Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 15 June
2026
Time 11.00 to
11.05 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक
बातम्या
दिनांक १५ जून
२०२६ सकाळी ११.०० वाजता
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या परदेश दौऱ्याच्या दुसऱ्या
टप्प्यात स्लोव्हाकियाची राजधानी ब्रातिस्लावा इथं पोहोचले. स्लोव्हाकियाला भेट देणारे
ते पहिले भारतीय पंतप्रधान आहेत. ब्रातिस्लावा इथं दाखल होताच मोदी यांचं उत्साहात
स्वागत करण्यात आलं. स्लोव्हाकियाचे परराष्ट्र मंत्री जुराज ब्लानार यांनी त्यांचं
पारंपरिक स्लोव्हाक पद्धतीने स्वागत केलं. भारतीय वंशाच्या नागरिकांकडूनही मोदी यांचं
स्वागत करण्यात आलं, तसंच स्लोव्हाक संगीतकारांकडून 'वंदे मातरम्' आणि वैदिक मंत्रांचं
सादरीकरण आणि पारंपरिक स्लोव्हाक लोकनृत्य आणि सांस्कृतिक कार्यक्रम यावेळी सादर करण्यात
आले. पंतप्रधान मोदी आज स्लोव्हाकियाचे पंतप्रधान आणि राष्ट्राध्यक्षांशी महत्त्वपूर्ण
मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत.
****
सोलापूर जिल्ह्यात काल भाविकांना घेऊन जाणारी गाडी विहिरीत
कोसळून झालेल्या अपघाताबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. या
अपघातातल्या मृतांच्या वारसांना प्रत्येकी दोन लाख रुपये, तर जखमींना प्रत्येकी ५०
हजार रुपये मदत पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून देण्याची घोषणा, त्यांनी समाज माध्यमावरच्या
संदेशात केली. माळशिरस तालुक्यात तांदूळवाडी गावाजवळ झालेल्या या अपघातात आठ जणांचा
मृत्यू झाला, तर सात जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आलं.
****
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर आयुष मंत्रालयाच्या
अधिकृत यूट्यूब वाहिनीवर काल योग प्रात्यक्षिकांचं थेट प्रसारण करण्यात आलं. या प्रक्षेपणाद्वारे
मंत्रालयानं सर्वाधिक प्रेक्षक संख्येचा नवा गिनीज विश्वविक्रम नोंदवला. या विशेष जागतिक
ऑनलाइन योग सत्रात चार लाख ३५ हजार ८३१ नागरिक सहभागी झाले होते. सहभागी झालेल्या जगभरातल्या
नागरिकांचं आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी अभिनंदन केलं.
****
खरीप हंगाम २०२६ साठी राज्य शासनाच्या विविध योजनांअंतर्गत
शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदानावर बियाणे संच उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यासाठी
महाडीबीटी प्रणालीवर अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, पात्र शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ
घ्यावा, असं आवाहन कृषी विभागानं केल आहे. यंदाचं वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी
वर्ष म्हणून साजरं करण्यात येत असल्याने या योजनेत महिला शेतकऱ्यांना विशेष प्राधान्य
देण्यात आलं असून, किमान ३० टक्के लाभ महिला लाभार्थ्यांना देण्याच नियोजन आहे. योजनेसंदर्भात
अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी सहाय्यक कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी किंवा तालुका
कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असं आवाहन कृषी विभागान केल आहे.
****
उन्हाळी सुट्टीनंतर राज्यातल्या शाळा आजपासून सुरु झाल्या. केवळ विदर्भात उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर
शाळा येत्या २२ तारखेपासून सुरु होणार आहेत.
नव्या शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांचं उत्साहात स्वागत करण्यासाठी
शाळांनी विशेष तयारी केली आहे.
****
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या पदव्यूत्तर
विभाग आणि संलग्नित महाविद्यालयं देखील उन्हाळी सुट्टीनंतर आजपासून सुरु झाली. बारावी
आणि पदवी अभ्यासक्रमांचे निकाल लागल्यामुळे प्रवेश प्रक्रियेला गती मिळणार आहे.
****
‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’या मोहिमेत प्रत्येक नागरिकाने राज्य
शासनासोबत एकत्र येऊन काम करण्याचं आवाहन मृद आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी
केलं आहे. या मोहिमेच्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते. मृद आणि जलसंधारण विभाग गेल्या
काही वर्षांपासून राज्यभर भरीव काम करत आहे. सध्या आम्ही ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ही महत्त्वाकांक्षी मोहीम हाती घेतली
असल्याची माहिती राठोड यांनी दिली. प्रत्येक गावाने, प्रत्येक शेतकऱ्याने या मोहिमेत
सहभाग घ्यावा, पर्यावरण वाचवायचे असेल, शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद आणायचा असेल, तर
जलसंधारणाशिवाय पर्याय नाही, असं मंत्री राठोड यावेळी म्हणाले.
****
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीनं काल गो. ब.
देवल स्मृतिदिन पुरस्कार आणि जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले. ज्येष्ठ अभिनेते
दिलीप प्रभावळकर आणि ज्येष्ठ अभिनेत्री स्वाती चिटणीस यांना सांस्कृतिक कार्यमंत्री
आशिष शेलार यांच्या उपस्थितीत जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. नाट्यपरिषदेच्या
नाट्यकला अकादमीला राज्यसरकार सर्वतोपरी मदत करेल असं आश्वासन शेलार यांनी यावेळी दिलं.
समारंभात इतरही नाट्यविषयक पुरस्काराचं वितरण करण्यात आलं.
****
ठाणे जिल्ह्यात अंबरनाथ तालुक्यात उसाटणे परिसरात अवैधरित्या
साठवून ठेवलेल्या ‘मिक्स हायड्रोकार्बन ऑईल’च्या मोठ्या साठ्यावर राज्य दक्षता पथकाने काल कारवाई
केली. यावेळी सुमारे एक कोटी २० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पथकाने घटनास्थळी
तपासणी केली असता एका टँकरमध्ये सुमारे २९ हजार ७०० किलो मिक्स हायड्रोकार्बन ऑईल असल्याचं
निदर्शनास आलं, तर दुसर्या टँकरमध्ये इलेक्ट्रिक मोटारीच्या सहाय्याने इंधन साठवण्याचं
काम सुरू होतं. याशिवाय एका टेम्पोमध्ये २०० लिटर क्षमतेच्या प्लास्टिक बॅरलमध्ये तेलाची
बेकायदेशीर साठवणूक सुरू होती. या वाहनात २२० लिटर क्षमतेचे २० रिकामे प्लास्टिक बॅरल्स
देखील आढळून आले. याप्रकरणी गुन्हा दाखल प्रक्रिया सुरु आहे.
****
No comments:
Post a Comment