Friday, 3 September 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 03.09.2021 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 03 September 2021

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०३ सप्टेंबर २०२ दुपारी १.०० वा.

****

टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत नेमबाज अवनी लेखरा हिनं इतिहास रचत वैयक्तिक दुसरं पदक पटकावलं आहे. अवनीनं महिलांच्या ५० मीटर रायफल ३ पोझिशन एस एच वन स्पर्धेत कांस्य पदक मिळवलं. एकाच स्पर्धेत दोन पदकं जिंकणारी ती पहिली भारतीय खेळाडू आहे.

उंच उडी प्रकारामध्ये भारताच्या प्रवीण कुमारनं रौप्य पदक जिंकलं. पुरुष उंच उडी टी ६४ प्रकारामध्ये प्रवीणने ही कामगिरी केली. उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय क्रिडा मंत्री अनुराग ठाकुर यांनी या खेळाडुंचं अभिनंदन केलं आहे. पॅराऑलिम्पिक स्पर्धेत भारतानं आतापर्यंत १२ पदकं जिंकली आहेत.

****

देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत काल ७४ लाख ८४ हजार ३३३ नागरीकांचं लसीकरण करण्यात आलं. देशात आतापर्यंत या लसीच्या ६७ कोटी नऊ लाख ५९ हजार ९६ मात्रा देण्यात आल्या आहेत.

देशात काल नव्या ४५ हजार ३५२ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर ३६६ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. देशात या संसर्गानं आतापर्यंत चार लाख ३९ हजार ८९५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल ३४ हजार ७९१ रुग्ण बरे झाले, देशात आतापर्यंत तीन कोटी २० लाख ६३ हजार ६१६ रुग्ण, कोरोना विषाणू मुक्त झाले असून, सध्या तीन लाख ९९ हजार ७७८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

दरम्यान, महाराष्ट्र आणि केरळ या दोन राज्यांमध्ये दररोज आढळणाऱ्या नवीन कोविड बाधितांची संख्या सर्वाधिक असली, तरी चाचण्यांच्या तुलनेत बाधित आढळण्याचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये बरंच कमी आहे.

****

भारतातल्या सामान्य शेतकऱ्याकडे शेतीचं पारंपरिक ज्ञान असून कृषी क्षेत्रातल्या पदवीधरांनी त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकल्या पाहिजेत, असं आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केलं. दापोली इथल्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या ३९ व्या पदवीप्रदान समारंभात, दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित राहून ते बोलत होते. कृषी क्षेत्रांत नैसर्गिक शेती, पेटेंट, भौगोलिक मानांकन यांमुळे शेतकऱ्यांसाठी समृद्धीची नवनवी दालनं उघडत आहेत, अशावेळी कृषी स्नातकांनी नोकरीच्या मागे न लागता कृषी क्षेत्रात नवी क्रांती आणण्यासाठी प्रयत्न करावेत, असं राज्यपाल म्हणाले.

****

औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी निदर्शनास आणून दिलेल्या ग्रामीण भागातल्या आरोग्य सोयीसुविधा आणि समस्येबाबत, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं, ग्रामीण विकासाचे प्रधान सचिव यांना प्रतिवादी करण्याची परवानगी देत, नोटीस जारी केली. जलील यांनी यासंदर्भात दाखल केलेल्या याचिकेवर काल सुनावणी झाली. औरंगाबाद जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातल्या रुग्णालयात रुग्णांच्या उपचाराकरता फक्त एकच डॉक्टर असून, या व्यतिरिक्त इतर संवर्गातल्या वैद्यकीय रिक्त पदाबाबत सविस्तर माहिती न्यायालयात सादर करुन, ग्रामीण भागातल्या रुग्णांना होणाऱ्या आर्थिक आणि मानसिक त्रासाची व्यथा, या याचिकेत मांडण्यात आली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात असणाऱ्या रिक्त पदांची माहिती देण्याचे आदेशही, न्यायालयानं प्रधान सचिवांना दिले आहेत.

****

पंधराव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून राज्यातल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत यांना विकास कामांसाठी केंद्र शासनाकडून निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. हा निधी आयसीआयसीआय बँकेत खातं काढून त्याचं वितरण करण्याचे आदेश, राज्य शासनानं सर्व जिल्हा परिषदेला दिले आहेत. वित्त आयोगाच्या माध्यमातून जिल्हा परिषदेला मिळणाऱ्या निधीपैकी दहा टक्के रक्कम जिल्हा परिषद, दहा टक्के पंचायत समिती, तर ८० टक्के रक्कम, ग्रामपंचायतीला उपलब्ध करून देण्याचा नियम आहे.

****

कोरोना विषाणूच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी लस एकमेव उपाय असून, प्रत्येकानं लस घ्यावी असं आवाहन, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केलं आहे. सिल्लोड शहरातल्या नॅशनल हायस्कूलच्या प्रांगणात कोरोना लसीकरण अभियानाचा शुभारंभ केल्यानंतर ते काल बोलत होते. लसीकरणाची ही मोहीम सुरूच राहणार असून, येत्या १५ दिवसांत मतदारसंघात शंभर टक्के लसीकरण करण्याचा निर्धार सत्तार यांनी यावेळी व्यक्त केला. या लसीकरण मोहीमेसाठी आणखी ८० हजार लस बजाज कडून उपलब्ध करून देऊ अशी ग्वाही, जानकी देवी बजाज ग्रामविकास संस्थेचे अध्यक्ष सी. पी. त्रिपाठी यांनी यावेळी दिली.

****

पोलीस दलात राबविण्यात येणाऱ्या क्राईम ॲण्ड क्रिमिनल ट्रेकिंग नेटवर्क ॲण्ड सिस्टम - सीसीटीएनएस प्रणालीच्या अंमलबजावणीमध्ये, जालना पोलीस दलानं राज्यात तृतीय क्रमांक मिळवला आहे. तर या प्रणालीच्या अंमलबजाणीत जालना शहरातल्या सदर बाजार पोलीस ठाण्यानं प्रथम क्रमांक पटावकला आहे. पोलीस अधीक्षक विनायक देशमुख आणि अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख यांनी, सीसीटीएनएस प्रणालीचं काम करणाऱ्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा काल प्रशस्तीपत्र देऊन सन्मान केला.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 13.04.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 13 April 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...