Tuesday, 9 June 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 09.06.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 09 June 2026

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक जून २०२ सकाळी.०० वाजता

****

केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला १२ वर्ष पूर्ण झाली. २०२४ मध्ये आजच्याच दिवशी नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. गेल्या १२ वर्षांत सुशासन, सर्वसमावेशक विकास, डिजिटल परिवर्तन, पायाभूत सुविधांचा विस्तार, राष्ट्रीय सुरक्षा आणि जनकल्याणकारी योजनांद्वारे भारताने विकासाची नवी उंची गाठली आहे. विकसित भारत २०४७ च्या संकल्पनेच्या दिशेने देशाची वाटचाल अधिक वेगाने सुरू आहे.

गेल्या १२ वर्षांत पंतप्रधानांच्या दूरदर्शी नेतृत्वाने "सेवा हीच साधना" या भावनेतून सुशासनाची नवी व्याख्या घडवली आणि विकासाचा लाभ समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवला, असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे.

****

दरम्यान, गेल्या १२ वर्षांत देशातील युवा, महिला आणि शेतकरी यांना सक्षम करण्यासाठी सरकारने कोणतीही कसर सोडलेली नसल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. १४० कोटी नागरिकांचे आशीर्वाद आणि 'राष्ट्र प्रथम' ही भावना घेऊन सरकार विश्वास, विकास आणि जनहित यासाठी समर्पित असल्याचं, त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात नमूद केलं. 'विकसित भारत'चा संकल्प पूर्ण करण्यासाठी सरकार सेवा, सुशासन आणि समृद्धीच्या या मार्गावर अविरतपणे पुढे जात राहील, असं त्यांनी अधोरेखित केले.

****

प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाला आज दहा वर्षे पूर्ण होत आहेत. या महत्त्वपूर्ण टप्प्यानिमित्त आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे "१० वर्षे – एक दशकाची काळजी" हा राष्ट्रीय कार्यक्रम आजपासून सुरू होत आहे. सुरक्षित गर्भावस्था आणि निरोगी मातृत्व सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमाचं उद्घाटन केंद्रीय आरोग्यमंत्री जगत प्रकाश नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या योजनेअंतर्गत गर्भवती महिलांना मोफत आणि गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा उपलब्ध करून दिल्या जातात. या सेवांचा लाभ अधिकाधिक महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. तसंच, वेळेवर प्रसूतीपूर्व तपासणीचं महत्त्व जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी व्यापक जनजागृती केली जाणार आहे.

****

देशभरातल्या शंभर औद्योगिक पार्कचा विकास करण्यासाठी वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी काल भव्य पोर्टलचं उद्घाटन केलं. कामगारस्नेही पायाभूत सुविधा, विश्वसनीय प्रणाली, डिजिटल प्रशासन यंत्रणा असणारी एकात्मिक औद्योगिक परिसंस्था तयार करणं हे या पोर्टलचं उद्दिष्ट असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. गुंतवणूकस्नेही औद्योगिक पायाभूत सुविधा तयार करून भारताच्या उत्पादन परिसंस्थेला बळकट करण्यासाठी हा उपक्रम उपयोगी आहे, असं त्यांनी नमूद केलं. भव्य पोर्टलच्या खर्चासाठी सरकारने ३३ हजार ६६० कोटी रुपये मंजूर केले आहेत.

****

सजग, संवेदनशील आणि जबाबदार नागरिक घडवण्यासाठी मूल्याधारित शिक्षण ही काळाची गरज असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुंबईत मूल्यवर्धन कार्यक्रमाच्या परिणामकारकतेचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते काल बोलत होते. शिक्षण क्षेत्रात केवळ अभ्यासक्रम महत्त्वाचा नसून, शिक्षकांची अध्यापन पद्धती, विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची क्षमता आणि त्यांच्यात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्याची भूमिका अधिक महत्त्वाची असल्याचं ते म्हणाले. मूल्यवर्धन कार्यक्रमांतर्गत शिक्षकांना दिलं जाणारं प्रशिक्षण विद्यार्थ्यांमधील भीती, संकोच आणि शंका दूर करण्यास मदत करत असून, ज्ञानार्जनाची प्रक्रिया अधिक प्रभावी बनवत आहे. त्यामुळे या कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्याची अधिक व्यापक आणि प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

****

किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत पणन हंगाम २०२५२६ साठी महाराष्ट्राच्या धान खरेदी उद्दिष्टात केंद्र शासनाने अतिरिक्त साडे २९ लाख क्विंटल वाढ मंजूर केली आहे. यापूर्वी मंजूर झालेल्या साडे ५९ लाख क्विंटल उद्दिष्टासह आता महाराष्ट्राचं एकूण धान खरेदी उद्दिष्ट ८९ लाख क्विंटलवर पोहोचलं आहे. दरम्यान, कालपर्यंत राज्यात एकूण 50 लाख क्विंटल धान खरेदी पूर्ण झाली आहे.

****

राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या जून-जुलै २०२६ मध्ये होणाऱ्या परीक्षांचं प्रवेश पत्र कालपासून उपलब्ध झालं आहे. मंडळाच्या संकेतस्थळावरून प्रवेश पत्र डाऊनलोड करता येईल. मंडळाच्या कार्यकक्षेतल्या सर्व माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी प्रवेशपत्रांची छापील प्रत विद्यार्थ्यांना द्यावी, यासाठी कुठलंही शुल्क आकारलं नसून प्रवेशपत्रावर मुख्याध्यापक किंवा प्राचार्य यांची स्वाक्षरी आणि शिक्का असावा, असे निर्देश मंडळाने दिले आहेत.

****

लातूर जिल्ह्यात काल झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये दोन जणांचा मृत्यू झाला. लातूर शहरातल्या सम्राट चौकात ट्रॅव्हल्सला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दुचाकीचा नियंत्रण सुटून अपघात झाला. यात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. अन्य एका घटनेत उदगीर शहरात रेल्वेच्या धडकेत एका ७० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 13.06.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 13 June 2026 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत...