Thursday, 23 September 2021

Text – आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 23.09.2021 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२३ सप्टेंबर २०२ सकाळी ११.०० वाजता

****

सणासुदीच्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी सर्वांनी काळजी घेण्याचा सल्ला आरोग्य मंत्रालयानं दिला आहे. आगामी तीन महिने अत्यंत महत्त्वाचे असून या काळात कोरोना नियमांबाबत हलगर्जीपणा करून चालणार नाही असं आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी काल ट्वीटरवर आयोजित कोविड चर्चा या विशेष कार्यक्रमात सांगितलं. सण साजरे करताना कोरोना नियमांचा विसर पडू देऊ नका; नागरिक आणि सरकारच्या एकत्रित प्रयत्नांतूनच कोरोना विरुद्धची लढाई जिंकता येईल, असं ते म्हणाले. 

****

संपूर्ण जग कोरोनाच्या सावटातून बाहेर येत असल्याचे संकेत मिळत आहेत, असं आशादायक प्रतिपादन रिझर्व बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी केलं आहे. मुंबईत अखिल भारतीय व्यवस्थापन संघटनेच्या ४८व्या राष्ट्रीय परिषदेत ते बोलत होते. अधिक मजबूत, सर्वसमावेश आणि शाश्वत अर्थव्यवस्था तयार करण्यासाठी नियोजन करण्याची हीच योग्य वेळ आहे, असं दास म्हणाले.

****

राज्यात महिला पोलिसांचे दैनंदिन कामाचे तास कमी करुन आठ तासांची पाळी करण्यात आली आहे. महिला, आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी ही माहिती दिली. महिला कर्मचाऱ्यांना कौटुंबिक जबाबदाऱ्याही सांभाळाव्या लागतात म्हणून त्यांना १२ तासांऐवजी आठ तासांची पाळी देण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत होती.

****

राज्यातल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘शरद शतम्’ आरोग्य कवच विमा योजना लागू करण्याकरता, राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत उच्च स्तरीय समिती गठीत करण्यात आल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. ज्येष्ठ नागरिकांचं वैद्यकीय सर्वेक्षण, तपासणी, निदान झाल्यानंतर अभिसरण करण्याची कार्यपद्धती निश्चित करण्याची जबाबदारी या समितीवर सोपवण्यात आली आहे.

****

बीड जिल्ह्यात केज-बीड महामार्गावर काल मध्यरात्रीच्या सुमारास मोटारसायकलवरून घरी निघालेल्या प्रशिक्षणार्थी पोलिसांसह दोन तरुणांच्या गाडीला अज्ञात वाहनानं जोराची धडक दिल्यानं झालेल्या अपघातात दोन तरुण जागीच ठार झाले, तर पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे. जखमी पोलिस कर्मचाऱ्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

****

No comments: