Thursday, 22 April 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 22.04.2021 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 22 April 2021

Time 1.00pm to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २२ एप्रिल २०२१ दुपारी १.०० वा.

****

देशातल्या १४६ जिल्ह्यांत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सर्वाधिक असून, त्या ठिकाणचा संसर्ग नियंत्रणात आणण्यावर केंद्र सरकारनं लक्ष केंद्रित केलं आहे. त्याच वेळी देशाचा कोविड मृत्यू दर कमी होत असून, सध्या तो एक पूर्णांक १७ शतांश टक्के आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी ही माहिती दिली. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक, छत्तीसगड आणि केरळ या राज्यात उपचाराधीन रुग्णांची संख्या एक लाखापेक्षा जास्त आहे; त्या अनुषंगानं आरोग्य सुविधा वाढवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारं एकत्रितपणे काम करत आहेत, असं भूषण म्हणाले. देशात लसीकरणाचा वेगही वाढत असून आतापर्यंत १३ कोटी २३ लाख ३० हजार ६४४ नागरिकांना लस देण्यात आली.

****

देशात काल तीन लाख १४ हजारांहून अधिक नव्या रुग्णांची नोंद झाली. आतापर्यंत एका दिवसात रुग्ण सापडण्याचा हा उच्चांक आहे. त्यामुळे देशातल्या एकूण कोविड बाधितांची संख्या, एक कोटी ५९ लाख झाली आहे. काल दोन हजार १०४ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर जवळपास ७८ हजार रुग्ण बरे झाले. देशात आतापर्यंत या विषाणू संसर्गानं एक लाख ८४ हजार रुग्णांचा मृत्यू झाला असून, एक कोटी ३४ लाखांहून अधिक रुग्ण, कोरोना विषाणू मुक्त झाले आहेत. सध्या देशभरात २२ लाख ९१ हजार रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

कोविड रुग्णांची संख्या जास्त असणाऱ्या राज्यांना रेमडेसीवीर औषधाच्या वितरणासाठी केंद्र सरकारनं एक कृती आराखडा तयार केला. येत्या ३० एप्रिल पर्यंत हे वितरण होणार असून, उपलब्ध साठ्यातून राज्यांची रेमडेसीवीरची गरज पूर्ण करण्यासाठी, राज्यांशी समन्वय सुरू आहे. राज्यांनी रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी सरकारी वितरण माध्यमावर नोंदवावी, असं केंद्र सरकारनं सांगितलं आहे. त्याचबरोबर या इंजेक्शनचा पुरवठा आणि मागणी यासंदर्भातल्या बाबींवर देखरेख ठेवण्यासाठी राज्यांनी एका नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, असंही सांगण्यात आलं आहे.

****

देशात कोविड १९चा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी भारतीय हवाई दलाची मदत होत आहे. हवाई दलानं सरकारची मदत करण्यासाठी, ऑक्सिजन सिलिंडर, आवश्यक औषधी, उपकरणे यासह आरोग्य कर्मचाऱ्यांना आपल्या विमानातून वाहतूक करण्यास सुरुवात केली आहे. हवाई दलानं मुंबई, कोचि, विशाखापट्टणम आणि बंगळूरु इथल्या डॉक्टरांना, दिल्लीतल्या कोविड रुग्णालयात सेवेसाठी पोहोचवलं आहे.

****

नाशिक महानगरपालिकेच्या डॉ.झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन गळती झाल्यानंतर २४ रुग्णांचा मृत्यू झाल्याप्रकरणी, नाशिक पोलिसांकडून अज्ञात व्यक्तीच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची माहिती नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी दिली. काल ही दुर्घटना घडली होती. पोलीस यंत्रणा तपास करत असल्याचं पांडेय यांनी सांगितलं.

****

राज्यात रेमडीसिवीर औषधाचा बेकायदा पद्धतीने साठा केल्याचं आढळल्यास संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी दिला आहे. ते सांगली इथं बोलत होते. प्राणवायू आणि रेमडीसिवीर औषधाचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी, केंद्र सरकारच्या मदतीनं राज्य सरकार प्रयत्नशील आहे, येत्या काही दिवसात याबाबतची परिस्थिती सुधारेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

****

राज्यात कोरोनाची गंभीर परिस्थिती लक्षात घेता केंद्र सरकारने राज्याला दिवसाला २६ नव्हे, तर ५० हजार रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे. केंद्र सरकारने नुकताच विविध राज्यांना वाटप केलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शनची आकडेवारी जाहीर केली, त्यानुसार राज्याला फक्त २६ हजार इंजेक्शन्स देणार असल्याचे सांगितले आहे. यावर मलिक यांनी आक्षेप नोंदवला आहे.

****

राज्यभरातल्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार गेल्या दोन महिन्यांपासून उशिरा होत आहेत. एप्रिल महिना संपत आला असतांना अजून मार्च महिन्याचे पगार झालेले नाहीत. शिक्षण विभाग आणि वित्त विभाग यांच्यामध्ये समन्वय नसल्यानं पैसे येऊनही वित्त विभागानं बिलं नाकारली आहेत. याबाबतीत शिक्षण संचालकांनी पत्र लिहिलं आहे. परंतू अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही, अशी माहिती शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी दिली.

****

नांदेड जिल्ह्यातल्या ११ खरेदी - विक्री केंद्रावर एक मे पासून आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत धान्य खरेदी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.विपिन ईटनकर यांनी काढले आहेत. एक मे ते ३० जून या कालावधीत या केंद्रांवर भरडधान्य, मका, ज्वारी, धान, हमी भावाने खरेदी करण्यास परवानगी देण्यात आली आहे. 

****

अकोला जिल्ह्याच्या पातुर तालुक्यातल्या नांदखेड गावानं कोरोनाला वेशीवरच रोखण्यात यश मिळवलं आहे. आजपर्यंत गावात एकही कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळला नाही. माझे कुटुंब माझी जबाबदारी या उपक्रमामुळे मोठी मदत झाल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं. एकीच्या जोरावर आणि जागृतीच्या आधारे संपूर्ण गाव कोरोनावर मात करण्यात यशस्वी ठरलं आहे.

****

No comments:

آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 13 جون 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 13 June-2026 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبریں ...