Wednesday, 24 June 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 24.06.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 24 June 2026

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २४ जून २०२६ सायंकाळी ६.१०

****

·      देशातील एकूण सौर कृषी पंपांपैकी ६० टक्के पंप महाराष्ट्रात, रूफटॉप सोलर बसवून घेण्याच्या बाबतीत राज्य देशात प्रथम क्रमांकावर असल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती

·      बाल विवाह रोखण्यासाठी लग्न पत्रिकेत वर आणि वधूची जन्मतारीख नमूद करण्यासाठी सरकार प्रयत्नशील

·      कॉर्पोरेट कंपन्यांमधील महिलांच्या सुरक्षेसाठी विद्यमान कायदे आणि नियमांचे पुनरावलोकन करणार, मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन

·      एसआयआर मोहिमेत पात्र मतदार वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचे छत्रपती संभाजीनगर इथल्या आढावा बैठकीत निर्देश

आणि

·      राज्यात मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस, मराठवाड्यात पुढील तीन दिवस बहुतांश जिल्ह्यांना यलो अलर्ट

****

देशातील एकूण सौर कृषी पंपांपैकी ६० टक्के पंप महाराष्ट्रात बसविण्यात आले असून, केंद्र सरकारनं सर्व राज्यांना ‘महाराष्ट्र मॉडेल’चं अनुकरण करण्याबाबत पत्र पाठवलं आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधिमंडळात दिली. तसंच राज्यात सध्या कुठेही भारनियमन होत नाही. सध्या राज्यातल्या ७५ टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळते, या वर्षअखेरपर्यंत उरलेल्या २५ टक्के शेतकऱ्यांनाही दिवसा वीज मिळेल, असं त्यांनी सभागृहाला सांगितलं. विजेची वाढती मागणी पाहता २०३१-३२ पर्यंत ७८ हजार मेगावॅट क्षमतेचं लक्ष्य सरकारनं ठेवलं आहे. ‘पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेच्यामाध्यमातून रूफटॉप सोलर बसवून घेण्याच्या बाबतीत महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

****

दरम्यान, सौर ऊर्जेच्या वाढत्या वापरामुळे वीज ग्रीडवर अतिरिक्त ताण येतो. या ताणामुळे निर्माण होणारा खर्च सामान्य ग्राहकांवर पडू नये, यासाठी ‘ग्रीड सपोर्ट चार्जआकारण्यात आला आहे. हे शुल्क केवळ शून्य पूर्णांक १३ टक्के ग्राहकांवर लागू होतं. हा कोणताही तोटा नसून काही ग्राहकांच्या अतिरिक्त नफ्यात झालेली मर्यादित कपात आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.

****

राज्यात बाल विवाहाचं प्रमाण कमी करण्यासाठी लग्न पत्रिकेत वर आणि वधूची जन्मतारीख नमूद करण्यासाठी विधी आणि न्याय तसंच ग्रामविकास विभागांच्या मदतीनं कार्यवाही करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज विधानसभेत दिली. राजस्थानमध्ये बालविवाह रोखण्यासाठी ही पद्धत सुरू आहे. गेल्या वर्षी राज्यात सुमारे पंधराशे आणि चालू वर्षात आतापर्यंत चौदाशेहून अधिक बालविवाह रोखण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार २०१९ ते २१ या कालावधीत देशात बालविवाहाचं प्रमाण २३ टक्क्यांपेक्षा जास्त आणि राज्यात सुमारे २२ टक्के होतें २०२३-२४ मध्ये काही जिल्ह्यात झालेल्या सर्वेक्षणानुसार हे प्रमाण देशात २० पूर्णांक १ दशांश टक्के तर राज्यात १९ पूर्णांक ७ दशांश टक्के झाल्याची माहिती त्यांनी विधानसभेत दिली.

****

नाशिकमधील टीसीएस कंपनीप्रमाणेच इतर कंपन्यांमध्ये महिला कर्मचाऱ्यांचा विनयभंग, लैंगिक अत्याचार, धर्मांतराचा प्रयत्न घडत असल्याचं समोर आलं आहे. अशा घटनांचा अभ्यास करण्यासाठी, तसंच सध्या लागू असलेले कायदे आणि नियमांचा अभ्यास करून बदल सूचवण्यासाठी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या महिला सदस्यांची समिती स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधिमंडळात केली. चित्रा वाघ यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. तर, मनीषा कायंदे यांनी शासकीय आयटीआय सोलापूर आणि तळेगाव दाभाडे इथल्या एका स्पॅनिश कंपनीतही असे प्रकार घडल्याचा मुद्दा उपस्थित केला. सोलापूर प्रकरणाची चौकशी करून कारवाई करू, तसंच तळेगाव दाभाडे प्रकरणी १५ दिवसांत चौकशी करून कंपनी दोषी असेल, तर कारवाई करू, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं.

****

नागरिकांना खऱ्या आणि नोंदणीकृत डॉक्टरांची माहिती सहज उपलब्ध व्हावी यासाठी महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेमार्फत ‘नो युवर डॉक्टरही क्यूआर कोड आधारित प्रणाली सुरू करण्यात आली आहे. क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर संबंधित डॉक्टर नोंदणीकृत आहे की नाही याची माहिती तात्काळ मिळू शकते, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज विधिमंडळात दिली.

****

परभणी जिल्ह्यातील पाथरी विधानसभा मतदारसंघातील मानवत उपजिल्हा रुग्णालय तसंच प्राथमिक आरोग्य केंद्रं, उपकेंद्रं यांसह जिल्ह्यातील अनेक प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रात मोठ्या प्रमाणावर पदनिर्मिती करण्यात आली आहे. राज्य सरकारने आज त्यास मंजूरी दिल्याची माहिती आमदार राजेश विटेकर यांनी दिली. मानवत इथं ३० खाटाच्या ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणी वर्धन होऊन ते ५० खाटांचं झालं आहे. तर उखळी, केकरजवळा, लोहगाव प्राथमिक आरोग्य केंद्रासह पेठशिवणी, असोला या प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी प्रत्येकी १५ पद निर्मिती करण्यात आली आहे.

****

राज्यात राबविण्यात येत असलेल्या विशेष सखोल मतदार पुनरीक्षण, एसआयआर मोहिमेत पात्र मतदार वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश अप्पर मुख्य सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी दिले. ते आज छत्रपती संभाजीनगर इथं आयोजित आढावा बैठकीत बोलत होते. नागरिकांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी मदत कक्ष स्थापन करून त्यांना वस्तुनिष्ठ माहिती उपलब्ध करून द्यावी. स्थानिक लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, स्वयंसेवी संघटना, मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी, बीएलए आणि स्वयंसेवक यांना विश्वासात घेऊन ही मोहीम राबविण्यात यावी, असं त्यांनी सांगितलं. या मोहिमेअंतर्गत ३० जून ते २९ जुलै या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी मतदारांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन गणना अर्जांचे वितरण आणि संकलन करणार आहेत.

****

जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी माहिती कायद्यात केलेल्या दुरुस्त्या रद्द कराव्या या मागणीसाठी पाच जुलै रोजी उपोषणाचा इशारा दिला आहे. या संदर्भात राज्याचे मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी आज अण्णा हजारे यांची राळेगणसिद्धी इथं भेट घेतली.

****

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहर आणि परिसरात ‘हरित कुंभ- हरित मॉन्सून’ उपक्रम २८ जून ते २५ ऑक्टोबर या कालावधीत राबवण्यात येणार आहे. याअंतर्गत एक लाख वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर नियोजनासाठी नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात तयारीसाठी आज बैठक घेण्यात आली. या अभियानांतर्गत वृक्ष लागवडीस २८ जूनपासून प्रारंभ होणार आहे.

****

सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातल्या तांदुळवाडी इथं १४ जून रोजी पिकअप वाहन विहिरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू झाला, त्यांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी ५ लाख रुपयांची आर्थिक मदत वितरित करण्यात आली आहे.

****

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचा आज आयुक्त अमोल येडगे यांनी आढावा घेतला. यात पावसाळी नियंत्रण कक्षातील उपस्थिती, तक्रार निवारण व्यवस्था आणि नागरिकांना तात्काळ मदत पोहोचविण्याच्या कार्यपद्धतीसंदर्भात आयुक्तांनी महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून सखल भागांवर सातत्यानं लक्ष ठेवून संबंधित विभागांना वेळेवर सूचना देण्याचे आदेश आयुक्तांनी दिले.

****

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त येत्या शुक्रवारी, २६ तारखेला विशेष व्याख्यान आयोजन करण्यात आलं आहे. राजर्षी शाहू महाराज संशोधन केंद्राच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. राजर्षी शाहू अध्यासन, कोल्हापूर येथील ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ प्राचार्य जे.के.पवार यांचं ‘राजर्षी शाहू महाराजांची अर्थनिती’ या विषयावर व्याख्यान होणार आहे.

****

हवामान

राज्यातील बहुतांश जिल्ह्यात कालपासून पावसाला सुरुवात झाली. मुंबई आणि पालघर जिल्ह्यांसाठी हवामान विभागानं आज मुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्येही पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना आणि धाराशिव जिल्ह्यात आज सकाळी पाऊस झाला. गेल्या २४ तासांत पैठण तालुक्यातील अडुळ इथं सर्वाधिक ९८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

छत्रपती संभाजीनगर, जालना आणि परभणी जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांना उद्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील तीन दिवस छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि नांदेड जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 24.06.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 24 June 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपत...