Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 24 June
2026
Time 7.10
AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २४ जून २०२६ सकाळी ७.१० मि.
****
·
राष्ट्रपतींच्या हस्ते दुसऱ्या टप्प्यातले पद्म पुरस्कार प्रदान, राज्यातल्या सात मान्यवरांचा गौरव
·
राज्यातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थविरोधी कृती दलाची स्थापना
करण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन
·
एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ तसंच वार्षिक वेतनवाढीचा दर तीन टक्के
करण्याची परिवहनमंत्र्यांची घोषणा
·
छत्रपती संभाजीनगर इथल्या रुग्णालयाच्या कार्यान्वयनासाठी १० कोटी रुपयांचा
निधी तातडीनं उपलब्ध करून देण्याचं सरकारचं आश्वासन
आणि
·
राज्यात मान्सून सक्रिय; मुंबई,
पुण्यासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत पावसाचं आगमन
****
राष्ट्रपती द्रौपदी
मुर्मू यांच्या हस्ते काल राष्ट्रपती भवनात झालेल्या सोहळ्यात दुसऱ्या टप्प्यातील पद्म
पुरस्कार प्रदान करण्यात आले. टेनिसपटू विजय अमृतराज, अभिनेता मामुटी, पार्श्वगायिका अलका याज्ञिक
आणि क्रिकेटपटू रोहित शर्मा यांसह ६५ मान्यवरांना पद्म पुरस्कारानं सन्मानित करण्यात
आलं. या वर्षी केंद्र सरकारनं एकूण १३१ पद्म पुरस्कारांची घोषणा केली असून,
यात ५ पद्मविभूषण, १३ पद्मभूषण आणि ११३ पद्मश्री
पुरस्कारांचा समावेश आहे. काल झालेल्या सोहळ्यात राज्यातील सात जणांना पद्म पुरस्काराने
गौरवण्यत आले.
****
शेतकऱ्यांचा थेट
सहभाग वाढवण्यासाठी खरेदी प्रक्रियेत मध्यस्थांची भूमिका संपवावी लागेल, असं आवाहन केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी केलं.
काल नवी दिल्लीत अटल अक्षय उर्जा भवनात नाफेडच्या लिलाव पोर्टलचं उद्घाटन करण्यात आलं,
त्यावेळी ते बोलत होते. किमान आधारभूत किमतीचा संपूर्ण लाभ शेतकऱ्यांपर्यंत
पोहोचावा यासाठी कडधान्यं आणि तेलबियांची खरेदी अधिकाधिक प्रमाणात शेतकऱ्यांकडूनच केली
जावी, असंही ते यावेळी म्हणाले. २०१४ मध्ये बंद होण्याच्या उंबरठ्यावर
असलेल्या नाफेडने व्यापक सुधारणा आणि पारदर्शक कार्यपद्धतीच्या बळावर आज ३० हजार कोटी
रुपयांची उलाढाल आणि ५०० कोटी रुपयांचा नफा मिळवला आहे, असं अमित
शाह यावेळी म्हणाले.
****
केंद्रीय कृषी आणि
शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी काल नवी दिल्ली इथं एल निनोच्या संभाव्य
परिणामांच्या पार्श्वभूमीवर हवामान बदल आणि त्याचा शेतीवर पडणारा प्रभाव यासंदर्भात
आढावा बैठक घेतली. या बैठकीला विविध राज्यांचे कृषीमंत्री, सचिव, जिल्हाधिकारी तसंच संबंधित अधिकारी
उपस्थित होते. यंदा कमी पावसाची शक्यता लक्षात घेऊन आवश्यक तयारी, पर्यायी पीक नियोजन आणि शेतकऱ्यांच्या हिताचं संरक्षण याबाबत बैठकीत चर्चा
झाली.
****
अंमली पदार्थांची
विक्री, तस्करी आणि सेवन रोखण्यासाठी राज्य
शासनाकडून व्यापक मोहीम राबविण्यात येत आहे. अंमली पदार्थ व्यापार आणि सेवनाचे समूळ
उच्चाटन करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात अंमली पदार्थविरोधी कार्यवाहीसाठी
स्वतंत्र युनिट उभारण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी
काल विधानसभेत दिली.
डॉ. मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस
****
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे
एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ५३ टक्क्यावरून ५८ टक्के करायचा निर्णय घेतल्याची
घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काल विधानपरिषदेत केली. या कर्मचाऱ्यांचा
घरभाडे भत्ता आणि वार्षिक वेतनवाढीच्या दरातही वाढ करत असल्याची घोषणा सरनाईक यांनी
केली. महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वार्षिक दरवाढीसह
सर्व मिळून प्रलंबित असलेली सुमारे ५ हजार ६४९ कोटी रुपयांची रक्कम लवकर अदा करण्यासाठी
सरकार प्रयत्नशील असेल, असं आश्वासन सरनाईक यांनी दिलं. २९ जून
रोजी एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेलं धरणं आंदोलन मागे घेतल्याची माहिती सरनाईक यांनी
दिली.
****
राज्यात दूध आणि
दुग्धजन्य पदार्थांमध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी दूधभेसळ अधिनियम तयार करायचं काम
सुरू आहे. त्यात भेसळीच्या गंभीरतेनुसार ६ महिने ते आजन्म तुरुंगवास आणि १० लाख रुपयांच्या
दंडाची तरतूद प्रस्तावित आहे, अशी माहिती
अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी काल विधानपरिषदेत लेखी उत्तराद्वारे
दिली. मिलिंद नार्वेकर यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता.
****
प्रधानमंत्री पिक
विमा योजनेसाठी परभणी जिल्ह्यात ५ लाख ७३ हजार ३०२ शेतकऱ्यांनी विमा अर्ज दाखल केले
असून, ३ लख ८४ हजार ७२५ हेक्टर क्षेत्रावरील
विमा उतरवण्यात आला आहे. सोयाबीन पिकासाठी १२४ कोटी रुपयांची विमा रक्कम मंजूर झाली
असून त्यापैकी १२३ कोटी रुपये वितरीत करण्यात आले आहेत. रब्बी हंगामात जिल्ह्यातील
१ लाख ९३ हजार ३२० शेतकऱ्यांनी विमा अर्ज दाखल केले असून १ लाख ४१ हजार ५०१ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचा विमा उतरविण्यात
आला असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दौलत चव्हाण यांनी दिली.
****
पुढील ४२ महिन्यांत
विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात ताडोबाच्या धर्तीवर व्याघ्र प्रकल्प, तर कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि खानदेशातील प्रत्येक जिल्ह्यात बिबट सफारी विकसित करण्यात येणार
असल्याची माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी विधानसभेत दिली.
****
छत्रपती संभाजीनगर
इथं स्मार्ट सिटी अंतर्गत उभारण्यात आलेल्या रुग्णालयाच्या कार्यान्वयनासाठी १० कोटी
रुपयांचा निधी तातडीनं उपलब्ध करून देण्यात येईल, असं मंत्री उदय सामंत यांनी काल विधानपरिषदेत सांगितलं. छत्रपती संभाजीनगर
स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि महानगरपालिका
यांच्या संयुक्त सहभागातून ९०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यातून
अत्याधुनिक रुग्णालयाची उभारणी करण्यात आली आहे. रुग्णालयातील वैद्यकीय उपकरणं,
मनुष्यबळाची नेमणूक आणि इतर कामांसाठी १० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध
करून देण्याबाबत राज्य शासनाकडून महानगरपालिकेला तातडीचे निर्देश दिले जातील,
असं सामंत म्हणाले.
****
शेतकऱ्यांना फसवी
कर्जमाफी न देता संपूर्ण कर्जमाफी तत्काळ घोषित करावी या आणि इतर मागण्यांसाठी काँग्रेसनं
काल नांदेडमध्ये आसूड मोर्चा काढला होता. शेतकऱ्यांना दर्जेदार खत आणि बियाणे उपलब्ध
करून द्यावे, महिलांवरील अत्याचार रोखावे,
गॅस सिलेंडर, पेट्रोल, डिझेलच्या
किंमती कमी कराव्यात, बेरोजगार युवकांना रोजगार द्यावा,
नीटसह इतर परीक्षांची विश्वासार्हता वाढवावी, अशा
मागण्या या मोर्चात करण्यात आल्या.
दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अर्धापूर तालुक्यातील
एका आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या घरी भेट देऊन कुटुंबीयांचं सांत्वन केलं.
****
राज्यातील सुमारे
५० ते ५५ लाख एकल महिलांच्या सन्मान, सुरक्षा आणि सक्षमीकरणासाठी स्वतंत्र आणि व्यापक धोरण राबविण्याचा निर्णय सरकारनं
घेतला आहे, अशी माहिती महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे
यांनी दिली. मुंबईत ‘एकल महिला दिन’ तसेच प्रस्तावित ‘एकल महिला धोरण’ यानिमित्त आयोजित
जिल्हास्तरीय कार्यशाळेत त्या बोलत होत्या. यावेळी मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते
तसेच जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या उपस्थितीत महिला आणि बाल विकास विभागाच्या विविध
योजनांची माहिती देणाऱ्या क्यूआर कोडचे अनावरण करण्यात आलं.
उदगीर नगरपरिषदेनंही
काल एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. एकल महिलांना उपेक्षित ठेवण्याऐवजी त्यांना
सन्मान आणि संधी देणे गरजेचं आहे. महात्मा फुले यांनी १९ व्या शतकात याची सुरुवात केली, असं प्रतिपादन मराठवाडा साहित्य परिषदेच्या उदगीर शाखेचे अध्यक्ष
धनंजय गुडसूरकर यांनी या कार्यक्रमात बोलताना केलं.
****
छत्रपती संभाजीनगर
जिल्ह्यात १६ जून ते ३१ जुलै या कालावधीत अतिसार थांबवा हे अभियान राबवण्यात येत आहे.
यासाठी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी पुढाकार घेऊन आपला परिसर स्वच्छ ठेवावा, असं आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू
पी. एम यांनी केलं आहे. या अभियानात जिल्ह्यातील शाळा, अंगणवाडी,
प्राथमिक आरोग्य केंद्रातील पाण्याची एफटीके द्वारे तपासणी करण्यात येणार
आहे. जिल्हा परिषदेच्या माता बालसंगोपन विभागाचे अधिकारी डॉ. विशाल बेंद्रे यांनी यासंदर्भात
माहिती दिली.
बाईट - डॉ. विशाल
बेंद्रे
डॉ. विशाल बेंद्रे
यांनी यासंदर्भात दिलेली सविस्तर माहिती आमच्या प्रासंगिक या साप्ताहिक सदरात आज १०
वाजून ४५ मिनिटांनी ऐकता येईल.
****
छत्रपती संभाजीनगर
इथल्या मोटार वाहन परिवहन कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा १६ जूनपासून विविध मागण्यांसाठी
बेमुदत संप सुरु आहे. या संपामुळं नवीन वाहन नोंदणी, टॅक्स, फिटनेस ही कामं ठप्प झाली आहेत.
****
हवामान
राज्यात काल मान्सूनची
मुंबई, विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये आगेकूच
पाहायला मिळाली. मुंबई, ठाणे, पुणे,
कोल्हापूर आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत पावसानं दमदार हजेरी लावली.
छत्रपती संभाजीनगर शहर आणि परिसरात जांगला पाऊस झाला. जालना आणि धाराशिव शहरासह जिल्ह्यात
बहुतांश भागात गेल्या दोन तासांपासून मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरु आहे.
नांदेड जिल्ह्यात
किनवट तालुक्यातील चिखली इथं वीज अंगावर पडून १५ वर्षीय शाळकरी मुलाचा मृत्यु झाला
तर मुखेड तालुक्यात वीज कोसळून पशुधन दगावल्याचं वृत्त आहे.
आजपासून मराठवाड्यात
विविध भागांत वादळी वारा आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.
****
No comments:
Post a Comment