Sunday, 14 June 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 14.06.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 14 June 2026

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १४ जून २०२ दुपारी १.०० वा.

****

युरोप दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत 'नीस' येथे 'इंडिया इनोव्हेट्स'चे उद्घाटन करतील. भारत-फ्रान्स नवोन्मेष वर्षाचा भाग म्हणून आयोजित या कार्यक्रमात, भारताची वेगाने वाढणारी प्रगती प्रदर्शित करण्यासाठी १२० हून अधिक भारतीय स्टार्टअप्स, जागतिक गुंतवणूकदार, तंत्रज्ञान क्षेत्रातील नेते आणि उद्योजक एकत्र येणार आहेत.

यानंतर, पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन भारत-फ्रान्स विशेष जागतिक सामरिक भागीदारीतील प्रगतीचा आढावा घेण्यासाठी आणि प्रमुख प्रादेशिक व जागतिक मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत.

****

आरोग्याशी निगडीत सेवा-सुविधा अधिक चांगल्या आणि परवडणाऱ्या करण्यासाठी अनेक उपाययोजना मागिल १२ वर्षात करण्यात आल्या आहेत, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. याबाबत समाजमाध्यमावर त्यांनी एक संदेश दिला आहे. आयुष्मान भारत योजनेद्वारे गरीब आणि गरजवंत नागरिकांना उपचाराची सुविधा मिळत असल्याचं त्यांनी नमूद केलं. जन औषधी केंद्रांवर स्वस्त औषधं, हृदयाचा स्टेंट, गुढघे प्रत्यारोपणाचे दर कमी करण्यासह वैद्यकीय महाविद्यालयांसह त्यातील जागा वाढवून डॉक्टरांची संख्या वाढवण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. स्वस्थ भारत निर्माणासाठी सरकार यापुढेही निरंतर काम करत राहणार असल्याचा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी आपल्या संदेशातून व्यक्त केला आहे.

दरम्यान, नुकत्याच प्रसिध्द झालेल्या एका अहवालानुसार वैश्विक औषध पुरवठ्यात भारताची अग्रणी भूमिका सिध्द झाली आहे. मागील वर्षात औषधनिर्माण क्षेत्रात चार पूर्णांक ७२ लाख कोटी रुपयांची उलाढाल भारतात झालेली आहे. भारत जगातील ७० टक्के अँटीरेट्रोव्हायरल अर्थात विषाणू संसर्गावरील उपचारांची औषधी, संयुक्य राष्ट्र संघटनेच्या युनिसेफ साठीच्या लसींच्या गरजेपैकी ५५ ते ६० टक्के लसी आणि जागतिक जेनेरिक औषधांचा सुमारे वीस टक्के पुरवठा भारताद्वारे होतो. भारतीय औषधे १९० हून अधिक देशांमध्ये पोहोचत आहेत.

****

लातूर जिल्ह्यात औसा तालुक्यात बुधोडा गावाजवळ तुळजापूर-नागपूर महामार्गावर कार आणि जीपची धडक होवून झालेल्या भीषण अपघातात एक जण ठार तर काही जण जखमी झाल्याचं वृत्त आहे. आज पहाटे ही दुर्घटना घडली. भरधाव वेगानं येणारी कार जीपला पाठीमागून आदळल्यानं एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य अपघातग्रस्त जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जखमींचा नेमका आकडा प्राप्त झालेला नाही. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

****

जालना जिल्ह्यात काल विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत करण्यात आलेल्या धडक कारवाईत १ कोटी रुपयांपेक्षा जास्त मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, संबंधित १६ आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीविरोधात जालना जिल्हा पोलीस प्रशासनानं अत्यंत आक्रमक पाऊल उचलून विशेष मोहीमेद्वारे वाळू माफियांवर कारवाई केली. या धडक मोहिमेत चंदनझिरा, घनसावंगी, मंठा, अंबड आणि तालुका जालना पोलीस ठाण्यांतर्गत ही कारवाई झाली. यात ११ वाहनं तसंच ५१५ ब्रास अवैध वाळू जप्त झाली आहे.

****

धर्म-परंपरांचा आदर राखत समाजसुधारणा करता येते, धर्म सोडल्याशिवाय प्रगती होऊ शकत नाही, असं म्हटलं जातं; मात्र धर्मातील योग्य सुधारणांद्वारेही समाजाची प्रगती साधता येते असं विधान परिषद उपसभापती-शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे यांनी म्हटलं आहे. पुणे जिल्ह्यात पुरंदर तालुक्यातील जेजुरीच्या खंडोबा देवस्थान इथं काल खंडोबाचं दर्शन घेतल्यावर वार्ताहरांशी संवाद साधतांना त्या बोलत होत्या. जेजुरीत पूर्वी अस्तित्वात असलेली मुरळी प्रथा बंद करण्यात मोठ्या प्रमाणात यश आल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं.

याठिकाणी भंडाऱ्यासाठी सेंद्रिय हळदीचा वापर वाढवून देवस्थाननं भाविकांना ती मोफत उपलब्ध करून देता येईल का, याबाबत पुढाकार घेण्याचं सूचित केलं. राज्य सरकारच्या सेंद्रिय हळद संशोधन केंद्राच्या माध्यमातून शुद्ध हळद उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न करता येतील, असही त्यांनी सांगितले. जेजुरीच्या विकासाला चालना देण्यासाठी वाराणसी प्रमाणेच विशेष मार्गिकेची आवश्यकता असल्याचं त्यांनी नमूद केलं.

****

महिला क्रिकेटमधील विश्वचषकाला गवसणी घालण्याच्या उद्दिष्टाने मैदानावर उतरत असलेला भारतीय महिला क्रिकेट संघ आज आपला पहिला सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरोधात खेळणार आहे. आयसीसी टी-ट्वेंटी विश्वचषकात इंग्लंडच्या बर्मिंगहॅम इथं भारतीय वेळेनुसार सायंकाळी सात वाजता हा सामना सुरू होईल.

****

आज जागतिक रक्तदाता दिवस साजरा होत आहे. मानवतेचा एक थेंब: रक्तदान करा जिवन वाचवा, अशा आथयाचा विचार यंदा रक्तदानाबद्दल मांडण्यात आला आहे.

यानिमित्तानं नागरिकांनी स्वत:हून रक्तदान करावं, असं आवाहन केंद्रीय आरोग्य मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी केलं आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 15.06.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र.

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 15 June 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपत...