Thursday, 23 September 2021

Text: आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 23.09.2021 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 23 September 2021

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २३ सप्टेंबर २०२ सकाळी ७.१० मि.

****

देशात १८ वर्षांवरील सर्वांना कोविड-१९ प्रतिबंधक लस मोफत देण्यात येत आहे. तरुणांना आमचा सल्ला आहे की, त्यांनी ही लस अवश्य घ्यावी आणि इतरांना लसीकरणासाठी मदत करावी. कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप संपलेला नाही. त्यामुळे सर्वांनी संपूर्ण काळजी घेणं आवश्यक आहे. महत्त्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं, सुरक्षित राहण्यासाठी नाका-तोंडावर मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

****

·      महानगरपालिका आणि नगरपरिषदांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धत सुरु करण्याचा राज्य सरकारचा निर्णय

·      नागरी स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये ५० टक्के आरक्षण मर्यादेतच इतर मागास प्रवर्गासाठी २७  टक्क्यांपर्यंत आरक्षण ठेवण्याचा आदेश राज्यपालांकडे मंजुरीसाठी पुन्हा पाठवण्यास मंत्रिमंडळाची मान्यता

·      किमान आधारभूत दराने खरेदी केलेल्या कापसाचे चुकारे शेतकऱ्यांना वेळेत अदा करण्यासाठीच्या कापूस पणन महासंघाच्या ६०० कोटी रुपयांच्या कर्जाला राज्य शासनाची हमी

·      कोविड लसीकरणाचा वेग वाढवण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

·      राज्यात तीन हजार, ६०८ नवे कोविड रुग्ण; मराठवाड्यात आठ जणांचा मृत्यू तर १३५ बाधित

आणि

·      मराठवाड्यात पावसाचा जोर कायम, निम्न दुधना, येलदरी, सिद्धेश्वर, माजलगाव, मांजरा, पैनगंगा, मानार आणि विष्णुपुरी प्रकल्प पूर्ण भरले

****

महानगरपालिका आणि नगरपरिषदांमध्ये एकसदस्यीय प्रभाग पध्दतीऐवजी बहुसदस्यीय प्रभाग पद्धत सुरु करण्याचा निर्णय, काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार, महानगरपालिका कार्यक्षेत्रात प्रत्येक प्रभागातून शक्य असेल तोवर तीन पालिका सदस्य,  मात्र  दोन पेक्षा कमी नाही आणि चार पेक्षा अधिक नाही, इतकी सदस्य संख्या निर्धारित करण्यासाठी अधिनियमात सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

 

नागरी स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये नागरिकांच्या इतर मागास प्रवर्गासाठीचं आरक्षण २७  टक्क्यांपर्यंत ठेवण्यास आणि एकूण आरक्षणाचं प्रमाण ५०  टक्क्यांपेक्षा अधिक होणार नाही अशी सुधारणा करण्यासही मंत्रिमंडळानं मान्यता दिली. यासंदर्भातला आदेश मंजुरीसाठी राज्यपालांकडे पुन्हा पाठवण्यात येणार आहे.

 

महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाद्वारे हंगाम  २०२० -२१  मध्ये किमान आधारभूत दराने खरेदी करण्यात आलेल्या कापसाचे चुकारे शेतकऱ्यांना वेळेत अदा करण्यासाठी युको बँकेकडून सहा टक्के व्याजदरानं कापूस पणन महासंघानं घेतलेल्या ६०० कोटी रुपयांच्या कर्जास शासन हमी देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. याबरोबरच ६००  कोटी शासन हमीवर कापूस पणन महासंघास राज्य शासनास अदा करावे लागणारे हमीशुल्क माफ करण्यास देखील, यावेळी मान्यता देण्यात आली.

 

महाराष्ट्राचं साखर उद्योगातलं स्थान विचारात घेता जागतिक दर्जाचं साखर संग्रहालय पुणे इथं उभारण्याच्या प्रस्तावास मंत्रिमंडळानं मान्यता दिली.

राज्यातल्या सर्व सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यास ३१  मार्च २०२२  पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.

 

राज्यात कालपर्यंत कोविड प्रतिबंधक लसीच्या सुमारे ३६ लाख मात्रा शिल्लक असून, ज्या जिल्ह्यांत कमी मात्रा दिल्या असतील, त्यांनी लसीकरणाचा वेग मोठ्या प्रमाणावर वाढवावा असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिले. राज्य लोकसेवा आयोगामार्फत सरळ सेवा भरतीसाठी काही विभागांकडून आयोगाला अद्यापही मागणीपत्र न सादर झाल्याची मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतली.

****

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं कोविडमुळे मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना ५० हजार रुपयांच्या मदतीची शिफारस केली आहे, असं केंद्र सरकारनं काल सर्वोच्च न्यायालयाला सांगितलं. कोविडमुळे मृत्यू झाला असल्याचं प्रमाणित झाल्यानंतर राज्य सरकार म्हणजेच राज्य आपत्ती निवारण निधीद्वारे ही रक्कम दिली जाईल. भविष्यातही कोविडमुळे मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना ही भरपाई दिली जाईल, असं केंद्र सरकारनं सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे.

****

प्रत्येक जिल्ह्यातल्या ऊसतोड कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांची नोंदणी ग्रामसेवकामार्फत करण्याबाबतचा, तसंच त्यांना ओळखपत्र देण्याचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ प्रत्यक्ष ऊसतोड कामगारांना देता यावा, यासाठी ही नोंदणी करण्यात येत आहे. ही नोंदणी यावर्षीच्या हंगामात कामगार स्थलांतरीत होण्यापूर्वीच केली जावी, अशी स्पष्ट सूचना सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी केली आहेत.

****

राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसच्या  उमेदवार रजनी पाटील तसंच भारतीय जनता पक्षाचे उमेदवार संजय उपाध्याय यांनी काल आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. आज या अर्जांची छाननी होणार असून, चार ऑक्टोबरला मतदान आणि मतमोजणी होणार आहे.

****

राज्यातलं महाविकास आघाडीचं सरकार हे मराठवाडा विरोधी असल्याची टीका भारतीय जनता पक्षाचे नेते संभाजी पाटील निलंगेकर यांनी केली आहे. ते काल औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठवाड्याचा निधी पळवला, असं ते म्हणाले. मराठवाड्याला जिल्ह्यांच्या नियोजन आराखड्यासाठी सहाशे कोटी रुपये, आणि उपमुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्याला फक्त रस्त्यांच्या कामासाठी अठराशे कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधलं. शेतकऱ्यांना कोणताही निधी या सरकारनं दिलेला नाही, मुख्यमंत्र्यांनी मराठवाडा मुक्ती संग्रामदिनी १७ सप्टेंबरला केलेल्या विकास कामांच्या घोषणांमध्ये मराठवाड्याच्या तोंडाला पाने पुसल्याची टीका, निलंगेकर यांनी केली.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ८१ वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.

****

राज्यात काल तीन हजार, ६०८ नवे कोविड बाधित रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ६५ लाख, ३१ हजार, २३७ झाली आहे. काल ४८ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ३८ हजार ६६४ झाली असून, मृत्यूदर दोन पूर्णांक १२ शतांश टक्के झाला आहे. काल चार हजार २८५ रुग्ण बरे झाले, राज्यात आतापर्यंत ६३ लाख ४९ हजार २९ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९७ पूर्णांक २१ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या ३९ हजार, ९८४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

मराठवाड्यात काल १३५ नवीन कोविड बाधितांची नोंद झाली, तर आठ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांमध्ये औरंगाबाद आणि बीड जिल्ह्यातल्या प्रत्येकी तीन, तर उस्मानाबाद आणि हिंगोली जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात काल ५३ नवे रुग्ण आढळले. बीड जिल्ह्यात ४२, लातूर २१, औरंगाबाद १४, जालना तीन, तर परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात प्रत्येकी एक रुग्ण आढळला. नांदेड जिल्ह्यात काल कोविड संसर्ग झालेला एकही रुग्ण आढळला नाही.

****

उस्मानाबाद जिल्ह्यातल्या कोल्हापुरी बंधाऱ्यांचं उच्च पातळी बंधाऱ्यामध्ये रुपांतर करण्यात येणार आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मृद आणि जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी काल मुंबई इथं मंत्रालयात झालेल्या आढावा बैठकीत ही माहिती दिली. जिल्ह्यातल्या तेरणा, मांजरा आणि बेनीतुरा या तीनही नद्यांवरील २४ ठिकाणांचं सर्वेक्षण करुन, याची तीन प्रकारात विभागणी करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच वडगाव तालुक्यातल्या लोहारा इथं साठवण तलावाचं काम तत्काळ सुरु करण्याचे आदेशही, गडाख यांनी संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी दिले.

****

परभणी तालुक्यातल्या बाभळगाव इथं नवीन औद्योगिक वसाहत स्थापन करण्यासाठी, राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडून मंजूरी मिळाली आहे. आमदार डॉ.राहुल पाटील यांनी ही माहिती दिली. यासाठी भूसंपादन प्रक्रियेची नोटीस शासनातर्फे जारी करण्यात आली असून, येत्या सहा महिन्यात या नवीन औद्योगिक वसाहतीच्या कामाला सुरूवात होणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली.

दरम्यान, परभणी जिल्हा आणि सत्र न्यायालयाच्या नवीन इमारतीसाठीची प्रक्रिया पूर्ण झाली असून, या इमारतीसाठी लागणारा निधी लवकरच उपलब्ध करून काम सुरू करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिली आहे. आमदार पाटील यांनी काल मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन, जिल्ह्यातले काही प्रमुख प्रलंबीत प्रश्न देखील मांडले.

****

जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं काल दुचाकी चोरी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीतल्या दोघांना अटक केली. पोलिसांनी संशयितांकडून चोरीच्या २६ दुचाकी जप्त केल्या असून त्यांच्या अन्य साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत.

****


वीजचोरीची प्रलंबित प्रकरणं निकाली काढण्यासाठी तसंच सामोपचारानं तडजोड घडवून वाद मिटवण्यासाठी, राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमानं, औरंगाबाद तसंच वैजापूर इथं जिल्हा आणि सत्र न्यायालयांमध्ये २५ सप्टेंबर २०२१ रोजी एकाच दिवशी राष्ट्रीय लोकअदालतीचं आयोजन करण्यात आलं आहे. वीजग्राहकांनी या लोकअदालतीचा लाभ घ्यावा, असं आवाहन महावितरणतर्फे करण्यात आलं आहे.

****

नांदेड जिल्ह्यात अनुसूचित जाती आणि नवबौध्द शेतकऱ्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना आणि बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना राबवण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी या योजनेसाठी महा-डीबीटी च्या संकेतस्थळावर अर्ज विहीत नमुन्यात करावा असं आवाहन जिल्हा परिषदेच्या कृषीविकास अधिकाऱ्यांनी केलं आहे.

****

मराठवाड्यात अनेक भागात पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ होत आहे. निम्न दुधना, येलदरी, सिद्धेश्वर, माजलगाव, मांजरा, पैनगंगा, मानार आणि विष्णुपुरी हे प्रकल्प पूर्ण भरले आहेत.

नाशिक जिल्ह्यातल्या गंगापूर धरणातून काल मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. यामुळे गोदावरी नदीला पूर आला आहे. जिल्ह्यातल्या दारणा धरणातून दोन हजार ७०८ घनफूट प्रतिसेकंद वेगानं, कडवा धरणातून ४२४ तर नांदूर मधमेश्वर इथून, तीन हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. या भागातल्या २२० गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात पैठण इथल्या जायकवाडी धरणात पाण्याची आवक वाढली असून, सध्या धरणाची पाणी पातळी सुमारे ७५ टक्के झाली आहे.

हिंगोली, नांदेड आणि यवतमाळ जिल्हयासाठी महत्वाच्या असलेल्या इसापूर धरणाचे सात दरवाजे सुमारे अर्धा मीटर उघडण्यात आले आहेत. यातून सुमारे १२ हजार घनफुट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग पैनगंगा नदीपात्रात करण्यात येत आहे. नदीकाठच्या गावांनी सतर्क राहण्याच्या इशारा प्रकल्प कार्यालयानं दिला आहे.

****

जालना जिल्ह्यात काल दुपारनंतर जोरदार पाऊस झाला. जिल्ह्यात सलग तीन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे लघु आणि मध्यम प्रकल्पतल्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. जालना शहराला पाणीपुरवठा होत असलेला घाणेवाडी जलाशय पूर्ण क्षमतेनं भरल्यानं पाणी सांडव्यावरून ओसंडून वाहत आहे. अतिवृष्टीमुळे घनसावंगीसह अंबड तालुक्यातल्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. जिल्ह्यातल्या आठ मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली.

हिंगोली जिल्ह्यात दोन दिवसांपासून काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस होत आहे. हिंगोली तालुक्यातल्या पिंपरखेड शिवारात ओढ्याला पूर आल्यानं शेतकरी रामराव देशमुख हे बैल गाडीसह पुराच्या पाण्यात वाहून गेले. यात दोन बैल आणि एका गाईचा मृत्यू झाला.

उस्मानाबाद शहरात काल दिवसभर पाऊस झाला. या पावसामुळे जिल्ह्यात काढणीला आलेल्या खरीप पिकांचं नुकसान होत आहे.

परभणी जिल्ह्याच्या गंगाखेड तालुक्यात राणीसावरगाव परिसरात काल संध्याकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. गेल्या पावसामुळे हैराण झालेला शेतकऱ्यांकडून, या पावसात सर्वच पीक हातचं जाण्याची भीती वर्तवली जात आहे. 

****

हवामान - येत्या २४ आणि २५ सप्टेंबरला बंगालच्या खाडीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण होवून मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी राज्यात जोरदार पावसाची शक्यता मुंबईच्या हवामान विभागाच्या ज्येष्ठ वैज्ञानिक डॉक्टर शुभांगी भुटे यांनी वर्तवली आहे.

****

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 21.08.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 21 August 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी ...