Tuesday, 23 June 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 23.06.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 23 June 2026

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २३ जून २०२ सकाळी.०० वाजता

****

केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा भारतीय कृषि सहकारी विपणन महासंघ ‘नाफेड’च्या पोर्टलचा आज शुभारंभ करणार आहेत. लिलाव प्रक्रियेत पारदर्शकता, कार्यक्षमता आणि सुलभता वाढवण्याच्या उद्देशाने हे पोर्टल सुरु केले जात आहे. या कार्यक्रमात शेतकरी-केंद्रित अनेक महत्त्वाच्या डिजिटल उपक्रमांचाही शुभारंभ होणार आहे. यामध्ये नाफेड-कल्याण शिष्यवृत्ती योजना, कडधान्यं आणि तेलबियांच्या साठा व्यवस्थापनासाठी 'दृष्टी' पोर्टल, तसच संस्थात्मक संसाधन नियोजन अर्थात एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग- ‘ईआरपी’ पोर्टलचा समावेश आहे. या उपक्रमांमुळे शेतकरी, सदस्य संस्था आणि संबंधित घटकांना अधिक पारदर्शक, जलद आणि सुलभ सेवा मिळण्यास मदत होणार आहे.

****

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज दुसऱ्या टप्प्यात ६५ मान्यवरांना पद्म पुरस्कारांनी गौरवण्यात येणार आहे. राष्ट्रपती भवनात होणाऱ्या आजच्या सोहळ्यात दोन पद्मविभूषण, सात पद्मभूषण आणि ५६ पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. यापूर्वी २५ मे रोजी राष्ट्रपती भवनात पहिल्या टप्प्यातील सोहळा पार पडला होता, ज्यात ६६ पुरस्कार विजेत्यांचा सन्मान करण्यात आला होता.

****

उत्तरप्रदेशातील लखनौ इथल्या अलीगंज भागात, एका ॲनिमेशन प्रशिक्षण केंद्रात काल लागलेल्या आगीत, १५ जणांचा मृत्यू झाला, तर नऊ जण जखमी झाले आहेत, मृतांमध्ये बहुतांशी १४ ते १६ वयोगटातील विद्यार्थी आहेत. या दुर्घटनेबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.  पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची,तर  जखमींना ५० हजार रुपयांची मदत देण्याची घोषणा पंतप्रधानांनी केली आहे. या प्रकरणी आता पर्यंत सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून चार जणांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. या प्रकरणी एसआयटी गठीत करण्यात आली असून सात दिवसांत अहवाल देण्याचे निर्देश उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रशासनाला दिले आहेत.

****

कतारमधील रास लाफान इथल्या सर्वात मोठ्या वायू प्रकल्पात रविवारी रात्री झालेल्या भीषण स्फोटात १२ भारतीय नागरिकांचा मृत्यू झाल्याचं कतार प्रशासनान म्हटलं आहे. या दुर्घटनेत एकूण १३ जणांचा मृत्यू, तर ६६ जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेनंतर कतार प्रशासनाने मृतांच्या कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त केला असून, भारतीय दुतावास प्रभावित भारतीय नागरिक आणि त्यांच्या कुटुंबीयांना आवश्यक मदत पुरवत आहे. दरम्यान, परराष्ट्रमंत्री डॉक्टर एस. जयशंकर यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत, प्रभावित भारतीयांच्या कुटुंबियांपर्यंत पोहोचून सर्वतोपरी मदतीचे प्रयत्न सुरू असल्याचं सांगितलं.

****

राज्यातील प्रथम वर्ष पदविका-डिप्लोमा अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया-‘कॅप’ फेरीसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दोन जुलैपर्यंत वाढवण्यात आली असल्याची माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. याआधी २२ जून पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत होती, मात्र विद्यार्थ्यांचा वाढता प्रतिसाद आणि विविध आवश्यक प्रमाणपत्रं मिळण्यास होणारा विलंब लक्षात घेऊन मुदतवाढ देण्यात आल्याचं पाटील यांनी सांगितलं. आतापर्यंत १ लाख ४५ हजार ७०८ उमेदवारांनी नोंदणी केली असून, त्यापैकी १ लाख १५ हजार ५३ विद्यार्थ्यांनी शुल्क भरून अर्ज मान्यतेसाठी सादर केले आहेत. प्रवेश प्रक्रियेचं सविस्तर वेळापत्रक, अर्ज सादरीकरणाची माहिती आणि ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी dte.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

****

पंढरपूर इथल्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीवर मंदिर समिती आणि पुरातत्त्व विभागाकडून २३ आणि २४ जून रोजी प्रस्तावित असलेल्या रासायनिक वज्रलेपनास पंढरपूर इथल्या दिवाणी कनिष्ठ स्तर न्यायालयानं तात्काळ स्थगिती दिली आहे. वारकरी संप्रदाय आणि महाराष्ट्र मंदिर महासंघानं दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करत, न्यायालयानं पुढील आदेशापर्यंत कोणत्याही प्रकारचे लेपन करण्यास मनाई केली आहे.

****

आषाढी एकादशीसाठी शेगाव इथून पंढरपूरला जाणाऱ्या संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचं काल अकोला जिल्ह्यातल्या भौरद इथं आगमन झालं. यावेळी भाविकांनी पालखीचं उत्साहात स्वागत केलं. यंदा श्री संत गजानन महाराज पालखी सोहळ्याचं ५७ वं वर्ष असून या पालखीमध्ये सुमारे ७०० वारकरी सहभागी झाले आहेत.

****

प्राचीन भारतीय पारंपरिक युद्धकला असलेल्या सिलंबम या क्रीडाप्रकाराच्या आंतरराष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा येत्या एक आणि दोन ऑगस्ट रोजीमलेशियामध्ये होणार आहे. या स्पर्धेसाठी पिंपरी-चिंचवडमधील २१खेळाडूंची निवड झाली आहे. जालना इथं नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीयसिलंबम अजिंक्यपद स्पर्धेतून भारतीय संघाची निवड झाली.

****

राज्यात नैऋत्य मौसमी पाऊस हळूहळू सक्रीय होत आहे, उत्तर कोकणातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना, हलका ते मध्यम पाऊस आणि ताशी ४०-५० किमी वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान, पालघरमध्ये आज सकाळी रिमझिम पावसानं हजेरी लावली तर छत्रपती संभाजीनगर, नांदेड, परभणी, जालना जिल्ह्यांत दिवसभरात पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे.

****

 

 

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 23.06.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 23 June 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रप...