Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 29 June
2026
Time 7.10
AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २९ जून २०२६ सकाळी ७.१० मि.
****
·
राष्ट्र
उभारणीत नागरिकांचा सहभाग हीच देशाची सर्वात मोठी शक्ती, पंतप्रधानांचं
प्रतिपादन
·
नांदेड
जिल्ह्यातल्या पेटकर कुटुंबाच्या अभिनव उपक्रमाचं पंतप्रधानांकडून मन की बात मध्ये
कौतुक
·
परभणीत
केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योगाचं केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्या हस्ते
उद्घाटन
·
लोकसभा
अध्यक्षांनी पक्षांतराच्या प्रकरणात नियमांनुसार तातडीने निर्णय घ्यावा, उद्धव
ठाकरे यांची मागणी
आणि
·
पुढील
चार ते पाच दिवसांत मराठवाड्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता
****
राष्ट्र उभारणीत नागरीकांचा सहभाग, हीच
देशाची सर्वात मोठी शक्ती असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं
आहे. आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून ते देशवासियांना संबोधित करत
होते. या मालिकेचा १३५वा भाग काल प्रसारित झाला. स्वदेशी उत्पादने, आत्मनिर्भर
भारत, लोकसहभाग आणि पर्यावरण संवर्धन या विषयांवर त्यांनी यावेळी विशेष भर दिला.
जून महिन्यात संरक्षण क्षेत्रात झालेल्या प्रगतीचा उल्लेख
करत पंतप्रधानांनी,
पूर्णपणे स्वदेशी असलेल्या आयएनएस दुनागिरी, आयएनएस
संशोधक आणि आयएनएस अग्रय या युद्धनौकांचा अभिमानाने उल्लेख केला. तसंच, सी-295 विमानाचं पहिलं यशस्वी उड्डाण आणि लाँग रेंज लँड अटॅक क्रूझ क्षेपणास्त्राच्या
चाचणीबद्दलही त्यांनी माहिती दिली.
आंतरराष्ट्रीय योग दिनाचा उल्लेख करताना, अहमदाबादमध्ये
झालेल्या स्पर्धेत भारताने ११४ पदकं जिंकून अव्वल स्थान पटकावल्याबद्दल त्यांनी
खेळाडूंचं कौतुक केलं.
पश्चिम आशियातल्या युद्धाच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, आपण
देशवासियांना केलेल्या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळाल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं.
त्याबद्दल नागरिकांचे आभार मानून, लोकसहभागाची हीच ताकद आपल्याला यशस्वी
करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मध्य प्रदेशातल्या महिलांनी बनवलेल्या 'इको-ब्रिक्स'चं
कौतुक करत पंतप्रधानांनी,
आगामी गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिस ऐवजी स्थानिक
मूर्तिकारांकडून मातीच्या गणेशमूर्ती खरेदी करण्याचं, तसंच
पावसाचं पाणी अडवण्यासाठी 'कॅच द रेन'
मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहन केलं.
नांदेड जिल्ह्याच्या बहादूरपुरा इथल्या पेटकर कुटुंबाने
राबवलेल्या सामाजिक उपक्रमाचं पंतप्रधानांनी यावेळी कौतुक केलं. ते म्हणाले,
बाईट – पंतप्रधान नरेंद्र मोदी
**
पंतप्रधानांनी मन की बात मध्ये उल्लेख केल्यामुळे पेटकर
कुटुंबाने समाधान व्यक्त केलं. यासंदर्भात आकाशवाणीशी बोलताना अनुप पेटकर म्हणाले,
बाईट – अनुप पेटकर
****
परभणीतल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात
केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री चिराग पासवान यांच्या हस्ते कॉमन
इन्क्युबेशन सेंटरचं उद्घाटन काल करण्यात आलं. कृषी उत्पादनांना मूल्यवर्धन करून
अन्न प्रक्रिया उद्योगाचा विस्तार करण्याची गरज त्यांनी यावेळी अधोरेखित केली.
तसंच 'मेड इन इंडिया'
उत्पादनांना जागतिक दर्जा मिळवून देण्यासाठी गुणवत्तेशी
कोणतीही तडजोड न करण्याचा संदेश देत, नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन
आणि अन्न नासाडी रोखण्यावरही पासवान यांनी भर दिला. या केंद्राबद्दल माहिती देताना
ते म्हणाले,
बाईट – केंद्रीय मंत्री चिराग
पासवान
पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी यावेळी बोलताना, परभणीसह
मराठवाड्यात कृषीआधारित उद्योग, महिला बचत गट आणि उद्योजकांनी पुढाकार
घेण्याचं आवाहन केलं.
तत्पूर्वी पासवान यांनी काल नांदेड इथं श्री हजूर साहिब
सचखंड गुरुद्वाराला तसंच शंकरराव चव्हाण स्मृती संग्रहालयाला भेट दिली.
****
लोकसभा अध्यक्षांनी पक्षांतराच्या प्रकरणात कोणत्याही
दबावाशिवाय नियमांनुसार तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी शिवसेना उद्धव
बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. ते काल परभणी इथं
जाहिर सभेत बोलत होते. पक्षातून बाहेर पडलेल्या खासदारांनी वंदनीय बाळासाहेब ठाकरे
यांच्या विचारांशी आणि पक्षाशी विश्वासघात केला असून, त्यांनी
हा दुसऱ्यांचा नाही तर स्वतःचाच राजकीय आत्मघात केल्याची टीका ठाकरे यांनी केली.
राज्य सरकारची कर्जमाफी ही शेतकऱ्यांची फसवणूक असून, शेतकऱ्यांना
माफी नव्हे तर कर्जमुक्ती द्यावी, अशी मागणी ठाकरे यांनी धाराशिव इथल्या
सभेत केली. खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या पक्षांतरावरही त्यांनी टीका केली.
तपासयंत्रणांच्या दबावामुळेच ओमराजे यांनी शिवसेना सोडल्याचा आरोप यावेळी खासदार
संजय राऊत यांनी केला.
****
शिक्षक पात्रता परिक्षा – टीईटी पेपरफुटी प्रकरणी भिवंडी
सत्र न्यायालयाने अटक केलेल्या तीन आरोपींना सहा जुलै पर्यंत पोलिस कोठडी सुनावली
आहे. या गैरव्यवहारात आणखी दोन आरोपी फरार असल्याचा पोलिसांना संशय असून, त्यांचा
शोध सुरु आहे. या प्रकरणाचे धागेदोरे केवळ स्थानिक किंवा राज्य पातळीपुरते
मर्यादित नसून,
त्यामागे आंतरराज्य रॅकेट असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त
केला.
****
राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम काल राबवण्यात आली. भारताचा
'पोलिओमुक्त'
दर्जा कायम राखण्यासाठी ही मोहिम यापुढेही सुरु राहणार
असल्याची माहिती,
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिली.
बुलडाणा जिल्ह्यातल्या मेहेकर इथं या मोहिमेचा शुभारंभ केल्यानंतर ते बोलत होते.
या मोहिमेअंतर्गत देशभरातल्या पाच वर्षांपर्यंतच्या वयोगटातल्या सुमारे १५ कोटीहून
अधिक बालकांना पोलिओचा डोस देण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचं जाधव यांनी
सांगितलं. जे बालक काल पहिल्या दिवशी लसीकरणापासून वंचित राहिले आहेत, त्यांना
पुढील पाच दिवस आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत घरोघरी जाऊन पोलिओचे डोस दिले जाणार
आहेत.
**
छत्रपती संभाजीनगर इथं महानगरपालिकेच्या एन-८ रुग्णालयात
महापौर समीर राजूरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत लसीकरण मोहिमेचं उद्घाटन झालं.
महानगरपालिका क्षेत्रात ८४ टक्के, तर जिल्हाभरात ९४ टक्के लसीकरण काल
पूर्ण झालं.
लातूर जिल्ह्यातही या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
शिरूर ताजबंद इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात सहकार मंत्री बाबासाहेब पाटील
यांच्या हस्ते बालकांना पोलिओचे डोस पाजून मोहिमेला सुरुवात झाली.
नांदेड जिल्ह्यात ३ लाख ८८ हजार ५२६ बालकांना पोलिओची लस पाजण्याचं
उद्दिष्ट प्रशासनानं निश्चित केलं आहे.
हिंगोलीत आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाचे आयुक्त संजय
काटकर यांच्या हस्ते या मोहिमेचं उद्घाटन झालं.
****
जालना शहरात नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या बटन गोळ्यांच्या
अवैध विक्रीवर दहशतवाद विरोधी पथकाने काल मोठी कारवाई करत, एक
हजार ८० बटन गोळ्या जप्त केल्या. या प्रकरणी मेडिकल चालकासह दोघांविरुद्ध कदीम
जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे आज छत्रपती
संभाजीनगर इथं शेतकरी कर्जमाफीसाठी आंदोलन करण्यात येणार असून त्यासाठी आमदार
रोहित पवार काल शहरात दाखल झाले. त्यांनी यानिमित्त पत्रकारांशी बोलताना आता आमदार
फुटणार नाहीत,
असा विश्वास व्यक्त केला.
****
महाराष्ट्र हज समितीतर्फे हजला जाणाऱ्या यात्रेकरूंसाठी
ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. समितीचं संकेतस्थळ आणि हज सुविधा
मोबाइल अॅपवर येत्या २० जुलै पर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत. यात्रेकरूंना
मार्गदर्शनासाठी छत्रपती संभाजीनगर इथल्या हज हाऊसमध्ये हेल्प डेस्क सुरू करण्यात
आल्याची माहिती हज हाऊसचे लेखाधिकारी शोएब शेख यांनी दिली.
****
महिला टी–ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत काल साखळी
सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा सहा खेळाडू राखून पराभव केला. लंडन इथं झालेल्या
या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत चार बाद १७० धावा केल्या.
ऑस्ट्रेलियाच्या संघाने १९ षटकात हे लक्ष्य साध्य केलं. यासोबतच भारताचं या
स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं.
****
येत्या चार ते पाच दिवसांत मराठवाड्याच्या संपूर्ण भागात
बहुतांशी ढगाळ वातावरण राहून काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची
शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
****
No comments:
Post a Comment