Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 09 June
2026
Time 7.10
AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ९ जून २०२६ सकाळी ७.१० मि.
****
·
महाराष्ट्रात रेल्वे फाटकमुक्त होण्यासाठी पायाभूत
सुविधा उभारण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
·
२१ जून रोजी होणाऱ्या नीट-यूजी २०२६ च्या फेरपरीक्षेसाठी
केंद्रांची यादी जाहीर
·
प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाची दशकपूर्ती;
गेल्या १२ वर्षांत गरीब आणि वंचितांच कल्याण हाच सरकारी धोरणांचा केंद्रबिंदू असल्याचं
पंतप्रधानांचं प्रतिपादन
·
जागतिक योगासन अजिंक्यपद स्पर्धेत धाराशिवच्या हिंदवी
चौरे ला सुवर्णपदक
आणि
·
राज्यात नैऋत्य मोसमी पावसाची आगेकूच
****
‘महाराष्ट्र रेल्वे
पायाभूत सुविधा विकास महामंडळ – महारेलमार्फत करण्यात येणाऱ्या एकूण १३१ पैकी पहिल्या
टप्प्यात ६५ कामांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली. काल झालेल्या
यासंदर्भातल्या बैठकीत त्यांनी, महाराष्ट्रात रेल्वे फाटकमुक्त होण्यासाठी पायाभूत
सुविधा उभारण्यात याव्यात, असे निर्देश दिले. राज्यातल्या सार्वजनिक बांधकाम आणि नगरविकास
विभागाच्या अखत्यारीत असलेल्या रस्त्यांवर रेल्वे उड्डाणपूल, पादचारी पूल आणि रेल्वे
मार्गाखालील रस्त्यांची कामं 'महारेल'मार्फत करण्यात येणार आहेत. महानगरांमधलं वाढतं
शहरीकरण लक्षात घेऊन नागरिकांच्या सुलभ दळणवळणासाठी या पायाभूत सुविधा उभारण्याचे निर्देश
मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
****
येत्या २१ जून रोजी
होणाऱ्या नीट-यूजी २०२६ च्या फेरपरीक्षेसाठी केंद्रांची यादी जाहीर झाली आहे. परदेशातल्या
१४ शहरांसह देशातल्या ५५१ केंद्रांवर दुपारी २ ते सव्वा पाच या वेळात लेखी पद्धतीनं
ही परीक्षा होणार आहे. प्रवेशपत्र आणि इतर माहितीसाठी विद्यार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळाशी
संपर्क साधण्याचं आवाहन राष्ट्रीय परिक्षा संस्था – एनटीएनं केलं आहे.
****
सीबीएसईने बारावीच्या
उत्तरपत्रिका तपासण्यासाठी लागू केलेल्या ऑनस्क्रीन गुणांकन पद्धतीला आव्हान देणाऱ्या
याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि सीबीएसई ला नोटीस जारी केली आहे.
याप्रकरणी पुढील सुनावणी १२ जूनला होणार आहे.
****
महाराष्ट्र राज्य
माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या जून-जुलै
२०२६ मध्ये होणाऱ्या परीक्षांचं प्रवेश पत्र कालपासून उपलब्ध झालं आहे. मंडळाच्या डब्ल्यू
डब्ल्य डब्ल्यू डॉट माहा एच एसएससी बोर्ड डॉट इन या संकेतस्थळावरून प्रवेश पत्र डाऊनलोड
करता येईल. मंडळाच्या कार्यकक्षेतल्या सर्व माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी
प्रवेशपत्रांची छापील प्रत विद्यार्थ्यांना द्यावी, यासाठी कुठलंही शुल्क आकारलं नसून
प्रवेशपत्रावर मुख्याध्यापक किंवा प्राचार्य यांची स्वाक्षरी आणि शिक्का असावा, असे
निर्देश मंडळाने दिले आहेत.
****
प्रधानमंत्री सुरक्षित
मातृत्व अभियानाला आज दहा वर्ष पूर्ण होत आहेत. गर्भवतींना मोफत आणि उत्तम गुणवत्तेच्या
प्रसुतीपूर्व विविध नऊ सेवा उपलब्ध करून देणं, हा या अभियानाचा उद्देश आहे. या पार्श्वभूमीवर
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या वतीने आजपासून देशभरात विशेष कार्यक्रमाचं
आयोजन करण्यात येणार आहे. या निमित्ताने ७५ रुपयांचं एक स्मारक नाणं तसंच टपाल तिकीटही
जारी केलं जाणार आहे.
****
गेल्या १२ वर्षात
गरीबांच्या कल्याणासाठी केंद्र सरकारने केलेल्या उपाययोजनांची माहिती पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात दिली. या काळात देशाने अनेक परिवर्तनांचा अनुभव
घेतला असून, या बदलांच्या केंद्रस्थानी गरीब आणि वंचितांचं कल्याण हेच मुद्दे असल्याचं
त्यांनी सांगितलं.
****
केंद्र सरकारच्या
बारा वर्षाच्या काळात कृषी आणि सहकार क्षेत्रात आमूलाग्र बदल करण्यात आले. त्यामुळे
कृषी तसंच ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये मोठे आणि ऐतिहासिक बदल दिसून आले. केंद्रीय कापूस
तंत्रज्ञान संशोधन संस्थेचे सदस्य मकरंद कोर्डे यांनी आकाशवाणीशी बोलतांना या बदलांचा
आढावा घेतला, ते म्हणाल..
बाईट- मकरंद कोर्डे
****
इंडिया आघाडीची
काल नवी दिल्लीत बैठक झाली. या बैठकीला विविध २५ पक्षांचे नेते उपस्थित होते. दर दोन
महिन्यांनी अशी बैठक घेण्यावर सर्वांचं एकमत झालं असून, पुढची बैठक हैदराबादला होणार
असल्याचं, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सांगितलं.
****
ऑल इंडिया रेडियो
अर्थात आकाशवाणीला काल नव्वद वर्ष पूर्ण झाली. आठ जून १९३६ रोजी इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग
सर्व्हिसचं, ऑल इंडिया रेडिओ असं नामकरण करण्यात आलं. सुमारे दोन दशकांनंतर आकाशवाणी
हे नाव या संस्थेला मिळालं. आकाशवाणीच्या कार्यविस्ताराचा हा संक्षिप्त आढावा..
बाईट-आकाशवाणी
****
राष्ट्रपती द्रौपदी
मुर्मू यांच्या हस्ते काल शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी सात कीर्ती चक्र,
१५ वीर चक्र, आणि २९ शौर्य चक्र राष्ट्रपतींच्या हस्ते देऊन, सैनिकांना गौरवण्यात आलं.
****
महाराष्ट्रातून
राज्यसभेच्या एका जागेसाठी काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं माजी आमदार राजेंद्र
जैन यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून उमेदवार
दिला गेला नाही, त्यामुळे जैन यांचा विजय निश्चित झाला आहे.
****
अहमदाबाद इथं सुरू
असलेल्या जागतिक योगासन अजिंक्यपद स्पर्धेत धाराशिवच्या हिंदवी चौरे हिनं फॉरवर्ड बेंडिंग
प्रकारात सुवर्णपदक पटकावलं. या स्पर्धेत भारतासाठी सुवर्णपदक जिंकणारी ती धाराशिव
जिल्ह्यातली दुसरी योगपटू आहे.
****
न्यू चंदीगड इथं
झालेल्या एकमेव कसोटी सामन्यात भारतानं अफगाणिस्तानला एक डाव आणि ३०० धावांनी पराभूत
केलं. भारतानं आपला पहिला डाव आठ बाद ५६४ धावांवर घोषित केला होता, अफगाणिस्तानचा पहिला
डाव १५२ धावांवर संपुष्टात आल्यावर भारताने त्यांना फॉलोऑन दिला. अफगाणिस्तानचा दुसरा
डावही ११२ धावांवर आटोपला. या सामन्याच्या पहिल्या डावात भारताचा फिरकी गोलंदाज मानव
सुथारने अवघ्या ३३ धावांच्या मोबदल्यात अफगाणिस्तानच्या सहा फलंदाजांना बाद केलं. पदार्पणातच
ही कामगिरी करणारा तो पहिला भारतीय डावखुरा फिरकी गोलंदाज तर पदार्पणात पाच बळी घेणारा
दहावा भारतीय गोलंदाज ठरला आहे.
****
छत्रपती संभाजीनगर
जिल्ह्यातल्या सुमारे २२ हजार हेक्टर शासकीय पडिक जमीनीवर दोन कोटी ४४ लाख वृक्षारोपण
करण्यात येणार आहे. 'ग्रीन महाराष्ट्र मिशन' अंतर्गत आगामी १० वर्षांत हे अभियान राबवण्याचं
उद्दिष्ट प्रशासनाने निश्चित केलं आहे. विविध विभागांच्या समन्वयातून हे काम पूर्ण
करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी यांनी दिले.
****
लातूर शहरात ॲबेट
मोहीमेची पहिली फेरी कालपासून सुरू झाली. २० जूनपर्यंत ही फेरी चालणार असून, शहरातील
जवळजवळ ७७ हजार ५९७ घरामध्ये ही मोहिम राबवली जाणार आहे. या मोहिमेत घर भेटीस येणाऱ्या
आरोग्य कर्मचाऱ्यास सहकार्य करावं असं आवाहन, लातूर महापालिकेकडून करण्यात आलं आहे.
****
जालना इथं एमडी
अर्थात मेफेड्रोन ड्रग्सची विक्री करण्यासाठी आलेल्या एका संशयिताला पोलिसांनी अटक
केली. अफरोज जाफर शेख असं त्याचं नाव असून, तो छत्रपती संभाजीनगर इथला रहिवासी आहे,
त्याच्याविरुद्ध कदीम जालना पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात
आला आहे. या कारवाईत अंमली पदार्थांसह कार, मोबाईल, इलेक्ट्रॉनिक वजनकाटा असा एकूण
चार लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
****
पर्यावरण संवर्धनाचा
संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशानं भारतीय जनता पक्षाच्या वतीनं काल छत्रपती
संभाजीनगर इथं स्थानिक भाजीमंडई परिसरात नागरिकांना कापडी पिशव्यांचं मोफत वाटप करण्यात
आलं. प्लास्टिकचा वापर टाळून कापडी पिशव्यांचा स्वीकार करावा, असं आवाहन पक्षाच्या
वतीनं यावेळी करण्यात आलं.
****
लातूर जिल्ह्यात
औसा तालुक्यात सर्वाधिक ३७ मिलीमीटर पाऊस झाला. जिल्ह्यातल्या बहुतांश तालुक्यात पाऊस
झाला असून, आगामी काही दिवसांत जिल्ह्यात मान्सूनची सक्रियता वाढण्याची शक्यता हवामान
विभागाने व्यक्त केली आहे.
****
धाराशिव जिल्ह्यात
काल आठ तालुक्यात मिळून सरासरी ६६ पूर्णांक चार शतांश मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
सर्वाधिक जवळजवळ १२२ मिलीमीटर पाऊस कळंब तालुक्यात झाला. या तालुक्यातील तीन महसूल
मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. जालना
शरासह जिल्ह्यातल्या जोरदार पाऊस झाला.
****
राज्यात नैऋत्य
मोसमी पावसाची आगेकूच वेगानं होत आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, सांगली,
सोलापूर या जिल्ह्यांमध्ये मोसमी पावसाने प्रवेश केल्याची माहिती हवामान विभागानं दिली.
आज बीड, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे.
****
No comments:
Post a Comment