Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 13 October 2021
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १३ ऑक्टोबर
२०२१ सायंकाळी ६.१०
****
देशात
१०० कोटी कोविड प्रतिबंधक लस देण्याचं उद्दिष्ट लवकरच पूर्ण होत आहे. ही उद्दिष्टपूर्ती करण्यामध्ये
योगदान देणारे डॉक्टर, परिचारिका आणि इतरांना 'आकाशवाणीचा सलाम'. कोरोना विषाणू संसर्गाचा
धोका अद्यापही कायम आहे, हे विसरू नका. लसीचे दोन्ही डोस वेळेवर
घ्याच, आणि इतरांनाही लस घेण्यासाठी
मदत करा. आगामी सणासुदीच्या काळात काळजी
घ्या. मास्क वापरा, सुरक्षित अंतर राखा, हात आणि चेहरा वारंवार
स्वच्छ धुवा. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि
मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६
१२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
** अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांसाठी १० हजार कोटीं रुपये अर्थसहाय्य;
कमाल दोन हेक्टर क्षेत्रासाठी मदत मिळणार
** पदोन्नतीमधील आरक्षण कायम ठेवण्याबाबत सर्वोच्च न्यायालयात
बाजू मांडण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
** महाविद्यालयातले नियमित वर्ग पुढच्या बुधवारी, २० ऑक्टोबरपासून
सुरु करण्यास मान्यता
आणि
** देगलूर विधानसभा पोट निवडणूकीतून नऊ जणांची माघार; रिंगणात
आता १२ उमेदवार
****
अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांसाठी १० हजार कोटीं रुपयांचं अर्थसहाय्य
देण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत जिरायती शेतीसाठी १० हजार रुपये
प्रति हेक्टर, बागायतीसाठी १५ हजार रुपये
प्रति हेक्टर, तर बहुवार्षिक पिकांसाठी २५ हजार रुपये प्रति हेक्टर प्रमाणे मदत दिली
जाणार आहे. जास्तीत जास्त २ हेक्टर मर्यादेत ही मदत करण्यात येणार आहे.
****
पदोन्नतीमधील आरक्षण कायम ठेवण्याबाबत सर्वोच्च न्यायालयात बाजू
मांडण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. मागासवर्गीयांची पदोन्नती आणि
सरळ सेवेतील प्रतिनिधींच्या शासन सेवेतील आरक्षणाबाबतच्या अहवालावर आज मंत्रिमंडळ बैठकीत
चर्चा करण्यात आली. महाराष्ट्र आरक्षण अधिनियम २००१ प्रमाणे अनुसूचित जाती, अनुसूचित
जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग यांना पदोन्नतीमध्ये आरक्षण
देण्यात आलं असून ते कायम ठेवण्यात यावं, असं मत सर्वोच्च न्यायालयातील याचिकेत मांडण्याचा
निर्णय घेण्यात आला.
****
सहकारी संस्थांच्या निवडणूका कोविड- १९ मुळे पूढे ढकलण्यात
आल्या होत्या. त्यामुळे बऱ्याचशा सहकारी संस्थांच्या समिती सदस्यांना नियमित
असल्याचं सरंक्षण देण्यासाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० मध्ये सुधारणा
करण्यास मंत्रिमंडळानं मान्यता दिली.
****
अकृषी विद्यापीठं आणि अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमधील
बिगर नेट सेट अध्यापकांना निवृत्तीवेतनाचा लाभ देण्याचा निर्णय राज्य
मंत्रिमंडळाने घेतला. जे अध्यापक २३ ऑक्टोबर १९९२ ते ३ एप्रिल २००० या कालावधीत
नियुक्त होते अशांना हे निवृत्तीवेतन देण्यात येईल.
****
राज्यातली सर्व अकृषी विद्यापीठं, अभिमत विद्यापीठं, स्वयंअर्थसहाय्यित
विद्यापीठं आणि त्यांच्याशी संलग्नित महाविद्यालयातले नियमित वर्ग पुढच्या बुधवारी,
२० ऑक्टोबरपासून सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री
उदय सामंत यांनी मंत्रालयात पत्रकार परिषदेत याबाबत घोषणा केली. हे वर्ग पूर्णपणे की
५० टक्के क्षमतेने सुरु करावे, याबाबत स्थानिक प्राधिकरणांशी विचारविनिमय करुन विद्यापीठांनी
आपल्या स्तरावर निर्णय घ्यावा, असंही सामंत यांनी सांगितलं आहे. कोविड प्रतिबंधक लसीच्या
दोन्ही मात्रा घेतलेले विद्यार्थी या वर्गांना प्रत्यक्ष उपस्थित राहू शकतील. ज्या
विद्यार्थ्यांनी लस घेतलेली नाही, त्यांच्यासाठी विद्यापीठाने संबंधित संस्थांच्या
मदतीने, जिल्हा प्रशासनाशी समन्वय साधून लसीकरणासाठी विशेष मोहिम राबवावी, शिक्षक तसंच
शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचंही लसीकरण प्राधान्याने करुन घ्यावं, असं सामंत यांनी सांगितलं.
****
शारदीय नवरात्र महोत्सवात आज उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तुळजापूर
इथल्या श्री तुळजाभवानी देवीची आज दुर्गाष्टमीच्या निमित्तानं महिषापूर मर्दिनी अलंकार
महापूजा मांडण्यात आली. देवीने महिषासुराचा वध केल्यामुळे देवीला महाअलंकार घालण्यात
येऊन महिषासुर मर्दिनी अलंकार महापूजा मांडण्यात येते. अशी आख्यायिका सांगितली जाते.
उद्या महानवमी निमित्त श्री तुळजाभवानी देवीची नित्योपचार पुजा केल्यानंतर अहमदनगरहून
येणाऱ्या पलंग पालखीची रात्री मिरवणूक काढण्यात येणार आहे.
****
कोल्हापूरच्या करवीर संस्थानचा ऐतिहासिक दसरा सोहळा यावर्षी
पारंपारिक पद्धतीनं साजरा होणार आहे. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी ही माहिती
दिली आहे. कोविड साथीचे नियम पाळून १५ तारखेला सायंकाळी श्री अंबाबाई, श्री तुळजाभवानी,
गुरु महाराज यांच्या पालखीसह हा सोहळा साजरा होणार असल्याचं शाहू महाराज यांनी प्रसिद्धी
पत्रकात नमूद केलं आहे.
****
आजादी का अमृत महोत्सवाअंतर्गत धुळे जिल्हा विधीसेवा प्राधिकरण
यांच्या संयुक्त विद्यमानं आज धुळे तालुक्यातल्या वणी गावात सायबर सुरक्षा आणि कायदे
विषय जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाचे सदस्य विधिज्ञ
चैतन्य भंडारी यांनी वणी गावातील लोकांना सायबर गुन्ह्यांविषयी माहिती देत प्रबोधन
केलं.
****
नांदेड जिल्ह्यातील देगलूर विधानसभा पोट निवडणूकीच्या उमेदवारी
अर्ज परत घेण्याच्या आज शेवटच्या दिवशी एकूण ९ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज परत घेतले
आहेत. यामुळे आता देगलूर विधानसभा पोट निवडणूकीच्या रिंगणात १२ उमेदवार उतरले आहेत.
यात काँग्रेसचे जितेश अंतापूरकर, भाजपचे सुभाष साबणे, धर्मनिरपेक्ष जनता दलाचे विवेक
केरूरकर, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार उत्तम इंगोले, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खोब्रागडे
डी. डी. वाघमारे, बहुजन भारत पार्टीचे उमेदवार परमेश्वर शिवदास वाघमारे यांच्यासह सहा
अपक्ष उमेदवार निवडणूक लढवत आहेत. या निवडणुकीसाठी येत्या ३० ऑक्टोबरला मतदान होणार
आहे.
दरम्यान, नांदेड वाघाळा शहर महापालिकेच्या महापौरपदी काँग्रेस
पक्षाच्या नगरसेविका जयश्री निलेश पावडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या पदासाठी
पावडे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला होता. मोहिनी येवनकर यांनी राजीनामा दिल्यामुळे
नांदेडचं महापौरपद रिक्त झालं होते.
****
लातूर जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गामुळे दोन्ही पालकांचा
मृत्यू झालेल्या पाच बालकांचं दायित्व स्वीकारून त्यांच्याशी संबंधितांच्या खात्यावर
पाच लाख रुपये शासनातर्फे जमा करण्यात आले आहेत. एकल पालक असलेल्या २८५ बालकांपैकी
२०८ बालकांची गृह चौकशी पूर्ण झाली असून उर्वरित बालकांच्या घरी भेटी देवून त्यांच्या
सुरक्षेची खात्री करुन घ्यावी, असे आदेश लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी
आज यासंदर्भातील बैठकीत दिले. जिल्ह्यात कोविड-१९ या आजारामुळे विधवा झालेल्या १४०
महिलांना एसओएस संस्थेमार्फत धान्य वाटप करण्यात आल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं.
//********//
No comments:
Post a Comment