Wednesday, 22 September 2021

Text – आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 22.09.2021 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२२ सप्टेंबर २०२ सकाळी ११.०० वाजता

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अमेरिका दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यात व्यापार, गुंतवणूक आणि सुरक्षा याविषयी चर्चा होण्याची शक्यता आहे. परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रींगला यांनी काल ही माहिती दिली. मूलतत्ववाद आणि दहशतवाद यासह अफगाणिस्तानमधल्या घडामोडी याबाबत मार्ग काढण्याविषयीसुद्धा दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा अपेक्षित आहे. २५ सप्टेंबर रोजी होणाऱ्या संयुक्त राष्ट्र सर्वसाधारण सभेच्या ७६ व्या सत्रात एका उच्चस्तरीय परिसंवादात पंतप्रधान बोलणार असल्याची माहिती श्रींगला यांनी दिली.

****

पावसावर अवलंबून असलेली शेती आणि हवामान बदलामुळे निर्माण झालेल्या आव्हानांचा सामना करून शेती उत्पादन तसंच उत्पादकता वाढवण्यासाठी राज्यांना मदत करण्यास केंद्र सरकार वचनबद्ध आहे, असं केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र तोमर यांनी सांगितलं. २०२१-२२ च्या रब्बी हंगामासाठीच्या राष्ट्रीय कृषी परिषदेचं दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन करताना ते काल बोलत होते. राज्यांनी पाणी, वीज आणि खतं योग्य पद्धतीनं वापरावीत तसंच जमिनीचा कस वाढवण्यासाठी उपयुक्त असलेल्या नॅनो युरिया या कमी किंमतीच्या खताचा वापर करावा असं आवाहन तोमर यांनी केलं.

****

औरंगाबाद शहराच्या विकासात भर टाकणाऱ्या विविध नव्या विकास प्रकल्पाच्या कामांचा आढावा, महापालिका प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी काल घेतला. विकासकामं सूरू करण्यासंदर्भात काही अडचणी येत असल्यास त्या तातडीनं सोडवून, प्रस्तावित प्रकल्पांची कामं दिलेल्या कालावधीत पूर्ण करण्याचे आदेशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

****

लातूर तालुक्यातल्या मौजे रुई दिंडेगाव आणि मौजे ढोकी या गावांमध्ये अटल भूजल योजनेअंतर्गत प्रस्तावित जलसुरक्षा आराखड्यासाठी क्षेत्रीय सर्वेक्षण सुरु करण्यात आलं आहे. वरिष्ठ भूवैज्ञानिक एस.बी.गायकवाड यांनी ही माहिती दिली.

****

मराठवाड्यात काल १२२ नवीन कोविड बाधितांची नोंद झाली, तर पाच रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांमध्ये बीड जिल्ह्यातल्या तीन, तर औरंगाबाद जिल्ह्यातल्या दोन रुग्णांचा समावेश आहे.

****

No comments: