Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 26 June 2021
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २६ जून २०२१ सायंकाळी ६.१०
****
कोविड १९शी संबंधित निर्बंध शिथिल जरी झाले आले असले तरी कोरोना विषाणू
संसर्गाचा धोका अद्याप कायम आहे. त्यामुळे सर्वांनी संपूर्ण काळजी घेणं आवश्यक आहे.
महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं, असं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. सुरक्षित
राहण्यासाठी नाका-तोंडावर मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात आणि
चेहरा स्वच्छ ठेवावा तसंच लसीकरण करून घ्यावं. कोविड - १९ शी संबंधित अधिक माहिती आणि
मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदतवाहिनीशी किंवा ०२०- २६ १२
७३ ९४ या राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
** इतर मागासप्रवर्गीय समाजाच्या राजकीय
आरक्षणासाठी भारतीय जनता पक्षाचं राज्यभर चक्काजाम
आंदोलन
** हिंगोली आणि नांदेडमध्ये काँग्रेसचं केंद्र सरकारविरुद्ध आंदोलन
** डेल्टा प्लस
आजाराचे अकरा राज्यात जवळपास ५० रुग्ण
** माजी गृहमंत्री
अनिल देशमुख आणि त्यांचा मुलगा अंमलबजावणी संचालनालयाच्या चौकशीला गैरहजर, दोन स्वीय सहायकांना अटक
आणि
** जालना जिल्ह्यात
दिवसभरात तीन कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू
****
इतर मागासप्रवर्ग - ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण देण्याच्या
मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आज राज्यभर चक्काजाम आंदोलन करण्यात आलं.
महा विकास आघाडीच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचं राजकीय आरक्षण
रद्द करण्यात आलं, उच्च न्यायालयाने निर्देश देऊनही मागासवर्गीय आयोग स्थापन
करण्यात या सरकारनं कमालीचा विलंब केला म्हणून हे आरक्षण रद्द करण्याचा
निर्वाळा सर्वोच्च न्यायालयानं दिला असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ते
नागपूर इथं झालेल्या आंदोलनावेळी बोलत होते. ते म्हणाले...
सुप्रीम कोर्टाने सेन्सस डाटा मागितलेला
नाही, इम्पिरिकल डाटा
मागितला आहे. जो राज्य मागासवर्ग आयोगच तयार करु शकते. पण यांना २०२२ च्या निवडणूकापर्यंत
ओबीसीला आरक्षण द्यायच नाहीये. महाराष्ट्रातल्या सगळ्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय
यांना करायच्या आहेत. पण भारतीय जनता पार्टी रस्त्यावर उतरली आहे. आम्ही आज रास्ता
रोको केला आहे. जेल भरो केला आहे. पंरतू यानीच आम्ही थांबणार नाही.जोपर्यंत ओबीसीला
आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत आमची लढाई सुरुच राहील.
परभणीत जिंतूर रस्त्यावरील महाराणा प्रताप चौकात जोरदार रस्तारोको
आंदोलन करण्यात आलं. त्यामुळे या महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. घोषणाबाजी
करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी नंतर ताब्यात घेतलं. नांदेड
इथं खासदार प्रतापराव
पाटील चिखलीकर, महानगराध्यक्ष प्रविण साले यांच्या नेतृत्वाखाली नांदेड -
हैद्राबाद आंतरराज्य महामार्गावर चक्का
जाम आंदोलन करण्यात आलं. या मार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. जालना
शहरात आमदार संतोष दानवे यांच्या नेतृत्त्वात अंबड चौफुली इथं चक्का जाम आंदोलन
करण्यात आलं. या आंदोलनामुळे चारही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती. औरंगाबाद शहरात आमदार अतुल सावे यांच्या
नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं.
****
हिंगोलीत काँग्रेसच्यावतीनं केंद्र सरकारविरुद्ध
गांधी चौक भागात आंदोलन करण्यात आलं. भाजपच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर
काँग्रेसनं हे आंदोलन केलं. ओबीसींचा इम्पेरिकल डाटा देण्याची मागणी तत्कालीन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गहलोत
यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. ती अजूनही दिली गेली नाही.
तरीही फडणवीस यावरून जनतेची दिशाभूल करीत असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला.
नांदेड इथंही काँग्रेसच्यावतीनं केंद्र सरकारविरुद्ध आंदोलन
करण्यात आलं. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी या आंदोलनाचं नेतृत्व
केलं. केंद्र सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याच्या निषेधार्थ जनक छत्रपती
शाहू महाराज यांच्या पुतळ्यासमोर हे आंदोलन करत असल्याचं आंदोलनकर्त्यांनी
सांगितलं.
****
देशात कोविड रुग्णांच्या संख्येत घट होत आहे, अशी माहिती आरोग्य
आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं दिली आहे. दैनंदिन आणि साप्ताहिक रुग्ण संख्या कमी
झाली असून सलग १९व्या दिवशी काल हा दर पाच टक्क्यांहून कमी होता असं मंत्रालयानं
म्हटलं आहे. कोरोना विषाणू संसर्गातून बरे होणाऱ्या रुग्ण संख्येतही
वाढ झाली आहे. आतापर्यंत २ कोटी ९१ लाख रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत तर तीन
लाख ९४ हजार रुग्ण या आजारानं मरण पावले आहेत अशी माहिती मंत्रालयानं दिली आहे.
दरम्यान, डेल्टा प्लस आजाराचे देशात अकरा राज्यात जवळपास ५०
रुग्ण आढळून आले आहेत. हे रुग्ण महाराष्ट्र, मध्यप्रदेश, तामिळनाडू, पंजाब, गुजरात, केरळ, आंध्र प्रदेश, ओडिशा, राजस्थान, जम्मू-काश्मीर, आणि कर्नाटक
राज्यात असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे. या राज्यांनी डेल्टा प्लसचा संसर्ग ज्या
जिल्ह्यांमध्ये आहेत, तिथं रुग्ण वाढू नये यासाठीचे उपाय करावेत अशा सूचना
मंत्रालयानं दिल्या आहेत.
****
अंमलबजावणी संचालनालयानं माजी गृहमंत्री
अनिल देशमुख आणि त्यांच्या मुलाला आज कार्यालयात उपस्थित राहण्यासाठी समन्स
बजावण्यात आले होते. मात्र, ते दोघेही आज उपस्थित राहिले नाहीत. उपस्थित राहू
शकणार नसल्याचं देशमुख यांनी पत्र लिहून कळवल्याची माहिती संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी
आकाशवाणीसोबत बोलताना दिली. पुढच्या कारवाई संदर्भात अजून निर्णय झाला नसल्याचं
अधिकाऱ्यांनी सांगितलं.
दरम्यान, देशमुख यांचे स्वीय सहाय्यक संजीव पालांडे आणि कुंदन
शिंदे यांना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं आहे
****
कोरोना विषाणू संसर्गाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या
पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यात उद्या पहाटे पाचवाजेपासून पुन्हा अंशत: निर्बंध लागू
करण्यात आले आहेत. याबाबतचे आदेश प्रभारी जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांनी आज जारी
केले. नवीन निर्बंधांनुसार औषधी दुकाने वगळता अत्यावश्यक सेवेची सर्व दुकाने दररोज
दुपारी ४ वाजेपर्यंत सुरु राहणार असून, इतर सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवार दुपारी चारवाजेपर्यंत
तर शनिवारी आणि रविवारी पूर्णत: बंद राहणार आहेत. लग्न समारंभासाठी ५० तर
अंत्यविधीसाठी २० व्यक्तींना परवानगी असेल. मॉल्स, सिनेमा हॉल, नाट्यगृह पूर्णपणे
बंद राहणार आहेत. उपहारगृह सोमवार ते शुक्रवार दुपारी चारवाजेपर्यंत ५० टक्के
क्षमतेने सुरू राहतील तर दुपारी चार ते रात्री नऊवाजेपर्यंत केवळ पार्सल सुविधा
सुरू राहील. सार्वजनिक मैदाने पहाटे पाच ते सकाळी नऊपर्यंत सर्वसामान्यांसाठी खुले
राहणार आहेत. शासकीय आणि खाजगी वाहतूक नियमितपणे सुरू राहणार आहे. नागरिकांनी कोविड नियमांचं पालन करावं, असं आवाहन जिल्हा
प्रशासनाच्यावतीनं करण्यात आलं आहे.
परभणी आणि लातूर जिल्ह्यातही सोमवारपासून अशाच प्रकारचे
निर्बंध लावण्यात येणार आहेत. परभणीचे जिल्हाधिकारी
दीपक मुगळीकर आणि लातूरचे जिल्हाधिकारी
पृथ्वीराज बी पी यांनी आज याबाबतचे आदेश आज जारी केले आहेत.
****
जालना जिल्ह्यात आज दिवसभरात तीन कोरोना विषाणू बाधित
रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात या संसर्गानं दगावलेल्या एकूण
रुग्णांची संख्या एक हजार १४८ झाली आहे. दरम्यान, आज दिवसभरात ३१
नवीन रुग्ण आढळून आले. जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आता ६१ हजार १४१ झाली आहे.
उपचारानंतर कोरोना विषाणूमुक्त झालेल्या ४० रुग्णांना आज सुटी देण्यात आली.
आजपर्यंत जिल्ह्यातले ५९ हजार ७८९ रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. तर सध्या
बाधित असलेल्या २०४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
जालना शहरातल्या मोतीबाग उड्डाणपुलावर आज दुपारी भरधाव आयशर
ट्रकनं दुचाकीला धडक दिल्यानं झालेल्या अपघातात दुचाकीवरील एकजण ठार, तर अन्य एकजण
गंभीर जखमी झाला. विनोद नवनाथ गोरे, असं अपघातातल्या मृताचं नाव असून, ते औरंगाबादमधल्या
गारखेडा इथले रहिवासी आहेत. तर सिध्देश्वर देशमुख, असं गंभीर जखमीचं
नाव असून, त्याच्यांवर औरंगाबाद इथं खासगी रुग्णालयात उपचार सुरू
आहेत.
****
कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेमध्ये
ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे राज्य सरकारनं प्रतिदिन तीन हजार
मेट्रिक टन ऑक्सीजन निर्मितीचं उद्दिष्ट ठेवलं असून यामध्ये राज्यातल्या २३ सहकारी
साखर कारखान्यांनी सहभाग घेतला आहे, अशी माहिती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली. अहमदनगर
इथं सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या नवीन ऑक्सिजन निर्मिती
प्रकल्पाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते आज
झाला, त्यावेळी ते बोलत होते. थोरात कारखाना हा तिसरा ऑक्सिजन
निर्मिती करणारा कारखाना ठरला असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. कृती दलांच्या
मते तिसरी लाट येण्याचा मोठा धोका आहे. यामध्ये राज्यात ५० लाख रुग्ण असू शकतात, त्यामुळे
प्रत्येकानं काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे असं आवाहन थोरात यांनी यावेळी केलं. या ऑक्सिजन
निर्मिती प्रकल्पामधून दररोज ८५० किलो ऑक्सिजन निर्माण होणार असून तो १००
रुग्णांना पुरेल इतका आहे असं त्यांनी सांगितलं.
//*********//
No comments:
Post a Comment