Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 17 October 2021
Time 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १७
ऑक्टोबर
२०२१ सकाळी ७.१० मि.
****
देशात १०० कोटी कोविड प्रतिबंधक लस देण्याचं उद्दीष्ट लवकरच पूर्ण होत आहे. ही उद्दीष्टपूर्ती करण्यामध्ये
योगदान देणारे डॉक्टर, परिचारिका आणि इतरांना आकाशवाणीचा सलाम.
कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्यापही कायम आहे, हे विसरू नका. लसीचे दोन्ही डोस वेळेवर घ्याच, आणि इतरांनाही लस घेण्यासाठी मदत करा. आगामी सणासुदीच्या
काळात काळजी घ्या. मास्क वापरा, सुरक्षित अंतर राखा, हात, चेहरा वारंवार स्वच्छ धुवा. कोविड -19 शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११-
२३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य
स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
**
कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेअंतर्गत, देशभरात ९७ कोटी २३ लाखांहून अधिक नागरिकांना
लस; राज्यात ९ कोटी लसीकरणाचा टप्पा पार
**
राज्यात नवे एक हजार ५५३ कोविडग्रस्त;
मराठवाड्यात ५४ बाधितांची नोंद
**
तपास यंत्रणांचा गैरवापर करून राज्यातलं सरकार अस्थिर करण्याचा केंद्राचा
प्रयत्न-खासदार शरद पवार यांचा आरोप
**
देशातला दहशतवाद संपवण्यासाठी मोदी सरकार कटिबद्ध -भाजप राष्ट्रीय सचिव सुनील देवधर
** औरंगाबाद इथल्या एमजीएम
संस्थेकडून कृषीततज्ज्ञ विजयअण्णा बोराडे
आणि चित्रकार मुरली लाहोटी यांना महात्मा गांधी मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर
** लातूर इथं घरगुती वापराच्या गॅसचं वितरण करणाऱ्या पाईपलाईन
प्रकल्पाचं भूमिपूजन
आणि
**
‘सॅफ’ अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेत भारत आठव्यांदा विजेता
****
देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण
मोहिमेअंतर्गत, कालपर्यंत लसीच्या ९७ कोटी
२३ लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं ही
माहिती दिली. केंद्रानं राज्य आणि केंद्रशासित
प्रदेशांना कोविड प्रतिबंधक लसीच्या १०१ कोटींपेक्षा अधिक मात्रा उपलब्ध करुन दिल्या आहेत. राज्यांजवळ सध्या कोविड लसीच्या ११
कोटी १२ लाखाहून अधिक मात्रा पोहचवण्यात आल्या असून, सरकार पूर्ण देशभरात लसीकरण अभियान
वेगानं राबवत असल्याचं आरोग्य मंत्रालयानं सांगितलं. दरम्यान, कोविड प्रतिबंधात्मक
लसीकरणाच्या जनजागृतीसाठी तयार करण्यात आलेलं गीत आरोग्यमंत्री मनसुख मांडविया आणि
पेट्रोलिअम मंत्री हरदीप सिंह यांनी काल प्रसिद्ध केलं. प्रसिद्ध गायक पद्मश्री कैलास
खेर यांनी गीत गायलं आहे. हे फक्त शासकीय अभियान नसून एक जन-आंदोलन असल्याचं पुरी यांनी यावेळी नमूद केलं.
****
राज्यात आतापर्यंत ९ कोटीहून अधिक नागरिकांचं कोविड लसीकरण झालं
आहे. यामध्ये सुमारे पाच कोटी ९४ लाखांवर नागरिकांना पहिली मात्रा तर, तर सुमारे अडीच
कोटी नागरिकांना दोन्ही मात्रा देण्यात आल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
कोविड लसीकरणात औरंगाबाद महापालिकेनं नऊ लाख नागरिकांच्या कोविड
लसीकरणाचा टप्पा ओलांडला आहे. यात पाच लाख ७६ हजार नागरिकांनी लसीची पहिली मात्रा घेतली
आहे. तर ३ लाख ३२ हजार नागरिकांनी दोन्ही मात्रा घेतल्या आहेत. आतापर्यंत ९ लाख ९ हजार
जणांचं लसीकरण झालं असल्याचं मनपा आरोग्य विभागाच्या अहवालात म्हटलं आहे. शहरात सध्या
पन्नासहून अधिक केंद्रांवर लसीकरण सुरू आहे.
****
कोरोना विषाणू प्रतिबंधक लसीकरणात
उस्मानाबाद जिल्ह्याने काल रोजी दहा लाखांचा टप्पा ओलांडला.
जिल्ह्यातील सात लाख १७ हजार ६२० नागरिकांना पहिली मात्रा देण्यात
आली असून दोन लाख ८४ हजार ७२३ नागरिकांना कोविड लसीच्या दोन्हीही मात्रा देण्यात आल्या आहेत. कालपर्यंत एकूण दहा लाख दोन हजार ३४० नागरीकांचं लसीकरण पूर्ण झालं असल्याची माहिती जिल्हा लसीकरण
अधिकारी डॉक्टर कुलदीप मिटकरी यांनी दिली.
****
राज्यात काल एक हजार ५५३ नवे कोरोना
विषाणू बाधित रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यभरातल्या कोविड
बाधितांची एकूण संख्या ६५ लाख ८९ हजार, ९८२ झाली आहे. काल २६ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू
झाला. राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ३९ हजार ७६० झाली असून, मृत्यूदर दोन पूर्णांक १२ शतांश टक्के झाला आहे. काल एक हजार ६८२ रुग्ण बरे झाले, राज्यात
आतापर्यंत ६४ लाख १६ हजार ९९८ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून,
कोविड मुक्तीचा दर ९७ पूर्णांक ३८ शतांश टक्के
झाला आहे. राज्यात सध्या २९ हजार ६२७
रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
मराठवाड्यात काल ५४ नवीन कोविड बाधितांची नोंद झाली. बीड १२, उस्मानाबाद
१९, औरंगाबाद नऊ, जालना आठ, तर लातूर जिल्ह्यात सहा रुग्ण
आढळले. नांदेड, परभणी तसंच हिंगोली
जिल्ह्यात काल कोविड संसर्ग झालेला एकही रुग्ण आढळला नाही. विभागात काल कोविड संसर्गामुळे कोणाचाही मृत्यू
झाला नाही.
****
परभणी शहरात जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार
आठवडी बाजार, धार्मिक स्थळे, विविध सेवा, आस्थापना, दुकाने सुरू ठेवण्यासाठी मास्कचा
वापर आणि सामाजिक अंतर इत्यादी नियमांच्या अधीन राहून मान्यता देण्यात आली आहे. नागरिकांनी
सार्वजनिक ठिकाणी या नियमांचं पालन करावं, अन्यथा साथरोग नियंत्रण तरतुदीनुसार कारवाई
करण्यात येईल असा इशारा महानगरपालिकेचे आयुक्त देविदास पवार यांनी दिला आहे.
****
कोरोना विषाणू संसर्गामुळे मरण पावलेल्या व्यक्तींच्या
वारसांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधी मधून ५० हजार रुपये अर्थसहाय्य देण्याचे निर्देश
सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार नांदेड जिल्ह्यात जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती
गठीत करण्यात आली आहे. वारसांना काही प्रशासकीय अडचणी किंवा तक्रार असेल तर ही समिती त्यांचं निवारण करेल.
****
तपास यंत्रणांचा गैरवापर करून राज्यातलं सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केंद्र
सरकार करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे.
ते काल पिंपरी चिंचवड इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. सक्तवसुली संचालनालयाचा
सातत्याने वापर करून लोकप्रतिनिधींना दडपणात ठेवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं,
पवार म्हणाले. माजी पोलीस आयुक्तांच्या तक्रारीनंतर अनेकांची चौकशी झाली. मात्र, त्याच आयुक्तांवर वेगवेगळे
आरोप होऊनही त्यांची चौकशी नाही, ते आज गायब आहेत, त्यांना शोधण्यासाठी केंद्र
सरकारनं कोणते प्रयत्न केले
असा प्रश्न पवार यांनी उपस्थित केला.
****
देशातला
दहशतवाद संपवण्यासाठी मोदी सरकार कटिबद्ध असल्याचं भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सचिव
सुनील देवधर यांनी म्हटलं आहे. औरंगाबाद इथं मराठवाडा युवक विकास मंडळ आयोजित प्रल्हादजी
अभ्यंकर व्याख्यानमालेत 'जागतिक दहशतवाद आणि भारत' या विषयावर देवधर यांनी काल पहिलं
पुष्प गुंफलं. पूर्वीच्या सरकारांनी मतपेटीच्या दबावाखाली दहशतवादी कारवाया थांबवण्यासाठी
भूमिका घेतली नाही, बदलता भारत मात्र सक्षम नेतृत्वाच्या हातात असल्याचं, देवधर यांनी
नमूद केलं. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांच्या हस्ते काल या व्याख्यानमालेचे
उद्घाटन झालं. या व्याख्यानमालेत आज 'बदलत्या हवामानाचं आव्हान' या विषयावर खगोलशास्त्र
आणि पर्यावरण अभ्यासक मयुरेश प्रभुणे हे दुसरं पुष्प गुंफणार आहेत.
****
देशाला उद्योजकांची मोठ्या
प्रमाणात गरज असतांना, आपल्याकडे मात्र उद्योजक तयार करणारी महाविद्यालयं नाहीत, अशी खंत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी
व्यक्त केली आहे. नागपूरच्या वनराई
फाउंडेशनच्यावतीने कमानी ट्यूब्जच्या अध्यक्ष पद्मश्री कल्पना सरोज यांना
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार काल प्रदान करण्यात
आला, त्यावेळी गडकरी बोलत होते. पाच लाख रुपये, शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरुप आहे.
****
औरंगाबाद इथल्या महात्मा गांधी मिशन संस्थेने महात्मा गांधी
मराठवाडा भूषण पुरस्कारांची घोषणा केली आहे.
कृषी आणि जलसंधारणाच्या बाबतीत भरीव योगदान देणारे
विजयअण्णा बोराडे आणि जगविख्यात चित्रकार मुरली लाहोटी यांची या पुरस्कारांसाठी
निवड करण्यात आली आहे. सन्मानचिन्ह आणि ५० हजार रुपये रोख असं
या पुरस्काराचं स्वरुप आहे. महात्मा गांधी मराठवाडा भूषण समितीचे
अध्यक्ष प्रताप बोराडे यांनी काल औरंगाबाद इथं पत्रकार
परिषदेत ही माहिती दिली. सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात
उत्तुंग कामगिरी करणाऱ्या मूळच्या मराठवाड्यातल्या दोन
व्यक्तींना दरवर्षी हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याचं बोराडे यांनी
सांगितलं. ज्येष्ठ समाजसेवक गिरीष गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत
उद्या सकाळी ११ वाजता संस्थेच्या रुक्मिणी सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे.
****
पाईपलाईन
द्वारे गॅस मिळण्याच्या व्यवस्थेमुळे लातूर शहरातल्या उद्योगांना चालना मिळेल, असा
विश्वास, जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी व्यक्त केला आहे. ते काल लातूर महानगरपालिके
अंतर्गत अशोक गॅस एजन्सीच्या सीएनजी पाईपलाईनचं भूमिपूजन झाल्यानंतर बोलत होते. पाईपलाईनद्वारे
घरगुती गॅसची सुविधा असलेलं लातूर हे मराठवाड्यातलं पहिलं शहर ठरणार असल्याबद्दल देशमुख
यांनी महापालिकेचं अभिनंदन केलं. औसा तालुक्यात इंधनावर आधारित नवीन औद्योगिक वसाहत
स्थापण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचं देशमुख यांनी सांगितलं.
****
राज्यात
नेहरु युवा केंद्र संघटनेतर्फे मोठ्या प्रमाणात स्वच्छ भारत अभियान चालवण्यात येत आहे.
या अभियानाअंतर्गत या महिन्याच्या अखेरपर्यंत पाच लाख १७ हजार किलोहून अधिक कचरा एकत्र
केला जाणार आहे. गेल्या १ तारखेपासून सुरु झालेल्या या अभियानात महाराष्ट्र आणि गोव्यातल्या
३७ जिल्ह्यांमधले नागरिक सहभागी झाले आहेत. अभियाना अंतर्गत प्रत्येक जिल्ह्यातून सर्वोत्कृष्ट
कामगिरी करणाऱ्या तीन जणांची निवड केली जाणार आहे. निवड झालेल्यांना राष्ट्रपती, उपराष्ट्रपती,
पंतप्रधान आणि ऑलिम्पिक खेळाडूंना भेटण्याची संधी दिली जाणार आहे.
****
भारतीय
संघाने ‘सॅफ’ अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धा जिंकली आहे. काल मालदीवची राजधानी माले इथं
झालेल्या अंतिम सामन्यात भारतानं नेपाळवर ३-० अशी मात केली. या स्पर्धेतलं भारताचं
हे आठवं विजेतेपद आहे.
****
भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक म्हणून माजी कर्णधार राहुल
द्रविड यांची भारतीय क्रिकेट नियामक मंडळ बीसीसीआयनं नियुक्ती केली आहे. सध्याचे प्रशिक्षक
रवी शास्त्री यांचा कार्यकाळ टी-२० विश्वचषक स्पर्धेनंतर संपणार आहे. त्यानंतर द्रविड
पदभार स्वीकारणार आहेत. याशिवाय पारस म्हांब्रे यांची गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून तर
विक्रम राठोड यांची संघाच्या फलंदाजीचे प्रशिक्षक म्हणून नियुक्ती मंडळानं कायम ठेवली
आहे, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर. श्रीधर यांच्या
बदलीबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नसल्याचं याबाबतच्या वृतात म्हटलं
आहे.
****
तुळजाभवानी मातेची कोजागिरी पोर्णिमेला होणारी यात्रा यंदा रद्द करण्यात आली
आहे. कोविड साथीच्या पार्दुभवामुळे यंदा इतर राज्यातील तसंच इतर जिल्ह्यातील
नागरिकांना १८ ते २० ऑक्टोबर दरम्यान उस्मानाबाद जिल्हयात
प्रवेशास मनाईचा आदेश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी काढला आहे. या
आदेशाअन्वये पोलिस प्रशासनानं जिल्ह्यातल्या काही मुख्य मार्गावरील वाहतुकीतही बदल
केला आहे.
****
मराठवाड्यात
काही ठिकाणी कालपासून पाऊस सुरू आहे. औरंगाबाद, जालना तसंच नांदेड
जिल्ह्यात रात्रीपासून सर्वदूर पाऊस सुरू आहे. परभणीतही काल
दुपारी पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. दरम्यान,
ओडिशाच्या किनाऱ्याकडून आलेल्या वाऱ्यांमुळे
आणखी तीन दिवस विदर्भात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता असून,
मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातही तुरळक सरींचा अंदाज हवामन विभागानं वर्तवला
आहे.
//************//
No comments:
Post a Comment