Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 02
June 2026
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २ जून २०२६ दुपारी १.०० वा.
****
भारतात प्रतिभावान युवकांची उणीव नाही, असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे.
राष्ट्रपतींनी आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात, आदिवासी शिष्यवृत्ती मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला, त्यावेळी त्या बोलत होत्या. आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी
सरकार सातत्यानं प्रयत्न करत असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं.
****
सर्वोच्च न्यायालयात नव्यानं नियुक्त झालेल्या पाच न्यायमूर्तींचा
आज शपथविधी झाला. सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी नव्या न्यायमूर्तींना पदाची शपथ दिली.
यामध्ये न्यायमूर्ती शील नागू, श्री चंद्रशेखर, संजीव सचदेव आणि अरुण पल्ली तसंच वरिष्ठ अधिवक्ता व्ही.मोहना
यांचा समावेश आहे. सर्वोच्च न्यायालयातल्या न्यायमूर्तींची संख्या चौतीस वरून अडोतीस
पर्यंत वाढवण्याबाबतच्या प्रस्तावाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजुरी दिल्यानंतर
काही आठवड्यातच या नियुक्ती झाल्या आहेत.
****
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ – सीबीएसईने विद्यार्थ्यांसाठी
गुणांची पडताळणी आणि पुनर्मूल्यांकनासाठीचं पोर्टल सुरु केलं आहे. मंडळाने सामाजिक
माध्यमावरच्या संदेशात ही माहिती दिली. गुणांची पडताळणी आणि पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज
कसा करावा, याच्या सविस्तर सूचनांसाठी विद्यार्थ्यांनी
व्हिडिओ काळजीपूर्वक पहावा, असा सल्ला सीबीएसईने दिला आहे. येत्या सहा जून पर्यंत यासाठी
अर्ज करता येणार आहे.
****
देशाच्या सर्वांगीण विकासासाठी मातृभाषेतील शिक्षण, भारतीय भाषांचं संवर्धन आणि मूल्याधिष्ठित पत्रकारिता
यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी
केलं. मुंबई हिंदी पत्रकार संघाच्या वतीने आयोजित हिंदी पत्रकारितेच्या २०० व्या वर्षपूर्ती
सोहळ्यात ते काल बोलत होते. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यावेळी उपस्थित होते.
हिंदी पत्रकारितेचा इतिहास समृद्ध असून देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात जनजागृती घडवून
आणण्यामध्ये तिचं मोठं योगदान राहिलं असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. हिंदी पत्रकारितेसाठी
योगदान दिलेल्या वरिष्ठ पत्रकार गंगाधर ढोबळे, हेमंत तिवारी, कुमुद संघवी चावरे, विनीत कुमार सिंग, अवधेश व्यास यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
****
मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान मृत्यूमुखी पडलेल्या आंदोलकांच्या
वारसांना आता औद्योगिक विकास महामंडळ अर्थात एमआयडीसीतही अनुकंपा तत्वावर नोकरी दिली
जाणार आहे. त्यानुसार राज्यातल्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आपापल्या जिल्ह्यातल्या
मृत आंदोलकांच्या वारसांची तातडीने पडताळणी करून प्रमाणपत्र वितरीत करण्याचे आदेश सामान्य
प्रशासन विभागानं दिले आहेत. राज्य सरकारच्या वतीने
मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी अलीकडेच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या
उपोषणावेळी आंदोलकांच्या वारसांना एसटीप्रमाणे एमआयडीसीतही नोकरीचं आश्वासन दिलं होतं. त्यानुसार
आता प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे.
****
अहिल्यानगर जिल्ह्यात सुरु करण्यात येणाऱ्या ‘एकात्मिक दुग्धव्यवसाय विकास उपक्रम’चा शुभारंभ पशुसंवर्धन
मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते मंत्रालयात करण्यात आला. कृत्रिम बुद्धिमत्ता, मानवी संवेदना आणि पारंपरिक ज्ञानाच्या समन्वयातून राज्यातला
पशुपालन व्यवसाय भरभराटीला आणावा, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं कारगिल, सिजेंटा फाउंडेशन आणि डिजिटल ग्रीन यांचा हा संयुक्त उपक्रम
आपल्या ‘विकसित महाराष्ट्र’ आणि ‘विकसित भारत’ या संकल्पनेला गती देणारा
ठरेल, असं मुंडे यांनी सांगितलं. हा पथदर्शी
प्रकल्प संपूर्ण राज्यासाठी एक आदर्श मॉडेल ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
****
राज्य शासनाच्या स्वायत्त ‘अमृत’ संस्थेमार्फत राबवण्यात
येणाऱ्या अमृत पर्यटन उपक्रमांतर्गत पर्यटन क्षेत्राशी संबंधित उद्योजक, व्यावसायिक आणि नवउद्योजकांसाठी लातूर इथं आज कार्यशाळा
होत आहे. पर्यटन क्षेत्रातील वाढत्या संधींचा लाभ स्थानिक उद्योजकांना मिळावा, रोजगार निर्मितीला चालना मिळावी आणि पर्यटन व्यवसाय अधिक
सक्षम व्हावा, या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात
येत आहे.
****
महाराष्ट्र संशोधन, उन्नती आणि प्रशिक्षण प्रबोधिनी – अमृत च्या वतीने हिंगोली इथं
येत्या पाच आणि सहा तारखेला “अमृतपेठ थेट बाजारपेठ” या विशेष उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. स्थानिक उत्पादक, महिला बचत गट, ग्रामीण उद्योजक आणि स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहन देण्याच्या
उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात विविध प्रकारची दर्जेदार उत्पादने ग्राहकांना
थेट उत्पादकांकडून उपलब्ध होणार आहेत.
****
जपानमधल्या काकामिगाहारा इथं सुरु असलेल्या पुरुषांच्या
१८ वर्षांखालील अशिया चषक हॉकी स्पर्धेतल्या गट अ मधल्या तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाने काल कोरियावर चार – एक असा विजय
मिळवला. या विजयामुळे भारतीय संघानं अ गटात जपान आणि कोरियाच्या सहा गुणांची बरोबरी
केली आहे. गटातले पहिल्या दोन क्रमांकांचे संघ उपान्त्य फेरीत प्रवेश करतील. भारताचा
पुढचा सामना उद्या चिनी तैपेई संघाशी होणार आहे.
****
No comments:
Post a Comment