Tuesday, 16 June 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 16.06.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 16 June 2026

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १६ जून २०२ दुपारी १.०० वा.

****

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार आता डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय औषध दुकानांमधून खोकल्याचं सिरप खरेदी करता येणार नाही. केंद्राच्या नव्या नियमानुसार, औषधी नियम, १९४५ च्या अनुसूची '' मधून ‘सिरप’ हा शब्द वगळण्यात आला आहे. याआधी कोणत्याही औषधी दुकानांतून ग्राहकांना खोकल्याचं सिरप थेट खरेदी करता येत होतं. आता मात्र औषध विक्रेते प्रिस्क्रिप्शनशिवाय खोकल्याचं सिरप विकू शकणार नाहीत. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षिततेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला आहे. खोकल्याच्या अनेक सिरपमध्ये कोडीनसारखे घटक असतात, ज्यांचा गैरवापर होण्याची शक्यता असते. तसेच लहान मुलांना चुकीच्या मात्रेत सिरप दिलं जाऊ नये, यासाठीही हा बदल करण्यात आला आहे.

****

येत्या २१ जून रोजी नीट परीक्षा पुन्हा घेतली जाणार आहे. या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सतर्कता बाळगत २२ जूनपर्यंत टेलिग्राम या ॲपवर बंदी घातली आहे. या प्रतिबंधासह, येत्या ३० तारखेपर्यंत, या ॲपवरच्या जुन्या मेसेजेसचं एडिटिंगही करता येणार नसल्याचंही सरकारनं स्पष्ट केलं आहे.

दरम्यान नीट परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड सुविधा सुरू झाल्याच्या २४ तासांच्या आत, आगामी NEET UG पुनर्परीक्षा २०२६ साठी १० लाखांहून अधिक उमेदवारांनी आपली प्रवेशपत्रे डाउनलोड केली आहेत, असे नॅशनल टेस्टिंग एजन्सी ने म्हटले आहे. सर्व उमेदवारांना सुरळीत प्रवेश मिळावा यासाठी त्यांचे पथक सर्व्हरवरील भारावर सतत लक्ष ठेवून आहे. सर्व उमेदवारांना परीक्षेपूर्वी वेळेवर त्यांची प्रवेशपत्रे मिळतील, याबाबत NTA ने विद्यार्थ्यांना आश्वस्त केले आहे.

****

राज्य विधिमंडळाचं आगामी पावसाळी अधिवेशन येत्या २२ जून ते १० जुलै दरम्यान मुंबईत होणार आहे. काल कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या तीन आठवड्यांच्या अधिवेशन काळात अनेक महत्त्वाच्या विधेयकांसह, महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र ओळख देणारे महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक मांडलं जाणार आहे. तसंच राज्यातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न, कर्जमाफी या विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या फुलंब्री तालुक्यातल्या वाघोळा गावातल्या जलजीवन मिशन योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या कथित निकृष्ट दर्जाच्या पाईपलाईन कामाची चौकशी होणार आहे. यासंदर्भात ग्रामस्थांनी सुरू केलेल्या आंदोलनाची आमदार अनुराधा चव्हाण यांनी गंभीर दखल घेतली असून, संबंधित अधिकाऱ्यांना कामाच्या गुणवत्तेची सखोल तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत. तपासणीत संबंधित ठेकेदार किंवा अधिकारी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे.

****

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे राज्यभरात आयोजित होणार असलेल्या 'प्रवासी राजा दिन'  आणि  'कामगार पालक दिन'  या उपक्रमांचं लातूर विभागाचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. त्यानुसार येत्या १७ जून ते २२ जुलै या काळात लातूर जिल्ह्यातल्या आगारांमध्ये हे उपक्रम राबवले जाणार आहेत. बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या तसंच एसटी कर्मचारी आणि कर्मचारी संघटनांच्या समस्या,  तक्रारी आणि सूचनांचं स्थानिक पातळीवर जलद गतीनं निराकरण व्हावं, या उद्देशानं एसटी महामंडळानं हे उपक्रम हाती घेतले आहेत.

****

केंद्रीय सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या वतीनं देशभरात राबवण्यात येत असलेल्या नियतकालिक श्रमशक्ती सर्वेक्षण मोहिमेत अकोला जिल्ह्यातल्या सर्वेक्षणाचा शुभारंभ आज जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या हस्ते  करण्यात आला. या सर्वेक्षणाद्वारे लघुउद्योग, व्यापारी आणि सेवा क्षेत्रातील वाहतूक, शिक्षण, आरोग्य आदी घटकांची आर्थिक आणि कार्यात्मक वैशिष्ट्यं नोंदवण्यात येणार आहेत. देशात हा उपक्रम मार्च २०२७ पर्यंत चालणार आहे.

****

भारतीय महिला हॉकी संघाची मिडफिल्डर ज्योतीने मंगळवारी न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या एफआयएच महिला हॉकी नेशन्स कपमध्ये जपानविरुद्ध आपला १०० वा आंतरराष्ट्रीय सामना खेळून एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. हॉकी इंडियाने याप्रसंगी तिचे अभिनंदन करत तिच्या योगदानाची दखल घेतली. मूळची हरियाणाची रहिवासी असलेल्या ज्योतीने २०१९ मध्ये मलेशियाविरुद्धच्या द्विपक्षीय कसोटी मालिकेतून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत ज्योतीने अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. २०२२ च्या बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा ती एक भाग होती.

****

कामगार कायद्यांच्या नव्या संहितांच्या अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने राज्यस्तरीय नियमांचा मसुदा तयार केला आहे. हा मसुदा https://mahakamgar.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. या मसुद्यांबाबत उद्योग क्षेत्र, कामगार संघटना, कर्मचारी; तसेच सर्वसामान्य नागरिकांनी सूचना व हरकती नोंदवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 16.06.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 16 June 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्...