Monday, 1 June 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 01.05.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 01 June 2026

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०१ जून २०२६ सायंकाळी ६.१०

****

·      एसटी बस चार्जिंग स्टेशन उभारण्याच्या कामाला गती देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

·      विधानपरिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत संपली

·      आयआयटी प्रवेशासाठीच्या जेईई ॲडव्हान्स्ड परीक्षेत मुलांची सरशी

·      मराठवाडा साहित्य परिषदेचे २०२६ चे ग्रंथपुरस्कार जाहीर

आणि

·      आशियाई अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भारताची चमकदार कामगिरी

****

राज्य परिवहन महामंडळ एसटीचा शंभर टक्के ताफा ई-बसेसमध्ये रूपांतरित करण्याचे उद्दिष्ट असून, बसेससाठी आवश्यक असलेले चार्जिग स्टेशन उभारण्याच्या कामाला गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा या निवासस्थानी राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या इ-बसेस संदर्भात बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते. विकसित महाराष्ट्र अंतर्गत एसटी महामंडळामध्ये २०२९ पर्यंत ५० टक्के, २०३५ पर्यंत ८० टक्के; तर २०४७ पर्यंत एसटीचा शंभर टक्के ताफा ई-बसेसमध्ये रूपांतरीत करायचा आहे. या अनुषंगाने फडणवीस यांनी यावेळी दिले. ई-वाहन धोरणांतर्गत दीड हजार ई-बसेसना बसच्या किमतीच्या दहा टक्के किंवा कमाल वीस लाख रुपये इतके अनुदान देण्याची तरतूद करण्यात आली असून महामंडळ सध्या पाच हजार एकशे पन्नास ई-बसचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवत असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं.

****

दरम्यान, राज्यात सर्व बसस्थानकातील स्वच्छतागृहं हे आजपासून मोफत सुविधा पुरवणार आहेत. प्रवाशांसह बस स्थानकात येणाऱ्या नागरिकांना या सुविधेसाठी कोणतंही शुशुल्क द्यावं लागणार नाही. या निर्णयामुळे प्रवाशांमधून समाधान व्यक्त होत आहे.

****

विधानपरिषदेच्या १७ जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आज संपली. महायुतीकडून अहिल्यानगर मतदार संघात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार प्राजक्त तनपुरे, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे, ठाणे मतदार संघातून शिवसेनेचे रवींद्र फाटक यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. नागपूर पोटनिवडणुकीसाठी भाजपचे डॉ. राजीव पोतदार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. तर वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली मतदारसंघातून भाजपचे अरुण लखाणी आणि काँग्रेसचे शैलेश अग्रवाल यांनीही उमेदवारी अर्ज भरला.

 

नाशिक मतदारसंघातून महायुतीकडून शिवसेनेचे माजी आमदार नरेंद्र दराडे यांनी अर्ज दाखल केला, दरम्यान, भाजपाचे इच्छुक उमेदवार गणेश गीते यांचे बंधू गोकुळ गीते यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते रवींद्र मिर्लेकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन घोडेबाजार टाळण्यासाठी आपल्या पक्षाने उमेदवार न देण्याचा निर्णय घेतल्याचं जाहीर केलं.

 

छत्रपती संभाजीनगर इथं आज औरंगाबाद जालना स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीकडून सुहास शिरसाट तसेच महाविकास आघाडी कडून देवयानी पाटील डोणगावकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तर सिल्लोड नगरपरिषदेचे नगराध्यक्ष समीर अब्दुल सत्तार यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला.

 

नांदेड विधान परिषद मतदारसंघातून आज आठ उमेदवारांचे १७ अर्ज प्राप्त झाले. यात महायुतीकडून भारतीय जनता पक्षाचे अमरनाथ राजूरकर यांनी तर काँग्रेसकडून रामदास पाटील सुमठाणकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

 

धाराशिव-लातूर-बीड विधान परिषद मतदार संघातून महायुतीचे बसवराज पाटील यांनी तर महाविकास आघाडीचे उमेदवार महेश देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यासोबतच सहा अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.

****

व्यावसायिक वापरासाठीच्या सिलेंडरच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. घरगुती वापरासाठीच्या गॅसच्या दरात बदल झालेला नाही. १९ किलो वजनाचा व्यावसायिक सिलेंडर मुंबईत साडे ४३ रूपयांनी महागला असून त्याची किंमत ३ हजार ६७ रूपये ५० पैसे झाली आहे. पाच किलोग्रम वजनाच्या छोट्या गॅस सिलेंडरच्या दरात ११ रूपये वाढ झाली आहे.

दरम्यान, केंद्र शासनाने आजपासून पेट्रोल, डिझेल आणि एटीएफ म्हणजे विमान इंधनावरचा निर्यात कर कमी केला आहे. पेट्रोलच्या निर्यातीवरील विंडफॉल गेनवरचा कर निम्म्यावर आणून दीड रुपया प्रतिलीटर, तर डिझेल साडे १३ रूपये प्रतिलीटर आणि एटीएफवरचा कर साडे नऊ रूपये प्रतिलीटर केला आहे.

****

प्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर यांच्या पार्थिव देहावर आज मुंबईत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. सुमन कल्याणपूर यांचं काल निधन झालं, त्या ८९ वर्षांच्या होत्या.

****

गेल्या महिन्यात वस्तू आणि सेवा कर महसुलात ३ पूर्णांक २ दशांश टक्के वाढ होऊन तो एक लाख ९४ हजार कोटी रुपयांवर पोहोचला. गेल्या वर्षीच्या मे महिन्यात वस्तू आणि सेवा कराचं संकलन एक लाख ८८ हजार कोटी रुपये झालं होतं.

मे २०२६ मधे समग्र वस्तू आणि सेवा कर संकलन ३७ हजार ३९७ कोटी रुपये तर राज्यांच्या जीएसटीचं संकलन ४५ हजार १४३ कोटी रुपये झालं. एकात्मिक जीएसटी चा महसूल ५१ हजार ९९० कोटी रुपयांवर पोहोचला.

****

नीट युजी २०२६ ची पुनर्परीक्षा सध्याच्या पेन-अँड-पेपरपद्धतीऐवजी संगणक-आधारित चाचणीस्वरूपात घेतली जावी, अशी मागणी करणारी याचिका आज सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. न्यायमूर्ती पी. एस. नरसिंहा आणि न्यायमूर्ती अरविंद कुमार यांच्या खंडपीठानं, याप्रकरणी नॅशनल टेस्टिंग एजन्सीआधीच अनेक आव्हानांचा सामना करत असल्यामुळे, ही पुनर्परीक्षा संगणक आधारित चाचणी स्वरूपात घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असं स्पष्ट केलं. या प्रकरणाची पुढील सुनावणी २७ जुलै ला होणार आहे.

****

आयआयटी प्रवेशासाठीच्या जेईई ॲडव्हान्स्ड परीक्षेत मुलांनी बाजी मारली आहे. आज जाहीर झालेल्या या परीक्षेच्या निकालात यंदा ५६ हजार ८८० विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरले, यामध्ये ४६ हजार ७७३ मुलं तर १० हजार १०७ मुलींचा समावेश आहे. दिल्ली विभागातला शुभम कुमार ३६० पैकी ३३० गुण मिळवून देशात सर्वप्रथम आला. विद्यार्थिनींमधे दिल्ली विभागातली आरोशी देशपांडे पहिली आली आहे. तिला २८० गुण मिळाले असून सर्वसाधारण यादीत ती ७७व्या क्रमांकावर आहे. विद्यार्थ्यांना आपला निकाल जेईईएडीव्ही.एसी.इन या संकेतस्थळावर पाहता येतील.

****

मराठवाडा साहित्य परिषदेचे २०२६ चे ग्रंथपुरस्कार आज जाहीर झाले. छत्रपती संभाजीनगर इथं परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील आणि कार्यवाह डॉ. दादा गोरे यांनी ही घोषणा केली. नरहर कुरुंदकर वाङ्गमय पुरस्कार नांदेडचे डॉ. अनुराग श्रीकांत लव्हेकर, यांच्या पुस्तके : साद आणि दादह्या पुस्तकाला जाहीर झाला आहे, तर प्राचार्य म. भि. चिटणीस वाङ्गमय पुरस्कार छत्रपती संभाजीनगर इथले डॉ. शिव कदम, यांच्या चित्रपटाचे शास्त्र - संहिता ते समीक्षाया ग्रंथाला जाहीर झाला.

बी. रघुनाथ कथा-कादंबरी पुरस्कारासाठी ठाण्याचे क्षितिज देसाई, यांच्या शीतपेटीतून जेव्हा जाग येतेया कथासंग्रहाची तर नरेंद्र मोहरीर वाङ्गमय पुरस्कारासाठी परभणीचे डॉ. साहेब खंदारे, यांच्या मराठवाडा अमूर्त संस्कृती संचितया ग्रंथाची निवड करण्यात आली आहे. मराठी पुस्तक व्यवहारात लक्षणीय कार्यासाठीचा रा. ज. देशमुख स्मृतिपुरस्कार मुंबईच्या उमा नाबर यांना जाहीर झाला आहे. रोख रकमेच्या स्वरुपातले हे पाच पुरस्कार येत्या २१ जून रोजी प्रदान केले जाणार आहेत.

****

येत्या सहा जून रोजी शिवराज्यभिषेक सोहळा दिनानिमित्त रायगड किल्ल्यावर बीडच्या अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे दोन दिवस कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला अभिषेक, राजमाता जिजाऊ यांच्या समाधीला अभिवादन, पारंपारिक वाद्यांच्या गजरात ध्वजपूजन आणि ध्वजारोहण करण्यात येणार आहे, अशी माहिती समितीचे सदस्य गंगाधर काळकुटे पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

****

छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने परीक्षेसंबंधीच्या मानधनाची पुनर्रचना करत त्यात १५ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या मानधन वाढीमुळे विद्यापीठाच्या तिजोरीवर वार्षिक सुमारे दोन कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे. दरम्यान, तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांनी किमान ३५ टक्के वाढीची मागणी केली आहे.

****

हाँगकाँग इथं झालेल्या २२व्या आशियाई २० वर्षांखालील अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भारतानं दहा सुवर्ण, पाच रौप्य आणि चार कांस्य पदकांसह एकूण १९ पदके जिंकली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या स्पर्धेतील सर्व यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन केलं आहे.

****

लातूर शहरासह परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी नागरिकांची धावपळ उडाली, तर पावसामुळे वातावरणातील उकाडा काही प्रमाणात कमी झाला. गेल्या दोन दिवसांपासून होत असलेल्या पूर्वमोसमी पावसामुळे शहरासह ग्रामीण भागात गारवा निर्माण झाला आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 01.05.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 01 June 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपत...