Thursday, 4 June 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 04.06.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 04 June 2026

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०४ जून २०२६ सायंकाळी ६.१०

****

·      विधान परिषद निवडणुकीचं चित्र स्पष्ट;काही ठिकाणी बंडखोरांची मनधरणी यशस्वी तर काही ठिकाणी बहुरंगी लढती

·      पेट्रोलऐवजी इथेनॉलचा वापर वाढल्यास, वायु प्रदुषणाला प्रतिबंध-केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना विश्वास

·      जालना जिल्ह्यात भेसळयुक्त तूप तर लातूर जिल्ह्यात निकृष्ट खाद्य तेल जप्त

आणि

·      नैऋत्य मोसमी पावसाचं केरलम्‌मध्ये आगमन

****

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याची मुदत आज संपली. यानंतर आता बहुतांश जागांचं चित्र स्पष्ट झालं आहे. अनेक ठिकाणी बंडखोरांची मनधरणी करण्यात राजकीय पक्षांना यश आलं, काही ठिकाणी मात्र शिष्टाईचे प्रयत्न अयशस्वी ठरल्याने ही निवडणूक चुरशीची होण्याची चिन्हं दिसत आहेत.

आमदार अब्दुल सत्तार यांचे चिरंजीव अब्दुल समीर यांनी औरंगाबाद-जालना मतदार संघाच्या निवडणुकीतून माघार घेतली आहे. आज दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. देवयानी डोणगावकर यांच्यासह आणखी एका अपक्ष उमेदवाराने आपला अर्ज मागे घेतला. त्यामुळे आता महायुतीकडून भाजपाचे सुहास शिरसाट आणि महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गटनेते गणेश लोखंडे यांच्यात थेट लढत होणार आहे. या दोघांसह इसाक सांडू खान हे तिसरे अपक्ष उमेदवारही निवडणूक रिंगणात आहेत.

****

नांदेड स्थानिक प्राधिकार मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसचे अधिकृत उमेदवार रामदास पाटील सुमठाणकर, माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्यासह पाच उमेदवारांनी माघार घेतली आहे. या निवडणुकीत आता महायुती भाजपाचे उमेदवार अमरनाथ राजूरकर आणि महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार कृष्णा पाटील आष्टीकर यांच्यात थेट लढत होणार आहे. प्रशांत इंगोले हे अपक्ष उमेदवारही रिंगणात आहेत.

****

परभणी हिंगोली विधान परिषद मतदार संघात तिरंगी लढत होणार आहे. महायुती पक्षातील तीनही बंडखोर उमेदवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे संग्राम जामकर, विजय जामकर आणि भाजपचे नगरसेवक विश्वजीत बुधवंत यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. काँग्रेसचे माजी आमदार सुरेश देशमुख यांचे चिरंजीव सुशील देशमुख यांनी आपली उमेदवारी कायम ठेवल्याने, आता महायुतीकडून शिवसेनेचे सईद खान, महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार डॉ,विवेक नावंदर यांच्यात तिहेरी लढत होणार आहे.

****

रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेंद्रनाथ तथा बाळ माने यांनी अर्ज मागे घेतला. माने अर्ज माघारी घेण्यासाठी आलेले असताना भाजप नेते आणि मंत्री नीतेश राणे त्यांच्यासोबत होते. त्यामुळे माने यांच्या भाजपप्रवेशाची शक्यता वर्तवली जात आहे.

या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर बाळ माने यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षतून हकालपट्टी करण्यात आली आहे.

****

नाशिक मतदार संघात महायुतीकडून शिवसेनेचे आमदार नरेंद्र दराडे यांच्या विरोधात भाजपचे इच्छूक गणेश बबन गिते यांनी माघार घेतली असली तरी त्यांचे बंधू गोकूळ बबन गिते यांनी अर्ज कायम ठेवला आहे. शिवाय भाजपचे बंडखोर प्रसाद बळीराम हिरे तसंच प्रसाद हिरे यांचाही अर्ज कायम आहे. त्यामुळे नाशिक मतदार संघात बहुरंगी लढत होणार आहे.

****

सोलापूर विधान परिषद मतदार संघातही बिनविरोध निवडणुकीची शक्यता मावळली आहे. आज पाच उमेदवारांनी माघार घेतली, पण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव देशमुख यांचा उमेदवारी अर्ज कायम राहिला आहे. त्यामुळे ही निवडणूक आता महायुतीकडून भाजपचे उमेदवार माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे वसंतराव देशमुख अशी होणार आहे.

****

देशभरातील ५३ हजार शासकीय कार्यालयांच्या छतांवर सौर ऊर्ज प्रणाली बसवण्यात आली आहे. केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ही माहिती दिली. निर्धारित उद्दीष्टाच्या ८० टक्के काम पूर्ण झाल्याचं जोशी यांनी सांगितलं.

****

पेट्रोलला पर्याय म्हणून इथेनॉलचा वापर वाढल्यास, वायु प्रदुषणाला आळा बसेल, असा विश्वास केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे. आज नवी दिल्लीत फ्लेक्स इंधनावर चालणाऱ्या चारचाकी गाडीचं अनावरण केल्यानंतर ते बोलत होते. देशात जुन्या चारचाकी मोडीत काढण्यासाठी देशभरात सुमारे पावणे दोनशे स्क्रपिंग युनीट सुरू असल्याची माहिती गडकरी यांनी दिली, ते म्हणाले -

बाईट - केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी

पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंह पुरी यावेळी उपस्थित होते. देशात इथेनॉल पंपांची संख्या वाढवणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

****

बांगलादेशात गोवरची लागण होऊन ६०० हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले आहेत. मार्च महिन्यापासून आतापर्यंत बांगलादेशात ७४ हजार ५७२ संशयास्पद रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी ९ हजार १९१ जणांना गोवरची लागण झाल्याचं निदान झालं आहे.

****

पुण्यातल्या विषारी दारू दुर्घटनेनंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध हातभट्टी दारू निर्मिती आणि विक्रीविरोधात विशेष मोहीम हाती घेतली आहे. गेल्या २९ मे ते २ जून या कालावधीत कोकण विभागातील ठाणे, पालघर गुन्हे नोंदवले असून २१३ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या मोहिमेदरम्यान दीड कोटी रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच अनेक हातभट्टी निर्मिती केंद्रे उद्ध्वस्त करण्यात आली. अवैध मद्य वाहतुकीविरोधात गुन्हे दाखल करून ६ वाहनंही जप्त करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं.

***

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका प्रशासनाने शहरातील अग्निसुरक्षा व्यवस्थेबाबत तातडीने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. दिल्लीत काल झालेल्या अग्नीकांडाच्या पार्श्वभूमीवर स्थायी समिती सभापती अनिल मकरिये यांनी आज एक बैठक घेतली. शहरातील सर्व हॉटेल्स, खाजगी रुग्णालयं, कोचिंग क्लासेस, अभ्यासिका, जिम, खासगी शाळा, मॉल्स आणि व्यावसायिक आस्थापनांची सखोल तपासणी करण्याचे आदेश मकरिये यांनी दिले.

****

जालना जिल्ह्यात घनसावंगी तालुक्यातल्या तीर्थपुरी इथल्या एका आस्थापनेवर कारवाई करत जवळपास १३ लाख रुपयांचा भेसळयुक्त तुपाचा साठा जप्त करण्यात आला आहे. आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या निर्देशानुसार तीर्थपुरी इथल्या मुंदडा इंडस्ट्रीज या आस्थापनेची तपासणी करण्यात आली. यावेळी तुपामध्ये रिफाइंड सोयाबीन तेल आणि इसेन्स मिसळलं जात असल्याचा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात आला. कारवाईदरम्यान विविध ब्रँडच्या तुपाचे, खुल्या साठ्यातील तुपाचे, रिफाइंड सोयाबीन तेलाचे आणि इसेन्सचे असे एकूण आठ नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. पुढील आदेशापर्यंत कंपनीला सील ठोकण्यात आलं आहे.

****

लातूर जिल्ह्यातही जवळ पास साडे तीन लाख रुपये किमतीचे खाद्य तेल आणि निकृष्ट साहित्य जप्त करण्यात आलं आहे. शहरातील गंजगोलाई परिसरातील दुकानं,उदगीर मधील ऑईल मिल तसंच हाकनाकवाडी इथल्या तेल कारखान्यावर धाड टाकून प्राशासनानं ही कारवाई केली.

****

यंदा खरीप हंगामात बीजप्रक्रिया करूनच पेरणी करावी, असं आवाहन बीडचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष साळवे यांनी केलं आहे. बीजप्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या भागातील सहाय्यक कृषी अधिकारी, उपकृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असं आवाहनही कृषी विभागाकडून करण्यात आलं आहे.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी बिगरशेती मतदारसंघातून राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी अर्ज दाखल केला. याच निवडणुकीसाठी प्राथमिक कृषी पतपुरवठा मतदारसंघातून अभिजीत देशमुख यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

****

बीड जिल्ह्यातल्या सर्व ग्रामपंचायतींमध्ये घनकचरा व्यवस्थापन उपक्रम राबवला जात असून, या उपक्रमाचा आढावा घेण्यासाठी उद्या ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जिल्ह्यात विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आल्या आहेत. सर्व ग्रामपंचायती, महिला बचत गट, युवक आणि स्वयंसेवी संस्थांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा, आणि पर्यावरण संवर्धनासाठी योगदान द्यावं, असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे.

****

जागतिक सायकल दिनानिमित्त धाराशिव जिल्ह्यात येत्या रविवारी सात जूनला सायकल फेरीचे आयोजन करण्यात येणार आहे. जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेच्या परिसरातून सकाळी सात वाजता या फेरीला प्रारंभ होईल, शहराच्या विविध भागातून मार्गक्रमण करत, ही फेरी श्री तुळजाभवानी जिल्हा क्रीडासंकुलावर विसर्जित होईल.

****

‘पहिली जागतिक योगासन क्रीडा स्पर्धा 2026’ आजपासून गुजरातमध्ये अहमदाबाद इथं सुरू झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सायंकाळी या स्पर्धेच्या औपचारिक उद्घाटनाच्या कार्यक्रमात दूरस्थ पद्धतीनं सहभागी होतील. येत्या ८ जून पर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत ७५ देशातले ५०० पेक्षा जास्त योगपटू सहभागी होत आहेत.

****

नैऋत्य मोसमी पावसाचं आज केरलम्मध्ये आगमन झालं, यंदा मोसमी पावसाच्या आगमनाला नेहमीपेक्षा तीन दिवस उशीर झाला आहे. दरम्यान, महाराष्ट्रात पुढील दोन दिवसांत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या चारही विभागांतील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आणि जोरदार वाऱ्यांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 13.06.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 13 June 2026 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत...