Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 02 September 2021
Time 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक
– ०२ सप्टेंबर २०२१
सकाळी
७.१०
मि.
****
देशात १८ वर्षांवरील सर्वांना कोविड-19 प्रतिबंधक लस मोफत देण्यात येत आहे. तरुणांना आमचा सल्ला आहे की, त्यांनी ही लस अवश्य घ्यावी आणि इतरांना लसीकरणासाठी मदत
करावी. कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप संपलेला नाही. त्यामुळे सर्वांनी
संपूर्ण काळजी घेणं आवश्यक आहे. महत्त्वाचं काम असेल तरच
घराबाहेर पडावं, सुरक्षित राहण्यासाठी नाका-तोंडावर मास्क
लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा. कोविड -19 शी संबंधित अधिक
माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी
किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
·
शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी
राज्यातल्या ४८८ शासकीय शाळा 'आदर्श शाळा' म्हणून विकसित करण्याचा राज्य
मंत्रिमंडळाचा निर्णय,
·
विधान परिषदेवरच्या १२ जागांच्या शिफारशींवर निर्णय घेण्याची
महाविकास आघाडीच्या नेत्यांची राज्यपालांकडे मागणी
·
राज्यात चार हजार ४५६ नवे कोविड रुग्ण; मराठवाड्यात तीन जणांचा मृत्यू तर १८५ बाधित
·
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे
काम युद्धपातळीवर सुरू, नुकसानग्रस्तांना मदत करण्यास सरकार कटिबद्ध- महसूल राज्यमंत्री
अब्दुल सत्तार
·
प्रधानमंत्री मातृवंदना योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष
सप्ताहास प्रारंभ
आणि
·
भारत आणि इंग्लंड यांच्यात आजपासून चौथा कसोटी क्रिकेट सामना
****
शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी राज्यातल्या ४८८
शासकीय शाळा 'आदर्श शाळा' म्हणून
विकसित करण्याचा निर्णय, राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली
काल ही बैठक झाली. शाळांमधल्या भौतिक सुविधा तसंच शैक्षणिक गुणवत्तेचा विकास करून, आदर्श शाळांची
निर्मिती केली जाईल. स्वतंत्र शौचालय, पिण्याच्या पाण्याची
व्यवस्था, सुस्थितीतल्या वर्ग खोल्या, आकर्षक इमारत, क्रीडांगण,
क्रीडा साहित्य, ICT लॅब, वज्ञान प्रयोगसाळा, ग्रंथालय, यासारख्या सुविधांचा यात समावेश असेल. शैक्षणिक गुणवत्तेमध्ये विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी पोषक वातावरण उपलब्ध करून
देण्याचा प्रयत्न करण्यात येईल. पाठ्यपुस्तकांशिवायही अनेक बाबी शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवतील. या ४८८ “आदर्श शाळां” च्या विकासासाठी ४९४ कोटी रुपये निधी उपलब्ध करून
देण्यात येईल.
सार्वजनिक-खासगी भागीदारीच्या माध्यमातून राज्यात
नवीन वैद्यकीय महाविद्यालयं आणि अतिविशेषोपचार रुग्णालयं स्थापन करून, वैद्यकीय सुविधात वाढ करण्याचा निर्णयही कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आयोजित करण्यास मंत्रिमंडळानं
मान्यता दिली. १५ ऑगस्ट २०२३ पर्यंत हा अमृत
महोत्सव राज्यात आयोजित करण्यात येईल. यासाठी विविध समित्या देखिल स्थापन करण्यात
येत आहेत. या संदर्भात सांस्कृतिक कार्य विभागानं काल एका सादरीकरणाद्धारे माहिती दिली.
पुण्यालगतच्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात भारतरत्न राजीव गांधी
विज्ञान अविष्कार नगरी उभारण्याचा निर्णय काल राज्य मंत्रिमंडळानं
घेतला.
इंटरगव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज या संयुक्त राष्ट्राच्या संस्थेनं वातावरणीय बदलाच्या
अनुषंगानं
सादर केलेल्या अहवालाबाबत काल पर्यावरण विभागानं मंत्रिमंडळ
बैठकीत सादरीकरण केलं. राज्यात या वातावरण बदलाचे किती गंभीर परिणाम
होतील, याविषयी यावेळी माहिती देण्यात
आली.
****
विधान
परिषदेवरच्या १२ जागांसाठी केलेल्या नावाच्या शिफारशीला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
यांनी मान्यता द्यावी, अशी मागणी काल महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली. आमदारांच्या
नावाची शिफारस करुन आठ महिने लोटले असून, त्यावर अद्यापही निर्णय न झाल्यानं, काल मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब
थोरात यांनी, राज्यपालांची भेट घेतली. यावर तातडीनं निर्णय घ्यावा, अशी मागणी राज्यपालांकडे
केली असल्याचं उपमुख्यमंत्र्यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितलं.
****
राज्यात काल चार हजार ४५६ नवे कोविड रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यभरातल्या
कोविड बाधितांची एकूण संख्या ६४ लाख ६९ हजार ३३२ झाली
आहे. काल १८३ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला,
राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ३७ हजार ४९६ झाली असून, मृत्यूदर दोन पूर्णांक १२ शतांश टक्के झाला
आहे. काल चार हजार ४३० रुग्ण बरे झाले, राज्यात आतापर्यंत ६२ लाख ७७ हजार २३० रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून,
कोविडमुक्तीचा दर ९७ पूर्णांक शून्य तीन शतांश टक्के झाला
आहे. सध्या राज्यभरात ५१ हजार ७८
रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
मराठवाड्यात काल १८५ नवीन कोविड बाधितांची नोंद झाली, तर तीन जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांमध्ये
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या दोन, तर औरंगाबाद जिल्ह्यातल्या एका रुग्णाचा समावेश आहे.
बीड जिल्ह्यात ७९ नवीन कोविड बाधित रुग्ण आढळले. उस्मानाबाद जिल्ह्यात ५१,
औरंगाबाद ३०, लातूर १६, परभणी सात, तर नांदेड
आणि जालना जिल्ह्यात प्रत्येकी एक रुग्ण आढळला. हिंगोली जिल्ह्यात काल एकही नवा रुग्ण
आढळला नाही.
****
भारतानं १९७१ मधे पाकिस्तानवर युद्धात मिळवलेल्या विजयानिमित्त काढलेल्या
स्वर्णिम मशालीचं, काल सायंकाळी मुंबईत मुख्यमंत्री उद्धव
ठाकरे यांनी स्वागत केलं. राष्ट्रीय युध्द स्मारकातल्या निरंतर ज्योतीवरून प्रज्वलित केलेल्या चार
विजय मशाली देशभर परिक्रमा करत आहेत. १९७१ च्या
युध्दातल्या परमवीर चक्र, महावीर चक्र, मिळालेल्या सैनिकांच्या गावांमधूनही या
मशाली नेल्या जात आहेत.
****
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर
सुरू असून, नुकसानग्रस्तांना मदत करण्यास सरकार कटिबद्ध असल्याचं, महसूल तथा ग्रामविकास
राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी म्हटलं आहे. सोमवारी रात्री झालेल्या ढगफुटी सदृश्य
पावसामुळे सर्वाधिक नुकसान झालेल्या औरंगाबाद जिल्ह्यातल्या कन्नड, सोयगाव आणि जळगाव
जिल्ह्यातल्या चाळीसगाव तालुक्याला, काल सत्तार यांनी भेट दिली. त्यांनी नुकसानग्रस्तांशी
संवाद साधून त्यांना धीर दिला. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना माहिती दिली असून,
नुकसानीचे पंचनामे पूर्ण होताच नेमकं किती नुकसान झालं याची आकडेवारी समोर येईल, त्यानंतर
मुख्यमंत्री मदतीची घोषणा करतील, असं सत्तार यांनी सांगितलं.
राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय झाला असून, अनेक जिल्ह्यांना सतर्कतेचा
इशारा देण्यात आला आहे. त्याअनुषंगानं आपत्ती व्यवस्थापनानं सज्ज राहून खबरदारी घ्यावी,
कन्नड घाटात कोसळलेली दरड हटवून वाहतूक पूर्वपदावर आणण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना
करावी, तसंच कन्नड तालुक्यातल्या बिलदरी सिंचन प्रकल्पाच्या नुकसानदुरुस्ती साठी तत्काळ
प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश, सत्तार यांनी दिले.
****
बीड
जिल्ह्यात मागील दोन दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे काही तालुक्यात मोठ्या प्रमाणावर
नुकसान झालं आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे
हे आज बीड जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. जिल्ह्यातल्या मराठवाडी, शेडळा, सावरगाव, गंगावाडी,
तलवाडा, रामनगर, राजुरी मळा, पोखरी, घाटसावळी, चिंचवण, या नुकसानग्रस्त गावांची, पालकमंत्री
पाहणी करणार आहेत.
****
संततधार
पावसामुळे बुलडाणा जिल्ह्यातल्या खडकपूर्णा धरणात ८० पूर्णांक १५ टक्के पाणीसाठा झाला
असून, कोणत्याही क्षणी पाण्याचा विसर्ग केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठावरच्या
गावातील नागरिकांनी सावध राहण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
****
प्रधानमंत्री
मातृवंदना योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी केंद्र शासनानं येत्या सात तारखेपर्यंत
विशेष सप्ताहाचं आयोजन केलं आहे. योजनेचा लाभ जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी घ्यावा असं
आवाहन करण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत राज्यात २३ लाख ९२ हजार लाभार्थ्यांची नोंदणी
करण्यात आली आहे. या लाभार्थ्यांना एक हजार कोटी रूपयांपेक्षा जास्त निधीचं वितरण करण्यात
आलं आहे. माता अणि बालमृत्यू दर कमी करणं आणि माता आणि बालकांचं आरोग्य सुधारणं हा
या योजनेचा उद्देश आहे.
दरम्यान,
काल उस्मानाबाद इथल्या जिल्हा स्त्री रुग्णालयात मातृवंदन
सप्ताहाचा शुभारंभ झाला. या सप्ताहानिमित्त जिल्ह्यात विविध कार्यक्रम घेतले जाणार
असून, योजनेचा प्रचार आणि प्रसार केला जाणार आहे. एक जानेवारी २०१७ पासून जिल्ह्यात
या योजनेचा ३६ हजार महिलांना लाभ झाला आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या
नेतृत्वातल्या सरकारनं देशात तब्बल ६५ कोटी १५ लाख लोकसंख्येच्या लसीकरणाचा विक्रमी
टप्पा गाठला आहे. मात्र, राज्य सरकारच्या लसीकरणाबाबतच्या धोरण लकव्यामुळे लस मिळवण्यासाठी
राज्यातल्या जनतेची केविलवाणी धडपड सुरू असल्याची टीका, भाजपचे प्रदेश सरचिटणीस आमदार
अतुल सावे यांनी केली आहे. देशात ऑगस्टपूर्वी ६० कोटी लसीकरणाचा टप्पा गाठला जाणार
नाही, असा अपप्रचार काही वाहिन्यांवरून सुरू होता. मात्र, तब्बल ६५ कोटी १२ लाख लोकांचं
लसीकरण पूर्ण करून सरकारनं या अपप्रचाराला चोख उत्तर दिलं असल्याचं, आमदार सावे यांनी
म्हटलं आहे. परभणी जिल्ह्यातील आमदार मेघना साकोरे बोर्डीकर यांनीही राज्य सरकारच्या
लसीकरण धोरणावर टीका केली आहे.
****
महाआवास
अभियानाअंतर्गत विविध उपक्रम राबवण्यामध्ये उस्मानाबाद जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेनं
औरंगाबाद विभागात प्रथम क्रमांक पटकावला असून, केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत
औरंगाबाद विभागात द्वितीय क्रमांक पटकावला आहे. हे पुरस्कार उद्या तीन सप्टेंबरला औरंगाबाद
इथं विभागीय आयुक्त कार्यालयात वितरीत केले जाणार आहे. राज्य शासनानं २० नोव्हेंबर
२०२० ते पाच जून २०२१ या कालावधीत राज्यात महाआवास अभियान ग्रामीण राबवलं होतं. प्रधानमंत्री
आवास अभियान आणि राज्य पुरस्कृत विविध आवास अभियान अंतर्गत विविध उपक्रमांचा यात समावेश
होता.
****
औरंगाबादचा
नाथ समूह आणि परिवर्तन यांच्या संयुक्त विद्यमानं दिला जाणारा बी रघुनाथ पुरस्कार यंदा
किरण येले यांच्या तिसरा डुळा या कथासंग्रहाला जाहीर झाला आहे. येत्या सात सप्टेंबर
रोजी कवयित्री अनुराधा पाटील यांच्या हस्ते पुरस्काराचं वितरण होणार आहे.
****
भारत
आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांच्या कसोटी क्रिकेट मालिकेतला चौथा सामना आजपासून
ओव्हल मैदानावर सुरु होत आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी साडे तीन वाजता सामन्याला सुरुवात
होईल. मालिकेत दोन्ही संघ एक - एकनं बरोबरीत आहेत.
****
कोरोनाच्या
पार्श्वभूमीवर आरोग्याची काळजी घेऊनच हिंगोली जिल्ह्यात गणेशोत्सव साजरा करावा, तसंच
खबरदारी म्हणून कमीत कमी गणेश मूर्तीची स्थापना करावी, असं आवाहन, जिल्हाधिकारी जितेंद्र
पापळकर यांनी केलं आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात काल शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत
होते.
सर्दी,
पडसे झालेल्यांनी गणेश मंडळाच्या ठिकाणी जाणं टाळावं, प्रत्येक मंडळाच्या सदस्यांनी
आपल्यामुळे कोविडमध्ये वाढ होणार नाही याची खबरदारी घ्यावी, सर्वांनी जबाबदारीने गणेशोत्सव
साजरा करावा, असं आवाहन, जिल्हाधिकार्यांनी केलं आहे.
****
No comments:
Post a Comment