Friday, 19 June 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 19.06.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 19 June 2026

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १९ जून २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजनेंतर्गत दोन हजार ४०० कोटी रुपयांच्या प्रोत्साहन निधीचं आज पंतप्रधानांच्या हस्ते वितरण

·      विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी मतदान, २२ जू रोजी मतमोजणी

·      शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या बैठकीला सहा खासदार अनुपस्थित, शिवसेनेत सामील होत असल्याचं पत्र लोकसभा अध्यक्षांना सादर

आणि

·      पुढील दोन दिवस मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट, काही ठिकाणी पावसाची शक्यता

****

पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजनेंतर्गत दोन हजार ४०० कोटी रुपयांच्या प्रोत्साहन निधीचं वितरण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. देशभरात २०० ठिकाणी, प्रामुख्यानं औद्योगिक आणि रोजगार केंद्र असलेल्या भागात हा कार्यक्रम होणार आहे. प्रथमच नोकरीवर रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी प्रोत्साहन देणं आणि संबंधित कर्मचाऱ्यांना रोजगार देणाऱ्या औद्योगिक संस्थांनाही प्रोत्साहनपर अनुदान देणं, अशा दोन भागात ही योजना राबवली जाणार आहे.

गेल्या वर्षी ऑगस्टपासून या योजनेअंतर्गत ६३ लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना औपचारिक रोजगार क्षेत्रात आणलं गेलं असून, त्यापैकी जवळपास ३० टक्के महिला असल्याचं, कामगार आणि रोजगार मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी सांगितलं. देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या लघु आणि उदयोन्मुख उद्योगांना आधार देण्यासोबतच रोजगार निर्मितीला चालना देण्यात या योजनेची भूमिका महत्त्वाची असल्याचं ते म्हणाले.

****

नागपूरजवळ अंबाझरी इथल्या आयुध कारखान्यात दहा हजार टनाच्या ॲल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेस या यंत्राची पायाभरणी आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते होणार आहे. देशाच्या संरक्षण सामग्री उत्पादनासाठी ही एक्सट्रुजन प्रेस अत्यंत महत्त्वाची मानली जाते. संरक्षण क्षेत्राच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणारं उच्च दर्जाचं ऍल्युमिनियम एक्सट्रुजन बनवण्याची क्षमता या एक्सट्रुजन प्रेसमुळे वाढणार असून यामुळे स्वदेशी उत्पादनाला चालना मिळेल, असं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे.

****

मुंबईतल्या राष्ट्रीय परीक्षण शाळा – एनटीएच परिसरातल्या बहुमजली निवासी प्रकल्पाची पायाभरणी आज केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते होणार आहे. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी निवासी पायाभूत सुविधा मजबूत करणं, आणि संस्थेची एकूण संस्थात्मक परिसंस्था अधिक सक्षम करणं, हे या प्रकल्पाचं उद्दिष्ट आहे. राष्ट्रीय परीक्षण शाळेने विकसित केलेल्या आधुनिक चाचणी सुविधांच्या तीन केंद्रांचं उद्घाटनही मंत्री जोशी यांच्या हस्ते दूरस्थ पद्धतीने होणार आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगरच्या ऑरिक सिटी मधल्या उप–चाचणी प्रयोगशाळा आणि नमुना संकलन केंद्राचा समावेश आहे.

****

राज्यात विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी काल मतदान पार पडलं. यात सोलापूर, जळगाव, सांगली- सातारा, नांदेड, भंडारा-गोंदिया, नाशिक, अमरावती, उस्मानाबाद-लातूर-बीड, परभणी-हिंगोली आणि औरंगाबाद-जालना या मतदारसंघांचा समावेश आहे. तर नागपूर मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीसाठीही काल मतदान झालं. मतमोजणी येत्या २२ तारखेला होणार आहे.

ठाणे, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, पुणे, यवतमाळ, वर्धा- गडचिरोली-चंद्रपूर आणि अहिल्यानगर या सहा जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.

**

औरंगाबाद-जालना मतदारसंघात सुमारे ९९ टक्के, परभणी-हिंगोली ९९ पूर्णांक ७९ टक्के, नांदेड ९९ पूर्णांक ७८ टक्के, तर उस्मानाबाद-लातूर-बीड मतदारसंघात ९९ पूर्णांक ४९ टक्के मतदान झालं.

**

दरम्यान, या मतदान प्रक्रियेत लातूर इथं वंचित बहुजन आघाडीच्या सर्व पाच नगरसेवकांनी मतदान केलं नाही. नांदेड आणि अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा दिला नसल्याचा आरोप करत, लातूर इथं काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान करणार नसल्याची भूमिका आघाडीने घेतली होती.

****

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने काल व्हीप जारी करत बोलवलेल्या पक्षाच्या बैठकीला सहा खासदार अनुपस्थित होते. या बैठकीला खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई आणि राजाभाऊ वाजे यांच्यासह पक्षाचे एकमेव राज्यसभा खासदार संजय राऊत उपस्थित होते. बैठकीला गैरहजर राहिलेल्या खासदारांमध्ये नागेश पाटील आष्टीकर, संजय देशमुख, संजय जाधव, संजय दिना पाटील, ओमप्रकाश राजे निंबाळकर आणि भाऊसाहेब वाकचौरे यांचा समावेश आहे. या सहाही खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातल्या शिवसेनेत सामील होत असल्याचं पत्र लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना सादर केलं. मात्र, ही प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसून, पडताळणीसाठी काही खासदारांनी प्रत्यक्ष उपस्थित राहणं आवश्यक आहे, असं लोकसभा अध्यक्षांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आलं.

****

पावसाच्या प्रत्येक थेंबाचं संवर्धन करून, दुष्काळाला हरवत जलसमृद्ध महाराष्ट्र घडवण्याचं आवाहन, मृद आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी केलं आहे. अल निनोमुळे यावर्षी राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून, उपलब्ध पाण्याचं योग्य नियोजन आणि संवर्धन करणं आवश्यक असल्याचं त्यांनी याबाबतच्या संदेशात नमूद केलं. मृद आणि जलसंधारण विभागाने राज्यभर मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामं हाती घेतली असून, निधीची कमतरता भासू देणार नाही असंही मंत्री राठोड यांनी आश्वासित केलं.

****

छत्रपती संभाजीनगरमध्ये गारखेडा इथली एक पूर्णांक १६ हेक्टर आर इतकी शासकीय जमीन औद्योगिक आणि कामगार न्यायालयाच्या नवीन इमारतीसाठी आणि न्यायिक अधिकाऱ्यांच्या निवासस्थानांच्या उभारणीसाठी मंजूर करण्यात आली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली. या निर्णयामुळे न्यायालयीन कामकाज अधिक सुलभ, कार्यक्षम आणि नागरिकाभिमुख होण्यास मदत मिळेल, असं बावनकुळे यांनी सांगितलं.

****

जागतिक योग दिनाच्या अनुषंगाने सध्या योग पंधरवडा पाळला जात आहे. या निमित्ताने दररोज एका आसनाची माहिती आपण घेत आहोत. योग अभ्यासक उमेश दरक यांनी दिलेली मकरासनाची माहिती आज आपण जाणून घेऊ.

बाईट – योग अभ्यासक उमेश दरक

****

अन्न आणि औषध प्रशासनाने बीड जिल्ह्यातल्या केज इथल्या 'विशाल डेअरी'वर काल धाड टाकून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बनावट पेढा तयार केला जात असल्याचं तपासात समोर आलं. हा पेढा बीड जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातल्या अनेक देवस्थानांमध्ये विक्री केला जात होता, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

****

जालना जिल्ह्यात संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत जिल्हास्तरीय पुरस्कार प्राप्त बदनापूर तालुक्यातल्या वरुडी आणि जालना तालुक्यातल्या सावरगाव या ग्रामपंचायतींची विभागस्तरीय तपासणी काल करण्यात आली. यात वैयक्तिक शौचालयांचा वापर, घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन, पाणीपुरवठा, शाळा आणि अंगणवाडी परिसरातली स्वच्छता, सार्वजनिक शौचालये, पाण्याची गुणवत्ता आणि पर्जन्य जलपुनर्भरण आदी बाबींची पाहणी करण्यात आली.

****

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने दर्शन व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. यात ५०० रुपये देणगी दर्शन, रेफरल देणगी दर्शन, २०० रुपये देणगी दर्शन तसंच धर्मदर्शन रांगेतल्या सर्व भाविकांना आता एकाच ठिकाणाहून, म्हणजेच सिंहाच्या गाभाऱ्यातून श्री तुळजाभवानी देवींचं दर्शन घेता येणार आहे. त्यामुळे सर्व भाविकांना समान अंतरावरून आणि समान पद्धतीने देवींचे दर्शन घेता येईल.

****

लातूर इथं जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी काल नीट युजी पुनर्परिक्षेच्या तयारीचा आढावा घेतला. या परिक्षेदरम्यान आवश्यक सुविधा परीक्षा केंद्रांवर उपलब्ध असल्याची खात्री करावी त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांची कोणतीही गैरसोय होणार नाही, यासाठी संबंधित सर्व यंत्रणांनी काळजीपूर्वक आणि समन्वयाने काम करावं, अशा सूचना त्यांनी दिल्या. जिल्ह्यात एकूण २६ केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे.

****

जालना जिल्ह्यात परतूर इथल्या किड्स वर्ल्ड इंग्लिश स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनात एका कथित आक्षेपार्ह व्हिडिओ प्रकरणी शाळेचे अध्यक्ष तथा मुख्याध्यापक, एक शिक्षक आणि एका शिक्षिकेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांच्या नृत्यावेळी आक्षेपार्ह घोषणांचा समावेश असलेलं तुर्कीमधलं एक गाणं वाजवण्यात आलं, तसंच नृत्य करताना पाकिस्तानी दहशतवादी मुमताज कादरीचा फोटो स्क्रीनवर दाखवण्यात आला. समाज माध्यमावर हा व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी चौकशी करुन ही कारवाई केली.

****

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची ई-केवायसी करून आयुष्मान कार्ड उपलब्ध करून देण्यासाठी धाराशिव जिल्ह्यात विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. २२ जून ते २१ जुलै या कालावधीत ही मोहिम राबवली जाणार आहे.

****

येत्या दोन दिवसात राज्याच्या चारही विभागांमध्ये तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट, आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 19.06.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 19 June 2026 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत...