Thursday, 2 September 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 02.09.2021 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 02 September 2021

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०२ सप्टेंबर २०२ दुपारी १.०० वा.

****

देशात कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीमेनं ६६ कोटीचा टप्पा पार केला आहे. काल देशात ८१ लाख नऊ हजार २४४ नागरिकांना लस देण्यात आली. देशात आतापर्यंत या लसीच्या ६६ कोटी ३० लाख ३७ हजार ३३४ मात्रा देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, देशात काल नव्या ४७ हजार ९२ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर ५०९ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. देशातली एकूण कोविड बाधितांची संख्या तीन कोटी २८ लाख ५७ हजार ९३७ झाली असून, या संसर्गानं आतापर्यंत चार लाख ३९ हजार ५२९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल ३५ हजार १८१ रुग्ण बरे झाले, देशात आतापर्यंत तीन कोटी २० लाख २८ हजार ८२५ रुग्ण, कोरोना विषाणू मुक्त झाले असून, सध्या तीन लाख ८९ हजार ५८३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना; योगाचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या दृष्टीनं आयुष मंत्रायालाच्या पुढाकारानं तयार करण्यात आलेल्या योग ब्रेक अर्थात वाय ब्रेक या मोबाईल अॅपचं लोकार्पण काल करण्यात आलं. नोकरीच्या किंवा कामाच्या ठिकाणी पाच मिनिटाच्या योग मध्यंतरामुळे कामाचा तणाव कमी होऊन, उत्साह वाढेल, कामावर अधिक लक्ष केंद्रीत करण्यास मदत होईल, या हेतूनं हे अॅप तयार करण्यात आलं आहे. देशभरातल्या सर्व नोकरदारांसाठी ही संकल्पना फायदेशीर ठरू शकते, असं केंद्रीय मंत्री किरेन रीजीजू यांनी यावेळी बोलताना सांगितलं.

****

अटल पेन्शन योजनेअंतर्गत २५ ऑगस्ट २०२१ अखेरपर्यंत तीन कोटी ३० लाख नोंदणीचा टप्पा पार केला आहे. अर्थ मंत्रालायानं दिलेल्या माहितीनुसार, चालू आर्थिक वर्षाच्या सुरुवातीच्या पाच महिन्यात या योजनेंतर्गत २८ लाख लाभार्थ्यांनी नावं नोंदणी केली असल्याचं म्हटलं आहे. या नोंदणीद्वारे ७८ टक्के लाभार्थ्यांनी एक हजार रुपयांच्या निवृत्ती वेतनाची निवड केली, तर जवळपास १४ टक्के लाभार्थ्यांनी पाच हजार रुपये निवृत्ती वेतनाची निवड केली असल्याचं या माहितीद्वारे समोर आलं आहे. या योजनेमध्ये ४४ टक्के महिला लाभार्थ्यांचा समावेश आहे. अटल पेन्शन योजनेअंतर्गत देशातल्या १८ ते ४० वर्ष वयोगटातले नागरिक ज्यांचं बँकेत किंवा पोस्टात खातं असेल असा कोणीही नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतो.

****

राज्यसभेचे माजी सदस्य आणि पत्रकार चंदन मित्रा यांचं काल निधन झालं, ते ६५ वर्षांचे होते. मित्रा हे दोन वेळा राज्यसभेचे खासदार होते, तसंच ते डेली पायोनियर या वृत्तपत्राचे संपादक होते. उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकुर यांनी मित्रा यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे.

****

दूरचित्रवाणीवरील लोकप्रिय अभिनेते आणि बिग बॉस १३ या स्पर्धेचे विजेते सिद्धार्थ शुक्ला यांचं आज मुंबईत हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं, ते ४० वर्षांचे होते. बालिका वधू या मालिकेमधून सिद्धार्थनं केलेला अभिनय विशेष गाजला होता.

****

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या वकीलाला केंद्रीय अन्वेषण विभाग - सीबीआयनं अटक केली आहे. भ्रष्टाचार प्रकरणी अनिल देशमुख यांच्याविरोधात सुरु असलेला तपासासंदर्भात ही अटक करण्यात आली असून, त्यांना पुढील चौकशीसाठी दिल्लीला नेण्यात येणार आहे. याप्रकरणी पोलिसांकडून सविस्तर अहवाल मागितला असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पावर यांनी सांगितलं.

****

कोविडच्या तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी महाराष्ट्र शासन अनेक उपाययोजना करत असून, त्याचाच एक भाग म्हणून कोविड राज्य कृती दलानं, पाच सप्टेंबर रोजी ‘माझा डॉक्टर’ ही ऑनलाईन वैद्यकीय परिषद आयोजित केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या परिषदेचं उद्घाटन करणार असून, आरोग्य मंत्री राजेश टोपे, वैद्यकिय शिक्षण मंत्री अमित देशमुख उपस्थित राहणार आहेत. रविवारी सकाळी ११ ते दुपारी एक या वेळेत होणारी परिषद समाज माध्यमांवरून प्रसारित केली जाणार आहे.

****

कोरोना प्रतिबंधक लसीकरणामध्ये अमरावती विभागामध्ये वाशिम जिल्हा अग्रेसर असून, जिल्ह्यात १८ वर्षांवरील सुमारे ३८ टक्के व्यक्तींचं लसीकरण झालं आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १८ ते ४४ वर्षे वयोगटातल्या एक लाख ६८ हजार ६७३ नागरीकांचं, तसंच ४५ वर्षांवरील दोन लाख २३ हजार ८९० नागरीकांचं लसीकरण झालं आहे.

****

टोकियो पॅरालीम्पिक स्पर्धेत भारतीय नेमबाज राहुल जाखड अंतिम फेरीत पोहोचला आहे. पी 3 मिश्रित २५ मीटर्स पिस्तुल स्पर्धेत आज सकाळी त्यानं लक्षणीय कामगिरी करत अंतिम फेरीत धडक मारली.

नोएडाचे जिल्ह्याधिकारी आणि पॅरा बॅडमिंटनपटू सुहास एल यथिराज यांनी पुरुष एकेरीच्या एस एल फोर प्रकारात दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. पॅराऑलिम्पिक स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करणारे सुहास पहिले नागरी सेवा अधिकारी आहेत.

****

भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांच्या कसोटी क्रिकेट मालिकेतला चौथा सामना आजपासून ओव्हल मैदानावर सुरु होत आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी साडे तीन वाजता सामन्याला सुरुवात होईल.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 08.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 08 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...