Tuesday, 20 April 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 20.04.2021 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 20 April 2021

Time 7.10AM to 7.25AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २० एप्रिल २०२१ सकाळी ७.१० मि.

****

कोरोना विषाणू रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होत आहे, त्यामुळे संपूर्ण काळजी घेण्याचं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. प्रत्येक नागरिकाने सर्व सुरक्षा उपायांचं पालन करावं. ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांनी, न घाबरता, लसीकरण करुन घ्यावं. नाक आणि तोंडाला मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात वेळोवेळी साबणाने धुवावेत. हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा. या सहज सुलभ उपायांचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा.

****

·      १८ वर्षांवरील सर्वांना कोविड लस देण्याचा केंद्र सरकारचा निर्णय.

·      किराणा खरेदीच्या नावावर नागरिक दिवसभर बाहेर फिरत असल्यानं आता सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंतच किराणा दुकान सुरू राहणार.

·      मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेल्या, पॅकेजमधली मदत, पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी युद्धपातळीवर अंमलबजावणी करण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश.

·      फुफ्फुसांचं आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी घरातल्या घरात सहा मिनिटं चालण्याच्या चाचणीवर आरोग्य विभागाचा भर.

·      राज्यात ५८ हजार ९२४ नविन कोविड रुग्णांची नोंद; मराठवाड्यात ११३ जणांचा मृत्यू तर सात हजार ४५७ बाधित.

आणि

·      प्रसिद्ध चित्रपट निर्मात्या दिग्दर्शक सुमित्रा भावे यांचं निधन.

****

देशातल्या १८ वर्षांवरील वयोगटाला कोविड लस देण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. येत्या एक मे पासून हे लसीकरण सुरू होईल. केंद्र सरकारनं काल कोविड लसीकरणाचा तिसरा टप्पा जाहीर करताना ही माहिती दिली. या तिसऱ्या टप्प्यात देशातल्या कोविड लस उत्पादक कंपन्या, थेट राज्य सरकारांना लस पुरवठा करू शकतील, तसंच खुल्या बाजारात कोविडची लस उपलब्ध करून देऊ शकतील, मात्र लसीच्या एकूण उत्पादनाच्या ५० टक्के साठा केंद्र सरकारला देणं, सर्वच लस उत्पादक कंपन्यांना बंधनकारक असणार आहे. राज्य सरकारांना किंवा उत्पादकांना लसीची किंमत एक मे पूर्वी जाहीर करावी लागेल, असंही केंद्रानं सांगितलं आहे. 

दरम्यान, १८ वर्षांवरील सर्वांना कोविड लस देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांचे आभार मानले आहेत. राज्यात या अनुषंगाने पुरेपूर नियोजन केलं जाईल आणि लसीच्या पुरेशा मात्रांचा पुरवठा वेळच्या वेळी मिळत राहील, अशी अपेक्षाही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

****

कोविडग्रस्तांवर उपचारासाठी आवश्यक असलेल्या द्रवरुप वैद्यकीय प्राणवायूची वाहतुक करण्यासाठी, रेल्वेची तयारी पूर्ण झाली आहे. काल मुंबईतल्या कळंबोली स्थानकातून रिकामे सात टँकर घेऊन, एक मालगाडी विशाखापट्टणम कडे रवाना झाली. परिवहन मंत्री अनिल परब यांनी या गाडीला हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं. हे टँकर जमशेदपूर, रौरकेला आणि बोकारो इथं पाठवले जातील. रिकाम्या टॅंकरमध्ये प्राणवायू भरून दोन दिवसांनी हे टॅंकर पुन्हा कळंबोलीत दाखल होणार आहेत.  राज्यातून परिवहन महामंडळाच्या वतीनं टँकर वाहतुकीचं नियोजन केलं जात असून, कळंबोली इथं एक हजार ६१८ टँकर आणले असल्याचंही, रेल्वच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.

दरम्यान, प्राणवायूच्या वाहतुकीसाठी एसटी अर्थात राज्य मार्ग परिवहन महामंडळही तयार असल्याचं, परिवहन मंत्री परब यांनी सांगितलं आहे. ते काल मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. प्राणवायूच्या वाहतुकीसाठी एसटीचे चालक सज्ज आहेत. गरज असलेल्या ठिकाणी ग्रीन कॉरिडॉर्स तयार करून, प्राणवायूचा प्राधान्यानं पुरवठा केला जाईल, असं त्यांनी सांगितलं.

****

राज्यात कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्शवभूमीवर कडक निर्बंध असतानाही किराणा खरेदीच्या नावावर नागरिक दिवसभर बाहेर फिरत असल्यानं किराणा दुकानांची वेळ सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत मर्यादित ठेवण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, रुग्णांची वाढती संख्या आणि ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेऊन, अधिकाधिक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प तातडीनं स्थापन करण्यात यावेत, असंही त्यांनी या बैठकीत सांगितलं.

कोविड निर्बंधकाळात नागरिकांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेल्या, ५ हजार ४७६ कोटींच्या पॅकेजमधली मदत, पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी युद्धपातळीवर अंमलबजावणी करण्याचे निर्देशही, उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. या अंतर्गत सात कोटी नागरिकांना मोफत अन्नधान्य, मोफत शिवभोजन थाळी, सामाजिक न्याय विभागाच्या ३५ लाख, आणि आदिवासी विभागाच्या १२ लाख लाभार्थ्यांना आगाऊ मदतीचं तात्काळ वितरण, बांधकाम क्षेत्रातले नोंदणीकृत कामगार, घरगुती कामगार, राज्यातील फेरीवाले, रिक्षाचालक यांच्यासह विविध समाजघटकांसाठी जाहीर केलेल्या मदतीचा निधी, तात्काळ वितरित करण्यात येणार आहे.

****

कोविड संसर्ग झालेला असताना, आपल्या फुफ्फुसांचे आरोग्य व्यवस्थित आहे का, हे तपासण्यासाठी गृहविलगीकरणातल्या रुग्णांनी, किंवा कोविडची लक्षणं असलेल्या व्यक्तींनी, घरातल्या घरात सहा मिनिटं चालण्याची चाचणी करण्यावर आरोग्य विभागानं भर दिला आहे. यासंदर्भात नागरिकांचं प्रबोधन करावं, असं आवाहन, आरोग्य विभागाचे मुख्य सचिव प्रदीप व्यास यांनी केलं आहे. राज्यातील आरोग्य यंत्रणेच्या नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीत, व्यास यांनी जिल्हा आरोग्य यंत्रणेला, सहा मिनिटं चालण्याच्या चाचणी बाबत, अधिक जागरूकता निर्माण करण्याची आवश्यकता असल्याचं सांगितलं. या चाचणीत रुग्णाने सामान्य गतीने सहा मिनिटं चालण्यापूर्वी, आणि चालल्यानंतर, बोटाला ऑक्सीमीटर लावून रक्तातल्या प्राणवायुच्या प्रमाणाची नोंद करावी, चालून झाल्यावरचं प्रमाण जर ९३ अंकापेक्षा कमी असेल किंवा दोन्ही नोंदीत तीन अंकांपेक्षा अधिक फरक असेल किंवा जास्ती प्रमाणात धाप लागत असेल, तर तत्काळ वैद्यकीय सल्ला घेण्याची सूचना, आरोग्य मंत्रालयानं केली आहे.

****

राज्यात काल ५८ हजार ९२४ कोविड रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे राज्यभरातल्या कोविडबाधितांची एकूण संख्या ३८ लाख ९८ हजार २६२ झाली आहे. काल ३५१ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, ६० हजार ८२४ झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ५६ शतांश टक्के झाला आहे. काल ५२ हजार ४१२ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत ३१ लाख ५९ हजार २४० रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ८१ पूर्णांक ४ दशांश टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात सहा लाख ७६ हजार ५२० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

मराठवाड्यात काल नव्या सात हजार ४५७ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर ११३ जणांचा या संसर्गानं मृत्यू झाला. मृतांमध्ये लातूर जिल्ह्यातल्या २८, औरंगाबाद २४, परभणी १६, नांदेड १५, उस्मानाबाद दहा, हिंगोली आणि बीड जिल्ह्यातल्या प्रत्येकी नऊ, तर जालना जिल्ह्यातल्या दोन रुग्णांचा समावेश आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात काल नवे एक हजार ४९३ रुग्ण आढळले. लातूर जिल्ह्यात एक हजार ४२१, नांदेड एक हजार ३७५, बीड एक हजार १२१, उस्मानाबाद ६६२, परभणी ५७३, जालना ५२१, तर हिंगोली जिल्ह्यात २९१ नवे रुग्ण आढळून आले.

****

राज्यातलं औद्योगिक क्षेत्रातलं पहिलं कोविड लसीकरण केंद्रं तसंच आरटीपीसीआर चाचणी केंद्र काल नाशिक औद्योगिक वसाहतीत सुरू झालं. राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते, दूरदृष्य प्रणालीद्वारे या केंद्राचं उद्धाटन झालं. कामगारांच्या लसीकरण मोहिमेसाठी औद्योगिक क्षेत्र स्वतःहून पुढे येत आहे, ही बाब भूषणावह असल्याचं भुजबळ म्हणाले.

****

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल मुंबईत जे जे रुग्णालयात कोविड प्रतिबंधात्मक लस घेतली. ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांनी लस घ्यावी, असं आवाहन आरोग्यमंत्र्यांनी यावेळी केलं. कोरोनाला हरवण्यासाठी लसीकरण आवश्यक असून, आतापर्यंत सुमारे एक कोटी २२ लाख लाभार्थ्यांना लस देऊन, महाराष्ट्र देशात अग्रस्थानी असल्याचं ते म्हणाले.

****

उस्मानाबाद जिल्ह्यात प्रशासनानं आणखी चार ठिकाणी द्रवरूप प्राणवायू प्रकल्प लवकर उभारण्यासाठी पूर्ण वेगाने काम करण्याचे निर्देश, पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी दिले आहेत. जिल्ह्यात कोविड स्थितीचा आढावा घेण्यासाठी काल जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. हवेतून प्राणवायू वेगळा करणारा प्रकल्प उभारण्यासाठी, प्रशासनानं मागणी प्रस्ताव तातडीनं सादर करावा, असे निर्देशही पालकमंत्र्यांनी दिले. माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेअंतर्गत, घरोघरी जाऊन आजारी व्यक्तींचा शोध घ्यावा, आणि संशयितांच्या तातडीने चाचण्या करून उपचार सुरू करावेत, असं गडाख यांनी सांगितलं.

****

हिंगोली इथं युध्दपातळीवर प्राणवायू निर्मिती प्रकल्प उभारण्याची सूचना, पालकमंत्री प्राध्यापक वर्षा गायकवाड यांनी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांना दिली आहेत. या शिवाय पालकमंत्र्यांनी प्राणवायू सुविधा असलेल्या रुग्ण खाटा, सामान्य रुग्णखाटा, रेमडेसीवीर औषध पुरवठा तसंच व्हेंटीलेटरची संख्या वाढवण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. खासदार राजीव सातव यांनी, जिल्ह्यात वाढती कोविड रुग्ण संख्या पाहता, प्राणवायू प्रकल्प उभारण्याची मागणी केली होती.

****

लातूर जिल्ह्यात जिल्हा प्रशासन, महापालिका आणि आरोग्य विभागानं, हेल्पलाइनच्या माध्यमातून रुग्णांना तत्काळ रुग्णखाटा उपलब्ध होतील, यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिल्या आहेत. ते काल एका आढावा बैठकीत बोलत होते. प्राणवायू सुविधेसह रुग्णखाटा, व्हेंटिलेटर सुविधा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून ठेवाव्यात, असंही पालकमंत्र्यांनी सांगितलं.

दरम्यान, लातूर महानगरपालिकेच्या वतीनं पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतनमध्ये, मुलांच्या वसतिगृहात कोविड समर्पित सुश्रुषा केंद्र सुरू करण्यात आलं आहे. या केंद्रात प्राणवायू सुविधा असलेल्या ९० रुग्णखाटा, तसंच २०० अलगीकरन रुग्णखाटा उपलब्ध आहेत. सहाय्यक आयुक्त वसुधा फड यांची या केंद्राच्या सुकाणू अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

दरम्यान, शहरातले डोळे तसंच दाताचे दवाखाने येत्या ३० तारखेपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश, मनपा आयुक्त अमन मित्तल यांनी दिले आहेत. कोविड संसर्ग वाढू नये, यासाठी हा निर्णय घेतल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

नांदेड इथं उभारलेल्या जम्बो कोविड सेंटरचं काल जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी उद्घाटन केलं. यावेळी आमदार अमरनाथ राजूरकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. बाधितांना आरोग्य सुविधा सुलभ मिळाव्यात यासाठी आरोग्य विभागाला तत्पर राहण्याला सांगितलं असून, आजच्या घडीला जिल्ह्यात प्राणवायूच्या बाबतीत कोणतीही कमतरता नसल्याचं, चव्हाण यांनी सांगितलं.

****

परभणी तालुक्यातल्या झरी तसंच पिंगळी इथं कोविड सुश्रुषा केंद्र सुरू करण्यात येणार असल्याचं, आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी सांगितलं. त्यांनी झरी इथं नियोजित कोविड केंद्राच्या जागेची काल पाहणी केली. मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद आदी शहरांमधून, कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात आपापल्या गावी परतत असल्यामुळे, ग्रामीण भागातही कोविडचा संसर्ग वाढत आहे, या पार्श्वभूमीवर आमदार पाटील यांनी, झरी तसंच पिंगळी इथं कोविड केंद्र सुरू करण्याची मागणी केली होती. शहरातल्या कोविड रुग्णालयात देण्यात येणाऱ्या सर्व सुविधा, या केंद्रात पुरवण्यात येतील, असं त्यांनी सांगितलं.

****

औरंगाबाद जिल्ह्यात सर्व रुग्णालयांनी प्राण वायुचा सुयोग्य वापर करण्याच्या सूचना, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दिल्या आहेत. ते काल औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीत बोलत होते. जिल्ह्यात द्रवरुप प्राणवायूचा पुरेसा साठा आहे, मात्र भविष्यातील परिस्थितीचा विचार करुन नियोजन करणं आवश्यक असल्याचं, केंद्रेकर म्हणाले. सर्वच कोविडग्रस्तांवर उपचारासाठी प्राणवायूची आवश्यकता नसते, गरज असणाऱ्या रुग्णांनांच प्राणवायू लावण्यात यावा, प्राणवायूची गळती होऊ देऊ नये, आदी सूचनाही केंद्रेकर यांनी केल्या.

****

औरंगाबाद जिल्ह्यात रेमडेसीवीर इंजेक्शनचा तुटवडा असून, जिल्ह्याल्या हे इंजेक्शन तातडीनं उपलब्ध करुन द्यावं, अशी मागणी खासदार इम्तियाज जलिल यांनी केली आहे. कोविड पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित लोकप्रतिनिधींच्या बैठकीनंतर ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. रेमडेसीवीर इंजेक्शन काळ्या बाजारात विकलं जात असून, रुग्णांच्या नातेवाईकांची लूट केली जात असल्याचं सांगून जलिल यांनी, इतर जिल्ह्यांच्या तुलनेत औरंगाबाद जिल्ह्यावर अन्याय होत असल्याचा आरोप केला.

****

नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी नागरिकांना कोविड प्रतिबंधासाठी नियम पाळण्याचं, तसंच कोविड लस घेण्याचं आवाहन केलं आहे.

कोरोनाची महामारी विशेषतः ग्रामीण भागामधे मोठ्या प्रमाणात फैलावत आहे. तेव्हा सर्व जनतेने मास्क वापरणे, सॅनिटायझरचा उपयोग करणे, साबणाने स्वच्छ हात धुणे आणि नियमाचं काटेकोरपणाने पालन करणे, या बाबींची काळजी घेतली तर निश्चित कोरोना महामारी कमी होण्याला मदत होईल. माझी आपणाला दुसरी एक विनंती अशी राहणार आहे की ४५ वर्षाच्या वरच्या नागरिकांना लस उपलब्ध आहे. ती लस सर्वांनी घ्यावी. मी स्वतः लसीचे दोन डोस घेतलेले आहेत. त्याच्यामुळे कुठलाही त्रास होत नाही. जनतेला माझी हात जोडून विनंती राहणार आहे की नियमांचे काटेकोरपणाने पालन करा. आणि कोरोनाला संपवण्यासाठी सहकार्य करा.

****

प्रसिद्ध चित्रपट निर्मात्या दिग्दर्शक सुमित्रा भावे यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दुःख व्यक्त केलं आहे. सुमित्रा भावे यांनी सामाजिक कार्यकर्ता आणि संवेदनशील दिग्दर्शक म्हणून केलेलं काम, या दोन्ही क्षेत्रांसाठी मार्गदर्शक ठरेल, त्यांच्या निधनामुळे या दोन्ही क्षेत्रांना जोडणारा दुवा निखळला आहे, अशी भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनीही भावे यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं. एका प्रयोगशील दिग्दर्शिकेला आपण मुकलो आहोत, अशी भावना अमित देशमुख यांनी व्यक्त केली. कर्करोगानं आजारी असलेल्या सुमित्रा भावे यांचं काल पुण्यात निधन झालं, त्या ७८ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पार्थिव देहावर काल अंत्यसंस्कार करण्यात आले.

****

परभणी जिल्ह्यात बियाणं, खतं आणि किटकनाशकं यांच्या गुणवत्ता आणि पुरवठ्यासंदर्भात अडचणींचं तत्काळ निराकरण करण्यासाठी, जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापित करण्यात आले आहेत. गेल्या खरीप हंगामात आलेल्या अडचणी पाहता, हा नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आल्याचं, जिल्हा कृषी अधिक्षक कार्यालयाकडून कळवण्यात आलं आहे.

****

केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून मागील वर्षी घेण्यात आलेल्या मुलाखती, कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर तात्पुरत्या स्थगित करण्यात आल्या आहेत. यासंदर्भातल्या नव्या तारखा लवकरच आयोगाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येतील, असं आयोगानं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.

****

औरंगाबाद इथल्या महात्मा गांधी मिशनच्या एमजीएम विद्यापीठाच्या कुलगुरूपदी, नागपूर इथल्या संत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे माजी कुलगुरु, डॉ.विलास सपकाळ यांची नियुक्ती झाली आहे. डॉ.सपकाळ यांनी काल पदभार स्वीकारला.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 21.06.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 21 June 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्...