Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 02 June
2026
Time 11.00 to
11.05 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक
बातम्या
दिनांक २ जून
२०२६ सकाळी ११.०० वाजता
****
मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान मृत्यूमुखी पडलेल्या
आंदोलकांच्या वारसांना आता औद्योगिक विकास महामंडळ अर्थात एमआयडीसीतही अनुकंपा
तत्वावर नोकरी दिली जाणार आहे. त्यानुसार राज्यातल्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना
आपापल्या जिल्ह्यातल्या मृत आंदोलकांच्या वारसांची तातडीने पडताळणी करून
प्रमाणपत्र वितरीत करण्याचे आदेश सामान्य प्रशासन विभागन दिले आहेत. राज्य
सरकारच्या वतीने मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी अलीकडेच मराठा आंदोलक मनोज
जरांगे पाटील यांच्या उपोषणावेळी आंदोलकांच्या वारसाना एसटीप्रमाणे एमआयडीसीतही
नोकरीचं आश्वासन दिलं होतं. त्यानुसार आता प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे.
एमआयडीसीत अनुकंपा तत्वावरील नोकरी देण्यासाठी मृत आंदोलकांच्या वारसांची अचूक
पडताळणी केली जाणार आहे.
****
एलपीजी, पेट्रोल, डिझेलच्या विक्री आणि वितरणातली अनियमितता, काळाबाजार, आणि साठेबाजीविरुद्ध दक्षता वाढवण्याचं आवाहन केंद्र सरकारनं राज्यं आणि
केंद्रशासित प्रदेशांना केलं आहे. नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत पेट्रोलियम आणि
नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मा यांनी ही माहिती दिली. गेल्या
तीन दिवसात १ हजार ३०० ठिकाणी छापे टाकण्यात आले, तसंच
सात जणांना अटक केली असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
नीट युजी परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी दिल्ली
न्यायालयानं तीन आरोपींना येत्या १५ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
यातील लातूरचे डॉक्टर मनोज शिरुरे यांच्यावर तीन विद्यार्थ्यांना रसायशास्त्राचे
प्रश्न पुरवल्याचा तर पुण्यातील शिक्षिका मनिषा हवालदार यांनी अन्य एक आरोपी तेजस
शहा याला भौतिकशास्त्राचे प्रश्न पुरवल्याचा आरोप सीबीआयनं गुन्हा दाखल करताना
नोंदवला आहे.
****
गडचिरोली जिल्ह्यात अवैधरित्या डिझेलची वाहतूक करताना आष्टी
पोलिसांनी एका इसमाकडून १६०० लीटर डिझेलसह सुमारे साडेसात लाख रुपयांचा मुद्देमाल
जप्त केला. पोलिस गस्त घालत असताना एका विना क्रमांकाच्या ट्रॅक्टरमधून काही ड्रम
वाहून नेले जात असताना दिसले. त्या वाहनाची तपासणी केली असता हा साठा सापडला. या
प्रकरणी पोलिसांनी ट्रॅक्टरचालक किशोर बिस्वास याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला
आहे.
****
एसटी महामंडळातील बसचे अपघात टाळण्याच्या चालकांच्या
प्रयत्नांना प्रोत्साहन मिळावं या दृष्टीने २५ वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त
कालावधीत विना अपघात सेवा करणाऱ्या
चालकांचा काल बीड आगाराच्या वतीने सत्कार करण्यात आला. विभागीय नियंत्रक अनुजा
दुसाने यांच्या हस्ते चालकांना रोख बक्षीस देण्यात आलं.
****
पुणे जिल्ह्यातल्या भीषण विषारी दारूकांडाच्या
पार्श्वभूमीवर,
ठाणे राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्यातल्या अवैध
गावठी दारूची विक्री आणि निर्मिती करणाऱ्या अड्ड्यांविरुद्ध कारवाईची मोहीम सुरू
केली आहे. गेल्या दोन दिवसांत
केलेल्या धडक कारवाईत ५६ मद्य तस्करांवर कारवाई झाली. यामध्ये गावठी दारू, रसायन आणि वाहनांसह तब्बल ८६ लाख ८३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात
आला. कोकण विभागीय उपायुक्त प्रदीप पवार यांनी खाडीत उतरून आणि जेसीबीच्या
साहाय्याने अनेक हातभट्ट्या पूर्णपणे उद्ध्वस्त केल्याची माहिती आमच्या
वार्ताहराने दिली आहे.
****
सांगली जिल्ह्यातही राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत हाती
घेण्यात आलेल्या अवैध मद्य निर्मिती, विक्री आणि
वाहतुकीविरोधात विशेष मोहिमेंतर्गत जिल्ह्यात एकूण ४१ गुन्हे दाखल करण्यात आले
असून,
एकूण २९ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईदरम्यान एक
वाहन आणि इतर मुद्देमालासह एकूण पाच लाख ७१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात
आला.
****
जुन्या वाहनांवर एचएसआरपी नंबर प्लेट बसवण्यासाठी राज्य
शासनानं ३० जून २०२६ पर्यंत अंतिम मुदतवाढ दिली आहे. कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी
मुदतीपूर्वीच एचएसआरपी नंबर प्लेट बसवून घेण्याचं आवाहन लातूर प्रादेशिक परिवहन
कार्यालयानं केलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा
विद्यापीठाने परीक्षेसंबंधीच्या मानधनाची पुनर्रचना करत त्यात १५ टक्के वाढ
करण्याचा निर्णय घेतला आहे. या मानधन वाढीमुळे विद्यापीठाच्या तिजोरीवर वार्षिक
सुमारे दोन कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे. दरम्यान, तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांनी किमान ३५ टक्के वाढीची मागणी केली आहे.
****
राज्य शासनाच्या स्वायत्त ‘अमृत’ संस्थेमार्फत राबवण्यात
येणाऱ्या अमृत पर्यटन उपक्रमांतर्गत पर्यटन क्षेत्राशी संबंधित उद्योजक, व्यावसायिक आणि नवउद्योजकांसाठी लातूर इथं आज कार्यशाळा होत आहे. पर्यटन
क्षेत्रातील वाढत्या संधींचा लाभ स्थानिक उद्योजकांना मिळावा, रोजगार निर्मितीला चालना मिळावी आणि पर्यटन व्यवसाय अधिक सक्षम व्हावा, या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात येत आहे.
****
बुलढाणा जिल्ह्यात संग्रामपूर तालुक्यात काल वादळी वाऱ्यासह
जोरदार पाऊस झाला. यामुळे केळी बागा उध्वस्त झाल्या आहेत. संग्रामपूर
तालुक्यातल्या वरवट ते शेगाव आणि वरवट-जळगाव जामोद रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठी
झाडं उन्मळून पडल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.
****
No comments:
Post a Comment