Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 18 June
2026
Time 11.00 to
11.05 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक
बातम्या
दिनांक १८ जून
२०२६ सकाळी ११.०० वाजता
****
विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य
संस्थांच्या निवडणुकीसाठी राज्यात मतदानाला
प्रारंभ झाला आहे. सकाळी आठ ते दुपारी चार या वेळेत हे मतदान होत आहे. नाशिक जिल्ह्यातील
नऊ केंद्रांवर मतदानप्रक्रिया सुरु आहे. या
नऊ केंद्रांवर ६१९ मतदार मतदानाचा हक्क बजावतील. महायुतीच्या वतीने शिवसेना एकनाथ शिंदे
गटाचे नरेंद्र दराडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर, महाविकास आघाडीच्या वतीने कोणताही उमेदवार देण्यात आलेला नसला तरीही खबरदारी
म्हणून महायुतीच्या नगरसेवकांना गेल्या तीन दिवसांपासून भिवंडी इथल्या एका हॉटेलमध्ये
ठेवण्यात आलं होतं. आज दुपारी ते मतदानासाठी परत येणार आहेत.
****
मराठवाड्यात बीड, लातूर तसंच परभणी, धाराशिव स्थानिक
स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेलाही सकाळी सुरुवात झाली. बीड जिल्ह्यात
११ मतदान केंद्राच्या माध्यमातून मतदान प्रक्रिया पार पडत आहे. दरम्यान, परभणी इथं विधान परिषद निवडणूक निरीक्षक
रुपेश जयवंशी यांनी मतदान केंद्रावर भेट देऊन पूर्ण पाहणी केली.
****
भंडारा-गोंदिया विधान परिषदेसाठी
सकाळी ८ वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली. या निवडणुकीत एकूण ४५७ मतदार मतदानाचा हक्क बजावतील. निवडणुकीसाठी
भंडारा जिल्ह्यात दोन आणि गोंदिया जिल्ह्यात दोन अशी एकूण चार मतदान केंद्रे स्थापन
करण्यात आली आहेत.
****
सोलापूर जिल्ह्यातल्या विविध
तालुक्यात सहा ठिकाणी मतदान प्रक्रिया सकाळपासून सुरळीत सुरू आहे. मतदान केंद्रावर
कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी चोख पोलिस बंदोबस्त
तसंच मतदान केंद्रावर सीसीटीव्हीची व्यवस्था करण्यात आली आहे. या निवडणुकीची मतमोजणी
येत्या सोमवारी २२ तारखेला होणार आहे. या निवडणुकीत भाजप महायुतीकडून राजेंद्र राऊत
तर राष्ट्रवादी महाविकास आघाडीकडून वसंतराव देशमुख निवडणूक रिंगणात आहेत. सातारा-सांगली
विधान परिषद मतदारसंघ निवडणुकीसाठी सकाळी पावणे दहा वाजेपर्यंत केवळ २७ मतदारांनी मतदान
केलं असून मतदानाची टक्केवारी ३ पूर्णांक २ इतकी आहे.
****
देशात सर्वात जास्त सीएसआर
अर्थात सामाजिक उत्तरदायित्व निधी मिळवणारं महाराष्ट्र राज्य आहे. या निधीच्या योग्य
विनियोगासाठी राज्य सीएसआर कक्षाची निर्मिती करून त्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य
संस्थांना देता येण्यासारख्या निधीचा विनियोग करावा, असे निर्देश
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत सहाव्या वित्त आयोगासंदर्भातल्या सादरीकरण
बैठकीत दिले. केंद्र शासनाच्या बिनव्याजी कर्ज योजनेच्या धर्तीवर स्थानिक स्वराज्य
संस्थांसाठी बिनव्याजी कर्जाची योजना तयार करावी आणि त्यातून विकास कामांसाठी अशा स्वरुपाचं
कर्ज उपलब्ध करून देण्याबाबत पडताळणी करावी असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. या
बैठकीत सहाव्या वित्त आयोगाच्या ४२ शिफारशींवर विस्तृत चर्चा झाली. या शिफारसी सहा भागांमध्ये विभागलेल्या
असून यात संस्थात्मक सुधारणा, स्वतःचे उत्पन्नाचे स्त्रोत
निर्माण करणं, कर मूल्यांकन आणि नियंत्रण, राज्याचं निधी वितरण, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये
निधीचं हस्तांतरण, वित्त आयोगाचं बळकटीकरण याचा समावेश आहे.
****
राज्यातील आकाशवाणीची यंत्रणा
अधिक बळकट करण्याचा विचार असून आकाशवाणीचं कोणतंही केंद्र बंद केलं जाणार नाही, असं आश्वासन केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल पुण्यात
केंद्रीय राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांना दिलं. मोहोळ यांनी यासंदर्भात
एक निवेदन मंत्री वैष्णव यांना दिलं होतं.
****
येत्या २१ जून रोजी साजऱ्या
होणाऱ्या १२ व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्तानं छत्रपती संभाजीनगर शहरात भारतीय
योग संस्थानच्या वतीने उद्या १९ तारखेला योगदिंडीचं आयोजन करण्यात आलं आहे. शहरातील
शिवाजीनगर परिसरात सकाळी सहा ते आठ या वेळेत ही योगदिंडी होईल तर रविवारी २१ तारखेला
शहरातील सिडको एन-८ इथल्या बोटॅनिकल गार्डन इथं सकाळी पावणेसहा ते सात या वेळेत योगदिन
साजरा होईल. या दोन्ही कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचं आवाहन भारतीय योग संस्थानचे
राज्याचे उपाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर उत्तम काळवणे यांनी केलं आहे.
****
फिफा विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडने
क्रोएशियाचा ४-२ असा पराभव करून ग्रुप 'एल' मधील आपल्या मोहिमेची धडाकेबाज सुरुवात केली आहे, तर याच ग्रुपमधील
दुसऱ्या सामन्यात घानाने पनामावर मात केली. दरम्यान, अर्जेंटिनाने
अल्जीरियाचा ३-० असा पराभव करत जोरदार सुरुवात केली. या सामन्यात स्टार खेळाडू लिओनेल
मेस्सीने ऐतिहासिक हॅटट्रिक नोंदवत विश्वचषकात सर्वाधिक १६ गोल करण्याच्या मिरोस्लाव
क्लोजच्या विक्रमाशी बरोबरी केली असून, तो विश्वचषकात हॅटट्रिक करणारा
सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे. दुसरीकडे, ग्रुप 'के' मध्ये पोर्तुगाल आणि काँगो यांच्यातील सामना १-१ असा
बरोबरीत सुटला. ऑस्ट्रियाने जॉर्डनचा ३-१ असा पराभव केला, तर नॉर्वेने इराकवर ४-१ ने मात केली.
****
No comments:
Post a Comment