि महाविकास आघाडीत थेट लढत होणार आहे.

****

मराठा आरक्षण उपसमितीने दिलेल्या विविध सूचनांनुसार मराठवाड्यातल्या सर्व  जिल्ह्यांमध्ये मराठा-कुणबी जात प्रमाणपत्र तसंच जात पडताळणी प्रमाणपत्रं निर्धारित मुदतीत वितरित करण्याची कार्यवाही पूर्ण करुन, प्रलंबित प्रकरणांचा तातडीने निपटारा करावा, असे निर्देश प्रभारी विभागीय आयुक्त खुशालसिंह परदेशी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. यासंदर्भातल्या आढावा बैठकीत ते आज बोलत होते. कोणताही अर्ज ९० दिवसांपेक्षा अधिक काळ प्रलंबित राहणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश परदेशी यांनी दिले.

****

राष्ट्रीय पोलिओ लसीकरण मोहीम येत्या २८ तारखेला राबवण्यात येणार आहे. छत्रपती संभाजीनगर इथं महानगर पालिकेच्या हद्दीतील ३४ आरोग्य केंद्र, महानगर पालिकेची पाच रुग्णालयं आणि शहरातल्या ४० आरोग्य केंद्रात बालकांना ही लस देण्यात येणार असल्याची माहिती महापौर समीर राजुरकर यांनी दिली. ते आज छत्रपती संभाजीनगर इथं वार्ताहरांशी बोलत होते. शून्य ते पाच वर्ष वयोगटातल्या बालकांना ही लस देऊन अभियानात सहभागी होण्याचं आवाहन महापौरांनी केलं आहे.

****

महिला टी-ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत, अ गटात भारत आणि बांगलादेश यांच्यात आज लढत होणार आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी सात वाजता सामन्याला सुरुवात होईल. या स्पर्धेत हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात भारतीय संघ आतापर्यंत तीन पैकी दोन सामने जिंकून दुसऱ्या स्थानावर आहे.

****

जालना शहरासह जिल्ह्यात आज सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. जिल्ह्यातल्या बहुतांश भागात पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळत आहे. या पावसामुळे कपाशी लागवडीसह खरिपातल्या रखडलेल्या पेरण्यांना वेग आला असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

हवामान विभागाने संपूर्ण मराठवाड्यात आज आणि उद्या पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. विदर्भातही काही ठिकाणी यलो अलर्ट देण्यात आला असून, कोकणात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 25.06.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 25 June 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपत...