Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 07 June 2026
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती
संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०७ जून २०२६ सायंकाळी
६.१०
****
· घरगुती एलपीजी
सिलिंडरच्या दरात २९ रुपयांची वाढ
· नीट यूजी पुनर्परीक्षेची
प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा एनटीएनं फेटाळला, अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन
· १५ जूनपर्यंत
राज्यात मान्सूनच्या प्रगतीचा वेग मंदावणार, पेरणीची घाई न करण्याचं कृषी विभागाचं
आवाहन
आणि
· भारताच्या ५६४
धावांच्या प्रत्युत्तरात अफगाणिस्तानच्या ५ बाद ११३ धावा, दुसऱ्या दिवसाअखेर कसोटीवर
भारताची पकड मजबूत
****
स्वयंपाकासाठीच्या
घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात २९ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. १४ किलोच्या सिलिंडरच्या
दरातली ही वाढ आजपासून लागू होणार आहे. गेल्या तीन महिन्यातली ही दुसरी दरवाढ आहे.
या वाढीमुळे मुंबईत घरगुती एलपीजी सिलिंडरचे दर ९१२ रुपये ५० पैशांवरून ९४१ रुपये ५०
पैसे झाले आहेत.
****
आंतरराष्ट्रीय
स्तरावर स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात वाढ होत असली तरी भारतात एलपीजी सिलिंडर जागतिक
स्तरावरच्या सर्वात कमी दरात मिळत असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. अमेरिका, कॅनडा
आणि ऑस्ट्रेलिया यांसारख्या विकसित अर्थव्यवस्थांच्या तुलनेत भारतात एलपीजी स्वस्त
आहे, असं केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या निवेदनात म्हटलं आहे.
****
२१
जूनला होणाऱ्या नीट यूजी २०२६ च्या पुनर्परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा एनटीए
अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं फेटाळला आहे. विद्यार्थी आणि पालकांमधल्या तणावाचा
गैफायदा घेऊन अशा अफवा पसरवणाऱ्या संघटित टोळ्यांचं हे काम असल्याचं एनटीए नं समाज
माध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. परीक्षा प्रक्रियेची विश्वासार्हता अबाधित आहे.
उमेदवारांना सुरक्षित आणि निष्पक्ष पद्धतीनं परीक्षा देता यावी, यासाठीच्या उपाययोजना
करण्यात आल्याचं यात म्हटलं आहे. परीक्षेबाबतची समाजमाध्यमांवरची आक्षेपार्ह सामग्री
तात्काळ ओळखून सायबर गुन्हे शाखेला त्याबाबत माहिती दिली जात असून, संबंधितांविरोधात
कारवाई केली जाईल, असं एनटीए नं म्हटलं आहे.
****
सीबीएसई
अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या यंदाच्या १२वी च्या परीक्षेसाठी निकाल-पश्चात
सेवा पुरवणाऱ्या पोर्टलवर आढळून आलेल्या त्रुटींची पडताळणी आणि प्रश्नपत्रिकेच्या पुनर्मुल्यांकनासाठी
अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. हे पोर्टल आज मध्यरात्रीपर्यंत खुलं राहणार
असून, विद्यार्थ्यांनी मुदत संपण्यापूर्वी आपले अर्ज पूर्ण करून सादर करावेत, असं सीबीएसई
नं समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
****
इस्रायलमध्ये
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि स्मारक उभारण्यात येणार असून, हे दोन्ही देशांतील
मैत्रीचे प्रतीक मानले जात आहे. इस्रायलचे महावाणिज्यदूत यानिव रेवाच यांनी ही माहिती
दिली. ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा भारत आणि इस्रायलमधील मैत्री,
प्रेरणा आणि सहकार्याचे कायमस्वरूपी प्रतीक ठरेल. फेब्रुवारीमध्ये पंतप्रधान मोदी यांच्या
इस्रायल दौऱ्यानंतर निर्णय घेण्यात आला. याची माहिती आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयालाही दिली आहे. त्यांनी तत्काळ या सुंदर प्रकल्पाला
आवश्यक ती सर्व मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन, विचार
इस्रायली नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांच्या चरित्राचे, संबंधित पुस्तकांचे हिब्रू
भाषेत भाषांतर करण्याचाही विचार सुरू आहे.
****
राष्ट्रीय
पुरस्कार विजेता मल्याळी अभिनेता सलिम कुमार यांचं काल कोची इथं निधन झालं. ते ५७ वर्षांचे
होते. त्यांच्यावर गेल्या अनेक दिवसांपासून उपचार सुरू होते. आपल्या तीन दशकांच्या
अभिनयाच्या कारकिर्दीत सलिम कुमार यांनी जवळपास साडे तीनशे चित्रपटात काम केलं. पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी सलीम कुमार यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
****
राज्यातील
ग्रामीण आणि आदिवासी भागांपर्यंत मानसिक आरोग्य सेवा प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी महाराष्ट्र
शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांमध्ये ‘उडान’ प्रकल्पांतर्गत
मानसिक आरोग्य सेवा अधिक बळकट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने सार्वजनिक आरोग्य विभाग आणि दोन स्वयंसेवी
संस्थांमध्ये पाच वर्षांसाठी सामंजस्य करार करण्यास मंजुरी दिली आहे. राज्यात मानसिक
आरोग्याच्या समस्या वाढत्या प्रमाणात समोर येत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय
महत्त्वाचा मानला जात आहे.
****
कॉकरोच
जनता पार्टीच्या नेतृत्त्वाखाली नवी दिल्लीतील आंदोलनात ७ हजार नागरिक सहभागी झाल्याचा
आणि हे आंदोलन यशस्वी झाल्याचा दावा संस्थापक अभिजित दीपके यांनी केला आहे. छत्रपती
संभाजीनगर इथं आज ते पत्रकारांशी बोलत होते. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान
यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी केलेले हे आंदोलन ते राजीनामा देईपर्यंत सुरूच राहील
असंही त्यांनी म्हटलं आहे. हे आंदोलन लवकरच देशव्यापी करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट
केलं. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या संभाजीनगर येथील घरी चोख पोलीस बंदोबस्त
लावण्यात आला आहे.
****
छत्रपती
संभाजीनगर शहरात क्रांती चौकात आज सकाळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने
महागाई विरोधात जनआक्रोश आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनाचं नेतृत्व आमदार अंबादास दानवे
यांनी केलं. यावेळी ‘महंगाई के अच्छे दिन’, म्हणत केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात
आली.
****
नैऋत्य
मोसमी पावसाचं राज्यात आगमन झालं असलं तरी १५ जूनपर्यंत राज्यात मान्सूनच्या प्रगतीचा
वेग मंद राहील, त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असं आवाहन कृषी आणि आपत्ती
व्यवस्थापन विभागानं केलं आहे. नैऋत्य मोसमी पाऊस दक्षिण कोकणात दाखल झाला असून सिंधुदुर्ग
आणि रत्नागिरी जिल्ह्यांच्या काही भागांत ९ जूनपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज
आहे. मात्र त्यानंतर १५ जूनपर्यंत पावसाच्या प्रगतीचा वेग कमी राहण्याची शक्यता आहे.
****
मृग
नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी आज नांदेड शहर आणि परिसरात वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह
जोरदार पाऊस सुरू झाला. दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास पावसाला झाल्यावर शहरातल्या
अनेक भागात वीज पुरवठाही खंडित झाला होता.
****
छत्रपती
संभाजीनगरचे युवा लेखक ऋषिकेश गोल्हार यांना ‘कलागंगा ग्रामीण कादंबरी पुरस्कार’ वाशीममधील
सावित्रीबाई फुले महाविद्यालयात झालेल्या कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. त्यांच्या
‘रानोबाचा माळ’ या कादंबरीला हा पुरस्कार मिळाला आहे. वाशीम जिल्ह्यातले ग्रामीण कथा,
कादंबरीकार बाबाराव मुसळे यांनी आपल्या आई-वडिलांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार सुरू केला
आहे.
****
बार
कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा निवडणुकीत बीडचे विधिज्ञ वसंतराव साळुंके यांनी सलग
पाचव्यांदा विजयी होण्याचा विक्रम नोंदवला आहे. छत्रपती संभाजीनगरचे अॅड. ज्ञानेश्वर
बागुल यांचीही सदस्यपदी निवड झाली आहे. या निवडणुकीत २५ जागांसाठी १५५ उमेदवार रिंगणात
होते.
****
दिल्लीतील
हॉटेलमध्ये घडलेल्या आगीच्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर महापालिका
आयुक्त अमोल येडगे यांनी शहरातील हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि बारचे तातडीने फायर ऑडिट करण्याचे
आदेश दिले आहेत. या आदेशानुसार, अग्निशमन विभागाने कडक पावले उचलत २७ व्यावसायिक मालमत्तांना
फायर एनओसीबाबत नोटीसा बजावल्या आहेत, अशी माहिती मुख्य अग्निशमन अधिकारी अशोक खांडेकर
यांनी दिली.
****
दिव्यांग
कल्याण सक्षमीकरण अधिकारी यांच्याविरुद्ध शिस्तभंग कार्यवाही करण्याचे आदेश बीड जिल्हा
परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितिन रहमान यांना पुणे राज्य दिव्यांग कल्याण आयुक्तांनी
दिले आहेत. दिव्यांग कर्मचारी संघटना प्रदेश उपाध्यक्ष अशोक आठवले यांनी ही माहिती
दिली.
बीड
जिल्हाधिकारी कार्यालयातील दिव्यांग कल्याण विभागात जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाचा
अवमान होत असल्याप्रकरणी २३ एप्रिल रोजी विशेष बैठकीचे आयोजन केले होते. जिल्हाधिकारी
विवेक जॉन्सन यांनी दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या समस्या निराकरणाबाबत ही बैठक घेतली होती.
यावेळी सर्व कार्यालय प्रमुखांनी दिव्यांग व्यक्तींकरिता मूलभूत सुविधा पुरवण्याबाबत
जॉन्सन यांनी दिव्यांग कल्याण सक्षमीकरण अधिकारी प्रियाराणी पाटील यांना आदेशीत केले
होते. मात्र, त्यावर कार्यवाही न झाल्याने शिस्तभंग कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात
आले आहेत.
****
शेतकऱ्यांना
संपूर्ण कर्जमाफी मिळेल अशी अपेक्षा होती, मात्र शासनानं लादलेल्या जाचक अटींमुळं बहुतांश
शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार आहेत. त्याचा निषेध करीत शेतकरी हक्क मोर्चानं बीडच्या
खांडे पारगाव इथं आज कर्जमाफी निर्णयाची होळी केली. कर्जमाफी आंदोलनात बच्चू कडू यांच्यावर
शेतकऱ्यांनी विश्वास दाखवला मात्र त्यांनी स्वतःच्या आमदारकीचा विचार करून शेतकऱ्यांना
वाऱ्यावर सोडलं असा आरोप शेतकरी आंदोलक राजेंद्र आमटे यांनी यावेळी केला.
****
भारत-अफगाणिस्तानमध्ये
न्यू चंदीगड इथं सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या दिवशी खेळ थांबला
तेव्हा अफगाणिस्तानने ५ बाद ११३ धावा केल्या आहेत. तत्पूर्वी आज भारताने आपला डाव ८
बाद ५६४ धावांवर घोषित केला. कर्णधार शुभमन गिलने १२६, के. एल. राहुल १००, ऋषभ पंत
आणि साई सुदर्शन यांनी प्रत्येकी ८१ धावा केल्या. वॉशिंग्टन सुंदरने नाबाद ५२ धावांची
खेळी केली. अफगाणिस्तानचा संघ अद्यापही ४५१ धावांनी मागे आहे.
****
No comments:
Post a Comment