Wednesday, 3 June 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 03.06.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 03 June 2026

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३ जून २०२ दुपारी १.०० वा.

****

२०२५ मध्ये वार्षिक सौरऊर्जा क्षमता वृद्धीमध्ये भारताने अमेरिकेलाही मागे टाकत जगातली दुसऱ्या क्रमांकाची सौरऊर्जा विकास बाजारपेठ म्हणून स्थान मिळवलं आहे. नवीन आणि नवीकरणीय उर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ही माहिती दिली. मजबूत धोरणात्मक पाठबळ, नावीन्यपूर्ण उपक्रम आणि जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांच्या बळावर भारत वेगाने विक्रमी सौरऊर्जा क्षमता उभारत असल्याचं ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली भारताची स्वच्छ ऊर्जा क्रांती अधिक वेगाने पुढे जात असून, ऊर्जा सुरक्षितता, शाश्वत विकास आणि अक्षय ऊर्जेतील जागतिक नेतृत्व अधिक मजबूत होत असल्याचं जोशी यांनी नमूद केलं. २०१४ मध्ये केवळ दोन पूर्णांक आठ गिगावॅट असलेली सौर ऊर्जा क्षमता, २०२६ मध्ये १५५ गिगावॅटपर्यंत पोहोचणं, हे भारताच्या वेगवान प्रगतीचं आणि दूरदर्शी नेतृत्वाचं द्योतक आहे.

****

काँग्रेसचे वरिष्ठ नेते डी. के. शिवकुमार आज कर्नाटकचे २५वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. यावेळी मंत्रिमंडळातले काही सदस्यही पद आणि गोपनीयतेची शपथ घेतील. आठ वेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या डी. के. शिवकुमार यांची, २८ मे रोजी सिद्धरामय्या यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली होती.

****

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ – सी बी एस ई च्या इयत्ता बारावीच्या गेल्या मार्च मध्ये झालेल्या परीक्षेच्या निकालानंतर सुमारे ४० हजार विद्यार्थ्यांनी त्यांचे पुनर्मूल्यांकन अर्ज सादर केले असून, कोणत्याही अडचणींशिवाय अर्ज प्रक्रिया पूर्ण केली असल्याची माहिती मंडळाने दिली आहे. निकालानंतरच्या सेवांसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता पडताळणी आणि पुनर्मूल्यांकनपोर्टलवर SBI, कॅनरा बँक, बँक ऑफ बडोदा आणि इंडियन बँक यांचे पेमेंट गेटवे उपलब्ध आहेत. पेमेंट प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांकडे यापैकी कोणत्याही बँकेत खाते असणं आवश्यक नसल्याचं मंडळाने कळवलं आहे.

****

जागतिक सायकल दिवस आज साजरा होत आहे. यावर्षीची या दिनाची संकल्पना हरित भविष्यासाठी सायकलअशी आहे.

युवकांनी सायकल चालवण्याचं आणि त्या माध्यमातून निरोगी, सुदृढ आणि हरित राष्ट्राच्या निर्मितेसाठी महत्वाची भूमिका बजावण्याचं आवाहन केंद्रीय क्रीडा मंत्री डॉक्टर मनसुख मांडविया यांनी केलं आहे. सायकल दिनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी सामाजिक प्रसार माध्यमावर यासंदर्भात एक चित्रफीत प्रसारित केली. सायकल चालवणं हे शारिरिक तसंच मानसिक आरोग्यासाठीही सहाय्यक असल्याचं ही त्यांनी या संदेशात नमूद केलं.

यानिमित्त आज परभणी इथं केंद्र सरकारच्या युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयाच्या माय भारत आणि परभणी सायकल क्लबच्या वतीने सायकल रॅली काढण्यात आली. पर्यावरणासोबतच आरोग्यासाठी सायकल चालवणं फायद्याचं आहे, अशी जनजागृती यावेळी करण्यात आली.

****

येत्या पाच तारखेला साजरा होणाऱ्या जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या पर्यावरण आणि वातारवणीय विभागाच्या वतीने रोजच्या वापरातील पर्यावरणपूरक वस्तूंचं किट तयार करण्यात आलं आहे. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी हे किट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह मंत्रिमंडळातल्या सदस्यांना भेट देऊन जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा दिल्या. पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर वाढवण्यासाठी ही मोहीम सुरू करण्यात आली आहे.

****

पर्यावरण दिनानिमित्त लातूर जिल्ह्यात राबवण्यात येणार असलेल्या वृक्षारोपण मोहिमेत तसंच स्वच्छता अभियानात स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं, असं आवाहन जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी केलं आहे. यासंदर्भात काल झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. लातूर जिल्ह्यातल्या घनकचरा व्यवस्थापनासाठी सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहनही त्यांनी केलं.

****

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर भूगर्भात पाणीसंचयन होईल अशा पद्धतीने ‘जलतारा खड्डे’ तयार करण्याचे निर्देश धाराशिवचे जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी संबंधितांना दिले आहेत. संभाव्य अल निनो आणि चारा टंचाईच्या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीत ते आज बोलत होते. ग्रामपंचायतींनी स्वतःचे जलस्रोत सक्षम करण्यासाठी विशेष मोहीम हाती घ्यावी, पावसाच्या पाण्याचं संचयन करण्यासाठी भूजल पुनर्भरणाची कामं अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनी पुढाकार घेऊन करावीत, पाणीपुरवठा योजनांमधील गळती तातडीने थांबवावी आदी सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

****

दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त बीड जिल्ह्यातल्या गोपीनाथ गडावर भाजप नेत्या, मंत्री पंकजा मुंडे, डॉ प्रीतम मुंडे यांनी त्यांना आदराजली वाहिली. यावेळी बीड जिल्ह्यासह राज्यभरातले भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.

****

बीड जिल्ह्यात अन्न आणि औषध प्रशासन विभागानं आज विविध ठिकाणी धाडी टाकून, मुदतबाह्य पदार्थांचा साठा जप्त केला. माजलगाव शहरात रिफाइंड सोयाबीन तेलाचा साठा जप्त करण्यात आला असून, शिरूर मध्ये देखील अशीच कारवाई करण्यात आली. यासोबतच पाटोदा तालुक्यातल्या दोन दूध संकलन केंद्राची तपासणी करत दुधाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 13.06.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 13 June 2026 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत...