Monday, 1 June 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.06.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 01 June 2026

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १ जून २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      विधान परिषदेच्या १७ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी महायुतीचं जागावाटप निश्चित

·      १० जूनपर्यंत मान्सूनच्या आगमनाची शक्यता नसल्यानं शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये- मुख्यमंत्र्यांचं आवाहन

·      मन की बात मधून पंतप्रधानांचा देशवासियांशी संवाद, वाढत्या उष्णतेसह विविध मुद्यांवर नागरिकांना सल्ला

·      ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचं निधन

·      पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वत्र अभिवादन

आणि

·      आयपीएल क्रिकेट स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाला सलग दुसऱ्यांदा विजेतेपद

****

विधान परिषदेच्या १७ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी महायुतीचं जागावाटप काल निश्चित झालं. त्यानुसार भाजप ११, शिवसेना ४ आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोन जागांवर लढणार आहे.

भाजपच्या वाट्याला आलेल्या ११ जागांमध्ये छत्रपती संभाजीनगर– जालना, धाराशिव–लातूर–बीड, नांदेड, सोलापूर, जळगाव, भंडारा–गोंदिया, वर्धा-गडचिरोली-चंद्रपूर, अमरावती, नागपूर, अहिल्यानगर, सांगली–सातारा या मतदारसंघांचा समावेश आहे. शिवसेना परभणी, ठाणे, नाशिक आणि यवतमाळ या जागांवर लढणार असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला पुणे आणि रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग दोन जागा आल्या आहेत.

भाजपने काल उमेदवारांची यादी देखील जाहिर केली. छत्रपती संभाजीनगर–जालना इथून सुहास शिरसाट यांना, नांदेडमधून अमर राजुरकर यांना, तर धाराशिव–लातूर–बीड मधून बसवराज पाटील यांना उमेदवादी देण्यात आली आहे.

****

दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने छत्रपती संभाजीनग–जालना इथून देवयानी डोणगावकर यांना, परभणी –हिंगोली मधून विवेक नावंदर यांना, तर रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून सुरेंद्र उर्फ बाळ माने यांना उमेदवारी दिली आहे.

या निवडणुकीसाठी आज अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस आहे, तर मतदान आणि मतमोजणी २२ जून ला होणार आहे.

****

राज्यसभेच्या द्वैवार्षिक तसंच पोटनिवडणुकीसाठी येत्या १८ तारखेला मतदान होणार आहे. याबाबतची अधिसूचना काल जारी झाली. यात महाराष्ट्रातून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राजीनामा दिलेल्या एका जागेचा समावेश आहे.

****

राज्यातल्या बहुतांश भागात किमान १० जूनपर्यंत मान्सूनच्या आगमनाची शक्यता नसल्याचं स्पष्ट झालं असून, शेतकर्यांनी मान्सूनपूर्व वादळी पावसावर अवलंबून राहून पेरणीची घाई करू नये, असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. योग्य आणि स्थिर पावसाची खात्री झाल्यानंतरच पेरणीचं नियोजन करावं, असं त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशातून सांगितलं.

****

चांगल्या हेतूने आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांनी समाजात मोठा बदल घडवता येतो, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून ते काल देशवासियांशी संवाद साधत होते. या कार्यक्रमाचा १३४वा भाग काल प्रसारित झाला. देशातल्या प्रत्येक गावात आणि शहरात आपल्याला प्रेरणा देणाऱ्या असंख्य गोष्टी घडत आहेत. अनेकदा या प्रयत्नांची फारशी चर्चा होत नाही, पण जेव्हा आपल्याला त्याची जाणीव होते, तेव्हा आपला देश या सामर्थ्याच्या बळावर पुढे वाटचाल करत असल्याचा आपला विश्वास अधिक दृढ होतो असं पंतप्रधान म्हणाले.

देशातल्या बहुतांश भागात उष्णता वाढली असल्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी, सतत पाणी पीत राहावं असं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं. यानिमित्तानं त्यांनी उन्हाळ्याच्या हंगामात कोकणाच्या हापूससह देशभरात विविध ठिकाणी आढळणाऱ्या आंब्याच्या जातींचा देखील उल्लेख केला.

नेदरलँड्स भेटीत ‘चोल’ साम्राज्य काळातला प्राचीन ताम्रपट भारताला परत करण्यात आला, देशाच्या अशा अमूल्य वारशांचं जतन संवर्धन करण्यासाठी सातत्यानं प्रयत्न सुरु, क्रीडा क्षेत्रात भारतीय खेळाडूंनी केलेली उल्लेखनीय कामगिरी, ‘नमामि गंगे’ अभियान अंतर्गतच्या ‘डॉल्फिन बचाव रुग्णवाहिका’ ही मोहिम, वेधशाळांचं महत्व आदी मुद्यांचाही पंतप्रधानांनी मन की बात मध्ये उल्लेख केला.

****

ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचं काल मुंबईत वृद्धापकाळाने निधन झालं, त्या ८९ वर्षांच्या होत्या. सुमन कल्याणपूर यांचा जन्म २८ जानेवारी १९३७ रोजी तत्कालिन भारताचा भाग असलेल्या आणि आताच्या बांग्लादेशातल्या भवानीपूर इथं झाला होता. १९४३ नंतर त्या मुंबईत स्थायिक झाल्या. साडे सातशे हून अधिक चित्रपटातून पार्श्वगायन केलेल्या पद्मभूषण सुमन कल्याणपूर यांच्या कारकिर्दीचा हा संक्षिप्त आढावा...

व्हॉईस कास्ट पॅकेज

केशवराव भोळे यांच्या कडून संगिताचे प्राथमिक धडे गिरवलेल्या सुमनताईंनी १९५२ साली आकाशवाणीवरून पहिल्यांदा जाहीरपणे गायन केलं, आणि तिथूनच त्यांचा सांगितिक प्रवास सुरू झाला. १९५३ साली शुक्राची चांदणी या मराठी तर ५४ साली मंगू या हिंदी चित्रपटातून पार्श्वगायन क्षेत्रात त्यांनी पदार्पण केलं. शेकडो हिंदी  चित्रपटांतून त्यांनी गायलेली गाणी मग ते दिल एक मंदिर है असो, आज कल तेरे मेरे प्यार के चर्चे असो, मेरा प्यार भी तू है असो की ना ना करते प्यार असो... ही आणि अशी कैक गाणी रसिकांच्या पसंतीस उतरली‌.

मराठी चित्रपट आणि भावगीत क्षेत्रात सुमनताईंचं योगदान अविस्मरणीय असंच आहे, नंदा घरी नंदनवन फुलले, शब्द शब्द जपून ठेव, केतकीच्या बनी, केशवा माधवा, मृदुल करांनी छेडीत तारा आणि जिथे सागरा धरणी मिळते.. अशी अनेक सुमधुर गाणी त्यांनी घराघरात फक्त पोहोचवलीच नाहीत, तर सर्वसामान्य कानसेनांच्या ओठावर रुळवलीत.

मराठी भावगीतांच्या सुवर्णयुगात मानाचं स्थान मिळवलेल्या सुमन ताईंनी पार्श्वगायनाचा प्रवास काही वर्षांपूर्वी थांबवला होता, मात्र जाहीर कार्यक्रमातून रसिकांच्या सानिध्यात असलेल्या सुमनताई काल कालनिद्रेच्या अधीन झाल्या.. त्यांची जी अंगाई ऐकत मराठी कुटुंबातल्या अनेक पिढ्या मोठ्या झाल्या, त्याच अंगाईच्या माध्यमातून सुमनताईंना आकाशवाणीची ही आदरांजली.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्यपाल जिष्णु देव वर्मा, सुनेत्रा पवार यांनी सुमन कल्याणपूर यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करत, त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

****

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त काल त्यांना सर्वत्र अभिवादन करण्यात आलं. राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी मुंबईत लोकभवन इथं अहिल्यादेवींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. अहिल्याबाईंचं जन्मस्थान, अहिल्यानगर जिल्ह्यातल्या चोंडी इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत अभिवादन सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यानंतर जयंती महोत्सवात बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी, अहिल्याबाईंच्या विचारांचा वारसा अंगीकारण्याची समाजाला गरज असल्याचं मत व्यक्त केलं. अहिल्यादेवींनी अनेक वैयक्तिक आघात सहन केले; मात्र त्यातून खचून न जाता आदर्श राज्यकारभाराचा वस्तुपाठ घालून दिला, त्यांनी समाजाच्या रक्षणासाठी आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित केलं, असं शिंदे म्हणाले.

****

छत्रपती संभाजीनगर इथं कोकणवाडी परिसरातल्या अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला विविध पक्ष संघटनांतर्फे अभिवादन करण्यात आलं. परभणी इथं निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांनी, तर जालना जिल्हाधिकारी कार्यालयात तहसीलदार अनिल नव्हाते, यांच्यासह इतर कर्मचार्यांनी अहिल्याबाईंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं.

धाराशिव इथल्या ‘अहिल्या सखी मंच’च्या वतीने विविध सामाजिक आणि सेवाभावी उपक्रमांनी अहिल्याबाईंची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. अहिल्यादेवींचं आजोळ असलेल्या चोराखळी इथल्या पापनाश मंदिरात अभिषेक, पूजन आणि आरती करून जयंती सप्ताहाची सुरुवात करण्यात आली.

****

नांदेडमध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाच्या डॉक्टर लेन शाखेतून ग्राहकांनी तारण ठेवलेलं तब्बल ८० तोळे सोनं, बँकेच्याच कर्मचार्यांनी लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मुख्य शाखा व्यवस्थापक राजीव कदम यांनी दिलेल्या तक्रारीवरून, बँक कॅश इन्चार्ज आदित्य सेनगावकर आणि सर्विस मॅनेजर जीवन जगदाळे या दोघांविरुद्ध वजीराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील सेनगावकर याला अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

****

लातूर महानगरपालिकेच्या आयुक्त मानसी मीना यांच्या निवासस्थानासमोर नालीचं काम सुरू असताना झाडांची तोड करण्यात आल्याच्या निषेधार्थ ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या वतीने काल अर्धनग्न अवस्थेत झाडाची अंत्ययात्रा काढत आंदोलन करण्यात आलं. संबंधित ठिकाणी योग्य ती कारवाई करून तातडीने नवीन झाडं लावण्यात येतील, असं आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आलं.

****

हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी काल भूगर्भातून आवाजासह भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. वसमत, कळमनुरी आणि औंढा तालुक्यातल्या २२ ते २५ गावात भूकंपाचा तीव्र धक्का जाणवला. भूकंप मापन केंद्रामध्ये त्याची तीव्रता तीन पूर्णांक पाच रिश्टर स्केल इतकी नोंदवली गेली. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखावी, असं आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केलं आहे.

****

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने सलग दुसऱ्यांदा आयपीएल क्रिकेट स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. काल झालेल्या अंतिम सामन्यात बंगळुरुच्या संघाने गुजरात टायटन्सचा पाच गडी राखून पराभव केला. नाबाद ७५ धावा करणारा विराट कोहली सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. राजस्थान रॉयल्सच्या वैभव सूर्यवंशीला प्लेयर ऑफ द सिरीज पुरस्कार देण्यात आला. या हंगामात २९ गडी घेणारा कागिसो रबाडा याला पर्पल कॅप मिळाली.

****

मराठवाड्यात अनेक भागात काल पूर्वमोसमी पाऊस झाला.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गंगापूर तालुक्यात वादळी वार्यासह गारपीट झाली. कन्नड तालुक्यात पिशोर इथं, तसंच पैठण तालुक्यात पाचोड, आडूळ, बालानगर परिसरातही वादळी वाऱ्यासह पाऊस पडला.

लातूर शहरासह जिल्ह्यातल्या विविध भागात काल मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. या पावसामुळे वातावरणातला उकाडा काही प्रमाणात कमी झाला असून शहरासह ग्रामीण भागातही गारवा निर्माण झाला आहे.

येत्या दोन दिवसात राज्याच्या चारही विभागांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.06.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 01 June 2026 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत...